Showing posts with label चिकन. Show all posts
Showing posts with label चिकन. Show all posts

Friday, June 26, 2015

Chicken Popcorn ( चिकन पॉपकॉर्न्स)

घरी बनवलेले चिकन पॉपकॉर्न्स हे केएफसी पेक्षा जास्त चविष्ट लागतात आणि स्वस्तही. करायला सोप्पे आहेत मग करून पाहणार नं ? 




साहित्य:
  • बोनलेस चिकन- २५० ग्रॅम
  • कॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून 
  • अंड - १
  • लसूण पावडर- १/२  टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून 
  • कांदा पावडर- १/२  टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून 
  • मिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार 
  • मिक्स हर्ब्स- १/२  टिस्पून
  • मिरपूड- १ टीस्पून  किंवा चवीनुसार
  • Worcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
  • मक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप
  • तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • चिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.  
  • एक वाडग्यात  लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स  हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा. 
  • मिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे. 
  • नंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा.  
  • एका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा.  बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे. 
  • अश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.  
  • गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे.  

टिपा:
  • मक्याच्या पोह्यांचा चुऱ्याच्याऐवजी  ब्रेडक्रम्ब्स किंवा कॉर्न  फ्लेक्सचा चुरा वापरू शकता.
  • हेच चिकन पॉपकॉर्न्स भारतीय चवीत बनवायचे  असतील तर वर नमूद केलेले मसाले वापरण्याऐवजी  टिक्का मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घाला.

Friday, February 6, 2015

Crispy Chicken Tikka (ओवन बेक चिकन टिक्का)

चिकन लॉलीपॉप प्रमाणे चटकदार पण तळलेले नाहीत तर ओवन मध्ये बेक केलेले असे हे … चिकन टिक्का. 



Read this recipe in English......click here. साहित्य:
बोनलेस चिकन- ५०० ग्रॅम
लॉलीपॉप मसाला- 3 टेबलस्पून (सुपर मार्केट किंव्हा क्रॉफर्ड मार्केट मध्ये उपलब्ध) 

चिकनला लावण्यासाठी :
तेल- २ टीस्पून
मिरची पूड- १ टिस्पून 
काळी मिरी पूड- १/२  टिस्पून
आले-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार 

कृती:

  • चिकनचे तुकडे करून स्वच्छ धुवा.
  • चिकनला लावण्यासाठीचे सर्व साहित्य एकत्र करून  चिकनला चोळावे. 
  • चिकन एका डब्यात भरून १० ते २४ तास फ्रीजर मध्ये ठेवा. जेव्हा टिक्का करायचा असेल तेव्हा अर्धा तास आधी फ्रीजबाहेर काढा.
  • २०० डी. से. ला ( OTG नसेल तर कन्व्हेक्शन मोड वर किंव्हा ग्रिल मोड वर) ओवन १० मि. प्रीहीट करा.    
  • चिकनला सुटलेले काढून टाका. लॉलीपॉप मसाला लावुन चांगला चोळा.  
  • बेकिंग ट्रे किंव्हा ग्रिल रॅकवर  ते तुकडे मांडा व  २५ ते ३० मिनिटे बेक करा. पण १५ मि. चिकनच्या तुकड्यांची खालची बाजू वर करा म्हणजे दोन्ही बाजूंनी छान भाजले जातील.  
  • कोणत्याही सलाड आणि सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
  • मी इथे मेयो सलाड बरोबर सर्व्ह केले आहे.  


टीप:
मी येथे लॉलीपॉप  मसाला वापरला आहे पण आपण टिक्का मसाला किंवा तंदूर मसाला किंव्हा मिरची पूड+ गरम मसाला वापरू शकता. पण मग त्यात  १-२ टेबलस्पून कॉर्न स्टार्च घालणे आवश्यक आहे.

