Showing posts with label न्याहारी. Show all posts
Showing posts with label न्याहारी. Show all posts

Friday, April 15, 2016

Purnann Appe (पूर्णान्न अप्पे)

'वन डिश मील' म्हणजे जेवणासाठी एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही  हवा. रात्रीची वेळ असल्यामुळे पचण्यास हलका हवा. मसाले सुद्धा अतिशय कमी लागतात. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.  


साहित्य:
  • मुग डाळ- १ टीस्पून  
  • मसूर डाळ- १ टीस्पून  
  • चणा डाळ- १ टीस्पून  
  • तूर डाळ- १ टीस्पून  
  • उडीद डाळ- १ टीस्पून  
  • लसूण पाकळ्या- २
  • हिरवी मिरची- ३ ते ४ 
  • आल- १ इंच
  • जिरे- १/२ टीस्पून
  • बारिक चिरलेला पालक - १/२  कप
  • गाजर, सोलून व किसून-  १/२  कप
  • उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४  कप  
  • रोल ओटस- १/२  कप
  • रवा- १/२  कप
  • हिंग- १/४  टीस्पून
  • हळद- १/२  टीस्पून
  • दही- १/४ कप 
  • खाण्याचा सोडा- १/२  टीस्पून
  • पाणी- अंदाजे १/२  कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल- जरुरीप्रमाणे 

कृती:
  • सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
  • सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे.
  • वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
  • दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात  दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
  • ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा  थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे.
  • अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
  • त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे.
  • एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
  • छान टम्म फुगतात.  टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.


टीपा :
  • जर अप्पे पात्र नसेल तर या मिश्रणाचे उत्तपे करू शकता.
  • हे अप्पे गरम असतानाच खावे. पारंपारिक अप्पे फारसे खरपूस भाजून घ्यावे लागत नाहीत परंतु यात ओटस असल्यामुळे खरपूस भाजून घ्यावेत, नाहीतर गिळगिळीत लागतात.


Friday, February 26, 2016

मटारचे फलाफेल वापरून मराठमोळे पॉकेट सँडविच

नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही.
आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की. हे थोडस वेगळ आपण भाकरीच्या आत भरुया. खायला आणखी सोप्पं.

Read this recipe in English, click here.


(पिटा पॉकेट सँडविच हा मध्य-पूर्व आशिया मधील पदार्थ आहे. भाकरीप्रमाणे दिसणारा गोल फुगलेला आणि आतून पोकळ असणारा ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड. त्याचे दोन भाग करून त्यात हर्ब्स घातलेले दही, ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट लावतात. त्यात लेट्युस सारखी सलाडाची पाने, कांदा इत्यादी पसरवतात. सुक्या काबुली चण्यापासून भजी सदृश्य 'फलाफेल' त्यावर ठेवले कि झाले पिटा पॉकेट सँडविच)

वाढणी- ४
साहित्य:
मटारचे फलाफेल /वडे -
  • मटार - १ कप (मटारऐवजी हिरवा ओला हरभरा, ओले तूर वापरले तरी चालतील. मी सगळ्याचे वडे करून पाहिलेत. चवीत अगदी थोडासा फरक जाणवतो. पण सगळेच रुचकर लागतात.)
  • कांदा, बारीक चिरून- २ टेबलस्पून
  • कोथिंबीर- १/४ कप
  • आले- १/२ इंचाचा तुकडा
  • लसुण- ३ ते ४ पाकळ्या
  • जीरे- १/२ टीस्पून
  • बडीशेप- १/४  टीस्पून 
  • मिरची- १
  • मिरची पूड/लाल तिखट- १/४ टीस्पून
  • हिंग- चिमुटभर
  • मीठ- चवीनुसार
  • बेसन- २ ते ३ टेबलस्पून
  • तांदूळ पीठ- १ टीस्पून 
  • तेल- जरुरीनुसार
चटणी-
  • दही- १/४ कप
  • शेंगदाणे, भाजून सोललेले - २ टेबलस्पून
  • तीळ, भाजलेले- १/२ टीस्पून
  • लसुण- २ पाकळ्या
  • मिरची पूड- १/२ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार
इतर-
  • ज्वारी~बाजरी जाडसर भाकरी - २
  • पालकाची कोवळी ताजी पाने- १६
  • काकडी- १
  • कांदा- १
  • टोमॅटो- १

कृती:
मटारचे फलाफेल -

  • मटार, जीरे, बडीशेप, कोथिंबीर, आले, लसुण, मिरची एकत्र पाणी न वापरता मिक्सर मध्ये भरडसर वाटून घ्यावे. (कोथिंबीर, आले, लसुण, मिरची हे बारीक चिरून घ्यावे म्हणजे व्यवस्थीत वाटले जाते.)
  • एका वाडग्यात वरील वाटण, मीठ, हिंग, मिरची पूड, कांदा व बेसन एकत्र करावे.
  • सर्व एकत्र मळून त्याचे आवळ्याएवढे गोळे करावे. मध्यम ते मंद आचेवर तळावेत. किंवा थोडे चपटे करून दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस भाजून /शालो फ्राय करून घ्यावेत. (तळले तर जास्त रुचकर लागतात.)



चटणी-
शेंगदाणे आणि तीळ आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावेत. त्यातच दही, मीठ, मिरची पूड टाकून वाटून चटणी करावी.

