Showing posts with label भारतीय गोड पक्वान्न. Show all posts
Showing posts with label भारतीय गोड पक्वान्न. Show all posts

Friday, October 5, 2018

काकडीचे घारगे (काकडीचे गोड वडे)

महाराष्ट्रात घारगे/गोड वडे हे काकडी, लाल भोपळा, केळे आणि फणस वापरून बनवले जातात. कोकणात काकडीचे घारगे गणेश उत्सवात गौरी पूजन (ओवसा) च्या दिवशी तांदुळाच्या खिरीसोबत नैवेद्यासाठी केले जातात. शिवाय पितृपक्षात श्राध्दासाठी आणि सर्वपित्री आमावस्येला केले जातात. मग आज पाहूयात माझ्या आजीच्या रेसिपीप्रमाणे काकडीचे घारगे. घारगे तळताना येणार मधुर दरवळ मला नेहमीच भूतकाळात नेहतो. 

Read this recipe in English, please click here for the recipe.



साहित्य:
  • मोठी काकडी (श्रावण काकडी/तवसे)- १
  • गूळ, किसून किंवा छोटे तुकडे करून- १ कप 
  • वेलची पावडर- १/२  टीस्पून 
  • तांदुळाचे पीठ- अंदाजे १ +१/२  कप 
  • बारीक रवा- १/२  कप 
  • मोहन- २ टेबलस्पून 
  • मीठ- चिमूटभर 
  • रिफाइंड तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • काकडी सोलून घ्या. बिया काढून किसून घ्या. नंतर काकडीचा किस घट्ट पिळून घ्या. काकडीचा रस फेकू नका. 
  • १/२  कप काकडीच्या रसात रवा साधारण १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. 
  • गूळ आणि काकडी जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये एकत्र करा. 
  • मंद ते माध्यम आचेवर शिजत ठेवा. मध्ये मध्ये हलवत रहा. 
  • आता गूळ वितळू लागेल. काकडी पण शिजून त्याचे एकजीव असे मिश्रण तयार होईल. काकडी शिजायला वेळ लागत नाही, गूळ विटलेपर्यंत काकडी शिजलेली असते. खालच्या फोटोत जसे दिसतेय तसे झाले कि गॅस बंद करा. 
  • वेलची पूड टाकून छान एकत्र करा. मिश्रण थोडं होऊ द्या. 
  • परातीत तांदुळाचा पीठ घ्या आणि त्यावर मोहन टाकून एकत्र करा. 
  • आता भिजवलेला रवा, तांदुळाचे पीठ, मीठ व काकडीचे मिश्रण एकत्र करा.
  • सर्व एकत्र मळून घेऊन त्याचा गोळा बनवा. गरज लागली तरच काकडीचा रस शिंपडून मळून घ्या. मळलेले पीठ/कणिक जास्त घट्टही नको आणि खूप सैल सुद्धा नको. 
  • पिठाचा गोळा १५-२० मिनिटे झाकून ठेवा. 
  • त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. केळीचं पान किंवा प्लॅस्टिकच्या पेपरला तेलाचा हात लावून त्यावर तेलाच्या बोटांनीच वडा थापून घ्या. 
  • तेल चांगले गरम करून घ्या. पण वडे मध्यम आचेवर तळा. सर्व वडे सोनेरी रंगावर तळून घ्या आणि टिशू पेपरवर काढा. 
  • हे घारगे तांदुळाच्या खीरीसोबत वाढायची पद्धत आहे आणि ते तसे लागतातही छान. मला तर असेच गरम गरम मटकावयाला आवडतात पण खूपदा सणवारीच केल्याने नैवेद्य दाखवल्याशिवाय खाता येत नाहीत. 



Wednesday, October 26, 2016

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

गोरी पान करंजी नावेसारखी दिसते,
पोटातले खाताच आणखी खावी वाटते!


Read this recipe in English, click here.

