मक्याचा सिझन असताना मक्याचे वेगवेगळे पदार्थ करून पाहावेत. आपल्या नेहमीच्या उपमाला बदल म्हणून छान लागतो. इंदूरला हा पदार्थ "मक्याचा कीस" म्हणून फार प्रसिद्ध आहे.
Read this recipe in English....click here.
साहित्य:
- मक्याची कणसे (मी स्वीट कॉर्न वापरले आहेत) - ४ नग
- हिरव्या मिरच्या, तुकडे करून -४ ते ५
- आले, किसलेले- १ टिस्पून
- मोहरी -१ टिस्पून
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग -१/४ टिस्पून
- कढीपत्ता- १ डहाळी
- तेल- ३ ते ४ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
- ओले खोबरे,खवलेले - आवश्यकतेनुसार सजावटीसाठी
- कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
- लिंबू - आवश्यकतेनुसार
- नायलॉन शेव - सजावटीसाठी
कृती:
- मक्याची कणसे किसून घ्यावीत. दाणे वापरत असल्यास, पाणी न भरड वाटून घ्यावे. फूड प्रोसेसरमध्ये छान भरडता येते.
- नॉन -स्टिक कढईत तेल तापवावे. मोहोरी घालून तडतडली की चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, हळद, हिंग घालून फोडणी करावी.
- मक्याचा किस घालून परतावा. त्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. मीठ बेतानेच घालावे. कारण कीस नंतर आळतो.
- झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
- मिश्रण घट्ट होईल आणि पॅनच्या कडेने सुटू लागेल. याचा अर्थ उपमा शिजला आहे.
- बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. झाकून ठेवा.
- गॅस बंद करा.
- ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून लिंबाच्या फोडी सोबत गरमागरम वाढा.
टिपा:
- मी इथे अमेरिकन स्वीट कॉर्न वापरले आहेत. पण आपण भारतीय पांढरा कॉर्न वापरू शकता.
- अमेरिकन स्वीट कॉर्न मऊ व रसाळ असतात. म्हणजे त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे ते शिजायला सोपे असतात.
- भारतीय पांढरे कॉर्न कडक आणि कोरडे असतात त्यामुळे शिजायला सोपे नसतात. म्हणून त्यांना शिजवण्यासाठी १/४ कप दूध वापरावे.
- भारतीय पांढरे मके अगोड असतात त्यामुळे आपण चिमूटभर साखर घालू शकता.
khup chhan .. nakki karen
ReplyDelete