Friday, September 26, 2014

Corn Dosa (मक्याचा डोसा)

डोश्याचा  एक आगळा-वेगळा प्रकार ……… मका नेहमी आपण भाजून किंवा उकडून खातो. फारफार तर काय भजी करतो. आता हे डोसे पण नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील.


Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • मक्याचे दाणे- २ कप (४ कणसापासून)
  • बेसन- पाव कप
  • बारीक रवा-२ टेबलस्पून
  • हिरवी मिरची, बारीक कुटून- ३ ते ४
  • आले, बारीक किसून- अर्धा इंच
  • कोथिंबीर, बारीक चिरून- पाव कप
  • जिरेपूड - १ टिस्पून
  • हळद - १/४ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
  • खायचा सोडा- चिमूटभर
  • तेल-  तळण्यासाठी, आवश्यकतेनुसार 

कृती:
  • थोडे पाणी घालून मक्याचे दाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत.  
  • मक्याच्या पेस्टमध्ये सर्व उर्वरित साहित्य एकत्र करा व चांगले ढवळा. जरुरीनुसार पाणी घालावे. मिश्रण डोसा पिठासारखे हवे. (थोडी आंबट चव हवी असल्यास पाण्याऐवजी ताक वापरावे.)  
  • १५ ते २० मिनिटे मिश्रण तसेच राहू द्या. 
  • नॉन-स्टिक डोसा पॅन गरम करा आणि थोडे तेल तव्याला लावा.  
  • पॅनवर एक पळीभर मिश्रण घालावे आणि गोलाकर चमचा फिरवून त्याचा डोसा बनवावा. 
  • डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडावे आणि डोसा दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावा.  अश्याप्रकारे सर्व उर्वरित डोसे करून घ्यावेत. 
  • पुदिना चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर गरम डोसा सर्व्ह करा. 

Tuesday, September 23, 2014

Corn Upama (मक्याचा उपमा )

मक्याचा सिझन असताना मक्याचे वेगवेगळे पदार्थ करून पाहावेत. आपल्या नेहमीच्या उपमाला बदल म्हणून छान लागतो. इंदूरला हा पदार्थ "मक्याचा कीस" म्हणून फार प्रसिद्ध आहे.  


Read this recipe in English....click here.

साहित्य: 
  • मक्याची कणसे (मी स्वीट कॉर्न वापरले आहेत) - ४ नग
  • हिरव्या मिरच्या, तुकडे करून -४ ते ५ 
  • आले, किसलेले- १ टिस्पून
  • मोहरी -१ टिस्पून 
  • हळद - १/२ टिस्पून 
  • हिंग -१/४ टिस्पून 
  • कढीपत्ता- १ डहाळी 
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून  
  • मीठ- चवीनुसार
  • ओले खोबरे,खवलेले - आवश्यकतेनुसार सजावटीसाठी 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
  • लिंबू - आवश्यकतेनुसार 
  • नायलॉन शेव - सजावटीसाठी 

कृती: 
  • मक्याची कणसे किसून घ्यावीत. दाणे वापरत असल्यास, पाणी न भरड वाटून घ्यावे. फूड प्रोसेसरमध्ये छान भरडता येते. 
  • नॉन -स्टिक कढईत तेल तापवावे. मोहोरी घालून तडतडली की चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, हळद, हिंग घालून फोडणी करावी.  
  • मक्याचा किस घालून परतावा. त्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. मीठ बेतानेच घालावे.  कारण कीस नंतर आळतो.  
  • झाकण ठेवून १० मिनिटे  मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • मिश्रण घट्ट होईल आणि पॅनच्या कडेने सुटू लागेल. याचा अर्थ उपमा शिजला आहे.  
  • बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. झाकून ठेवा.  
  •  गॅस बंद करा.  
  • ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून लिंबाच्या फोडी सोबत गरमागरम वाढा. 


टिपा: 
  • मी इथे अमेरिकन स्वीट कॉर्न वापरले आहेत. पण आपण भारतीय पांढरा कॉर्न वापरू शकता. 
  • अमेरिकन स्वीट कॉर्न मऊ व रसाळ असतात. म्हणजे त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे ते शिजायला सोपे असतात. 
  • भारतीय पांढरे कॉर्न कडक आणि कोरडे असतात त्यामुळे शिजायला सोपे नसतात. म्हणून त्यांना शिजवण्यासाठी १/४ कप  दूध वापरावे. 
  • भारतीय पांढरे मके अगोड असतात त्यामुळे आपण चिमूटभर साखर घालू शकता.  


