Showing posts with label दिवाळी फराळ. Show all posts
Showing posts with label दिवाळी फराळ. Show all posts

Wednesday, October 26, 2016

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

गोरी पान करंजी नावेसारखी दिसते,
पोटातले खाताच आणखी खावी वाटते!


Read this recipe in English, click here.

साहित्य:
रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार
पारी-

  • मैदा- १ कप (२ वाट्या)
  • बारीक रवा- १/२  कप (१ वाटी) 
  • मीठ- चिमुटभर 
  • गरम रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप (मोहन)- ५ टेबलस्पून 
  • दुध किंवा दूध+पाणी- अंदाजे १/२  कप  

सारण/चुरण-

  • बारीक रवा- १/२ कप (१ वाटी)
  • सुके खोबरे, बारीक खिसुन- १/२ कप (पाऊण वाटी ते १ वाटी)
  • पिठीसाखर- अंदाजे ३/४ कप (१ वाटी) ~ आपल्या चवीप्रमाणे थोडे कमी-जास्त घ्यावे पण सारण जास्त गोडच हवे, कारण नंतर करंजी खाताना ते बरोबर लागते.
  • खसखस- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • चारोळी- १ टेबलस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून
  • साजूक तूप- १ टीस्पून


कृती :

  • प्रथम खोबरे चुरचुरीत भाजून घ्या व हाताने बारीक चुरा, खसखस भाजून त्याची भरड पुड करावी, नाही केली तरी चालेल. 
  • १ टीस्पून तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. 
  • नंतर दिलेले सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. 
  • रवा-मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे व मोहन घालावे. थोडं थंड झाल्यावर सर्व पीठ हाताने चोळून घ्यावे म्हणजे सर्व पीठाला मोहन लागते. 
  • दुधाने घट्ट पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे किंवा फूडप्रोसेसरला बारीक तुकडे करून फिरवावे. 
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावे. 
  • त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. 
  • सारण भरून घ्यावे व पुरीच्या कडेला बोटाने जरासं दूध लावून घडी करून दाबावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातण्याने कापून घ्यावे. अश्या प्रकारे करंज्या तयार करून घ्याव्यात.  तयार कारंज्यावर ओले (भिजवून घट्ट पिळलेले) फडके ठेवा म्हणजे त्या सुकत नाहीत. 
  • कढईत तेल/तूप चांगले तापवून घ्यावे. मात्र करंज्या मध्यम ते मंद आचेवरच तळाव्यात. तळताना करंजीवर तेल घालत घालत तळावे. 
  • तळलेल्या करंज्या टिशु पेपर किंव्हा कोऱ्या पेपरवर पसरून ठेवाव्यात.
  • करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भराव्यात. 


टीप:
आम्ही सारण जरा जास्तच करून ठेवतो. कारण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा करंज्या कराव्या लागतात. सारण उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे, ६ महिने टिकते. पुन्हा करंज्या करायचा कंटाळा आला तर कणकेचे लाडू किंवा मेथीचे लाडू मध्ये घालावे.   

Friday, November 6, 2015

Khajurachya Vadya (खजुराच्या वड्या)

आरोग्यपूर्ण व नैसर्गिक गोडवा असणाऱ्या रुचकर …… खजुराच्या वड्या !


Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • खजूर - 500 ग्रॅम
  • काजू - ¼ कप
  • बदाम - ¼ कप
  • अक्रोड - ¼ कप
  • पिस्ता - 2 टेस्पून
  • काळ्या मनुका - 2 टेस्पून
  • खसखस - 1 टीस्पून
  • वेलची पूड - 1 टीस्पून
  • डेसिकेटेड कोकोनट (रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा चुंरा) - आवश्यकतेनुंसार
  • साजूक तूप - 1 टेबलस्पून

