Showing posts with label कोशिंबीरी आणि सलाड. Show all posts
Showing posts with label कोशिंबीरी आणि सलाड. Show all posts

Friday, June 12, 2015

Achari Bhendi Raita (भेंडीचे आचारी रायते)

रायते विशेषत: पुलाव किंवा बिरयानी सोबत दिले जाते. पण हे असे रायते आहे की पुलाव, खिचडी सोबत चांगले लागेलच पण चपाती सोबत पण छान लागते.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • भेंडी - २०० ग्रॅम
  • दही - १ कप
  • तेल- २ टेबलस्पून
  • तयार कैरी लोणचे मसाला - ३ टिस्पून
  • मोहरी/राई - १ टिस्पून
  • सुक्या लाल मिरच्या-  २ नग 
  • हळद - १/४  टीस्पून
  • कढीपत्ता- ६ पाने 
  • कोथिंबीर, बारीक चिरून - १/४  कप
  • साखर - १/२ टिस्पून किंवा चवीनुसार
  • मीठ- चवीनुसार

कृती:
  • भेंडी स्वच्छ धुवा. किचन टॉवेलने घासून घासून पूर्ण कोरड्या करा.  
  • भेंडीला मधोमध कापून तिचे लांबट तुकडे करा.
  • कढईत १ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात कापलेली भेंडी टाकून मोठ्या आचेवर २ मिनीट परतून घ्यावे.
  • मग आच कमी करून त्यात मीठ आणि लोणचे मसाला घाला. थोडावेळ परतून घ्या. गॅस बंद करून थंड होऊ द्या.
  • एका वाडग्यामध्ये दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर आणि मीठ घेऊन छान एकत्र करा. 
  • कढल्यात १ टेबलस्पून तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की कढीपत्ता, लाल मिरची, हिंग, हळद टाकावे आणि जरासे परतून गॅस लगेच बंद करावा.  
  • हि फोडणी दह्यात घालून चांगले मिक्स करावे.
  • वाढण्यापूर्वी दही आणि भेंडी एकत्र करावे.  
  • बिरयानी/ पुलाव किंवा चपाती सोबत सर्व्ह करावे.

Wednesday, April 16, 2014

Pandharya Kandyachi Koshimbir (पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर)

उन्हाळ्याची चाहूल लागली की पांढरे कांदे बाजारात दिसू लागतात.  कोकणात मिळणारे पांढरे कांदे आकाराने लहान आणि गोड असतात. मुंबई-गोवा महामार्गावर  किंवा अलिबागला जात असताना वडखळ जवळ, रस्त्यात सगळीकडे तुम्हाला ते दिसतील. (एक सल्ला: हल्ली वर्षभर वडखळला पांढरे कांदे मिळतात. मार्च ते मे मध्येच हे कांदे घ्या. बाकी काळात मिळणारे कांदे हे स्थानिक नसतात, चवीला चांगले नसतात. अलिबागला जात असाल तर पोयनाड सोडल्यावर कांदे घ्या.)       
उन्हाळ्यातील विकारांवर ते अतिशय गुणकारी असतात. जेवणासोबत विशेषकरून मासांहारी जेवणासोबत हा कांदा खूप मस्त लागतो. हा कांदा न कापताच नुसता फोडून खायला मजा येते.

आज आपण याची कोशिंबीर बनवणार आहोत. माझी आई  याची कोशिंबीर बनवत असे.  काही दिवसापूर्वी एका मराठी मालिकेमध्ये याच कोशिंबीरीला "जीऱ्याची कोशिंबीर" अस म्हटलं होत.


Read this recipe in English ....... click here. 

साहित्य:
पांढरे कांदे, चिरून- १/२ कप
दही- १/२ कप
भाजलेल्या जीऱ्याची पूड- १ १/२ ते २ टीस्पून
कोथिंबीर, बारीक चिरून - १ टेबलस्पून
हिरवी मिरची, चिरून - १ (ऐच्छिक)
सैंधव मीठ किंवा साध मीठ - चवीप्रमाणे

कृती:
वरील सर्व साहित्य एकत्र करा. झालं …….
जेवणाबरोबर आस्वाद घ्या.