Wednesday, December 17, 2014

Shahi Chicken Korma (शाही चिकन कोरमा)

शाही चिकन कोरमा रोटी किंव्हा नानबरोबर छान लागतो. त्याची क्रिमी आणि घट्ट ग्रेव्ही चविष्ट लागते. हा फोटो जरा खराब आला आहे पण  चिकन कोरमाची चव अगदी उत्तम. :)



साहित्य:
  • चिकन- ७५० ग्रॅम 
  • कांदा, उभा चिरून -  २ मोठे 
  • वेलची- २
  • मसाला वेलची- २
  • तमाल पत्र- ४
  • लवंगा- २
  • काळी मिरी- ५
  • दालचिनी- २ इंचाचा तुकडा 
  • जीरे- १/२ टीस्पून   
  • जायपत्री - १
  • चक्रीफुल- २
  • तेल- ६ ते ७ टेबलस्पून 
चिकनला लावायचा मसाला-
  • दही- ३/४  ते १ कप 
  • लिंबाचा रस- १ टेबलस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/२ टीस्पून 
  • लाल मिरची पूड- २ ते ३ टीस्पून 
  • धणे पूड- १ टीस्पून 
  • गरम मसाला- १ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार  
शाही पेस्ट बनवण्यासाठी-
  • आले- १ इंच 
  • लसूण- ६ पाकळ्या 
  • हिरव्या मिरच्या- ४ ते ५
  • कोथिंबीर, चिरून -  मुठभर 
  • पुदिना पाने- १०
  • काजू- ५
  • बदाम- ५
  • तीळ-  १ टीस्पून 

कृती:
  • चिकन धूवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. 
  • चिकनला लावण्यासाठी जो मसाला तयार केला आहे तो चिकनला चोळून २-३ तासांसाठी मुरत ठेवावे.
  • काजू, बदाम व तीळ कोरडेच थोडेसे भाजुन घ्यावेत.  शाही पेस्ट बनवण्यासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये थोड्याश्या पाण्यासोबत बारीक वाटुन घ्यावेत.  
  • कढईत तेल गरम करून सर्व अख्खे गरम मसाले आणि कांदा घालून, तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. 
  • त्यात चिकन घालून कढईच्या बाजूला तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • नंतर शाही पेस्ट घालून नीट एकत्र करून तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • झाकण ठेवा आणि मंद आचेवर १५ ते २० मीनिटे किंव्हा चिकन शिजेपर्यंत शिजू द्या. (जास्तीचे पाणी घालू नका, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सुटेल व त्या पाण्यावर चिकन शिजेल.) मधेमधे ढवळा. 
  • वरून कोथिंबीर पेरून गरमागरम चिकन चपाती किंव्हा तंदुरी रोटी आणि जीरा राइस सोबत वाढा. 

Wednesday, July 23, 2014

Malwani Kombadi Rassa (मालवणी कोंबडी रस्सा/ कोंबडी-वडे)

"कोंबडी-वडे" या लोकप्रीय पदार्थातील "कोंबडी" म्हणजे कोंबडीचा रस्सा आणि वडे. तर मग पाहूया सर्वांचा आवडता असा झणझणीत, रुचकर कोंबडीचा रस्सा. नुसते वडेच नाही तर भात, भाकरी, चपाती, घावण, आंबोळी किंव्हा पाव कश्याही सोबत हा रस्सा चांगला लागतो ……. नक्की करून पहा !

 


साहित्य:
  • गावठी कोंबडी - १/२ किलो (ब्रोइलर चिकन पण चालेल)
  • कांदा, चिरुन- १/४ कप 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला किंवा संडे मसाला - ५ ते ६ टीस्पून (आवडीनूसार कमी जास्त वापरा) 
  • तेल- ४ टे.स्पून 
  • तमालपत्र- ६
  • मीठ - चवीनुसार 
हिरवं वाटण-
  • आल- २ इंच 
  • लसुण- ८ ते १० पाकळ्या 
  • हिरवी मिरची- १ ते २
  • कोथिम्बिर- २ टेबलस्पून 
सर्व एकत्र करून थोड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.

खोबऱ्याचे वाटण-
  • तेल- २ टीस्पून 
  • खवलेल ओल खोबर - १/४ कप 
  • किसलेले सुक खोबर-१/४ कप 
  • कांदा, चिरुन- १/४ कप 
  • लवंगा- ३
  • धणे- १/२ टीस्पून 
  • बडीशेप- १/४ टीस्पून 
  • खसखस- १/४ टीस्पून 
  • काळी मिरी- ६
  • जायपत्री- १ छोटी 
  • दालचिनी- २ इंचाचा तुकडा 
तेलावर सर्व खडे मसाले आणि कांदा टाकून १ मिनिट परतवा. त्यात खोबर टाकून खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर थोड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.