साहित्य:
रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार
पारी-

  • मैदा- १ कप (२ वाट्या)
  • बारीक रवा- १/२  कप (१ वाटी) 
  • मीठ- चिमुटभर 
  • गरम रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप (मोहन)- ५ टेबलस्पून 
  • दुध किंवा दूध+पाणी- अंदाजे १/२  कप  

सारण/चुरण-

  • बारीक रवा- १/२ कप (१ वाटी)
  • सुके खोबरे, बारीक खिसुन- १/२ कप (पाऊण वाटी ते १ वाटी)
  • पिठीसाखर- अंदाजे ३/४ कप (१ वाटी) ~ आपल्या चवीप्रमाणे थोडे कमी-जास्त घ्यावे पण सारण जास्त गोडच हवे, कारण नंतर करंजी खाताना ते बरोबर लागते.
  • खसखस- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • चारोळी- १ टेबलस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून
  • साजूक तूप- १ टीस्पून


कृती :

  • प्रथम खोबरे चुरचुरीत भाजून घ्या व हाताने बारीक चुरा, खसखस भाजून त्याची भरड पुड करावी, नाही केली तरी चालेल. 
  • १ टीस्पून तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. 
  • नंतर दिलेले सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. 
  • रवा-मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे व मोहन घालावे. थोडं थंड झाल्यावर सर्व पीठ हाताने चोळून घ्यावे म्हणजे सर्व पीठाला मोहन लागते. 
  • दुधाने घट्ट पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे किंवा फूडप्रोसेसरला बारीक तुकडे करून फिरवावे. 
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावे. 
  • त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. 
  • सारण भरून घ्यावे व पुरीच्या कडेला बोटाने जरासं दूध लावून घडी करून दाबावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातण्याने कापून घ्यावे. अश्या प्रकारे करंज्या तयार करून घ्याव्यात.  तयार कारंज्यावर ओले (भिजवून घट्ट पिळलेले) फडके ठेवा म्हणजे त्या सुकत नाहीत. 
  • कढईत तेल/तूप चांगले तापवून घ्यावे. मात्र करंज्या मध्यम ते मंद आचेवरच तळाव्यात. तळताना करंजीवर तेल घालत घालत तळावे. 
  • तळलेल्या करंज्या टिशु पेपर किंव्हा कोऱ्या पेपरवर पसरून ठेवाव्यात.
  • करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भराव्यात. 


टीप:
आम्ही सारण जरा जास्तच करून ठेवतो. कारण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा करंज्या कराव्या लागतात. सारण उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे, ६ महिने टिकते. पुन्हा करंज्या करायचा कंटाळा आला तर कणकेचे लाडू किंवा मेथीचे लाडू मध्ये घालावे.   

Saturday, September 3, 2016

Panage ~ पानगे / पानगी

कोकणात पानगे/पानगी आणि पातोळे हे दोन पदार्थ केले जातात. हे दोन्ही पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. पानगे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.
एक प्रकार म्हणजे केळ किंवा काकडी वापरून बनवलेले गोड पानगे, दुसरा प्रकार म्हणजे  जिरे, मिरची, आलं चे वाटण लावून बनवलेले तिखट पानगे आणि तिसरा प्रकार म्हणजे भाकरीप्रमाणे  ना गोड ना तिखट, चटणी किंव्हा कुठल्याही रश्यासोबत खायचे.
आज मी त्यातला गोड प्रकार दाखवणार आहे. गौरीचे आगमन झाल्यावर त्या संध्याकाळी नैवेद्यात हे पानगे आमच्याकडे बनवतात.    
केळीच्या पानात भाजल्याने पानग्यांना एक छान सुवास येतो.

Read this recipe in English, plz click here.


साहित्य:

  • तांदूळ पीठ- १/२  कप
  • रवा- १ टेबलस्पून
  • गुळ- १/४  कप किंवा आवडीप्रमाणे कमीजास्त
  • जायफळ पूड- चिमूटभर
  • पिकलेली केळी- २
  • मीठ- एक छोटी चिमूटभर
  • साजूक तूप- १ टेबलस्पून
  • केळीची पाने- गुंडाळण्यासाठी


कृती:

  • गुळ हाताने मोडून किंवा किसून घ्या.  आणि अगदी थोड्याश्या पाण्यात विरघळून घ्या.
  • केळ कुस्करून घ्या.
  • त्यात रवा, तांदुळाचे पीठ , मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्या.  
  • नंतर त्यात गुळाचे पाणी टाकून मळून घ्या. तूप टाकून पुन्हा मळून घ्या. कणिक फार घट्टही नको आणि सैलही.
  • अर्धा तास हे कणिक झाकून ठेवा.
  • अर्ध्या तासानंतर पुन्हा मळून त्याचे ३ ते ४ गोळे करा.
  • पाण्याचा हात लावून केळीच्या पानावर भाकरीप्रमाणे थापून घ्या. खुप जाड थापू नका. (माझ्या सासूबाई फार पातळ थापत नाहीत पण तुम्ही आमच्या पानगीपेक्षा पातळ थापले तरी चालेल.)
  • पानगा थापून झाला कि पण दुमडून त्याचे पाकीट बनवावे.
  • हे पाकीट गरम तव्यावर झाकण ठेवून २-३ मिनिटे भाजून घ्यावे.
  • नंतर दुसऱ्या बाजूने २-३ मिनिटे भाजून घ्यावे. केल्याचा 
  • भाजून झाल्यावर पानातून हलकेच सोडवावे.
  • गरम गरम पानगे साजूक तूप आणि दुधाबरोबर खायला द्यावेत.  

टीप: आम्ही एकदा तांदुळाच्या पीठाऐवजी गव्हाचे पीठ आणि चिमूटभर बेकिंग पावडर वापरून पानगे केले होते. छान झाले होते.




Tuesday, June 28, 2016

Fanasache Umbar (फणसाचे उंबर)

फणसाचे उंबर  ही कोकणातील एक पारंपरिक पाककृती आहे. पावसाळ्यात भाजीप्रमाणे ही गरम गरम उंबर खायला सुद्धा मजा येते. 

साहित्य: 
  • फणसाचे गरे, आठळ्या काढुन आणि चिरून- २ कप 
  • गुळ- १/२ कप 
  • रवा- १ कप 
  • ओले खोबरे, खोवलेले- १/४ ते १/२ कप 
  • काळे किंवा पांढरे तीळ- १ टेबलस्पून 
  • वेलची पूड- १/४ टीस्पून 
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
  • मीठ- चिमूटभर 
  • खायचा सोडा- चिमूटभर 
  • तळण्यासाठी तेल- जरुरीनुसार 

कृती:
  • रवा थोडासा मंद आचेवर भाजून घ्या, त्यामुळे त्याचा कच्चटपणा निघून जाईल. 
  • गरे आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्रित पाणी न घालता वाटून घ्या. अगदी पेस्ट झाली पाहिजे. 
  • ही फणसाची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात रवा, वेलची व जायफळ पूड, खायचा सोडा, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. 
  • हे मिश्रण २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. किंचित चाखून बघा, गोड पुरेसे आहे ना यासाठी. नसेल तर जरासा गूळ कुस्करून घाला. 
  • कढईत तेल गरम करा. तेल व्यवथित तापले की आच कमी करून मध्यम ते मंद आचेवर वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हाताने किंवा चमच्याने तेलात सोडा व खरपूस टाळून घ्या. (गुळामुळे गडद तपकिरी रंग येतो)

टिपा: 
  • या मिश्रणाचे अप्पे सुद्धा करता येतात. यासाठी मिश्रण थोडसं पाणी टाकून सैल करा व नेहमीप्रमाणे अप्पे करा. 
  • शक्यतो यासाठी बारीक रवा वापरु नये. 
  • हे उंबर गव्हाचे पीठ वापरून देखील करतात, पण ते तितकेसे खुसखुशीत लागत नाहीत. 
  • फणसाऐवजी पिकलेल्या केळ्याचा वापर करून देखील उंबर बनवतात. 
  • फणसाच्या मिश्रणात रव्याऐवजी त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालून पुरी प्रमाणे घट्ट कणिक मळावे व त्याच्या पुऱ्या बनवाव्या. आमच्या गावी आषाढी/दीप आमावस्येला फणसाच्या पुऱ्या व तांदळाची खीर  याचा नैवेद्य देवाला दाखवतात.   