कृती:
  • खजुराच्या बिया काढून त्यांचे लहान तुकडे करा आणि मिक्सरवर भरडसर वाटून घ्या. 
  • मनुका चिरून घ्या.
  • काजू, बदाम व पिस्ता वेगवेगळे भाजून घ्या आणि अगदी बारीक तुकडे करा. 
  • खसखस ​​मंद आचेवर अगदी थोडी गरम करा. 
  • एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टिक भांड्यात तूप गरम करून खजूर टाकून त्याचा एकजीव गोळा होईपर्यंत परतून घ्यावा. सतत हलवावे नाहीतर खालून करपेल. 
  • मग त्यात भाजलेली खसखस व काजू, बदाम, पिस्ता, मनुका, वेलची पावडर घाला. मिश्रण व्यवथित मिक्स करावे आणि थोडे थंड होऊ द्यावे. 
  • मिश्रण कोमट असतानाच चांगले मळून घ्यावे आणि त्याचे दोन किंवा तीन भाग करावे. 
  • एका अॅल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिक शीट वर डेसिकेटेड कोकोनट पसरावे. 
  • खजुराच्या मिश्रणाचा एक भाग घेऊन त्याला दंडगोलाकार (रोल) आकार द्या. त्याप्रमाणे  इतर दोन रोलही तयार करा. 
  • तो रोल अॅल्युमिनियम फॉईल ठेवून घट्ट  गुंडाळून घ्या. आणि रोलच्या दोन्ही टोकांना चॉकलेट टॉफी प्रमाणे पीळ द्या. प्लास्टिक शीट वापरत असाल तर रोलच्या दोन्ही टोकांना धागा बांधून घ्या. 
  • 4-5 तास फ्रिजमध्ये हे रोल्स ठेवा.
  • चार तासानंतर वरील अॅल्युमिनियम फॉईल काढून इच्छित जाडी/रुंदी ठेवून रोलचे काप करा.

टिपा:
  • सुका मेवा मिक्सरला बारीक करू नये. भरड हवा. किंवा खलबत्त्यात कुटून घ्या.  
  • खजुराऐवजी अंजीर वापरून पण अश्याच वड्या करता येतात.  
  • मोदक मोल्ड वापरून याच मिश्रणाचे खजूर मोदक बनवता येतात. तसेच प्लास्टिक शीटवर हे मिश्रण सारख्या जडित लाटून घेवून कुकीज कटरने हव्या त्या आकारात वड्या पाडता येतात.  

Wednesday, November 4, 2015

खारी शंकरपाळी (Khari Shankarpali)

दिवाळीच्या फराळाचा अविभाज्य भाग पण इतर वेळीही संध्याकाळच्या चहाची रंगत वाढवणारी ……. खारी शंकरपाळी.


Read this recipe in English... click here.


साहित्य:
  • मैदा- २५० ग्रॅम 
  • मोहन- ४ टेबलस्पून 
  • मिरे, भरडून- १ टीस्पून (तिखट आवडत असल्यास प्रमाण वाढवणे) 
  • जिरे, भरडून- १ टीस्पून 
  • ओवा- १/२ टीस्पून 
  • मीठ- १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे 
  • पाणी- १/२ कप 
  • रिफाइंड तेल, तळण्यासाठी - जरुरीप्रमाणे 

कृती:
  • मैदा परातीत चाळून घ्यावा. त्यात कुटलेले जिरे व मिरे, ओवा आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. 
  • मोहन घालून आधी चमच्याने व नंतर हाताने पीठ चोळून मिक्स करावे. 
  • पाणी घालुन घट्ट कणिक मळावी. कणिक तयार झाली की ती १-२ तास झाकून ठेवावी. त्यामुळे कणिक लाटण्यायोग्य सैल होते. 
  • आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. (मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर कणकेचे छोटे छोटे तुकडे करून फूड-प्रोसेसर मध्ये फिरवुन घ्यावेत.) 
  • मग या कणकेचे मोठे गोळे करून ते चपातीप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. हि चपाती फार जाड नको आणि फार पातळही नको. (गोड शंकरपाळीपेक्षा पातळ हवी.) लाटण्यासाठी वरून मैदा लावण्याची आवश्यकता नाही. 
  • कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. झालेल्या शंकरपाळ्या आणि कणिक फडक्याने झाकून ठेवावे. 
  • सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की भरपूर तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. प्रखर(मोठ्या) आचेवर तळल्या तर बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे नंतर मऊ पडतात. 

