Wednesday, April 16, 2014

Pandharya Kandyachi Koshimbir (पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर)

उन्हाळ्याची चाहूल लागली की पांढरे कांदे बाजारात दिसू लागतात.  कोकणात मिळणारे पांढरे कांदे आकाराने लहान आणि गोड असतात. मुंबई-गोवा महामार्गावर  किंवा अलिबागला जात असताना वडखळ जवळ, रस्त्यात सगळीकडे तुम्हाला ते दिसतील. (एक सल्ला: हल्ली वर्षभर वडखळला पांढरे कांदे मिळतात. मार्च ते मे मध्येच हे कांदे घ्या. बाकी काळात मिळणारे कांदे हे स्थानिक नसतात, चवीला चांगले नसतात. अलिबागला जात असाल तर पोयनाड सोडल्यावर कांदे घ्या.)       
उन्हाळ्यातील विकारांवर ते अतिशय गुणकारी असतात. जेवणासोबत विशेषकरून मासांहारी जेवणासोबत हा कांदा खूप मस्त लागतो. हा कांदा न कापताच नुसता फोडून खायला मजा येते.

आज आपण याची कोशिंबीर बनवणार आहोत. माझी आई  याची कोशिंबीर बनवत असे.  काही दिवसापूर्वी एका मराठी मालिकेमध्ये याच कोशिंबीरीला "जीऱ्याची कोशिंबीर" अस म्हटलं होत.


Read this recipe in English ....... click here. 

साहित्य:
पांढरे कांदे, चिरून- १/२ कप
दही- १/२ कप
भाजलेल्या जीऱ्याची पूड- १ १/२ ते २ टीस्पून
कोथिंबीर, बारीक चिरून - १ टेबलस्पून
हिरवी मिरची, चिरून - १ (ऐच्छिक)
सैंधव मीठ किंवा साध मीठ - चवीप्रमाणे

कृती:
वरील सर्व साहित्य एकत्र करा. झालं …….
जेवणाबरोबर आस्वाद घ्या.


  

Thursday, April 10, 2014

Shevagyachya Shenganchi Aamati (शेकटाच्या/ शेवग्याच्या शेंगांची आमटी)

शेकटाच्या शेंगा यायला लागल्या की दर दोन दिवासाआड हि आमटी आमच्याकडे होतेच. घाई आहे किंव्हा कधी जेवण करायला वेळ नाहीये अश्यावेळी नुसती आमटी केली, पापड भाजला की आणखी काही नको. हि आमटी शाकाहारी किंव्हा मासांहारी मेनू बरोबर उत्तम. म्हणजे नुसती भेंड्याची भाजी परतली किंव्हा एखादी पालेभाजी केली आणि हि आमटी कि झाल जेवण. कांद्यातली सुकट केली किंव्हा कोलंबी परतली  किंव्हा नुसता अंड्याचा पोळा केला की जेवण तयार. या आमटीमध्ये भाज्या वापरल्यामुळे थोडक्यात सुद्धा पूर्ण आहार होतो. अशी हि आमची "कोकणी" लोकांची आवडती शेंगांची आमटी ……Read this recipe in English...........click here.

साहित्य: 
 • तूरडाळ  किंव्हा मुगडाळ -  १/२ कप 
 • शेवग्याच्या शेंगा- ३ ते ४
 • बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक )
 • वांगे - १ मध्यम (ऐच्छिक )
 • टोमाटो, चिरून - १ मध्यम 
 • कांदा, चिरून- २ टेबलस्पून (ऐच्छिक, मी कधीतरीच वापरते) 
 • लसूण, ठेचून - ७ ते ८ पाकळ्या  
 • तेल-  ३ ते ४ टेबलस्पून 
 • राई- १ टीस्पून  
 • जीरे-  १ टीस्पून
 • हिंग- १/२ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून
 • मेथी दाणे- ५  (ऐच्छिक ) 
 • कढीपत्ता- १ डहाळी (१०-१२ पाने) 
 • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून (जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर, "सूचना" मध्ये वाचा.)
 • गोडा मसाला- १ १/२ टीस्पून   
 • गूळ, किसून- १ टेबलस्पून 
 • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप किंव्हा मुठभर 
 • मीठ- चवीनुसार   