  

Thursday, March 27, 2014

Kamang Kakadi (खमंग काकडी/ काकडीची कोशिंबीर)

सोप्पी आणि रुचकर …



Read this recipe in English.......... click here.

साहित्य:
  • हिरव्या काकड्या - २
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- २
  • लिंबाचा रस- १/२ लिंबू 
  • शेंगदाण्याचा कूट- २ टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खवलेले -  २ टेबलस्पून (ऐच्छिक )
  • कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर 
  • साजूक तूप- १ टीस्पून 
  • जीरे- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • साखर- १/२ टीस्पून  किंव्हा चवीनुसार 
  • मीठ- चवीनुसार 


कृती:
  • काकडी धुवून आणि सोलून घ्यावी. काकडीची टोके कापून टाकावी. 
  • काकडी थोडी चाखून पहावी, कधीकधी काकडी कडू असते. नंतर काकडी चोचवून घ्यावी किंव्हा बारीक चिरावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मीठ चोळून ठेवावे. २-३ मिनिटांनी काकडी पिळावी व त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. 
  • काकडी, शेंगदाण्याचा कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची,  साखर, लिंबाचा रस व थोडेसे मीठ (मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, कारण आधीच काकडीला मीठ लावून ठेवले होते) घालून छान एकत्र करावे.
  • कढल्यात तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंग घालून फोडणी करावी व काकडीत घालावी. झाली तयार खमंग काकडी …… 

Monday, December 2, 2013

Beetachi Pachedi बीटाची कोशिंबीर (बीटाची पचेडी )

बीटाचे गुणधर्म जेवढे चांगले आहेत तेवढाच बीट खायला अतिशय कंटाळवाण वाटत. लहान मुल तर त्या कडे पाहायला ही तयार नसतात. मी सुद्धा कच्च बीट या पचेडीच्यायोगेच खाऊ शकते कारण खरच ही पचेडी खूपच छान लागते.  


Read this recipe in English........ click here!

साहित्य:

  • बीट - १ मध्यम आकाराचे
  • दही- १ कप (किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे)
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून - २
  • चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
  • दाण्याचा कुट - १/४ कप
  • साखर- चिमुटभर
  • मीठ- चवीप्रमाणे

कृती:

  • बीट  साले काढून  किसून घ्यावे.
  • एका बाउलमध्ये वरील  एकत्र करावे. बीटाची कोशिंबीर (बीटाची पचेडी ) तयार………
  • पण जेवायला वेळ असेल तर दही आणि दाण्याचा कुट आधीपासून घालू नये.



    टीपा :
    • याप्रमाणे गजर, मुळा, काकडी व केळ यांची कोशिंबीर (पचेडी )  करता येते.
    • पण काकडीची पचेडी करणार असाल तर काकडी किसून घेऊ नये.  काकडी कोचावी.
    • आणि अर्थातच केळ किसून न घेता त्याचे छोटे तुकडे करावेत, हि केळ्याची कोशिंबीर जास्त वेळ ठेऊ नये. 

    Saturday, October 12, 2013

    Lal Bhopalyache Bharit (लाल भोपळ्याचे भरीत)

    ब्राम्हणी पद्धतीच रुचकर अस हे भरीत. लाल भोपळा 'अ' जीवनसत्वाने भरपूर, खूप पौष्टिक आहे. गर्भारपणात भरपूर लाल भोपळा खावा. या भरीतातील काही पदार्थ वगळलेत तर उपवासाला चालेल. आमच्या शेजारी दातार आजी राहायच्या. त्यांनी माझ्या आईला हे भरीत करायला शिकवल. हे भरीत केल की नेहमी त्यांची  येते. 


    Read this recipe in English..... Click here.