टीपा:
  • या कणकेची शंकरपाळी ऐवजी कडक पुरी पण बनवू शकता. तळण्याआधी पुरीला टोचे मारून घ्या. 
  • मिरी ऐवजी लाल तिखट/मिरची पूड घालून तिखट शंकरपाळी बनवू शकता. 
  • कसुरी मेथी, तीळ, कलौन्जी, लसूण तसेच पालक, बीट किंवा टोमॅटो प्युरी असे वेगवेगळे जिन्नस वापरून चवीत वेगवेगळे प्रयोग करू शकता. 

Wednesday, October 15, 2014

Shankarpali (शंकरपाळी)

खुसखुशीत आणि करायला अगदी सोप्पी ………



साहित्य :
  • मैदा- ५०० ग्रॅम 
  • बारीक रवा- १०० ग्रॅम (१ वाटी) 
  • दुध- १ कप (दीड वाटी) 
  • साखर- १ कप (सव्वा वाटी) 
  • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- अर्धा कप (१ वाटी) 
  • मीठ- चिमुटभर 
  • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती:
  • एका पातेल्यामध्ये रवा, दुध, साखर व तूप एकत्र करून गरम करण्यास ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे. सतत हलवावे नाहीतर गुठळ्या होतील. या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करावा. मिश्रण पेजेसारखे (खिरीसारखे) दिसेल. 
  • मैदा परातीत चाळून घ्यावा. मधे खड्डा करून वरील मिश्रण त्यात ओतावे. हळू हळू कणिक मळून घ्यावी. घट्ट कणिक मळावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर अगदी थोडेसे पाणी किंव्हा दुध शिंपडावे आणि मळून घ्यावे किंव्हा पाण्याच्या हाताने मळावी. 
  • कणिक तयार झाली की ती १-२ तास झाकून ठेवावी. त्यामुळे कणिक लाटण्यायोग्य सैल होते. 
  • आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर कणकेचे छोटे छोटे तुकडे करून फूड-प्रोसेसर मध्ये फिरवुन घ्यावेत. (आमच्याकडे पाट्यावर कुटून घेतात म्हणजे कणिक सैल होते.) 
  • मग या कणकेचे मोठे गोळे करून ते चपातीप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. हि चपाती फार जाड नको आणि फार पातळही नको. लाटण्यासाठी वरून मैदा लावण्याची आवश्यकता नाही. 
  • कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. झालेल्या शंकरपाळ्या आणि कणिक फडक्याने झाकून ठेवावे. 
  • सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की भरपूर तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. प्रखर(मोठ्या) आचेवर तळल्या तर बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे नंतर मऊ पडतात. 
  • जोडीला दुसरे कुणी असेल एकाने लाटाव्यात, एकाने तळाव्यात . 

Wednesday, October 8, 2014

Chakalya (भाजणीच्या चकल्या)

चक चक चकली काट्याने माकली, तुकडा मोडताच खमंग लागली ……….किती चकलीची कौतुके तशीच तिची चव………. सर्वांना आवडणारी चकली !
माझ्या आजीची हमखास यशस्वी होणारी सोप्पी पाककृती, याप्रमाणे केल्यामुळे गेली १०-१२ वर्ष माझ्या चकल्या छान होतात.  


Read this recipe in English.....click here.