Sunday, March 20, 2016

Puranpoli (पुरणपोळी)

'होळी रे होळी पुरणाची पोळी' अस समीकरणं असलं तरी खरतरं इतरही बऱ्याच सणावारी आपल्याकडे पुरणपोळी करायची पद्धत आहे. पण प्रत्येक ठिकाणाची पुरणपोळी करायची पद्धत वेगळी आहे. देशावर जास्तकरून पूर्णपणे कणिक वापरूनच पोळी केली जाते. काही ठिकाणी अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरून पोळ्या बनवतात. काही ठिकाणी तेल पोळ्या तर काही ठिकाणी खापरावरच्या पोळ्या. काही ठिकाणी साखर वापरतात तर काही ठिकाणी गुळ. मुख्यत्वे पुरणासाठी चणाडाळच वापरली जाते पण काही ठिकाणी तुरीच्या डाळीचेही पुरण बनवतात. माझ्या माहेरी पुरणपोळी साठी पूर्ण मैदाच वापरला जातो. मैद्यामुळे  पोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ होते, तोंडात विरघळते जणु. माझ्यासाठी माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्यांना अख्या जगात तोड नाही. इथे मी तिचीच रेसीपी देत आहे.


Read this recipe in English.......click here.

वाढणी: १५ ते २० पोळ्या

साहित्य:
पुरणासाठी- 
  • चणाडाळ- २५० ग्रॅम
  • गुळ, किसुन- २५० ग्रॅम (यातील ३ टेबलस्पून गुळ काढून त्याऐवजी तेवढीच साखर* घालावी. चांगली चव येते.)
  • साखर*- ३ टेबलस्पून 
  • हळद- चिमुटभर
  • मीठ- चिमुटभर किंवा चवीनुसार
  • वेलची पूड-  १/२ टीस्पून
  • जायफळ पूड- १/४ टीस्पून
पोळीसाठी-
  • मैदा- २५० ग्रॅम
  • हळद- चिमुटभर
  • मीठ- चिमुटभर 
  • पाणी- अंदाजे  १/४  कप
  • तेल-१/२  कप
  • तांदुळाचे पीठ- जरुरीनुसार (नसेल तर मैदाच वापरा. पण तांदूळ पीठाने पोळ्या सरसर लाटता येतात. ) 
  • साजुक तूप- जरुरीनुसार 

