Friday, August 28, 2015

Narali Bhat (नारळी भात)

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे नेहमी एकाच दिवशी असतं. नारळी पौर्णिमा आली की प्रथम आठवतो तो नारळी भात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात या दिवशी समुदात नारळ अर्पण करून पावसामुळे खवळलेल्या समुदास शांत करतात. कारण नारळ म्हणजे की शीत, सर्वांना शांत करणारा. नारळाचं दूध शरीरास खूप थंड असतं. काही वेळेला नारळीभात एक गोड पदार्थ जेवणात असावा म्हणून पण बनवला जातो.


Read this recipe in English......click here. 

साहित्य:
 • जुना तांदूळ (बासमती तुकडा किंवा आंबेमोहर) - १ कप 
 • पाणी- २+ १/४  कप (तांदूळ नवा असेल तर पाणी कमी वापरा.)   
 • साजूक तूप- ३ ते ४ टेबलस्पून 
 • लवंगा- ४
 • वेलची पूड- १/२  टीस्पून 
 • जायफळ पूड- १/२  टीस्पून 
 • गूळ, किसलेला- ३/४ कप ते १ कप 
 • ओले खोबरे, खोवलेले- २  कप  (१ मोठा नारळ) 
 • काजू, तुकडे करून- १/४ कप  
 • मनुका/बेदाणे (पिवळे किंवा काळे) - २ टेबलस्पून
 • केशर- चिमुटभर (ऐच्छिक) 
 • मीठ- चिमुटभर 

कृती:
 • तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत अर्धा ते एक तास निथळत ठेवावेत.
 • पातेल्यात २ टेबलस्पून तूप गरम करून लवंगा घालून काही सेकंद परता. 
 • निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परता.
 • तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर पाणी गरम करत ठेवा.  
 • गरम पाणी परतलेल्या तांदूळावर घाला. मीठ घालून ढवळून घ्या.  
 • पातेल्यावर झाकण ठेवून भात शिजवावा. भात शिजला की हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
 • भात शिजत असताना खोबरे, वेलची-जायफळ पूड आणि गूळ एकत्र  करावे. हलक्या हाताने चुरून घ्यावे.  
 • परतीतील भात कोमट असतानाच खोबऱ्याचे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
 • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या कढईत/भांड्यात तूप गरम करून काजू सोनेरी रंगावर तळून घ्यावे. मनुका टाकून जराश्या परताव्यात. 
 • लगेच आच मंद करून त्यात भात घाला. झाकण ठेवून साधारण १० ते १५ मिनीटे शिजवा. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. भांड्याखाली तवा ठेवल्यास करपण्याची भीती राहत नाही. आणि हळूहळू शिजल्यामुळे गुळ भातात चांगला मुरतो. 
 • सुरूवातीला भात पातळ होईल आणि काही वेळाने आळू लागेल.  
 • भात आळला की गॅस बंद करावा. झाकण ठेवून १५ मिनिटे तसाच ठेवावा. भात खुप कोरडा करू नये. थोडा आसट/ मऊ भात चांगला लागतो. फडफडीत/मोकळा भात चांगला लागत नाही.      

टीपा:
 •  मी भात करताना केमिकल विरहित नॅचरल गुळ वापरला आहे. हा गुळ गडद तपकिरी असतो. म्हणून भाताला तपकिरी रंग आला आहे. तुम्ही नेहमीचा पिवळा गुळ वापरू शकता.    
 • तुम्हाला जसे गोड आवडते त्या प्रमाणात गूळाचे प्रमाण पाऊण कप ते १ कप ठेवा.
 • तांदूळ पूर्णपणे शिजला पाहिजे. अन्यथा भात जर कमी शिजला असेल तर गुळ टाकल्यावर परतला तरी नंतर शिजत नाही. 
 • भात आळला की  नंतर शिजवू नये . भातातल्या गुळाचा पाक नंतर घट्ट होवू लागतो. त्यामुळे भात कडकडीत होतो. 
 • गुळाऐवजी तेवढीच साखर वापरू शकता. किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरा. 
 • विशेष करून साखर वापरल्यास भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो. चिमुटभर केशरी रंग टाकला तरी चालेल.  