कृती:

  • चिकन स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. त्याला हळद, हिंग, मसाला, हिरवं वाटण आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा ते एक तास मुरत ठेवा.
  • कढई मध्ये तेल गरम करुन त्यात कांदा आणि तमाल पत्र टाका व कांदा गुलाबी होइस तो पर्यंत परता.
  • आता चिकन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता.
  • त्यात जरुरीप्रमाणे पाणी घाला. झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या.
  • मग वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. ३० ते ४५ मिनिट मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
  • मधेमधे हलवत रहा. जरुरीनुसार गरम पाणी टाका. झाकानावरचे टाकले तरी चालेल. चव घेऊन मिठाचे प्रमाण पहा. (पण लक्ष्यात ठेवा, नेहमीच्या चिकनपेक्षा गावठी कोंबडी शिजायला जास्त वेळ लागतो. )
  • गरमागरम रस्सा वडे, आंबोळी किंव्हा भातासोबत वाढा. 


टीपा :
  • रस्सा घट्ट हवा असेल तर खोबऱ्याचे प्रमाण वाढवले तरी चालेल पण त्या प्रमाणात थोडा मसालाही वाढवायला लागेल. 
  • नुसते ओले किंव्हा नुसते सुके खोबरे घेतले तरी चालते पण दोन्ही घेतल्यामुळे रस्सा चवीला चांगला लागतो. 
  • मालवणी मसाला बाजारात उपलब्द्ध आहे. अगदी आगरी-कोळी मसाला वापरला तरी चालेल. कोकणातले हे मसाले थोड्याफार फरकाने चवीला सारखेच असतात. मात्र घरगुती मसाले पदार्थाला जी चव देतात ते विकतचे मसाले देऊ शकत नाहीत.  
  • आमचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील असल्यामुळे माझा घरगुती मसाला हा मालवणी मासाल्यासारखाच आहे. नक्की वापरून पहा. 

पाककृती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
वडे : http://marathifoodfunda.blogspot.in/2013/08/blog-post_2.html
आंबोळी :http://marathifoodfunda.blogspot.in/2014/07/kokani-aambolya.html

Thursday, March 13, 2014

Chicken Kadhai (चिकन कढाई )

चिकन कढाई  वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यातली मला जी आवडते आणि करायला पण सोप्पी आहे अशी हि पाककृती ……… नक्की करून बघा.




साहित्य:
  • चिकन- ५०० ग्रॅम 
  • दही- १/२ कप 
  • आले लसूण पेस्ट- ३ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/२ टीस्पून 
  • लाल मिरची पूड- २ ते ३ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार  
  • कांदा, बारीक चिरून - १ कप (२ मध्यम )
  • टोमाटो, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम)
  • हिरव्या मिरच्या- २
  • मसाला वेलची- २
  • तमाल पत्र- ४
  • लवंगा- २
  • काळी मिरी- ५
  • दालचिनी- १ इंचाचा तुकडा 
  • जीरे- १/२ टीस्पून   
  • धणे पूड- १ टीस्पून 
  • गरम मसाला- १ टीस्पून ( ज्यामध्ये मिरची पूड नसेल असा आणि शक्यतो पंजाबी गरम मसाला वापरावा) 
  • कसुरी मेथी- १ टीस्पून 
  • तेल- ४ ते ५ टेबलस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून -  मुठभर 

कृती:
  • चिकन धूवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. 
  • चिकनला दही, आले लसूण पेस्ट, हळद, हिंग, लाल मिरची पूड, मीठ चोळून २-३ तासांसाठी मुरत ठेवावे.
  • कढईत तेल गरम करून सर्व अख्खे गरम मसाले आणि कांदा घालून, तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा. 
  • त्यात अख्ख्या मिरच्या व टोमाटो घालून मऊ होईपर्यंत परतावा. 
  • त्यात चिकन घालून कढईच्या बाजूला तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • नंतर गरम मसाला, धणे पूड घालून नीट एकत्र करून झाकण ठेवा आणि मंद आचेवर १५ ते २० मीनिटे किंव्हा चिकन शिजेपर्यंत शिजू द्या. (जास्तीचे पाणी घालू नका, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सुटेल व त्या पाण्यावर चिकन शिजेल.) मधेमधे हाताने ढवळा. मध्येच कसुरी मेथी हातावर चुरून त्यात घाला. 
  • वरून कोथिंबीर पेरून गरमागरम चिकन चपाती किंव्हा तंदुरी रोटी आणि जीरा राइस सोबत वाढा. पावाबरोबर पण मस्त लागत.