वाढण्यासाठी रचना-
  • पालक धुवुन पुसून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या.
  • भाकरी भाजून झाली कि लगेच तिचे दोन तुकडे करून पापुत्रा सोडवून ठेवा.
  • त्या अर्ध्या भाकरीला आतुन चटणी लावा, त्यावर पालकाची ३-४ पाने पसरा. त्यावर काकडी-टोमॅटोच्या चकत्या पसरा. त्यावर हरभऱ्याचे ३ वडे ठेवून त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवा आणि थोडीशी चटणी शिंपडा. 
  • पटकन खाऊन टाका. नाहीतर नंतर मऊ पडेल.

टीप:
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर मटार/हरभरा/तूर  ब्लांच करून घ्या.  
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर बेसन थोडेसे भाजून घ्यावे म्हणजे बेसन कच्चट लागत नाही. 
  • वडे करताना बेसन ऐवजी भाजणी वापरली तरी चालेल.   


Thursday, September 3, 2015

Adai Dosa (अडाई डोसा)

अडाई डोसा पौष्टिक, प्रथिनयुक्त आणि लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. अडाई डोसा हा 'मिक्स डाळ डोसा' यापेक्षा वेगळा असतो कारण यात डाळीसह तांदूळ सुद्धा वापरतात.


Read this recipe in English.......click here.

साहित्य:
  • जाडा किंवा इडलीचा तांदूळ - 1½ कप
  • चणा डाळ- ½ कप
  • तूर डाळ - ¼ कप
  • उडीद डाळ- ¼ कप
  • मुग डाळ- ¼ कप
  • मसूर डाळ * - ¼ कप (ऐच्छिक)
  • मेथी दाणे * -  ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • कांदा किंवा मद्रासी छोटे कांदे, चिरून- 1 कप 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
  • कढीपत्ता, बारीक चिरून- 2 टेबलस्पून 
  • हिरवी मिरची, बारीक चिरून * - 2 टेबलस्पून (पर्यायी)
  • आले, किसून- 2 टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खवलेले- 2 टीस्पून 
  • हिंग- ¼ टिस्पून
  • हळद * - ¼ चमचा (ऐच्छिक)
  • लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी)- 10 (किंवा मिरची पूड- 2 ते 3 टिस्पून)
  • खायचा सोडा- चिमूटभर (ऐच्छिक)
  • मीठ - चवीनुसार
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • तांदूळ आणि सर्व डाळी धुवा. किमान 5 तास किंवा पूर्ण रात्रभर तांदूळ आणि डाळी  वेगवेगळ्या भिजत घाला. मेथी दाणे डाळीतच भिजायला टाका.
  • तांदूळ आणि लाल मिरच्या वाटून एक मोठ्या वाडग्यात काढा.
  • सर्व डाळी एकत्र जराश्या भरडसर वाटाव्या.  
  • वाटलेले तंदुलांनी डाळी एकत्र करा. 2 ते 5 तास पीठ आंबवण्यासाठी ठेवा किंवा वाटल्यावर लगेच डोसे केले तरी चालतात. पण थोड्यावेळ पीठ आंबवले तर डोसे हलके आणि रुचकर होतात.   
  • डोसे करायला घेण्यापूर्वी पीठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, खोबरं, हळद, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घालावा. ढवळुन मिक्स करावे. पीठ इडली सारखेच असावे. गरज असल्यास पाणी टाका.
  • तवा गरम करून आणि थोडे तेल पसरवा आणि पळीभर पीठ डोसा घाला. डोश्यापेक्षा जाड आणि उत्तप्यापेक्षा पातळ असा डोसा घालावा. 
  • डोश्याच्या बाजूने आणि वरून थोडे तेल सोडवे. मध्यम गॅस वर झाकण ठेवून १-२ मिनिट शिजवावे. मग डोसा पलटून आणि पुन्हा एक मिनिट शिजवावे.
  • टोमॅटो चटणी किंवा नारळाची हिरवी चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर हे डोसे गरमागरम सर्व्ह करा.

टिपा:
  • * असे चिन्हांकित केलेले साहित्य मुळ पाककृतीत नाहीत, मी चव वाढवण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते वगळले तरी चालेल.
  • डाळ-तांदूळ  वाटल्यावर लगेचच  डोसा करणार असाल तर बेकिंग सोडा वापरा,अन्यथा गरज नाही.  
  • जर चुकून पिठ पातळ झाले, तर बारीक रवा घाला. रवा घातल्यावर किमान अर्धा तास पिठात भिजला पाहिजे.
  • जाड डोसे आवडत नसतील तर पीठात थोडे पाणी घालून पातळ डोसे पण करता येतात.  
  • या डोश्याला 'पूर्णान्न' बनवण्यासाठी पीठात गाजर, कोबी, पातीचा कांदा, सिमला मिरची, पालक, शेवग्याची पाने किंवा शेपू सारख्या भाज्या घाला. चव तर वाढेलच सोबत पौष्टीकताही.  

Friday, December 5, 2014

Dudhi Muthiya (दुधी मुठीया)

दुधी मुठिया हा गुजराती पदार्थ अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.


Read this recipe in English, plz click here. 

साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा
गहू पीठ (कणिक)- १ कप
बारीक रवा - १ कप
बेसन- १ कप
आले- २ इंच
हिरव्या मिरच्या - 2
लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून
तीळ- १/२  टिस्पून
जिरे- १ टिस्पून
धणे पूड - १/२  टिस्पून
हळद - १/२  टिस्पून
हिंग - १/२  टिस्पून
बडीशेप- १/२  टिस्पून
लिंबू रस - २ टिस्पून
साखर- एक चिमूटभर
कोथिंबीर, चिरून- १/२  कप
खायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२  टिस्पून
मीठ-चवीप्रमाणे
तेल- २ टीस्पून

फोडणीसाठी:
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
कढीपत्ता- २ डहाळ्या
मोहोरी- १ टिस्पून
तिळ - २ टीस्पून
हिंग- १/४  टिस्पून

सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
दुधी किसून  आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.
दुधी, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ  परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. कणिक फार मऊ  नको आणि फार घट्टही  नको .
हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
स्टीलच्या चाळणीला  तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या. मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे.
वरून कोथिंबीर टाकुन सजवावे.  कैरीच्या किंव्हा नारळाच्या चटणी बरोबर गरम सर्व्ह करा.

Saturday, November 1, 2014

Tandul Ghavane (झटपट घावणे)

"घावणे" आमच्या कोकणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किव्हा जेवताना सुद्धा खाल्ले जातात. घावणे दोन प्रकारे केली जातात. रात्री तांदुळ भिजवुन सकाळी वाटुन त्याचे घावणे बनवायचे किंव्हा पुढे देत असलेल्या कृतीप्रमाणे तांदुळ पिठापासून झटपट घावणे बनवायचे.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे, फार बारीक दळू नये ) 
  • पाणी- १+ १/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे) 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंव्हा साजूक तूप - आवश्यकतेनुसार 

सूचना :
  • जाडा तांदूळ धुवून सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ, हलके आणि पांढरे शुभ्र होतील शिवाय बिघडण्याची शक्यता कमी होईल.
  • घावण्यासाठी पीठ ताजेच हव, जुन्या, रया गेलेल्या पीठाचे घावणे करताना तुटतात. 

कृती:
  • पीठ, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे. सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
  • नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील/तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. 
  • कडेने थोडेसे तेल सोडावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे. घावण डोश्यासारखे कुरकूरीत बनवू नका. 
  • गरम गरम घावणे नारळाची चटणी किंवा पिवळी सुकी बटाटा भाजीबरोबर मस्त लागतात. थंड झाले तरी चांगले लागतात. आम्ही नाश्ता मध्ये गूळ आणि तूपासोबत पण हे घावणे खातो. 
  • जेवणामध्ये मटण किंवा चिकन रश्यासोबत वाढतात. तसेच काळा वाटाणा किंव्हा चण्याच्या रश्यासोबत पण वाढतात. खरतरं हे कुठल्याही भाजीसोबत चांगले लागतात. 

टीपा:
  • चिमुटभर मेथी पूड टाकली तरी चालते, चांगली चव येते. 
  • ताक आणि मिरची घालून याचेच रुपांतर धिरड्यात होते. 

गोड पदार्थासाठी वापर: 
  • आमच्याकडे गणपतीत गौरी-शंकराला "घावण- घाटले" म्हणजेच  "घावणे- गुळवणी" याचा नैवेद्य दाखवला जातो. 
  • घाटले/ गुळवणी हे गूळ आणि नारळाचे दूध पासून बनवले जाते. बासुंदी सारखे दिसते. याची पाककृती मी नंतर देईन. 
  • उकडीच्या मोदकासाठी जसा आपण चव/सारण बनवतो, तो चव गरम घावण्यावर पसरून त्याची घडी घातली जाते. असे घावणे सुद्धा नैवेद्यात गोड पदार्थ म्हणून ठेवले जातात. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावणे बनवतात तेव्हा वरील जे प्रमाण दिले आहे त्यात १ टेबलस्पून गुळ टाकू शकता. त्यामुळे घावणे गोडसर लागतील. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावाने बनवतात तेव्हा तेलाऐवजी तूप आणि पाण्याऐवजी दुध किंव्हा नारळाचे दुध वापरले तर घावाने अजून रुचकर लागतील. 

Thursday, October 30, 2014

Jambhalya Kobicha Paratha (जांभळ्या कोबीचा पराठा)

मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी करावा लागणारा हा प्रकार …… 


Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • गहू पीठ- साधारण ३ कप  
  • जांभळा कोबी, बारीक चिरून किंवा किसून- २ कप (१ लहान आकाराचा कोबी) 
  • कांदा, बारीक चिरून- १ मध्यम 
  • हळद- १/४  टिस्पून 
  • हिंग- १/४  टिस्पून 
  • धणे पूड- १ टिस्पून 
  • तिळ- १ टिस्पून 
  • ओवा, खरडून- दिड टिस्पून 
  • जीरे - १ टिस्पून 
  • आले- 2 "तुकडा 
  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (आपल्या चवीनुसार) 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंवा बटर- २ टिस्पून + भाजण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती: 
  • पाणी न घालता आले, हिरव्या मिरची आणि जिरे भरड वाटावे. 
  • परातीमध्ये कोबी, कांदा, आलं-मिरच्याचा ठेचा, कोथिंबीर, धणेपूड, हळद, हिंग आणि मीठ एकत्र. हाताने चुरून चांगले मिक्स करावे आणि ५ मिनीटे तसेच राहू द्यावे. मुरून पाणी सुटते.   
  • त्यात गव्हाचे पीठ, तिळ, ओवा घालावे आणि मिक्स करावे.  
  • त्यात २ टिस्पून गरम तेल (मोहन) टाका. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालुन मळून घ्यावे. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. 
  • कणकेचे लहान गोळे करा.    
  • प्लास्टिकच्या कागदावर लाटा. लाटण्यासाठी प्लास्टिक कागद वापरल्याने जास्तीचे पीठ न वापरता पराठा लाटता येतो त्यामुळे भाजताना कमी तेल लागते. 
  • नॉन-स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. भाजताना कडेने थोडे थोडे तेल किंव्हा बटर सोडा. 
  • गरम गरम पराठा टोमॅटो केचप किंवा दही किंवा कोणत्याही लोणचे/चटणी बरोबर सर्व्ह करा. 