चकलीची भाजणी तयार करण्यासाठी:

साहित्य:
  • जुना जाडा तांदूळ - १ किलो (जाडा तांदूळ वापरल्याने भाजणी फुलते व चिकट होते)
  • चणाडाळ - ५०० ग्रॅम
  • उडीद डाळ - ५० ग्रॅम
  • मुग डाळ - २०० ग्रॅम
  • साबुदाणे - १०० ग्रॅम
  • पोहे - १०० ग्रॅम
  • जीरे- २५ ग्रँम
  • धणे - २५ ग्रँम

कृती:
  • तांदूळ, डाळी व इतर साहित्य चाळून आणि निवडून घ्या.
  • तांदूळ धुवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापड वर पसरुन सावली मध्ये दिवसभर खडखडीत वाळवा.
  • प्रत्येक डाळ वेगवेगळी (स्वतंत्रपणे) सोनेरी भुऱ्या रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावी. खमंग वास दरवळू लागला की झालं असे समजावे.  
  • तांदूळ सोनेरी भुऱ्या (पिवळट/फिक्कट तपकिरी) रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावेत. एक  दाणा दाताखाली चावावा,  कुरकुरीत झाला म्हणजे तांदूळ व्यवथित भाजले गेलेत. 
  • पोहे  मंद-मध्यम आचेवर नकरपवता सोनेरी भुऱ्या रंगावर एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. भाजण्यापुर्वी पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास येतो.  
  • साबुदाणा मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावा. साबुदाणा फुलतो म्हणजे झाला 
  • जिरे आणि धणे सुद्धा खमंग भाजून घ्यावेत.
  • सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले की गिरणीतून बारीक दळून आणावे.
  • चकल्या करताना प्रथम भाजणीचे पीठ चाळून घ्यावे.

आता मुख्य कृती पाहू या ….
एका वेळी खूप पीठ मळून घेऊ नका. पीठाची रया जाऊन चकल्या चांगल्या होत नाहीत.  थोड थोड पीठ मळून चकल्या बनवा. त्रास पण कमी होतो.

साहित्य:
  • भाजणी पीठ- २ कप
  • घरगुती मसाला किंवा लाल मिरची पूड - १ टेबलस्पून किंवा आवडीनुसार
  • तिळ - ३ टिस्पून
  • ओवा - १ टिस्पून (ऐच्छिक)
  • तेल (मोहन)- ३ टेबलस्पून
  • पाणी - अंदाजे १ कप (थोडे कमी-जास्त लागू शकते, पाण्याचे प्रमाण तांदळाच्या प्रतीवर तसेच तो नवा आहे कि जुना आहे यावर अवलंबून असते.)     
  • मीठ - १ टिस्पून किंवा चवीनुसार
  • तेल- तळण्यासाठी

कृती:
  • परातीत भाजणी, तिळ, ओवा, लाल तिखट आणि मीठ एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
  • लहान कढईत तेल गरम करावे. परातीतल्या पीठावर सगळीकडे गरम तेल (मोहन) घालावे. एकाच जागी घालू नये.
  • थोडे थोडे पाणी घेऊन कणिक भिजवावे. गरम पाणी वापरण्याची गरज नाही.
  • चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही.
  • सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. कागदाचे छोटे तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्यावर एक-एक चकली पाडावी. म्हणजे चकली उचलायला आणि कढईत सोडायला सोप्पे जाते. 
  • चकली सोडायच्या आधी तेल चांगले गरम असावे. चकल्या तेलात सोडल्यावर गॅस कमी करावा व मध्यम आचेवर चकल्या सोनेरी रंगावर खमंग तळून घ्याव्यात. एकावेळी फक्त ३-४ घालाव्यात, गर्दी करू नये.
  • हळूहळू चकल्या रंग बदलून व बुडबूडे बंद होवून खाली बसू लागतील. म्हणजे चकल्या झाल्या.
  • कढईतून चकल्या काढल्यावर अधिकचे तेल शोषण्यासाठी कागदावर पसरवाव्यात.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्याच्या तळाशी आणि मधेमधे कागद पसरऊन घालुन त्यावर चकल्या ठेवाव्यात. म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाते.  