Friday, September 19, 2014

Mathari (मठरी)

मठरी हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे. ते लोक आंब्याच्या लोणच्याबरोबर याची मजा लुटतात. आपण दिवाळीसाठी तिखट पुरीला किंव्हा खाऱ्या शंकरपाळीला बदल म्हणून या मठरी करू शकतो.


Read recipe in English......click here.

साहित्य:
  • मैदा- २ कप
  • वनस्पती तूप (डालडा)- १/२ कप
  • जीरे, जाडसर कुटून-१/२ टीस्पून
  • काळे मीरे, जाडसर कुटून-१ टीस्पून 
  • कलौन्जी (कांद्याचे बी)- १ टीस्पून 
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती:
  • मैदा चाळून घ्यावा.
  • त्यात सर्व मसाले आणि मीठ घालावे.
  • तूप कडकडीत तापऊन त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे.
  • थोडस थंड झाल्यावर हाताने हळूहळू चोळून तूप मैद्यात सारखे मिसळून एकजीव करावे.
  • मग लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून मैदा घट्ट भिजऊन घ्यावा.
  • थोडा वेळ तसाच झाकून ठेवावा.
  • नंतर पुन्हा चांगले मळून घेऊन त्याच्या छोट्या लाट्या कराव्यात.
  • जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात व काट्याने त्यावर टोचे मारावेत. (नाहीतर पुरीसारख्या फुगतील आणि नंतर मऊ होतील.) लांबडे आयताकृती तुकडे पण करता येतील.
  • तेल तापून घ्या. थोड्या थोड्या पुऱ्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा. तरच त्या खुसखुशीत होतील. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

Monday, September 15, 2014

Valache Birade (वालाचे बिरडे)

वालाचे बिरडे किंवा बिरडं म्हणजे आमच्या कोकणी माणसांचा विक पॉइंट. सणवार असो की कुठलाही समारंभ असो बिरडे हे हवेच. आमचे नैवेद्याचे ताट बिरड्याशिवाय अपूर्ण आहे. दर महिन्याला येणारी संकष्टी आणि बिरडे हे समीकरण तर अतूट आहे. आठवड्यातून एकदा आमच्याकडे बिरडे करावेच लागते. बिरडे सोलणे हा एक वैताग असला तरी बिरड-भाताचा पहिला घास तोंडात गेल्यावर सगळा वैताग विसरायला होतो. बिरड्याचा शिजताना येणारा वास, अनेकांना घरची आठवण देतो. असा आहे बिरड्याचा महिमा…

Read this recipe in English....click here.


पूर्वतयारी: 
बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मुग, चवळी या कडधान्यापासून बिरड केली जातात. पण अर्थात लोकप्रिय आहे ते "वालाचे बिरडे". कडवे वाल हे बिरड्यासाठी उत्तम समझले जातात.
आमच्या "पेणचे" कडवे वाल फारच चवदार असतात आणि म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत.
दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा बिरडे शनिवारी करायचे असेल तर गुरुवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
  • वाल पाण्यात रात्रभर किंव्हा १० ते १२ तास भिजत ठेवावे. खूप थंडी असेल तर कोमट (गरम नव्हे, नाहीतर मोड येणार नाहीत) पाण्यात भिजत ठेवावे. 
  • सकाळी पाणी काढून टाकून धुवून घ्यावेत, असे केल्याने नंतर वाल चिकट (बिळबिळीत)  होत नाहीत.  
  • सुती कापडात बांधून ठेवावे. हे गाठोडं एका डब्यात किंव्हा भांड्यात ठेऊन झाकून ठेवावेत. हे भांडे उबदार जागी (शक्यतो ओट्याच्या खाली) १६ ते २० तास ठेवावे. उष्ण हवामान असेल तर लवकर मोड येतील आणि थंड हवामान असेल तर अर्थात मोड यायला वेळ लागेल. 
  • करतेवेळी मोड आलेल्या वालांना कोमट पाण्यात किमान २ तास भिजवावे म्हणजे वाल पटापट सोलता येतात. बोटाच्या चिमटीत दाबून साले काढावीत.    