Tuesday, October 28, 2014

Tomato Omelette (टोमॅटो ऑम्लेट)

चटकदार आणि झटपट होणारा पदार्थ.……. 


साहित्य:
  • टोमॅटो, चिरून- ४ मोठे 
  • बेसन- १ कप 
  • तांदूळ पिठ- २ टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्या, चिरून- ३
  • लसूण पाकळ्या- ६
  • जिरे पूड- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून 
  • मिरपूड - १/४ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप 
  • तेल- आवश्यकतेनुसार तळण्यासाठी 
  • बटर, टोमॅटो केचप, पुदीना चटणी - आवश्यकतेनुसार
  • ब्रेड स्लाइस- ६

कृती:
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र मिक्सरमध्ये वाटा. पाणी वापरण्याची गरज नाही. पण गरज असल्यास, अगदी थोडेसे पाणी वापरा. 
  • या टोमॅटो रसात दोन्ही पीठे, हिंग, हळद, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड आणि मीठ घालून चांगले ढवळून मिक्स करावे. गुठळ्या राहू देवू नयेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
  • नॉनस्टीक तव्याला तेल लावून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस कमी करून एक डावभर मिश्रण तव्यावर घालून डावेनेच गोलाकार पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू भाजून खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू भाजावी. 
  • टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. (मुंबईला टोमॅटो ऑम्लेटबरोबर बटर लावलेला स्लाईस ब्रेड देतात, छान लागतो.)

Friday, September 26, 2014

Corn Dosa (मक्याचा डोसा)

डोश्याचा  एक आगळा-वेगळा प्रकार ……… मका नेहमी आपण भाजून किंवा उकडून खातो. फारफार तर काय भजी करतो. आता हे डोसे पण नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील.


Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • मक्याचे दाणे- २ कप (४ कणसापासून)
  • बेसन- पाव कप
  • बारीक रवा-२ टेबलस्पून
  • हिरवी मिरची, बारीक कुटून- ३ ते ४
  • आले, बारीक किसून- अर्धा इंच
  • कोथिंबीर, बारीक चिरून- पाव कप
  • जिरेपूड - १ टिस्पून
  • हळद - १/४ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
  • खायचा सोडा- चिमूटभर
  • तेल-  तळण्यासाठी, आवश्यकतेनुसार 

कृती:
  • थोडे पाणी घालून मक्याचे दाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत.  
  • मक्याच्या पेस्टमध्ये सर्व उर्वरित साहित्य एकत्र करा व चांगले ढवळा. जरुरीनुसार पाणी घालावे. मिश्रण डोसा पिठासारखे हवे. (थोडी आंबट चव हवी असल्यास पाण्याऐवजी ताक वापरावे.)  
  • १५ ते २० मिनिटे मिश्रण तसेच राहू द्या. 
  • नॉन-स्टिक डोसा पॅन गरम करा आणि थोडे तेल तव्याला लावा.  
  • पॅनवर एक पळीभर मिश्रण घालावे आणि गोलाकर चमचा फिरवून त्याचा डोसा बनवावा. 
  • डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडावे आणि डोसा दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावा.  अश्याप्रकारे सर्व उर्वरित डोसे करून घ्यावेत. 
  • पुदिना चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर गरम डोसा सर्व्ह करा. 

Tuesday, September 23, 2014

Corn Upama (मक्याचा उपमा )

मक्याचा सिझन असताना मक्याचे वेगवेगळे पदार्थ करून पाहावेत. आपल्या नेहमीच्या उपमाला बदल म्हणून छान लागतो. इंदूरला हा पदार्थ "मक्याचा कीस" म्हणून फार प्रसिद्ध आहे.  


Read this recipe in English....click here.

साहित्य: 
  • मक्याची कणसे (मी स्वीट कॉर्न वापरले आहेत) - ४ नग
  • हिरव्या मिरच्या, तुकडे करून -४ ते ५ 
  • आले, किसलेले- १ टिस्पून
  • मोहरी -१ टिस्पून 
  • हळद - १/२ टिस्पून 
  • हिंग -१/४ टिस्पून 
  • कढीपत्ता- १ डहाळी 
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून  
  • मीठ- चवीनुसार
  • ओले खोबरे,खवलेले - आवश्यकतेनुसार सजावटीसाठी 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
  • लिंबू - आवश्यकतेनुसार 
  • नायलॉन शेव - सजावटीसाठी 

कृती: 
  • मक्याची कणसे किसून घ्यावीत. दाणे वापरत असल्यास, पाणी न भरड वाटून घ्यावे. फूड प्रोसेसरमध्ये छान भरडता येते. 
  • नॉन -स्टिक कढईत तेल तापवावे. मोहोरी घालून तडतडली की चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, हळद, हिंग घालून फोडणी करावी.  
  • मक्याचा किस घालून परतावा. त्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. मीठ बेतानेच घालावे.  कारण कीस नंतर आळतो.  
  • झाकण ठेवून १० मिनिटे  मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • मिश्रण घट्ट होईल आणि पॅनच्या कडेने सुटू लागेल. याचा अर्थ उपमा शिजला आहे.  
  • बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. झाकून ठेवा.  
  •  गॅस बंद करा.  
  • ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून लिंबाच्या फोडी सोबत गरमागरम वाढा. 