सूचना:
  • चकलीसाठी दोन प्रकारच्या चकत्या येतात. एक छोटा स्टार आणि मोठा स्टार. तर छोटा स्टारची चकती वापरावी, कारण त्यामुळे चकल्या हमखास खुसखुशीत होतात. तळायलाही वेळ कमी लागतो.     
  • प्रथम एक-दोन चकल्या करून तळून घ्याव्यात. चाखून पहाव्यात. म्हणजे चवीचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे तिखट, मीठ व जरूर असल्यास धने-जिरे पूड घालावी.     
  • चकल्या खूप लालसर तळू  नयेत. कारण त्या कढईतून काढल्यावर पण थोडावेळ गरम तेलामुळे शिजत राहतात आणि थोड्या वेळाने काळपट लाल दिसू लागतात.
  • चकल्या मध्यम आचेवरच तळाव्यात.
  • चकल्या मोठ्या आचेवर तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील आणि बाहेरून करपतील. त्यामुळे त्या मऊ /वातड होतील आणि चवीला कडू लागतील.
  • चकल्या मंद आचेवर तळल्या तर त्या तेलकट आणि कडक होतात.
  • भाजणी बिघडली तर चकल्या बिघडतात. म्हणजे भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर चकल्या खुसखुशीत होत नाहीत आणि करपवले तर चकल्या कडवट लागतात.
  • चकलीचे पिठ प्रमाणापेक्षा नरम भिजवल्यास चकल्या  मऊ होतात अर्थातच त्या मळलेल्या पिठात थोडी भाजणी घालावी व त्या प्रमाणात तिखट-मीठ पण वाढवावे आणि पुन्हा मळून घ्यावे.
  • चकल्या पाडताना तुटत असल्यास, पिठ प्रमाणापेक्षा जास्त घट्ट झाले आहे पुन्हा पाण्याच्या हाताने मळून घ्यावे.
  • पिठात मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात घातल्यावर फुटतात.
  • उकडीच्या चकल्या  खुसखुशीत आणि चटकदार होतात यात शंकाच नाही पण मी दिलेल्या या पाककृतीमुळे चकल्या खमंग होतातच आणि उकडीच्या चकलीप्रमाणे खूप तेल पित नाहीत म्हणजेच फार तेलकट नाहीत. शिवाय उकडीच्या चकल्यांचा व्याप पण फार असतो, या चकल्या त्यामानाने झटपट होतात. 
  • काही लोक डाळी आणि तांदुळ दोन्ही धुवून घेऊन वापरतात. पण आमच्याकडे डाळी आणि तांदुळ दोन्ही न धुता भाजले जातात. मात्र डाळी आणि तांदुळ स्वच्छ असायला हव्यात. थालीपीठाची भाजणी करताना कुठे आपण धान्य धुवून घेतो? 
  • तुम्ही तांदूळ धुवून वापरू शकता. तांदूळ सुकावताना सावलीतच सुकवावे. पंख्याखाली सुकवले तरी चालतील. तांदूळ धुतल्यावर चाळणीत किंवा रवळीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळले की सुती कपड्यावर वाळत घालावेत. खडखडीत सुकवावेत.    
  • तांदूळ आणि डाळी धुवुन घेणे गरजेचे असेल पण जागेची किंव्हा वेळेची कमतरता असेल तर त्यासाठी एक टीप आहे. एक स्वच्छ सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवुन घटत पिळून घ्यावा. त्यावर क्रमाक्रमाने तांदूळ व डाळी चोळून पुसून घ्याव्यात. मात्र प्रत्येक जिन्नस चोळून पुसून झाल्यावर तो कपडा पाण्यातून आगळून पिळुन घ्यावा. नंतर पंख्याखाली धान्ये वाळवावीत आणि नंतर भाजावीत.            


काही लोकांना चकली दही किंव्हा लोण्यासोबत खायला आवडते. पण खर सांगू का, मला कशी आवडते ते. मला आवडते चहासोबत. मस्त कपभर गरमागरम चहा घ्यायचा, त्यात चकल्यांचे तुकडे टाकायचे आणि …… आणि काय गट्टम करायचे. आणि तो उरलेला मसालेदार चहा पण काय मस्त लागतो.  :)

Wednesday, October 1, 2014

Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा)

चिवडा हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय दिवाळी फराळ आहे. तो अनेक प्रकारे केला जातो, आज मी एक अत्यंत सोप्पी आणि पटकन होणाऱ्या चिवड्याची कृती देत आहे. 