दुसरी पद्दत:-
 • एका मोठ्या नारळाचे दुध काढावे.  (२ कप दुध हवे, तेवढे नसल्यास थोडे पाणी वाढवावे.) 
 • तांदूळ धुऊन निथळत ठेवून द्यावेत. 
 • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा, काजू परतून घ्यावेत. 
 • त्यातच तांदूळ टाकून थोडेसे परतवून घ्यावेत. 
 • त्यावर नारळाचं दूध व मीठ टाकून हलवावं.  
 • मंद गॅसवर भात शिजू द्यावा. 
 • भात पूर्ण शिजल्यावर त्यात किसलेला गूळ, केशर, मनुका, वेलची-जायफळ पूड टाकून मंद गॅसवर ठेवून मिश्रण हलवत राहावं. 
 • गूळ विरघळल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. 
 • भात आळला कि  गॅस बंद करावा.  


Tuesday, August 25, 2015

Bhajaniche Vade (भाजणीचे वडे)

भाजणीचे वडे अतिशय रुचकर लागतात. विशेषतः मंगळागौरीच्या नैवेद्याला करण्याची प्रथा आहे.


Read recipein English.........click here. 

साहित्य:
 • थालीपिठाची भाजणी- १ कप
 • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 
 • तीळ- १ टेबलस्पून
 • मिरची पूड- १ टिस्पून 
 • हिंग- १/४  टिस्पून
 • हळद- १/२  टिस्पून
 • ओवा- १ टिस्पून (ऐच्छिक)
 • मीठ- चवीनुसार 
 • गरम तेल (मोहन) - १ टेबलस्पून
 • कोमट पाणी- साधारण ३/४  कप
 • तेल,तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार 

कृती:
 • परातीत भाजणी, मिरची पूड, हळद, हिंग, तिळ, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ एकत्र करा.
 • त्यावर मोहन ओता आणि चमच्याने एकत्र करा. 
 • थोड थंड झाल्यावर कोमट पाणी घालून घट्ट मळुन घ्यावी आणि किमान १५ मिनिटे झाकून ठेवावी. 
 • तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवा. 
 • भिजवलेली भाजणी पुन्हा चांगली मळुन त्याचे १० ते १२ छोटे गोळे करावे.  
 • प्लॅस्टिकच्या कागदाला पाण्याचा हात लावून १ गोळा पुरी एवढ्या आकाराचा थापावा. मध्ये भोक पाडावे. 
 • गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळावा. अश्याप्रकारे सर्व वडे करून घ्यावेत.       
 • गरमगरम वडे दह्याबरोबर सर्व्ह करा.

टिपा:
 • भाजणी करताना धान्य व्यवस्थित भाजलेले नसेल तर, वडा खरपुस होत नाही.
 • वडे तळताना तुटत असतील तर, त्यात गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घाला आणि त्यानुसार तिखट-मीठाचे प्रमाण वाढवा. 
 • भोक पाडले नाही तर वडे पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.    
'थालीपीठ भाजणी' ची कृती वाचण्यासाठी ...... येथे क्लिक करा.

Saturday, August 22, 2015

South Indian Tomato Chutney (दक्षिण भारतीय पद्धतीची टोमॅटो चटणी)

टोमॅटो चटणी आंबट -तिखट, मस्त चटकदार लागते. हि चटणी इडली, डोसा किंवा अगदी पराठ्याबरोबर पण मस्त लागते.Read this recipe in English........click here. 


साहित्य:
 • टोमॅटो, चिरून- ३ मध्यम 
 • कांदा, चिरून- १/४ कप किंवा १ लहान 
 • तेल- १ टेबलस्पून
 • चणाडाळ- १ टिस्पून
 • उडीद डाळ- १ टिस्पून
 • सुक्या लाल मिरच्या (ब्याडगी), तोडून- २ ते ३
 • हिरवी मिरची, चिरून- १
 • आले, चिरून-, १/४  इंच
 • ओला नारळ, खवुन- २ टेबलस्पून किंवा भाजलेले शेंगदाणे- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
 • साखर- चिमूटभर (ऐच्छिक)
 • हिंग- १/४  टिस्पून
 • मीठ- चवीनुसार 
फोडणीसाठी:
 • तेल- १ टेबलस्पून
 • मोहरी- १  १/२  टीस्पून
 • सुकी लाल मिरची (ब्याडगी), तोडून- १
 • कढीपत्ता- ७-८ पाने 
 • हिंग- चिमूटभर