टिपा: 
  • मी इथे अमेरिकन स्वीट कॉर्न वापरले आहेत. पण आपण भारतीय पांढरा कॉर्न वापरू शकता. 
  • अमेरिकन स्वीट कॉर्न मऊ व रसाळ असतात. म्हणजे त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे ते शिजायला सोपे असतात. 
  • भारतीय पांढरे कॉर्न कडक आणि कोरडे असतात त्यामुळे शिजायला सोपे नसतात. म्हणून त्यांना शिजवण्यासाठी १/४ कप  दूध वापरावे. 
  • भारतीय पांढरे मके अगोड असतात त्यामुळे आपण चिमूटभर साखर घालू शकता.  


Monday, July 21, 2014

Kokani Aambolya (कोकणी आंबोळ्या)

आंबोळ्या ह्या कोकण स्पेशल पाककृती पैकी एक म्हणाव्या लागतील. काही लोक धिरडे, घावण आणि आंबोळी एकच समजतात. पण तस नाही आहे. निदान आमच्या कोकणात तरी धिरडे, घावण आणि आंबोळी हे तीन वेगळे पदार्थ आहेत. घावणे फक्त तांदुळाच्या पिठापासून व पीठ न आंबवता केले जातात तर धिरडे बनवताना पिठात ताक, मिरची वै. घातली जाते आणि आंबोळ्या कश्या करायच्या ते पहा.
खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळेच ते डोश्यापेक्षा वेगळे लागतात. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते.  आंबोळीला छान जाळी पडते.


आंबोळीचे पीठ : 

  • भाकरीचे जाडे तांदूळ- ५०० ग्रॅम
  • उडीद डाळ- ५० ग्रॅम
  • मेथी दाणे- १/२  टीस्पून

गिरणीतून जाडसर/रवाळ/खसखशीत दळून आणावे.

साहित्य:

  • आंबोळीचे पीठ- १ कप
  • मीठ- चवीनुसार
  • पाणी- अंदाजे १+ १/४ कप (थोडस कमी-जास्त, डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे हव.)

कृती:

  • पिठात पाणी मिसळून सरसरीत भिजवावं व सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.
  • हे मिश्रण एका डब्यात भरून उबदार जागी रात्रभर ठेऊन द्यावे.
  • करतेवेळी मीठ घालून छान ढवळून घ्यावे.
  • नॉन-स्टीक तवा किंव्हा बीडाची "कावील" गरम करावी.
  • चमच्याने किंव्हा कांदा अर्धा कापून, त्याने तव्याला तेल लावावं. ऑईल स्प्रेचा सुद्धा वापर करता येईल. (माझी आई नारळाच्या शेंबीने कावीलला तेल लावायची.)
  • तवा चांगला गरम झाला कि वाटीने किंव्हा पळीने तव्याच्या कडे पासून मध्यापर्यंत हे मिश्रण गोलाकार ओतावे. (सविस्तर कृतीसाठी  "घावण" ची कृती वाचावी.)
  • झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. कडा सुटताच उलटे करावे व १-२ मिनिटे शिजू द्यावे.
  • आंबोळी तयार……… मटण रस्सा /कोंबडी रस्सा किंव्हा काळे वाटाणे आमटी / चणे आमटी सोबत खा. नारळाच्या चटणीसोबत पण मस्त लागते.



झटपट आंबोळ्या बनवायच्या असतील तर ……. 
  • १/२ कप जाडे तांदुळ, १ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे ४-५ तास भिजत घाला आणि वाटा. रात्रभर आंबू द्या. 
  • १ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे २ तास भिजत घाला आणि वाटा.  त्यात १/२ कप तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.  रात्रभर आंबू द्या. 
मी हे कमीत कमी प्रमाण दिले आहे ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात गुणुन वाढवावे . 




Sunday, January 19, 2014

Upavasache Thalipeeth (उपवासाचे थालीपीठ)

झटपट होणारं खुसखुशीत चविष्ट उपासाच थालीपीठ, माझी मुलगी तर या थालीपीठासाठीच उपवास करायला तयार असते......  


Read this recipe in English..... click here. 

उपवासाची भाजणी :
साबुदाणा - १ किलो
वरी तांदूळ  - १ किलो
राजगिरा - ५०० ग्रॅम
जीरे - १०० ग्रॅम

साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.
जीरे न भाजताच घालावे.
सर्व जिन्नस एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक करावे किंवा गिरणीतून सरसरीत दळून आणावे.

उपवासाची भाजणी बाजारात पण मिळते.  त्यापासून तुम्ही उपवासाचा उपमा, वडे  बनऊ शकता. 
आता आपण यापासून थालीपीठ कसे बनवायचे ते पाहू ……….    

साहित्य:
  • उपवासाची भाजणी - १ १/२ कप 
  • उकडलेले बटाटे- २ मध्यम 
  • शेंगदाण्यांचा कूट- २ ते ४ टेबलस्पून 
  • मिरची पूड- १ टीस्पून 
  • साखर- १/२ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • पाणी किंव्हा ताक - १/२ कप 
  • तेल किंव्हा तूप तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 

कृती:
उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
भाजणी, बटाटे, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
पाणी किंव्हा ताक घालून मळून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
नॉनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर  थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. 
दही किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते. 


