Thursday, February 15, 2018

मेथीगोळ्यांची रस्सा भाजी

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा हि भाजी आवडीनं खातात असा अनुभव आहे. कडूपणा अजिबात जाणवत नाही. गरमागरम भाकरीसोबत तर मेथीगोळ्यांची रस्सा भाजी फारच छान लागते.



साहित्य -
मेथी गोळे बनवण्यासाठी:
  • बारीक चिरलेली मेथी - १ ते सव्वा कप
  • बेसन किंवा भाजणी- १/२ ते पाऊण कप
  • तीळ- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा लाल तिखट - १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • मीठ - चवीनुसार

रस्सा बनवण्यासाठी:
  • तेल - ३ टीस्पून 
  • मोहरी - १/२ टीस्पून 
  • जिरे - १/२ टीस्पून 
  • हिंग - १/२ टीस्पून 
  • हळद - १/२ टीस्पून 
  • कांदा- १ मध्यम (१/२ कप)
  • लसूण पेस्ट किंवा भरड - २ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंवा काळा मसाला - ३ टीस्पून किंवा ( १ १/२ टीस्पून मिरची पूड+ १ टीस्पून गरम मसाला + १/२ टीस्पून धणे पूड)
  • भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- १ टीस्पून (कारण हा रस्सा पातळच असतो आणि गोळ्यातील बेसन पण रश्श्यात उतरून थोडा घट्टपणा येतो.)
  • मीठ - चवीनुसार

कृती-
  • मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. चाळणीवर टाकून निथळुन घ्यावी व बारीक चिरून घ्यावी.
  • मेथी गोळे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. 
  • एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिऱ्याची फोडणी करावी. त्यात कांदा आणि लसुण घालून गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावे. 
  • त्यात हळद, हिंग, मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यावे. 
  • त्यातच खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • त्यात साधारण २ वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात मेथीचे छोटे छोटे गोळे एक-एक करीत सोडावेत. 
  • उकळी आल्यावर झाकून २-३ मिनिटे वाफवावे. 
  • गॅस बंद करून रस्सा झाकून ठेवावा म्हणजे रस्सा गोळ्यात मुरेल. गरमागरम ज्वारीच्या किंवा कुठल्याही भाकरीसोबत सर्व करावे. 
टिपा-
  • गोळे बनविताना त्यात तिखटाऐवजी वाटलेली हिरवी मिरचीही वापरता येइल. 
  • प्रथम गोळे तळून नंतर रश्श्यात सोडता येतील. 

Thursday, February 8, 2018

Popati (पोपटी)

पोपटी हा कोकणातला खरंतर  रायगड जिल्ह्यातला लोकप्रिय पार्टी पदार्थ....... देशावर हुरडा पार्टी, भरीत पार्टी होतात तश्या कोकणात हिवाळ्यात पोपटी पार्टी होतात. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत शेकोटीवर शेकत शेकत गरमा गरम पोपटीचा आस्वाद घेतला जातो.
पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटी करण्यासाठी लागणार्‍या साहित्यामधले लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात. पोपटी ही हिवाळ्यात तयार होणाऱ्या वालाच्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, तुरीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा व रताळी वापरली जातात.  हल्ली अंडी व चिकन टाकुनही पोपटी केली जाते व हि मांसाहारी पोपटी जास्त लोकप्रिय बनली आहे.




पोपटी खायला या.......

(फोटो बघून असं वाटलं असेल ना... एवढ्या मोठ्या मडक्यात एवढुसचं काय ते! दरवेळी ठरवते कि या वेळी चांगला फोटो काढायचा. आणि दरवेळेला होत काय मडकं ओतलं रे ओतलं की सगळे त्यावर तुटून पडतात.)