कृती:
 • तूरडाळ किमान २-३ तास धुवून भिजत ठेवावी.  
 • शेंगा सोलून त्याचे साधारण ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. शेंगा जाड असतील तर मधून चीर द्यावी.  
 • बटाटा सोलून त्याचे साधारण १ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. 
 • वांग्याचे जर मोठेच तुकडे ठेवावे. (शेंगा आणि बटाट्याच्या मानाने वांगे जरा लवकर शिजते.)    
 • कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. (डाळ पूर्ण शिजायला हवी. प्रत्येकाने आपल्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या घ्याव्यात. )
 • पातेल्यात तेल गरम करावे. त्यात राई टाकावी, तडतडली की लसूण टाकून जर परतावा. नंतर कढीपत्ता, जीरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. लगेचच त्यात कांदा व मसाला घालून काही सेकंद परतावे. 
 • त्यात शेंगांचे तुकडे, बटाटे, वांगे आणि थोडे पाणी घालावे. या भाज्यांपुरते मीठ घालावे. (अंदाज असेल तर पूर्ण आमटीचे मीठ एकदाच  चालेल.) झाकणावर पाणी ठेऊन भाज्या ७-८  मिनिटे मंद आचेवर शिजू द्याव्यात.  
 • नंतर त्यात टोमाटो, कोथिंबीर घालून पुन्हा थोडावेळ शिजू द्यावे.     
 • या दरम्यान, कुकर उघडून डाळ रवीने घोटून घ्यावी. 
 • तोपर्यंत बटाटे, शेंगा शिजतील. त्यात घोटलेली  तूरडाळ, गुळ व गोडा मसाला घालावा. गरजेनुसार पाणी घालावे. (हि आमटी फार घट्ट चांगली लागत नाही. मी थोडी पातळच करते. माझ्या मुलीला तर ती सुप प्रमाणे प्यायला आवडते.)  गरज असल्यास मीठ घालावे. 
 • पातेल्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर आमटीला उकळ येईपर्यंत शिजवावे. 
 • ही आमटी भाताबरोबर वाढावी.  चपातीसोबत पण छान लागते.  

सूचना व वैविधता: 
 • तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर साधारण १ १/२  टीस्पून मिरची पूड आणि सोबत गोडा मसाला जरा जास्त म्हणजे २-३  टीस्पून घाला.  
 • टोमाटो ऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे कैरी, चिंच, कोकम किंव्हा आंबोशी ( वाळवलेल्या कैरीच्या फोडी) असं काही वापरलं तरी चालेल.   
 • तूरडाळीची आमटी चविष्ट लागते. पण काहींना तुरडाळ सोसत नाही. अर्धी तुरडाळ आणि अर्धी मुगडाळ घेतली तरी चालेल. 
 • आमटी नुसत्या शेंगा घालून केली तरी चालेल. पण वांग-बटाटा मस्त लागत. निदान बटाटा तरी घालावा.   
 • या प्रकारच्या आमटीत  शेंगांसोबत किंव्हा शेंगांशिवाय दुधी, लाल भोपळा, घोसाळे इत्यादी भाज्या सुद्धा वापरता येतील. 
 • कोकणात या आमटीत वरून खवलेले ओले खोबरे घालायची पद्धत आहे. मला आमटीत खोबर घातलेलं नाही आवडतं. पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर वापरा.  
 • मी आमटी शिजतानाच कोथिंबीर घालते त्यामुळे आमटीला छान वास आणि चव येते.  तुम्ही हव तर वरून पण घालू शकता.      
 • कोकणातल्या शेंगा देशावरच्या शेंगाप्रमाणे जाड नसतात त्यामुळे लवकर शिजतात. जर शेंगा फार जाड  असतील तर  आधी थोड्या शेंगा शिजऊन घेऊन नंतर वंग-बटाटा घाला.   


Wednesday, April 9, 2014

Goda Masala (गोडा मसाला)

गोडा मसाला हा शाकाहारी पदार्थांमध्ये वापरला जातो. खास अश्या ब्राम्हणी पदार्थांची हा खासियत आहे. आमटी, भरलेली वांगी-तोंडली, मसालेभात, खिचडी, उसळी इत्यादी पदार्थांची चव वाढवतो.Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
 • धणे - ५०० ग्रॅम (खासकरून इंदूरी धने वापरावेत)
 • सुके खोबरे- १ वाटी/कवड
 • तीळ - १०० ग्रॅम
 • जिरे- १०० ग्रॅम
 • शहा जिरे - २५ ग्रॅम
 • लवंग- ५ ग्रॅम
 • दालचिनी- ५ ग्रॅम
 • तमाल पत्र- १० ग्रॅम
 • मसाला वेलची- ५ ग्रॅम (ऐच्छिक )
 • दगड फुल - १० ग्रॅम
 • नागकेशर-  ५ ग्रॅम (ऐच्छिक )
 • हिंग- २५ ग्रॅम
 • शेंगदाणा तेल- थोडस जरुरीप्रमाणे


कृती:
 • हे सर्व मसाल्याचे जिन्नस मंद आचेवर वेगवेगळे छान वास येईपर्यंत तेलावर खमंग भाजून घ्यावेत. करपऊ नयेत. 
 • मसाल्याचे जिन्नस तळून झाले कि गरम असतानाच त्यावर हिंग पूड पसरावी. ( जर खडा हिंग वापरायचा असेल तर, आधी तेलात तळून नंतर खलबत्याने कुटून घ्यावा.)
 • तीळ व खोबरे वेगवेगळे भाजून कुटून घ्यावेत आणि मिक्सरवर दळून घ्यावेत. भाजताना तेलाची आवश्यकता नाही.  
 • नंतर थंड झाल्यावर तीळ व खोबरे सोडून इतर सर्व मसाल्याचे जिन्नस मिक्सरवर दळून घ्यावेत. दळून झाल्यावर चाळणीने चाळून पुन्हा मिक्सरवर दळून घ्यावा.  
 • मसाले दळून झाले कि त्यात दळलेले तीळ व खोबरे मिक्स करावे.  
 • मसाला पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात/बरणीत भरून ठेवावा. 
 • सुके खोबरे व तीळ वापरल्यामुळे मसाला खराब होण्याची शक्यता असते. शिवाय मसाल्याला खोमट (खवट ) असा वास येतो म्हणून मसाला फ्रीझमध्ये ठेवावा.        Saturday, April 5, 2014

Dahi Butti/ Dahi Bhat (दही बुत्ती/दही भात)

दही बुत्ती/दही भात उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाला गारवा मिळतो. झटपट होणारा हा भाताचा प्रकार रुचकर आणि पोटभरीचा आहे.