कृती:
पुरणासाठी- 
  • डाळ स्वच्छ धुवून पुरेश्या पाण्यात अर्धा तास भिजवावी. 
  • चिमुटभर हळद व मीठ टाकुन कुकरला शिजवुन घ्या. कुकरच्या भांड्यात ठेवा, म्हणजे खालून करपायची भीती नाही. बाहेर शिजवतो त्यापेक्षा डाळीत पाणी कमी ठेवावे. २ शिट्ट्या घ्याव्या. (बाहेर शिजायला अंदाजे ४०-५० मिनिटे लागतात. सारखे लक्ष ठेवावे लागते.)  डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे अन्यथा पुन्हा शिजवावी पण वरणासाठी करतो तसा गाळ व्हायला नको. अख्खीच दिसली पाहिजे पण बोटाने दाबल्यास फुसकन तुटली पाहिजे. 
  • डाळ शिजल्यावर सर्व पाणी गाळुन काढून बाजूला ठेवावे. (हेच पाणी वापरून कटाची आमटी करतात.) 
  • जाड बुडाच्या भांड्यात गुळ टाकुन थोडा विरघळला की शिजवलेली डाळ टाकावी. 
  • गुळ विरघळेपर्यंत चांगली परतून घ्यावी. मिश्रण एकजीव झाले की गरम असतानाच पुरण यंत्रावर किंवा पाट्यावर वाटावे. फुड-प्रोसेसरवर पण वाटता येते.   (वाटून झाल्यावर पुरण फारच सैल वाटत असेल तर स्वच्छ व सुती कपड्यावर पसरावे. कपडा पाणी शोषून घेतो व पुरण कोरडे होते.)
  • पुरण वाटून झाल्यावर वेलची पूड व जायफळ पूड टाकावी आणि पुन्हा छान मळून घ्यावे.  
पोळीसाठी-
  • मैदा चाळून घ्यावा. साधारण त्यातील १/४ कप मैदा बाजूला काढून ठेवा. 
  • मैद्यात चिमुटभर हळद व मीठ टाकून मिक्स करा. 
  • आता मैद्यात हाताने मिक्स करत करत हळूहळू पाणी घालत घ्या. अगदी चमच्याने घातलेत तरी चालेल. अंदाजे १/४ कप म्हणजे साधारण अर्धी वाटी पाणी लागेल. खूप चिकट होतो. (म्हणूनच थोडा मैदा बाजूला काढून ठेवावा, जर भिजवलेले पीठ खूपच सैल वाटले तर वरून मैदा घालता येतो.) 
  • हाताला थोडेसे तेल लावून त्याचा गोळा करून साधारण १/२ कप म्हणजे साधारण एक वाटी तेलात ३ ते ४ तास भिजत ठेवावा. एवढ्या वेळात मैदा त्यातील तेल शोषून घेतो. 
  • पोळ्या करायला घेताना हा मैद्याचा गोळा परातीत घेवून पुन्हा चांगला मळून घ्या. थोडेफार जे तेल उरलेले असते ते पण तो मैद्याचा गोळा शोषून घेतो. अगदी त्या गोळ्याला तन्यता येईपर्यंत मळायचे आहे. 
  • पुराणाचे समान आकाराचे गोळे करून घ्यावेत. याचे २० गोळे होतात. 
  • छोट्या लिंबाएवढ्या आकाराचा मैद्याचा गोळा घेऊन हातानेच दाबून पुरीसारखा आकार करून त्यात पुरणाचा गोळा भरून तो सर्व बाजुंनी सारख्या प्रमाणात ताणत ताणत नेवुन त्याची टोक जुळवून टाकावीत. वर आलेले जास्तीचे कणिक पिळुन काढून टाकावे.  
  • पोळपाटावर तांदुळाचे पीठ भुरभुरून हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. लाटताना मध्यभागीच जोर देऊ नये, नाहीतर पुरण मध्येच राहत आणि नुसती मैदाची पोळी बाजूनी वेगळी होते. कडा जाड लाटू नये, चिवट लागतात. 
  • तवा व्यवस्थित गरम करून घ्या. शक्यतो नॉन-स्टिक तवाच वापरा, पोळी चिकटण्याची शक्यता कमी असते. 
  • पोळीवरील जास्तीचे पीठ स्वच्छ रुमालाने हलकेच झटका. हलक्या हाताने पोळी उचलून तव्यावर टाका. मध्यम ते मंद आचेवरच भाजा, हलक्या हाताने उलटा. भाजताना दोन्ही बाजूंनी तूप लावा. 
  • गरमागरम पोळीवर साजुक तुपाची यथेच्छ धार सोडा आणि दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत वाढा. कोकणात काही वेळा गुळवणी (गोड नारळाचे दुध) सोबत पुरणपोळी वाढतात. देशावर काही ठिकाणी बासुंदी सोबत तर काही ठिकाणी आमरसासोबत पुरणपोळी वाढतात.  
  • डब्यात भरताना पोळ्या थंड झाल्यावरच भरा.   

टिपा :
  • पुरण आदल्या दिवशी वाटून फ्रीजमध्ये ठेवले तर आयत्या वेळेला घाई होत नाही. पण पोळ्या करायच्या आधी १ तास आधी बाहेर काढून ठेवावे.  
  • सकाळी लवकरच पहिले मैदा भिजवून तेलात ठेवून द्यावा. म्हणजे दुपारी पोळी करायला घेईपर्यंत त्याने सर्व तेल शोषुन तो छान मुलायम झालेला असतो. 
  • पिवळा गुळ वापरा.  नैसर्गिक केमिकल विरहित गुळ नको, नाहीतर पोळ्या काळ्या दिसतील.  

Friday, January 22, 2016

Aalepak (आले पाक / आल्याच्या वड्या)

लहानपणी एक आजोबा आलेपाक विकायला आणायचे. "सर्दी-खोकला, झटकन मोकळा" अशी त्यांची खणखणीत आवाजातली साद ऐकून आम्ही पटकन बाहेर यायचो. आजही 'आलेपाक' हा शब्द ऐकला की जुनी आठवण ताजी होते.  
आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.        


