Thursday, April 21, 2016

Chitrann (चित्रान्न ~ कैरी भात)

चैत्र महिन्यातील खासीयत असलेल्या चित्रान्न या पदार्थाचे मुळ कर्नाटकात असले तरी हा भात महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातही बनवला जातो. दाक्षिणात्य 'लेमन राइस' च्या चवीशी साधर्म्य असणारा हा भाताचा एक प्रकार आहे. यासाठी शिळा भातही चालेल.

   


Read this recipe in English, click here.

साहित्य:
 • शिजलेला मोकळा भात- ३ कप (बासमती वापरण्याची गरज नाही, मी रोजच्या वापरातील 'कोलम' तांदुळ वापरला आहे. )  
 • कैरीचा कीस- १/२  ते १ कप 
 • खवलेले ओले खोबरे- १/४  कप 
 • हिरव्या मिरच्या, चिरून- २ ते ३
 • कढीपत्ता- १ डहाळी 
 • शेंगदाणे- मुठभर 
 • काजू तुकडे- १ टेबलस्पून (ऐच्छिक) 
 • चणाडाळ- १ टेबलस्पून 
 • उडीद डाळ- १ टीस्पून 
 • लाल सुक्या मिरच्या, तोडून- २
 • मोहरी- १ टीस्पून 
 • हिंग- १/४  टीस्पून 
 • हळद- १/२  टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार
 • साखर- चिमुटभर (ऐच्छिक) 
 • तेल- २  टेबलस्पून 
 • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४  कप 

कृती:
 • सडसडीत भात शिजवून घ्यावा. थंड झाल्यावर हलक्या हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात भाताच्या प्रमाणात मीठ घालून मिसळून घ्यावा.  
 • कढईत तेल गरम करावे. तेलात शेंगदाणे आणि काजू खरपुस तळून घ्यावेत. झाऱ्याने बाहेर काढून भातावर टाकावेत. 
 • त्याच तेलात मोहरी टाकावी, ती तडतडली की चणाडाळ व उडीदडाळ टाकून सोनेरी तपकिरी रंगावर तळून घ्यावी. 
 • त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे व कडीपत्ता टाकून जरासे परतावेत. 
 • त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि हिंग घालून जरासे परतावे. 
 • आता त्यात हळद, कैरीचा किस, साखर व जरास मीठ घालुन ३-४ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. 
 • त्यात खवलेले खोबरे घालून पुन्हा जरावेळ परतावे. 
 • आता त्यात शेंगदाणे व काजू घातलेला भात टाकून चांगला मिसळून घ्यावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी. 
 • नंतर त्यात कोथिंबीर टाकुन पुन्हा एकदा जरासा परतून घ्यावा. 
 • चित्रान्न तयार आहे. भात पापडासोबत वाढावा.        

टीपा:
 • मला स्व:ताला फारसे आंबट आवडत नाही त्यामुळे मी १/४  कप एवढाच कैरीचा किस वापरते. तुम्ही सुद्धा तुमच्या आंबटपणाच्या आवडीवर किसाचे प्रमाण ठरवा. 
 • कैरी आधीच चाखून बघा म्हणजे ती किती आंबट आहे हे कळेल, त्यावरून किसाचे प्रमाण ठरवा. 
 • भात फोडणीला घालताना तो पुरेसा थंड झाला असावा. 
 • शिळा भात संपवण्याचा एक रुचकर उपाय.
 • साखर जास्त घालू नका. हा साखरभात नाही.       
 • बदल म्हणून भाताऐवजी पोहे वापरावे. कांदे पोह्याला जसे पोहे भिजवतो तसे भिजवून वर सांगितलेली फोडणी करावी.       


Tuesday, April 19, 2016

Kairicha Moramba / Sakharamba (मोरांबा / साखरांबा)

मोरांबा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यालाच 'साखरांबा' असेही म्हटले जाते. काहीजण  कैरीच्या बारीक फोडी करतात पण आमच्या घरात किसलेल्या कैरीचा मोरंबा आवडतो.  Read this recipe in English...click here.

साहित्य:
 • कैरी - १ किलो /साधारण  ४ मध्यम (२ कप किस)  
 • साखर- ४ कप (यापेक्षा थोडी कमी-जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे)   
 • वेलची पूड- १ टीस्पून 
 • लवंग- ६ ते ८
 • मीठ- चिमुटभर 

कृती:
 • प्रथम कैऱ्या सोलून व किसून घ्याव्यात. कोय किंवा बाटा टाकून द्यावा. 
 • एका जाड बुडाच्या स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक भांड्यात कीस, साखर, मीठ व लवंगा एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण १ तास तसेच ठेवून द्यावे. त्यामुळे कैरीला भरपूर रस सुटतो.   
 • हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर ठेवून शिजवावे. लक्ष ठेवून मधून मधून ढवळत रहावे. 
 • साखर वितळून त्याचा पाक होऊ लागेल. पाक हळूहळू घट्ट होवू लागेल. २ तारी पाक झाला की गॅस बंद करावा.  मधाप्रमाणे पाक दिसेल.    
 • त्यात वेलची पूड घालावी आणि छान ढवळून घ्यावे.  
 • गार झाल्यावर निर्जंतुक व कोरड्या बरणीत भरून ठेवावा.
 • कोरड्या हवेत हा मोरंबा वर्षभर टिकतो. दमट हवामानात २ महिने बाहेर चांगला राहील पण नंतर फ्रीजमध्ये ठेवावा.   

टिपा :
शक्यतो राजापुरी कैऱ्या वापराव्यात. घट्ट व मांसल असणाऱ्या या कैऱ्या लोणचे व मोरांबा बनवण्यासाठी आदर्श मानल्या जातात.   

Friday, April 15, 2016

Purnann Appe (पूर्णान्न अप्पे)

'वन डिश मील' म्हणजे जेवणासाठी एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही  हवा. रात्रीची वेळ असल्यामुळे पचण्यास हलका हवा. मसाले सुद्धा अतिशय कमी लागतात. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.  


साहित्य:
 • मुग डाळ- १ टीस्पून  
 • मसूर डाळ- १ टीस्पून  
 • चणा डाळ- १ टीस्पून  
 • तूर डाळ- १ टीस्पून  
 • उडीद डाळ- १ टीस्पून  
 • लसूण पाकळ्या- २
 • हिरवी मिरची- ३ ते ४ 
 • आल- १ इंच
 • जिरे- १/२ टीस्पून
 • बारिक चिरलेला पालक - १/२  कप
 • गाजर, सोलून व किसून-  १/२  कप
 • उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४  कप  
 • रोल ओटस- १/२  कप
 • रवा- १/२  कप
 • हिंग- १/४  टीस्पून
 • हळद- १/२  टीस्पून
 • दही- १/४ कप 
 • खाण्याचा सोडा- १/२  टीस्पून
 • पाणी- अंदाजे १/२  कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
 • मीठ- चवीप्रमाणे
 • तेल- जरुरीप्रमाणे 

कृती:
 • सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
 • सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे.
 • वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
 • दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात  दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
 • ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा  थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे.
 • अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
 • त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे.
 • एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
 • छान टम्म फुगतात.  टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.


टीपा :
 • जर अप्पे पात्र नसेल तर या मिश्रणाचे उत्तपे करू शकता.
 • हे अप्पे गरम असतानाच खावे. पारंपारिक अप्पे फारसे खरपूस भाजून घ्यावे लागत नाहीत परंतु यात ओटस असल्यामुळे खरपूस भाजून घ्यावेत, नाहीतर गिळगिळीत लागतात.