Tuesday, November 12, 2013

Dudhi Parathe (दुधीचे पराठे)

दुधीची भाजी म्हटलं की अनेक जणांची नाके मुरडतात. पण दुधी सारखी पौष्टिक भाजी नाही. माझ्या मुलांना आणि त्यांच्या बाबांना सुध्दा ही भाजी  आवडत नाही. मग काय अशी हार  मानायची का? म्हणूनच त्यासाठी पराठ्यांचा पर्याय एकदम योग्य आहे. पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे ………….



साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा (साधारण किसल्यावर २ १/२ कप)
कणिक (गव्हाचे पीठ)- ३ कप 
बेसन- ४ टीस्पून 
हळद- १/२ टीस्पून 
हिंग- १/४ टीस्पून 
तीळ - २ टीस्पून 
हिरव्या  मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड- २ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
जिरे पूड किव्हा खरडलेलं जिरे - १ टीस्पून 
आले-लसूण वाटण (पेस्ट)- २ टीस्पून 
चिरलेली कोथिंबीर- १/४ कप 
मीठ- चवीप्रमाणे 
मळण्यासाठी तेल-  २ टेबलस्पून 
भाजण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार  



कृती:

दुधी भोपळा बियांसकट किसून घ्यावा. त्याला सुटलेले पाणी फेकून देऊ नये, त्यामुळे जीवनसत्वे नष्ट होतात. 
एका  काचेच्या बाउलमध्ये  कीस , आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग घेऊन ते ३ मिनिटे मायक्रो-व्हेव करावे. 
किंव्हा प्यांमध्ये २ टीस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग  परतून दुधी चा कीस ३-४ मिनिटे  शिजवावा. नंतर बेसन घालून ढवळून ग्यास बंद करावा.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीळ, मिरची पूड किव्हा ठेचा, कोथिंबीर व मीठ टाकावे.  छान एकत्र करून त्यात कणिक घालावे. जरूर वाटल्यास आणखी कणिक घालावयास हरकत नाही. पाणी अजिबात वापरू नये. तेल टाकून कणिक माळून घ्यावे. त्याचे सारख्या  बनवावे. 

लाटताना प्लास्टीक पेपर घेतल्यास पीठ  लागते, त्यामुळे भाजताना सुद्धा कमी तेल लागते. शिवाय पराठा लाटणे  जाते. 

तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लाऊन पराठे भाजून घ्यावेत. 
हे पराठे कच्च्या टोमाटोची चटणी, छुंदा, दही, चटणी, केचप किंव्हा  लोणचे ….  कश्याबारोबरही  छान लागतात.   






Thursday, August 8, 2013

Healthy Heart Dumplings (हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस )





Read this recipe in English...........

साहित्य:
  • रोल ओटस- १ कप
  • पाणी - ३/४ कप
  • कांदा, बारीक चिरलेला - २ टेबलस्पून
  • आलं, बारीक चिरलेलं - १ टेबलस्पून
  • गाजर, बारीक चिरलेलं - २ टेबलस्पून
  • शिमला मिरची, बारीक चिरलेली  - १ टेबलस्पून
  • मटार - २ टेबलस्पून
  • हिरवी मिरची,बारीक चिरलेली  - ४
  • कोथिम्बिर, बारीक चिरलेली  - २ टेबलस्पून
  • खवलेल ओल खोबर - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
  • मोहरी- १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • ऑलिव ओईल किंव्हा कुठलही तेल- ३ टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे


कृती :
  • एका प्यान मध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर  त्यात मिरची, कांदा आणि आल टाका. हळद आणि हिंग टाकून जरासं परता.  त्यात राहिलेल्या भाज्या आणि मीठ टाकून १-२ मिनिट परता. पाणी टाका आणि उकळी येऊ द्या.
  • त्यात ओटस टाका आणि व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. झाकण ठेऊन १ मिनिट वाफ काढा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडा.
  • पण एक लक्ष्यात ठेवा कि पाण्याचे प्रमाण हे ओटस पेक्षा कमीच असले पाहिजे अन्यथा मिश्रण चिकट बनेल.
  • नंतर त्यात कोथिंबीर आणि खोबर टाकून व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या .
  • त्या मिश्रणाचे सारखे गोळे करून इडली पात्रात  किंव्हा मोदक पात्रात ४ ते ५ मिनिट वाफवा. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये पण करू शकता.
  • टोमाटो केचप किंव्हा कुठल्याही चटणीसोबत गरमागरम वाढा. 


Sunday, July 28, 2013

Palak Mug Dosa (पालक मुग दलिया डोसा )

न्याहारी, मुलांच्या डब्यासाठी  छानसा आरोग्यदायी पदार्थ………  


Read this recipe in English........click here.