पोपटी कशी करायची ते पाहुयात.
सर्वप्रथम चिकन धुवून मीठ, आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट, मसाला (कोकणी, आगरी, कोळी, मालवणी किंवा  संडे असा कुठलाही मसाला चालेल.) मॅरीनेट करावं.  चिकनला चिरा पाडाव्यात म्हणजे मसाला आतपर्यंत मुरतो. २-३ तास तरी चिकन मॅरीनेट व्हायला  हवं.  नंतर केळीच्या पानात चिकन बांधुन त्याचे पॉकेट बनवावेत.


शेंगा धुवून मीठाच्या पाण्यात किमान अर्धा तास तरी बुडवून ठेवाव्यात. म्हणजे शिजल्यावर पचक्या लागत नाहीत आणि पाण्यात भिजवल्यामुळे शिजल्यावर सुकत नाहीत आणि पटकन करपत नाहीत. आम्ही वालाच्या आणि चवळीच्या शेंगा वापरतो.

भाजीत भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यावा. ताज ओल खोबरं, घरगुती मसाला, हळद, हिंग, ओवा, मीठ, कोथिंबीर आणि हिरवी मिरची+लसूण+जीरे याचे भरड वाटण हे सर्व एकत्र करून मसाला तयार करावा. हवं असल्यास या मसाल्यात लिंबूचा रस टाकला तरी चालेल.

कांदे, बटाटे, वांगी यांना अधिक च्या आकारात चिरा पाडाव्यात व त्यात वरील मसाला भरून घ्यावा.

रताळी धुवून मीठ चोळून ठेवा.

अंडी स्वच्छ धुवून घ्यावीत.

पाण्यात भिजवलेल्या शेंगा बाहेर काढून त्यावर खडे मीठ आणि ओवा टाकून घ्यावा.  वरील मसाला उरला असेल तर तो पण शेंगाना चोळावा.
पोपटीसाठी वापरली जाणारी मडकी पण पाण्यात भिजवून ओली करून घ्यावी. मडक्यात भरलेले आतील जिन्नस जळू/करपू नयेत म्हणून पूर्वीपासूनच एक विशिष्ट वनस्पतीचा/भांबुर्डीचा पाला वापरतात. भांबुर्डी ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.

मडक्यात तळाशी आणि मडक्याच्या सर्व भिंतीना सील केल्याप्रमाणे हा पाला पसरवायचा. त्यानंतर शेंगा, त्यावर भाज्या, रताळी त्यावर अंडी, त्यावर चिकनची पार्सल व वरून परत शेंगा आणि पुन्हा वरून भांबुर्डीचा पाला दाबून भरायचा आणि मडक्याच तोंड बंद करायचं. इतका तो पाला दाबून भरायचा कि आतले  जिन्नस बाहेर आलं नाही पाहिजे. शक्यतो आम्ही भाज्या आणि चिकन-अंडी भरलेली अशी वेगवेगळी मडकी करतो. 



पोपटी शिजवण्यासाठी मोठ्या शेकोटीसारखा जाळ आवश्यक असतो. म्हणून मोकळी जागा हवी. मोठ्या अंगणात किंवा शेतात, बागेत ही पोपटी पार्टी साजरी केली जाते.
मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी साधारण एक विताएवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात सुकलेला पाला-पाने किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.

आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, नारळाच्या झावळ्या किंवा गवत/पेंडा आणि शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावुन त्याला आग लावली जाते.


साधारण पाऊण तास लागतो पोपटी शिजायला. गुलाबी थंडी आणि बाहेरचा गार वारा अंगाला झोंबायला लागतो अश्यावेळी ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतघेत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात.
साधारण ४०-४५ मिनिटांनी खमंग, खरपूस सुवास येऊ लागला पोपटी तयार. जाणकारांकडे पोपटी तयार झाली कि नाही यासाठीच्या क्लुप्त्या पण असतात.  :)


आधी भांबुर्डीचा पाला काढून केळीच्या पानावर किंवा पेपरवर मडक रिकामं केलं जातं. 

आणि ..... आणि काय बस तुटून पडा. गरम असतानाच पोपटीचा आस्वाद घ्यायचा.