साहित्य:
  • पातळ पोहे- ५०० ग्रॅम 
  • शेंगदाणे- अर्धा कप 
  • काजू तुकडा - पाव कप 
  • डाळ्या (पंढरपूरी डाळं) - पाव कप 
  • सुके खोबरे, पातळ काप करून- पाव कप 
  • मनुका (बेदाणे) - पाव कप 
  • लाल तिखट/मिरची पूड- २ टिस्पून 
  • कढीपत्ता- पाव कप 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग (हळद) - ¼ टिस्पून 
  • खसखस- 2 टिस्पून (ऐच्छिक) 
  • तीळ- १ टेबलस्पून 
  • धणे पूड- १ टिस्पून 
  • जीरे- 2 टिस्पून 
  • मोहरी- १ टिस्पून 
  • तेल- १० ते १२ टेबलस्पून 
  • पिठी साखर- ३ टिस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • पिवळी शेव- आवडीनुसार (ऐच्छिक) 

कृती:
  • पोहे हलक्या हाताने चाळून आणि निवडून घ्यावेत. 
  • कढीपत्ता धुवून, पुसून कोरडा करून घ्यावा. 
  • जाड बुडाच्या कढईत २-२ मुठी पोहे मंद आचेवर चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. पोहे चुरचुरीत झाले की नाही हे बघण्याकरता चिमटीभर पोहे हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे चुरचुरीत झाले असे समजावे.(किंव्हा २ दिवस चांगले कडक उन्हात वाळवले तरी चालतात.) 
  • भाजलेले पोहे वर्तमान पत्रावर पसरवून घ्या. 
  • त्यावर मिरचीपूड, धणे पूड, मीठ आणि पिठी साखर टाका आणि पोहे हलक्या हाताने हलवून चांगले मिक्स करा. 
  • मोठ्या आकाराचे पातेले घ्या. त्यात तेल गरम करावे. 
  • सर्वात आधी शेंगदाणे, काजू आणि खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तळून झाले की झाऱ्याने काढून भाजलेल्या पोह्यावरच पसरून टाकावेत. 
  • आता त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी. त्यात कढीपत्ता घालावा आणि तळून कुरकुरीत होऊ द्यावा. 
  • नंतर त्यात जिरे, तिळ, खसखस, डाळं, मनुका घालून परतावे. 
  • आता गॅस बारीक करून हळद, हिंग घालून चमच्याने मिक्स करावे. 
  • आता सर्व तळलेल्या साहित्यासह भाजलेले पोहे पातेल्यात घालावे आणि नाजूक हाताने पटापट ढवळावे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. 
  • हळूहळू सर्व साहित्य छान मिक्स होऊन पोह्याचा रंग बदलेल आणि पोहे खमंग होतील. त्यावेळी गॅस बंद करा. (नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद केल्यावर ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून ठेवणे. 
  • थंड झाल्यावर अतिशय खरपूस असा चिवडा तयार. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. 

टिपा:
  • पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास चिवड्याला येतो. तसेच प्रत्येक वेळी भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती स्वच्छ पुसून घेऊनच दुसरे पोहे भाजावेत. 
  • मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरच्या वापरू शकता. कढीपत्त्यासोबत फोडणीत टाका आणि कुरकुरीत तळून घ्या. 
  • लसूण, मिरची, कोथिंबीर एकत्र भरड वाटून घ्या. मिरची पावडर ऐवजी हा ठेचा वापरू शकता. मस्त चव येते. 
  • २ टिस्पून बडीशेप जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, एक वेगळाच स्वाद येतो. 
  • पाव टिस्पून लिंबू फुल (सायट्रिक ऍसिड) जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, थोडीशी आंबट चव येते. 
  • अंदाज चुकल्याने चिवडा खारट, तिखट किंव्हा तेलकट झालाच तर थोडे भणंग/कुरमुरे भाजून घालावेत.