साहित्य:
सालवाली मुगडाळ- १/४ कप
दलिया (लापशी रवा)- १/४ कपबारीक रवा- १ टेबलस्पून
पालक, चिरून- १/४ कप
हिरवी मिरची- २ ते ३
लसुण पाकळ्या- २
जीरे- १/२ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १ टेबलस्पून
हिंग- चिमुटभर
तीळ- १ टीस्पून
खायचा सोडा - चिमुटभर
मीठ- चवीनुसार
तेल- आवश्यकतेनुसार


कृती:
मुगडाळ व दलिया धुऊन, रात्रभर किंव्हा किमान ४ तास पाण्यात वेगवेगळे भिजत घाला.
हि भिजलेली डाळ, पालकाची पाने, मिरची, लसुण, जीरे, साखर, दही आणि जरुरीनुसार पाणी एकत्र करून  मिक्सरवर वाटा. दलिया सुद्धा वाटून डाळीच्या मिश्रणात मिसळा.
त्या वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तीळ, सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. ते मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी तसच ठेवा म्हणजे रवा भिजेल.
डोसा तवा गरम करून थोडेसे तेल पसरवा. त्यावर डोसे करून घ्या.
नेहमीच्या डोश्याप्रमाणे  पातळ नको. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
टोमाटो केचप सोबत किंव्हा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत गरमागरम वाढा.

डाळीऐवजी अख्खे मुग वापरले तरी चालतील पण रात्रभर भिजवावे लागतील. 

Thursday, July 18, 2013

Sabudana-Variche Ghavan (साबुदाणा आणि वरीचे घावन)

उपवासासाठी उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ.......... 


Read this recipe in English.......

साहित्य:
वरी तांदूळ- १ कप
साबुदाणे - १/२ कप
उकडलेला बटाटा- १ मोठा
मिरच्या - ३ ते ४
जीरे - १ टीस्पून
खवलेल ओल खोबर-२ टेबलस्पून  (ऐच्छिक )
मीठ- चवीनुसार
तेल किंव्हा साजूक तूप- जरुरीनुसार
पाणी- जरुरीनुसार

कृती:
साबुदाणे आणि वरी धूऊन  वेगवेगळे भिजत घाला. पूर्ण बुडतील एवढ पाणी त्यात ठेवा. रात्रभर किंव्हा ४-५ तास तरी भिजू द्या.
वरी, मिरच्या, जीरे आणि ओल खोबर मिक्सरवर बारीक वाटून घ्या. साबुदाणे पण बारीक वाटून घ्या. उकडलेला बटाटा सोलून, किसणीवर किसून घ्या.
वरील वरी , साबुदाणा चे वाटलेले मिश्रण आणि किसलेला बटाटा, चवीनुसार मीठ टाका. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. डोश्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट हव.
नॉन-स्टिक तवा तापऊन थोडे तेल किंव्हा तूप घालून घावन करून घ्या.
काकडीच्या किंव्हा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत गरमागरम वाढा.

वरील मिश्रणात बटाटा घातला नाही तरी चालतो. पण मग ते घावन लगेचच खावे लागतात.  कारण नंतर ते चिवट किंव्हा कडक होतात. बटाट्यामुळे मऊ  राहतात. त्यामुळे डब्यात किंव्हा प्रवासाला सोबत नेऊ शकतो.





Monday, July 15, 2013

Thalipeeth (थालीपीठ)

थालीपीठ हा पदार्थ परिपूर्ण आहार आहे. मराठी माणसास त्याविषयी अधिक सांगणे न लगे. मी हा आपला पारंपारिक पदार्थ अधिक पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.




Read this recipe in English..........

साहित्य:
भाजणी - १ कप
कापलेला कांदा- १ कप (१ मोठा)
मिरची पूड किंव्हा घरगुती मसाला - १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तीळ - १ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप (किंव्हा आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
तेल- आवश्यकतेनुसार
पाणी- १/४ कप

कृती:
एका परातीत कांदा, कोथिम्बिर, मिरची पूड, हळद, हिंग, तीळ व मीठ एकत्र करावे व हाताने हलकेसे चुरून घ्यावे.
त्यात भाजणी आणि पाणी टाकून मळून  घ्यावे. त्याचे ४ समान भाग करावेत.
एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यावा. तो पोळपाटावर पसरून त्यावर गोल ठेऊन थापून घ्यावा. तेल सोडण्यासाठी भोक पडवीत. कपड्यासकट उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर टाकावा. शक्यतो नॉन-स्टीक तव वापरावा, तेल कमी लागत.
किंव्हा थंड तव्यावर थापून, तेल सोडून तवा ग्यासवर ठेवावा. भोकामध्ये व बाजूनी तेल सोडून थालीपीठ खमंग भाजून घ्यावे.
घराच्या लोण्यासोबत गरमागरम थालीपीठाची मजा काही न्यारीच असते.
मस्त घट्ट दही किंव्हा टोमाटो केचप सोबत वाढा.



Thursday, June 13, 2013

Egg Dosa (अंड्याचे घावन )

हा मसालेदार डोसा/घावन  खूपच रुचकर आणि किस्पी होतो. ह्यात अंड असल्यामुळे यशाची खात्री १०० % अजिबात मोडणार नाही.  


Read this recipe in English.....

साहित्य:

  • अंडी-२
  • तांदुळाचे पीठ- १ कप
  • बारीक चिरलेला कांदा- १/२ कप
  • बारीक चिरलेला टोमाटो - १/४ कप
  • बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
  • आल-लसुन पेस्ट- १ टीस्पून
  • हिरवी मिरची ठेचा- १ टीस्पून किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे
  • हळद- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • पाणी- अंदाजे १ कप
  • मीठ आणि मिरपूड -चवीप्रमाणे
  • तेल- आवश्यतेनुसार


कृती:

  • कांदा आणि टोमाटो फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेतलत तर छान बारीक होईल आणि मिळून येईल.
  • एका बाउल मध्ये पाणी व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा. पाणी लागेल तसे हळूहळू घाला.
  • व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण डोश्यासारख सरसरीत झाल पाहिजे. मिश्रण डोश्यापेक्षा थोडं पातळ चालेल. 
  • डोसा तवा गरम करून थोड तेल पसरवा. वाटीत मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओता. जास्त जाडसर करू नका. झाकण ठेऊन १-२ मिनिटे शिजू द्या.
  • उलटून घ्या. छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या .
  • गरमागरम घावणे केचप बरोबर वाढा.
  • चिकन किंव्हा कोलंबीच्या करी सोबत पण छान लागतात .


