Friday, January 22, 2016

Aalepak (आले पाक / आल्याच्या वड्या)

लहानपणी एक आजोबा आलेपाक विकायला आणायचे. "सर्दी-खोकला, झटकन मोकळा" अशी त्यांची खणखणीत आवाजातली साद ऐकून आम्ही पटकन बाहेर यायचो. आजही 'आलेपाक' हा शब्द ऐकला की जुनी आठवण ताजी होते.  
आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.        


Read this recipe in English.....click here.

साहित्य: 
 • आले, सोलून व चिरून- १ कप
 • साखर- २ कप 
 • सायीसकट दुध- १/२  कप 
 • तूप- १ छोटा चमचा   

कृती:
 • आले अगदी थोडं पाणी वापरून गुळगुळीत मिक्सरवर वाटून घ्या. 
 • एका चौकोनी बर्फी ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या.    
 • एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये वाटलेले आले, साखर आणि दुध एकत्र करा. 
 • मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत रहा. हळूहळू साखर वितळून घट्ट होऊ लागेल. 
 • लक्ष्यपूर्वक ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल. याचा अर्थ ते तयार आहे. गॅस बंद करा.  
 • मिश्रण ट्रे मध्ये ओतून गरम  सुरीने चौकोनी तुकडे पाडा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या करा. 
 • हवाबंद डब्यात भरून ठेवा.    

Wednesday, January 13, 2016

Bhogichi Bhaji (भोगीची भाजी)

नव्या वर्षाचे स्वागत केल्यावर येणारा पहिला सण मकरसंक्रात ! महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्यांची एकत्र भाजी केली जाते…हीच ती भोगीची लेकुरवाळी भाजी.  
संक्रांतीच्या सुमारास म्हणजेच जानेवारी महिन्यात भाजीपाला व फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हेमंत ऋतूचे हे दिवस हे मस्त थंडीचे असतात. या काळाला धुंदुर मास असही म्हणतात. याकाळात नैसर्गिकरित्या खूप भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. त्यामुळे  थंडीमध्ये पोषक ठरतील, असे पदार्थ केले जातात.
बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे. बाजरी ही बलकारक, उष्ण, अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. थापताना वरून तीळ लावावेत. 
तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात. यासोबत दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे.

Read this recipe in English....click here. साहित्य:
 • वांग्याच्या फोडी - १/२ कप
 • बटाट्याच्या फोडी-  १/२ कप 
 • तुरीचे दाणे - १/४ कप 
 • मटारचे दाणे - १/४ कप 
 • वालाचे/पावट्याचे दाणे- १/४ कप 
 • ओल्या हरभऱ्याचे दाणे - १/४ कप 
 • ओले शेंगदाणे/भुईमुग- १/४ कप 
 • गाजराचे तुकडे - १/४ कप 
 • घेवडा, सोलून मोडलेला - १/४ कप 
 • शेवग्याचे ३ इंचाचे तुकडे, सोलून  - ६ नग 
 • तोंडली- १/४ कप 
 • पिकलेली घट्ट बोरे - ५ ते ६ नग *
 • उसाचे १ इंचाचे तुकडे, सोलून- ३
 • कोथिंबीर- मुठभर  
 • सुके खोबरे, किसून भाजून- १ टेबलस्पून 
 • तीळ - १ टेबलस्पून + १ टीस्पून 
 • शेंगदाणे, भाजून सोलून-  १ टेबलस्पून
 • चिंचेचा घट्ट कोळ - १ टीस्पून 
 • गूळ - चिमुटभर 
 • काळा मसाला / गोडा मसाला - १ टेबलस्पून
 • मिरची पूड / लाल तिखट - १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे 
 • मोहरी - १ टीस्पून 
 • जिरे- १ टीस्पून 
 • हिंग - १/४  टीस्पून 
 • हळद - १/२ टीस्पून 
 • मीठ - चवीनुसार
 • तेल - ४ ते ५ टेबलस्पून

कृती: 
 • सगळ्या भाज्या चिरून-निवडून व धुवून घ्याव्यात. 
 • तीळ खरपूस भाजावेत. थंड झाल्यावर तीळ, शेंगदाणे व सुके खोबरे एकत्र वाटून घ्यावेत. 
 • तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद फोडणी करावी. 
 • त्यात मिरची पूड घालून लगेच थोडे पाणी टाकावे. 
 • त्यात तुरीचे, मटारचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, पावट्याचे दाणे, शेंगदाणे घालून ५ मिनिट मंद आचेवर वाफवावे. 
 • नंतर गाजर, वांगे, घेवडा, उस आणि शेवगा घालून शिजवावे. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. मध्ये मध्ये हलवावे. 
 • भाज्या शिजत आल्या की त्यात बोरे, कोथिंबीर, तयार केलेला कूट, काळा मसाला, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून मिक्स करावे. जरूर असल्यास पाणी शिंपडावे. एक वाफ आणावी. 
 • गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर भाजीचा आस्वाद घ्या. शिवाय जोडीला मुगाची खिचडी, ताकाची कढी आणि तीळाची झणझणीत चटणी हवीच. 


 
टिपा: 
 • भाजीला फार रस्सा ठेवायचा नाही, अंगाबरोबर रस्सा ठेवा.   
 • ज्या भाज्या आवडत असतील आणि उपलब्ध असतील त्या वापरा, आवडत नसतील त्या वगळा. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे.
 • वालपापडी व मुळ्याचे तुकडे पण घालू शकता. 
 • सुक्या खोबऱ्याऐवजी खवलेले ओले खोबरे पण वापरू शकता. अगदी शेवटी कोथिंबीर बरोबर घालावे.