Friday, September 19, 2014

Mathari (मठरी)

मठरी हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे. ते लोक आंब्याच्या लोणच्याबरोबर याची मजा लुटतात. आपण दिवाळीसाठी तिखट पुरीला किंव्हा खाऱ्या शंकरपाळीला बदल म्हणून या मठरी करू शकतो.


Read recipe in English......click here.

साहित्य:
  • मैदा- २ कप
  • वनस्पती तूप (डालडा)- १/२ कप
  • जीरे, जाडसर कुटून-१/२ टीस्पून
  • काळे मीरे, जाडसर कुटून-१ टीस्पून 
  • कलौन्जी (कांद्याचे बी)- १ टीस्पून 
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती:
  • मैदा चाळून घ्यावा.
  • त्यात सर्व मसाले आणि मीठ घालावे.
  • तूप कडकडीत तापऊन त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे.
  • थोडस थंड झाल्यावर हाताने हळूहळू चोळून तूप मैद्यात सारखे मिसळून एकजीव करावे.
  • मग लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून मैदा घट्ट भिजऊन घ्यावा.
  • थोडा वेळ तसाच झाकून ठेवावा.
  • नंतर पुन्हा चांगले मळून घेऊन त्याच्या छोट्या लाट्या कराव्यात.
  • जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात व काट्याने त्यावर टोचे मारावेत. (नाहीतर पुरीसारख्या फुगतील आणि नंतर मऊ होतील.) लांबडे आयताकृती तुकडे पण करता येतील.
  • तेल तापून घ्या. थोड्या थोड्या पुऱ्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा. तरच त्या खुसखुशीत होतील. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

Monday, September 1, 2014

Pakatale Rava-Khobare Ladu (पाकातले रवा-खोबरे लाडू)

ओल्या नारळाचा वापर करून केलेले कोकणाची मधुरता असलेले रवा लाडू ........



Read this recipe in English.

साहित्य:
  • बारीक रवा- १ कप
  • ओले खवलेले खोबरे- १ कप  
  • पाणी- १/२ कप 
  • साखर- ३/४ कप ते १ कप 
  • साजूक तूप- १/४  कप 
  • वेलची पूड- १/२ टीस्पून 
  • चारोळ्या- १ टेबलस्पून 
  • मनुका/बेदाणे- १ टेबलस्पून 
  • बदाम,काजू,पिस्ता यांचे काप- १ टेबलस्पून (ऐच्छिक)


कृती:
  • रवा मंद ते मध्यम आचेवर तूपावर खमंग, गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. 
  • त्यात खोबरे टाकून अजून ४-५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यावे. रवा चांगला फुलाला पाहिजे नाहीतर लाडू कच्चट लागतात. 
  • रवा-खोबरे भाजून झाले की त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावेत व अजून थोडावेळ परतावे.  
  • पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. साखर वितळली की ३-४ मिनिटात पाक (एकतारी  पाक हवा) तयार होतो.  
  • गॅस बंद करून त्यात रवा व वेलची पूड घालावी.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.  
  • २-३ तासांनी मिश्रण आळून लाडू वळण्याजोगे होईल. मग लाडू वळावेत. 
  • लाडू जास्त दिवस ठेऊ नयेत. ओल्या खोबऱ्यामुळे लाडू लवकर खराब होतात.  ५-६ दिवसांपेक्षा जास्त राहिले तर फ्रीज मध्ये ठेवावेत.


Friday, November 29, 2013

Mugache Ladu (मुगाचे पौष्टीक लाडू)

साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या ) डाळीच्या पीठापासून बनवले जातात.  परंतु मी (खरतरं माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून  हे लाडू अधिक पौष्टीक  बनवले आहेत.  

हे लाडू उपवासाला पण चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत. 