कृती:
 • एका नॉन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दोन्ही डाळी मंद आचेवर लालसर रंगावर परता.  
 • त्यात हिंग, लाल मिरच्या आणि जरासं परता.
 • त्यात आले, हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून १मिनिटभर परता.  
 • त्यात टोमॅटो आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. झाकण लावून टोमॅटो मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावे. करपू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहावे.  
 • आता त्यात साखर आणि खोबरं घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
 • मिश्रण पूर्णपणे थंड होवू द्या आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्सरला वाटून घ्या. वाटण्यासाठी पाणी वापरायची गरज नाही. एका वाडग्यात चटणी काढा.
 • कढल्यात/ फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहोरी टाका.
 • मोहरी तडतडल्यावर गॅस कमी करून त्यात लाल मिरची, कढीपत्ता घाला आणि काही सेकंद परता.
 • त्यात हिंग घाला आणि लगेच गॅस बंद करा. लगेचच चटणीवर फोडणी ओता, जरा वेळ झाकून ठेवा. 
 • वाढताना छान मिक्स करा आणि इडली, डोसा किंवा मेदूवडा, डाळवड्यासोबत सर्व्ह करा.
 • २-३ दिवस फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात घालुन ठेवू शकता.

टिपा:
 • ओले खोबरे आणि साखर हे चटणीच्या मुळ कृती मध्ये नाही.  पण मी ते माझ्या मनाने वापरले आहेत. त्यामुळे चटणीला जरासा गोडवा येतो व तिची चव वाढते. खोबरे किंवा शेंगदाणे वापरल्यामुळे चटणी एकजीव होते. आवडत नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास नाही वापरले तरी चालेल.
 • ब्याडगी मिरची फारशी तिखट नसते पण रंगला छान असते. ब्याडगी मिरची ऐवजी काश्मिरी मिरची वापरू शकता.
 • चटणी जास्त तिखट हवी असेल तर, टोमॅटो परतताना त्यात थोडेसे लाल तिखट घालावे. सुक्या मिरच्या उपलब्ध नसतील तर ३ सुक्या मिरची ऐवजी १ टीस्पून लाल तिखट/मिरची पूड वापरली तरी चालेल.  

Thursday, August 13, 2015

Solkadhi (सोलकढी)

सोलकढी म्हणजे कोकमाचा अर्क आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली चवदार, पित्तनाशक, भूकवर्धक व पाचक कढी. कोकम शीत प्रकृतीचे असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला चांगली. तसेच नारळाचे दुध नैसर्गिक ताण नाशक आहे.
कोकणातील जेवणात सोलकढीला अगदी माशांइतकच अढळ स्थान. सोलकढीशिवाय मांसाहारी जेवणाची सांगता होत नाही. शेवटी भाताबरोबर सोलकढी ओरपावी ही तर कोकणी माणसाच्या सुखाची परमावधी. पण मला तर सोलकढी नुसतीच प्यायला फार आवडते. सोलकढीची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते.
सर्व कोकणी हॉटेलांच्या मेनूत सोलकढी हमखास दिसते आणि आता तर सोलकढीनं पंचतारांकित हॉटेलातही अव्वल स्थान मिळवलं आहे.
साहित्य:
 • कोकमं/आमसुलं/सोलं- एक मूठभर / १० ते १२ (किंवा कोकम आगळ- ६ टेबलस्पून) 
 • ओले खोबरे- २ कप (१ मोठ्या नारळा पासून)
 • लसूण पाकळ्या- ४ 
 • हिरव्या मिरच्या- १ ते २ 
 • जिरे- १ टिस्पून 
 • मीठ किंवा सैंधव- चवीनुसार
 • गरम पाणी- साधारण ३ कप
 • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 