साहित्य:
  • वाल, मोड आणून सोललेले- २ कप (१ कप सुक्या वालापासून अंदाजे २ कप बिरडे/ डाळींब्या तयार होतात)
  • ओले खोबरे, खवलेले किंव्हा किसलेले- १/२ कप 
  • जीरे- १ टीस्पून 
  • लसुण पाकळ्या- ६
  • तेल-४ ते ५ टेबलस्पून 
  • मोहोरी- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/२  टीस्पून 
  • हळद-१/२ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ४ ते ५ टीस्पून (किंव्हा २  १/२ टीस्पून मिरची पूड/लाल तिखट + २ टीस्पून गोडा मसाला)
  • कांदा, चिरून- १ मध्यम 
  • गूळ- १/२ ते १ टीस्पून 
  • कोकम (आमसुलं)- ४ (किंव्हा घट्ट चिंचेचा कोळ- १ टीस्पून ) 
  • कोथिंबीर- २ टेबलस्पून 
  • मीठ-चवीनुसार


कृती:
  • ओले खोबरे, जीरे, लसुण पाकळ्या आणि थोड पाणी टाकून सर्व एकत्र वाटून घ्या. (फ्रीझरमधले खोबरे वापरणार असाल तर वाटणासाठी गरम पाणी वापरा.)  
  • एका भांड्यात तेल गरम करा. मोहोरी घालून तडतडू द्यावी. कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर हिंग, हळद आणि मसाला किंव्हा लाल तिखट घालून जरासं परतून लगेचच त्यात धुतलेले बिरडे/ डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोड पाणी घालावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
  • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
  • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.

दुसरी पद्धत : (ही आहे माझ्या आजीची पारंपारिक पद्धत आणि सी. के. पी. लोक सुद्धा हीच पद्धत वापरतात.)    
  • एका भांड्यात बिरडे/ डाळींब्या, तेल, कांदा, हिंग, हळद, मसाला किंव्हा लाल तिखट घालून थोड पाणी घालून छान एकत्र करावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
  • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
  • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.  

सूचना:
  • बिरड्याचे दाणे /डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने ढवळावे. त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. 
  • बिरडे अति शिजले तर त्याचा डाळी सारखा लगदा होईल. आणि मग तो चवीला अतिशय वाईट लागेल. 
  • बिरड्यात पाणी घालताना गरम पाणी वापरावे त्यामुळे बिरडे चांगले शिजते. झाकणाच्या ताटावरचे गरम पाणी वापरले तरी चालेल.   
  • काही लोक यात बटाटा घालतात, पण माझ्या मते त्यामुळे बिरड्याची चव बिघडते.     



  

Saturday, September 13, 2014

Malwani Dry Mutton Curry (मालवणी सुक्क मटण)





Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • मटण - १/२  किलो
  • आल-लसुण पेस्ट - २ टीस्पून 
  • हळद- १ टीस्पून 
  • हिंग- १/२ टीस्पून 
  • कांदा, बारीक चिरुन- १ मोठा 
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - ४ ते ६ टीस्पून  (आवडीनूसार कमी जास्त वापरा, मी ५ टीस्पून वापरला आहे ) 
  • गरम मसाला- २ टीस्पून
  • तेल- ६ टे.स्पून 
  • दालचिनी- १ इंचाचा तुकडा 
  • तमालपत्र- ३
  • भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून 
  • मीठ - चवीनुसार 

कृती:
  • मटण स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. मटणाला हळद, हिंग, आल-लसूण पेस्ट आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा तास मुरत ठेवा. 
  • कढई मध्ये तेल गरम करुन त्यात दालचिनी, तमालपत्र आणि कांदा टाकून गुलाबी होइस तो पर्यंत परता. 
  • आता मटन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता. 
  • मटणात थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित हलून घ्या. 
  • झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या. मधेमधे हलवत रहा. मटण पूर्णपणे शिजऊ नका, साधारणपणे ७५% शिजले पाहिजे.  (प्रेशर कुकरचा वापर केला तरी चालेल.)
  • मग मालवणी मसाला, गरम मसाला आणि वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. २० ते २५ मिनिट किंव्हा मटण शिजेपर्यंत मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
  • नंतर मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या. म्हणजे मटण छान फ्राय होऊन सुक्क होईल. 
  • गरमागरम भाकरी, चपाती, आंबोळी किंव्हा वड्यासोबत वाढा. 