Read this recipe in English......... click here. 


साहित्य:
 • तांदूळ- १ कप 
 • दही- १ १/२ कप (दही शीळे व फार आंबट नको) 
 • काकडी- १ (ऐच्छिक) 
 • शेंगदाणे- २ टेबलस्पून (ऐच्छिक) 
 • तेल- १ टेबलस्पून 
 • मोहरी- १ टीस्पून 
 • कढीपत्ता पाने- १ डहाळी 
 • सुक्या लाल मिरच्या- २ ते ३ 
 • उडीद डाळ- १ टीस्पून 
 • हिंग- १/४ टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार 

कृती:
 • भात शिजवून घ्यावा. एका ताटात काढून पसरावा म्हणजे लवकर थंड होईल. 
 • भात थंड झाला की त्यात दही आणि मीठ घाला. ढवळून एकत्र करून घ्या. 
 • काकडीचे छोटे तुकडे करून घ्या. 
 • कढल्यात तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत. हे शेंगदाणे व काकडीचे तुकडे दही घातलेल्या भातावर पसरावेत. 
 • त्याच गरम तेलात उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली की त्यात कढीपत्ता, सुक्या मिरच्या तोडून घालाव्यात. सगळ्यात शेवटी हिंग घालून गॅस बंद करावा आणि हि फोडणी दही-भातावर घालावी. 
 • छान एकत्र करून वाढावे. 

सुचना आणि वैविधता :
 • भात गरम असताना भातात दही मिसळू नये. 
 • तुम्हाला भात जर मऊ व गुरगुट्या आवडत असेल तर त्यात १/४ कप थंड दुध घालावे. 
 • भात अजून चटपटीत बनवायचा असेल तर भातात बारीक किसलेले आले मिसळावे. 
 • कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जीरे असे एकत्र वाटून दह्यात फेटावे आणि भातात घालावे, छान चव येते. 
 • सुक्या मिरच्यांऐवजी सांडगी मिरच्या (भरून सुकवलेल्या) फोडणीत टाकाव्यात. भात खाताना वरून कुस्करून टाकाव्यात, भाताला छान खमंगपणा येतो. 
 • काकडी ऐवजी किंव्हा सोबत काळी/हिरवी द्राक्षे किंव्हा डाळिंबाचे दाणे भातात टाकावेत. पांढरा कांदा पण चिरून घालता येईल. पण मग अशी फळे किंव्हा भाज्या घातलेला भात लगेचच संपवावा. अन्यथा भाताला पाणी सुटेल व कडवटपणा येईल. Friday, April 4, 2014

Sukatichi Koshimbir/Chirmur (सुकटीची कोशिंबीर/किसमुर)

काही म्हणतात भाजलेली मसाला सुकट, तर काही सुकटीची कोशिंबीर. गोवा-कारवार भागात 'किसमुर' किंवा 'किसमुरी' म्हणतात, पण त्यात ओले खोबरे वापरतात. जाऊदे नावात काय आहे? ज्यांना सुकी मासळी आवडते, त्यांना हा पदार्थ आवडतोच.

 

 Read this recipe in English ..... click here. 

साहित्य :
सुकट - २ कप
कांदा, चिरलेला- १/२ कप
कोथिंबीर, चिरलेली- २ टेबलस्पून
कैरी, छोटे तुकडे करून- २ टेबलस्पून (उपलब्ध असेल तर ) किंवा आवडत असेल तर जरासा चिंचेचा कोळ
घरचा मसाला किंव्हा मिरची पूड-  १ १/२  टीस्पून
मीठ- चवीनुसार
तेल - १ १/२ ते २ टेबलस्पून

कृती: 
सुकट चाळून व निवडून घ्या.  धुऊ नका. सुकट चांगली स्वच्छ व ताजी असली पाहिजे.
लोखंडी तव्यात किंव्हा कढईत सुकीच लालसर रंगावर भाजून घ्या. करपऊ  नका.
 सुकट सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करा.
खायच्या वेळेलाच त्यात सुकट मिक्स करा नाहीतर ती मऊ पडेल. (हव असल्यास सुकट थोडी हाताने चुरली तरी चालेल. )
गरमागरम भाकरीसोबत वाढा.
नाचणीच्या भाकरी सोबत फक्कड लागते. हि आहे आमच्या कोकणातील लोकप्रिय न्याहरी.