कृती:
 • कोकमं गरम पाण्यात ३० मिनिटे भिजत घाला. नंतर कोकमं त्याच पाण्यात घट्ट पिळुन घ्या. घट्टसर गडद गुलाबी रंगाचा रस तयार होईल. 
 • नारळ खवून घ्यावा. तळाकडील काळा भाग घेवू नये, पांढरे खोबरेच घ्यावे. 
 • मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खोबरे, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि कोमट पाणी एकत्र करा व वाटून घ्या. (चवीत बदल म्हणून आल्याचा छोटा तुकडा घातला तरी चालेल. मात्र मुळ पाककृतीत आल्याचा वापर नाही.) 
 • मोठ्या गाळण्याने किंवा जाळीच्या भांड्यामध्ये वरील वतन टाकून गाळून घ्या. 
 • उरलेला चोथ्यात कोमट पाणी घालून पुन्हा वाटून घ्या. पुन्हा गाळून घ्या. असे २ वेळा करा. (साधारण ३ कप नारळाचे दुध मिळेल. पातळ हवे असल्यास अजून थोडे पाणी घालावे. पण फार पातळ चांगले लागत नाही.)
 • ह्या नारळाच्या दुधात काढलेला कोकम रस किंवा कोकम आगळ आणि मीठ घालून एकत्र करा.
 • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
 • अर्धा ते एक तास फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.

टीप: 
 • कोकमाचे आगळ हल्ली सहजपणे मिळू लागले आहे, शक्यतो तेच वापरावे. त्यामुळे सोलकढी बनवण्याचा वेळही वाचतो आणि तिला सुंदर गुलाबी रंगही येतो.
 • आमच्याकडे 'कोकमाचे सार' पण बनवतात. त्याची कृती थोडी वेगळी आहे. ती नंतर कधीतरी ….    

Tuesday, August 11, 2015

Shiralyachi/Dodakyachi Bhaji (शिराळ्याची/ दोडक्याची भाजी)

शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. या मोसमात अगदी छान चव असते या भाजीला. आमच्याकडे एकूण चार-पाच प्रकारे (बटाटा घालून, चण्याची डाळ घालून, बिर्ड घालून, भरली शिराळी आणि मिरचीवर परतून) हि भाजी करतात. त्यातला एक प्रकार आज इथे देत आहे.


Read this recipe in English........click here. 

साहित्य:
 • शिराळी किंव्हा दोडके- ३ मध्यम (२५० ग्रॅम)
 • बटाटा- १ मध्यम
 • कांदा, चिरून- १ मध्यम
 • तेल- ३ टेबलस्पून
 • लसूण, ठेचून- ४ ते ६पाकळ्या
 • मोहरी- १ टिस्पून
 • जिरे- १/२ टिस्पून
 • हिंग- १/४ टिस्पून
 • हळद- १/२ टिस्पून
 • घरगुती मिश्र मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टिस्पून+ गोडा मसाला- १ टिस्पून)
 • गोडा मसाला- १ टिस्पून
 • गूळ- जरासा चिमूटभर (ऐच्छिक) 
 • मीठ- चवीनुसार
 • कोथिंबीर, बारीक चिरून- ३ टेबलस्पून 
 • ओले खोबरे, खवून- २ टेबलस्पून 


कृती:
 • शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. त्याचे साधारण १ ते १.५ इंचाचे तुकडे करा.   
 • बटाटा सोलून त्याचे अर्धा इंचाचे तुकडे करा. 
 •  नॉन -स्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी टाका. मोहरी तडतडली कि जिरे, चिरलेला कांदा आणि लसूण ठेचून टाका. 
 • कांदा गुलाबी होईपर्यंत चांगले परता व त्यात हिंग व हळद घाला.
 • त्यात घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर घालून मिक्स करा आणि जरासं परता.
 • त्यात बटाटे आणि थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करून झाकण ठेवा. मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजू द्यावे.
 • नंतर त्यात शिराळ्याचे तुकडे, गोडा मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा,  झाकण ठेवुन मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. साधारण ८-१० मिनिटे लागतात. (जास्ती पाणी वापरू नका. शिराळे शिजताना पाणी सोडते. अगदी आवश्यक असल्यास, फक्त पाणी शिंपडावे.) 
 • आता भाजीत गूळ, कोथिंबीर, खोबरे टाका आणि नाजूक हाताने छान मिक्स करून घ्यावे.  झाकण ठेवून एक वाफ काढा. 
 • चपाती किंवा डाळ-भात बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.


टीप:
साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल. त्याची चटणीही करतात.
शिराळ्याच्या /दोडक्याच्या सालांची भाजी: रेसिपीसाठी इथे क्लिक करा.