Saturday, May 25, 2013

Palak Oats Uttapa (पालक ओटस उत्तपा)

आम्हा आयांना ही नेहमीच चिंता असते कि मुलांना ओटस आणि पालक सारख्या पालेभाज्या कश्या खाऊ घालाव्या. मला वाटते कि हा त्यावरील एक उपाय आहे. शिवाय हा एक हेल्दी नाश्ता आहे.


Read this recipe in English.... click here.

साहित्य:
चिरलेला पालक - १ कप
चिरलेला कांदा- १/२ कप
ओटस- १ कप
बारीक रवा- १ कप
लसूण आणि मिरची ठेचा - ३ ते ४ टीस्पून
जिरे पावडर- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १/४ कप
खाण्याचा सोडा- चिमुटभर
पाणी- अंदाजे २ कप
मीठ चवीप्रमाणे
तळ्ण्यासाठी तेल

कृती:
एका बाउल मध्ये ओटस  आणि रवा गयाव. त्यात दही व पाणी घालून चांगले फेटावे. या एवजी २ कप आंबट ताक सुद्धा चालेल.
ते मिश्रण एक तासासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे. चांगले फेटून घ्यावे.
तव गरम करून त्यावर थोडे तेल घालावे. वरील मिश्रणाचे उत्तपे घालावे. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
टोमतो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.

ह्या मिश्रणाचे तुम्ही अप्पे सुद्धा करू शकता.
ह्यामध्ये पालक एवजी दुसऱ्या तुमच्या आवडीच्या भाज्या वापरता येतील.
लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक छान आणि झटपट प्रकार आहे. 

Tuesday, April 9, 2013

Coleslaw Sandwich (कॉलस्लो सँडविच)

 कॉलस्लो हा डच शब्द आहे. कॉल म्हणजे कोबी आणि स्लो म्हणजे सलाड.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
कॉलस्लो बनवण्यासाठी :
  • उभा चिरलेला कोबी- १ कप
  • उभा चिरलेला जांभळा कोबी- १ कप
  • उभी चिरलेली सिमला मिरची- २ टेबलस्पून
  • उभा चिरलेला गाजर-  १/४ कप
  • उभा चिरलेला कांदा- १/४ कप
  • थावझंट इसलंड (Thousand Island) स्प्रेड  - १/४  कप (बाजारात उपलब्ध आहे)
  • मीर पूड- १/२ टीस्पून 
  • चिली सॉस- १ टीस्पून
  • मस्टर्ड सॉस - १ टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे 
इतर साहित्य:
  • ब्राऊन ब्रेड स्लाइस- १०
  • बटर- जरुरीप्रमाणे
  • पनीर- १०० ग्रॅम
  • मीठ आणि काळी मिरी- चवीप्रमाणे
कृती:
  • वरील सर्व कॉलस्लो बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करावे.  कॉलस्लो तयार आहे. 
  • पनीरचे २ इंचाचे तुकडे करून थोड्याश्या तेलावर मिरपूड आणि मीठ टाकून परतून घ्यावेत. 
  • ब्रेडला दोन्ही बाजूला बटर लाऊन तव्यावर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. किंव्हा सँडविच टोस्टर वापरा.  
  • ब्रेडवर कॉलस्लो पसरून त्यावर पनीरचे तुकडे ठेवावेत व वर ब्रेडची दुसरी स्लाइस लावावी. 
  • पनीर एवजी टोफू किंव्हा चिकन वापरू शकता. 



Thursday, February 28, 2013

Takatale Ghavan (ताकातले घावन किंव्हा तांदळाचं धिरडं)

या घावण्याला धिरडे असेही म्हणतात. माझं बालपण मुरुड सारख्या एका गावात गेले. फारस बाहेरचं खायला मिळायचं नाही. आजच्या सारखे बिस्कीट, फरसाण वै. सारख्या पदार्थांनी डबे भरलेले नसायचे. खेळून आलो किंव्हा शाळेतून आल्यावर आई पटकन काहीतरी गरम गरम खायला करायची त्या पैकीच हा एक पदार्थ आहे. खरतरं न्याहारीचा हा पदार्थ पण केव्हाही खाता येण्यासारखा. 
     

Read this recipe in English......click here.

साहित्य:
तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम  असावे, फार बारीक दळू नये )
आंबट ताक- १/२ कप
पाणी- ३/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे)
लसुण पाकळ्या - ३ ते ४
जीरे- १ टीस्पून 
हिरव्या  मिरच्या- २
मेथी पूड- चिमुटभर  (ऐच्छिक) 
मीठ- चवीनुसार 
तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
मिरच्या, लसुण आणि जीरे खडबडीत वाटून घ्यावी. फार तिखट आवडत नसेल तर मिरची न वाटता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. म्हणजे सहज बाजूला काढता येतील.
पीठ, लसून-मिरचीचा ठेचा, ताक, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे.
सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. कडेने थोडेसे तेल सोडावे.
झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे.
गरम गरम टोमाटो केचप सोबत वाढावे अथवा नुसतेच खावे.