टिप:
  • हे मटन कुकरमध्ये पण शिजवता येईल. पण बाहेर केलेल्या मटणाची चव काही न्यारीच असते. 
  • ह्या पद्धतीने कोंबडी पण शिजवता येईल. पण लक्ष्यात ठेवा, कोंबडी शिजायला कमी वेळ लागतो. 
  • खास मालवणी चवीसाठी हाच गरम मसाला (इथे क्लिक करा) वापरा. 





Tuesday, September 2, 2014

Jayfal Muramba /Jam (जायफळाचा मुरंबा /जॅम)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. एकदा माझ्या सासूबाईंनी विचार केला की मुरंबा पण बनवून पाहावा. लगोलग कृती करण्यात आली आणि सादर करत आहे हि जायफळे वापरून बनवलेला मुरंबा......आंबट-गोड चवीचा मुरंबा मस्त लागतो आणि जायफळाचा वासही येतो. या मुरंब्याला सुंदर लालसर रंग येतो.


Read recipe in English, click here.

जायफळाच्या फळाची ओळख:
हि आहेत जायफळाची फळे. मधोमध कापून घेतले असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. 
   
साहित्य:

  • कच्च्या जायफळाची फळे  - ६
  • साखर- अंदाजे ५०० ग्रॅम (जेवढा कीस, तेवढीच साखर घ्यावी)  
  • लवंगा- ५

कृती:

  • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाचा भाग किसून घ्यावा.
  • एका जाड बुडाच्या किंव्हा नॉन-स्टिक भांड्यात जायफळाचा कीस, साखर आणि लवंगा एकत्र करून मध्यम आचेवर शिजवावे.
  • सतत ढवळावे अन्यथा करपण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने साखर वितळू लागेल. साधारण अर्ध्या तासाने पाक घट्ट होऊ लागेल.
  • गॅस बंद करून मुरंबा थंड होऊ द्यावा. काचेच्या कोरड्या व स्वच्छ बरणीत मुरंबा भरावा.
  • चपाती किंव्हा ब्रेड बरोबर छान लागतो.

Monday, September 1, 2014

Pakatale Rava-Khobare Ladu (पाकातले रवा-खोबरे लाडू)

ओल्या नारळाचा वापर करून केलेले कोकणाची मधुरता असलेले रवा लाडू ........



Read this recipe in English.

साहित्य:
  • बारीक रवा- १ कप
  • ओले खवलेले खोबरे- १ कप  
  • पाणी- १/२ कप 
  • साखर- ३/४ कप ते १ कप 
  • साजूक तूप- १/४  कप 
  • वेलची पूड- १/२ टीस्पून 
  • चारोळ्या- १ टेबलस्पून 
  • मनुका/बेदाणे- १ टेबलस्पून 
  • बदाम,काजू,पिस्ता यांचे काप- १ टेबलस्पून (ऐच्छिक)


कृती:
  • रवा मंद ते मध्यम आचेवर तूपावर खमंग, गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. 
  • त्यात खोबरे टाकून अजून ४-५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यावे. रवा चांगला फुलाला पाहिजे नाहीतर लाडू कच्चट लागतात. 
  • रवा-खोबरे भाजून झाले की त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावेत व अजून थोडावेळ परतावे.  
  • पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. साखर वितळली की ३-४ मिनिटात पाक (एकतारी  पाक हवा) तयार होतो.  
  • गॅस बंद करून त्यात रवा व वेलची पूड घालावी.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.  
  • २-३ तासांनी मिश्रण आळून लाडू वळण्याजोगे होईल. मग लाडू वळावेत. 
  • लाडू जास्त दिवस ठेऊ नयेत. ओल्या खोबऱ्यामुळे लाडू लवकर खराब होतात.  ५-६ दिवसांपेक्षा जास्त राहिले तर फ्रीज मध्ये ठेवावेत.