    साहित्य:
    • लाल भोपळा- २५० ग्रॅम
    • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- ४ ते ५
    • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप
    • तेल- २ टेबलस्पून
    • मोहरी - १ टीस्पून
    • हळद- १/२ टीस्पून
    • हिंग- १/४ टीस्पून
    • दही- १/२ कप
    • साखर- चवीनुसार
    • मीठ- चवीनुसार 

    कृती:
    • लाल भोपळ्याच्या साल काढून छोट्या फोडी/तुकडे करून घ्यावेत.  
    • भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये भांड्यात (डाळ आणि भाताच्या भांड्यावर ठेवल्या तरी चालतील) थोडेसे पाणी शिंपडून उकडून घ्याव्यात. 
    • चमच्याने मॅश करून घ्याव्यात. (उकडल्यावर भोपळ्यात जे पाणी असेल ते घेऊ नये पण टाकुही नये. आमटीसाठी/वरणासाठी वापरावे. त्यात जीवनसत्व असतात. )
    • थंड झाल्यावर मिरच्या आणि कोथिंबीर घालून निट मिक्स करावे.
    • कढल्यात/फोडणी पात्रात तेल गरम करावे. मोहरी आणि हळद, हिंग घालून फोडणी करून उकडलेल्या भोपळ्यात घालावी. लगेच झाकण ठेवावे. थोडावेळ झाकण तसेच ठेवून फोडणी त्यात मुरु द्यावी.   
    • जेवायच्या वेळेला दही घालावे. चवीनुसार मीठ आणि किंचीत साखर घालावी. छान मिक्स करावे. 

    हे भरीत उपवासासाठी करायचे असेल तर …….
    • फोडणीत हळद, हिंग, मोहोरी घालू नये त्याएवजी जीरे वापरावे. 
    • तेलाएवजी तूप वापरले तरी चालेल. 
    • भरीतात वरून शेंगदाण्याचा कूट घातल्यास छान वेगळी चव येते.
    • कोथिंबीर तुमच्याकडे उपासाला चालत असेल तर घाला.  

    Saturday, September 21, 2013

    क्रंची लेट्युस सलाड

    लेट्युस, रंगीत सिमला मिरच्या आणि छानस ड्रेसिंग यांचा मेळ जमला की सलाड छानच लागत.....


    Read this recipe in English......click here!

    साहित्य :
    लेट्युस , तुकडे करून - १ कप
    कांदा, चौकोनी तुकडे- १/२ कप
    पिवळी सिमला मिरची, चौकोनी तुकडे- १/२ कप
    लाल सिमला मिरची,चौकोनी तुकडे - १/४ कप
    हिरवी सिमला मिरची,चौकोनी तुकडे - १/४ कप
    काकडी, चौकोनी तुकडे - १/२ कप
    काळे ऑलिव - ४

    ड्रेसिंग :
    लिंबू रस - १ टेबलस्पून 
    ऑलिव ओईल - २ टीस्पून
    बाल्सामिक विनेगर - १ टीस्पून
    मीर पूड व मीठ चवीप्रमाणे 


    कृती:
    सर्व भाज्या धुउन कापून घ्याव्यात. लेट्युस कपू नये, हाताने तुकडे करावे. वापरायच्या आधी लेट्युस बर्फाच्या पाण्यात ठेवावे, म्हणजे छान कुरकुरीत होते. 
    वरील सर्व भाज्या आणि ड्रेसिंग एकत्र करावे.  
    गार्लिक ब्रेड बरोबर सर्व करावे. 
    कुठल्याही ग्रील किंव्हा तंदूर डीश बरोबर उत्तम. 

    Wednesday, March 20, 2013

    कॉर्न चाट

    मक्याच्या दाण्यांना बनवा मजेदार .......


    Read this recipe in English......

    साहित्य:

    उकडलेले मक्याचे दाणे - १ १/२ कप
    उकडून कापलेला बटाटा- १/४ कप
    कापलेला टोमाटो- १/२ कप
    कापलेला कांदा- १/४ कप ( छोट्या रिंगा तयार करा )
    बारीक चिरलेली हिरवी मिरची - १/४ टीस्पून
    बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
    बारीक चिरलेला पुदिना- १ टेबलस्पून ( या ऐवजी पुदिना चटणी वापरली तरी चालेल)
    डाळिंबाचे दाणे- १/४ कप
    कापलेली कैरी - १ टेबलस्पून (ऎच्छिक)
    लिंबाचा रस- १ टेबलस्पून
    चिंचेची चटणी- १ टेबलस्पून
    लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
    सैंधव- १/२ टीस्पून
    चाट मसाला- १ टीस्पून


    वरील सर्व साहित्य एकत्र करावे. शक्यतो सर्व पदार्थ ताजे असावेत.
    हवी असल्यास वरून पिवळी शेव भुरभुरावी.