साहित्य:
  • सालवाली मुगाची डाळ- २५० ग्रॅम 
  • पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हांला कितपत गोड आवडत त्याप्रमाणात )
  • साजूक तूप- १२५ ग्रॅम 
  • बदाम पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • खारीक पूड-  १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • डिंक- २ टेबलस्पून 
  • काळ्या मनुका- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून 

कृती :

  • सालवाली मुगाची डाळ खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरवर दळावी. 
  • डिंक थोड्याश्या तूपात फुलवून (तळून ) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
  • एका जाड  बुडाच्या भांड्यात/कढईत किंव्हा नॉन-स्टिक प्यानमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन  मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम  ते मंद आचेवर (  जसे बेसन लाडू साठी बेसन भाजतो तसे ) भाजावे.  सतत हलवावे अन्यथा खालून जळण्याची भिती असते.
  • थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर  इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू बांधावेत.
टीप: साखर वापरायची नसेल तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.  

Saturday, November 2, 2013

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी फराळ

लक्ष दिव्यांनी उजळल्या दाही दिशा, घेऊन नवी उमेद नवीन आशा 
हि दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवारास सुखाची जावो हीच सदिच्छा!
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!




  दिवाळी फराळ: (पाककृती वाचण्यासाठी पाककृतीच्या नावावर क्लिक करा.)  


Tuesday, October 29, 2013

Besan Ladu (बेसन लाडू)

दिवाळीत तर करायलाच पाहिजेत असे बेसन लाडू ...........पण लांबच्या प्रवासात सोबत न्यायला सुद्धा उत्तम.
  

Read this recipe in English....... click here.

साहित्य:
  • चणाडाळ - ५०० ग्रॅम
  • साजूक तूप- २५० मिली  
  • पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
  • वेलचीपूड- २ टीस्पून 
  • बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)

कृती:
  • डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.)  
  • गिरणीतून दळून आणावी. 
  •  बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते  मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर  नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील. 
  • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.) 
  • बेसन पूर्ण गार होवू द्यावे. 
  • पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी. 
  • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव  घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी.  
  • नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
  • साजूक  वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात,  ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.

सुचना: 
  • जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ  होतात.
  • बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल.   
  • पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
  • किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
  • कधीही भाजलेले  बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या  तयार होऊन लाडू बिघडतात.      
  • घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.       


शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे  बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे. 

Thursday, April 25, 2013

चुरमा लाडू

गुजरात व राजस्थान मध्ये प्रसिध्द असलेले चुरमा लाडू खास तुमच्यासाठी……………


Read this recipe in English..... click here.

साहित्य :
  • रवाळ गहू पीठ (कणिक) - २ कप
  • साजूक तूप- २ टेबलस्पून + १/२ कप
  • साजूक तूप किंव्हा वनस्पती तूप - तळण्यासाठी
  • दुध- जरुरी नुसार
  • पिठी साखर - २ कप
  • वेलची पूड- २ टीस्पून
  • खसखस,भाजून- १/२ कप
  • मीठ - चिमुटभर

कृती:
  • परातीत कणिक आणि मीठ एकत्र करावे. २ टेबलस्पून तुपाचे मोहन घालावे. जसे लागेल तसे थोडे थोडे दुध घेऊन घट्ट कणिक भिजवावी.
  • वरील कणकेचे छोटे छोटे मुटके किंव्हा जाडसर पुऱ्या (पुऱ्या करणार असाल तर पुरीला टोचे मारा.) करून तुपात किंव्हा वनस्पती तुपात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. थंड करून घ्यावेत.
  • तळलेले मुटके हाताने फोडून खलबत्त्यात घालून कुटावेत किंव्हा मिक्सरवर जाडसर दळून घ्यावेत. 
  •  त्यात पिठी साखर, वेलची पूड आणि १/२ कप तूप कोमट करून घालावे. 
  • ते सर्व छान एकत्र करून लाडू वळावेत. वळून झाल्यावर खसखस मध्ये घोळून घ्यावेत. लाडू तयार.

कठीण वाटणारे लाडू प्रत्यक्षात किती सोपे आहेत, नाही का ?