Monday, September 15, 2014

Valache Birade (वालाचे बिरडे)

वालाचे बिरडे किंवा बिरडं म्हणजे आमच्या कोकणी माणसांचा विक पॉइंट. सणवार असो की कुठलाही समारंभ असो बिरडे हे हवेच. आमचे नैवेद्याचे ताट बिरड्याशिवाय अपूर्ण आहे. दर महिन्याला येणारी संकष्टी आणि बिरडे हे समीकरण तर अतूट आहे. आठवड्यातून एकदा आमच्याकडे बिरडे करावेच लागते. बिरडे सोलणे हा एक वैताग असला तरी बिरड-भाताचा पहिला घास तोंडात गेल्यावर सगळा वैताग विसरायला होतो. बिरड्याचा शिजताना येणारा वास, अनेकांना घरची आठवण देतो. असा आहे बिरड्याचा महिमा…

Read this recipe in English....click here.


पूर्वतयारी: 
बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मुग, चवळी या कडधान्यापासून बिरड केली जातात. पण अर्थात लोकप्रिय आहे ते "वालाचे बिरडे". कडवे वाल हे बिरड्यासाठी उत्तम समझले जातात.
आमच्या "पेणचे" कडवे वाल फारच चवदार असतात आणि म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत.
दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा बिरडे शनिवारी करायचे असेल तर गुरुवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
 • वाल पाण्यात रात्रभर किंव्हा १० ते १२ तास भिजत ठेवावे. खूप थंडी असेल तर कोमट (गरम नव्हे, नाहीतर मोड येणार नाहीत) पाण्यात भिजत ठेवावे. 
 • सकाळी पाणी काढून टाकून धुवून घ्यावेत, असे केल्याने नंतर वाल चिकट (बिळबिळीत)  होत नाहीत.  
 • सुती कापडात बांधून ठेवावे. हे गाठोडं एका डब्यात किंव्हा भांड्यात ठेऊन झाकून ठेवावेत. हे भांडे उबदार जागी (शक्यतो ओट्याच्या खाली) १६ ते २० तास ठेवावे. उष्ण हवामान असेल तर लवकर मोड येतील आणि थंड हवामान असेल तर अर्थात मोड यायला वेळ लागेल. 
 • करतेवेळी मोड आलेल्या वालांना कोमट पाण्यात किमान २ तास भिजवावे म्हणजे वाल पटापट सोलता येतात. बोटाच्या चिमटीत दाबून साले काढावीत.    

साहित्य:
 • वाल, मोड आणून सोललेले- २ कप (१ कप सुक्या वालापासून अंदाजे २ कप बिरडे/ डाळींब्या तयार होतात)
 • ओले खोबरे, खवलेले किंव्हा किसलेले- १/२ कप 
 • जीरे- १ टीस्पून 
 • लसुण पाकळ्या- ६
 • तेल-४ ते ५ टेबलस्पून 
 • मोहोरी- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/२  टीस्पून 
 • हळद-१/२ टीस्पून 
 • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ४ ते ५ टीस्पून (किंव्हा २  १/२ टीस्पून मिरची पूड/लाल तिखट + २ टीस्पून गोडा मसाला)
 • कांदा, चिरून- १ मध्यम 
 • गूळ- १/२ ते १ टीस्पून 
 • कोकम (आमसुलं)- ४ (किंव्हा घट्ट चिंचेचा कोळ- १ टीस्पून ) 
 • कोथिंबीर- २ टेबलस्पून 
 • मीठ-चवीनुसार


कृती:
 • ओले खोबरे, जीरे, लसुण पाकळ्या आणि थोड पाणी टाकून सर्व एकत्र वाटून घ्या. (फ्रीझरमधले खोबरे वापरणार असाल तर वाटणासाठी गरम पाणी वापरा.)  
 • एका भांड्यात तेल गरम करा. मोहोरी घालून तडतडू द्यावी. कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर हिंग, हळद आणि मसाला किंव्हा लाल तिखट घालून जरासं परतून लगेचच त्यात धुतलेले बिरडे/ डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोड पाणी घालावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
 • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
 • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
 • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.

दुसरी पद्धत : (ही आहे माझ्या आजीची पारंपारिक पद्धत आणि सी. के. पी. लोक सुद्धा हीच पद्धत वापरतात.)    
 • एका भांड्यात बिरडे/ डाळींब्या, तेल, कांदा, हिंग, हळद, मसाला किंव्हा लाल तिखट घालून थोड पाणी घालून छान एकत्र करावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
 • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
 • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
 • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.  

सूचना:
 • बिरड्याचे दाणे /डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने ढवळावे. त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. 
 • बिरडे अति शिजले तर त्याचा डाळी सारखा लगदा होईल. आणि मग तो चवीला अतिशय वाईट लागेल. 
 • बिरड्यात पाणी घालताना गरम पाणी वापरावे त्यामुळे बिरडे चांगले शिजते. झाकणाच्या ताटावरचे गरम पाणी वापरले तरी चालेल.   
 • काही लोक यात बटाटा घालतात, पण माझ्या मते त्यामुळे बिरड्याची चव बिघडते.       

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.