Read this recipe in English.....click here.

साहित्य: 
  • आले, सोलून व चिरून- १ कप
  • साखर- २ कप 
  • सायीसकट दुध- १/२  कप 
  • तूप- १ छोटा चमचा   

कृती:
  • आले अगदी थोडं पाणी वापरून गुळगुळीत मिक्सरवर वाटून घ्या. 
  • एका चौकोनी बर्फी ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या.    
  • एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये वाटलेले आले, साखर आणि दुध एकत्र करा. 
  • मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत रहा. हळूहळू साखर वितळून घट्ट होऊ लागेल. 
  • लक्ष्यपूर्वक ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल. याचा अर्थ ते तयार आहे. गॅस बंद करा.  
  • मिश्रण ट्रे मध्ये ओतून गरम  सुरीने चौकोनी तुकडे पाडा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या करा. 
  • हवाबंद डब्यात भरून ठेवा.    

Friday, November 6, 2015

Khajurachya Vadya (खजुराच्या वड्या)

आरोग्यपूर्ण व नैसर्गिक गोडवा असणाऱ्या रुचकर …… खजुराच्या वड्या !


Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • खजूर - 500 ग्रॅम
  • काजू - ¼ कप
  • बदाम - ¼ कप
  • अक्रोड - ¼ कप
  • पिस्ता - 2 टेस्पून
  • काळ्या मनुका - 2 टेस्पून
  • खसखस - 1 टीस्पून
  • वेलची पूड - 1 टीस्पून
  • डेसिकेटेड कोकोनट (रेडीमेड सुक्या खोबऱ्याचा चुंरा) - आवश्यकतेनुंसार
  • साजूक तूप - 1 टेबलस्पून

कृती:
  • खजुराच्या बिया काढून त्यांचे लहान तुकडे करा आणि मिक्सरवर भरडसर वाटून घ्या. 
  • मनुका चिरून घ्या.
  • काजू, बदाम व पिस्ता वेगवेगळे भाजून घ्या आणि अगदी बारीक तुकडे करा. 
  • खसखस ​​मंद आचेवर अगदी थोडी गरम करा. 
  • एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टिक भांड्यात तूप गरम करून खजूर टाकून त्याचा एकजीव गोळा होईपर्यंत परतून घ्यावा. सतत हलवावे नाहीतर खालून करपेल. 
  • मग त्यात भाजलेली खसखस व काजू, बदाम, पिस्ता, मनुका, वेलची पावडर घाला. मिश्रण व्यवथित मिक्स करावे आणि थोडे थंड होऊ द्यावे. 
  • मिश्रण कोमट असतानाच चांगले मळून घ्यावे आणि त्याचे दोन किंवा तीन भाग करावे. 
  • एका अॅल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिक शीट वर डेसिकेटेड कोकोनट पसरावे. 
  • खजुराच्या मिश्रणाचा एक भाग घेऊन त्याला दंडगोलाकार (रोल) आकार द्या. त्याप्रमाणे  इतर दोन रोलही तयार करा. 
  • तो रोल अॅल्युमिनियम फॉईल ठेवून घट्ट  गुंडाळून घ्या. आणि रोलच्या दोन्ही टोकांना चॉकलेट टॉफी प्रमाणे पीळ द्या. प्लास्टिक शीट वापरत असाल तर रोलच्या दोन्ही टोकांना धागा बांधून घ्या. 
  • 4-5 तास फ्रिजमध्ये हे रोल्स ठेवा.
  • चार तासानंतर वरील अॅल्युमिनियम फॉईल काढून इच्छित जाडी/रुंदी ठेवून रोलचे काप करा.

टिपा:
  • सुका मेवा मिक्सरला बारीक करू नये. भरड हवा. किंवा खलबत्त्यात कुटून घ्या.  
  • खजुराऐवजी अंजीर वापरून पण अश्याच वड्या करता येतात.  
  • मोदक मोल्ड वापरून याच मिश्रणाचे खजूर मोदक बनवता येतात. तसेच प्लास्टिक शीटवर हे मिश्रण सारख्या जडित लाटून घेवून कुकीज कटरने हव्या त्या आकारात वड्या पाडता येतात.  

Friday, August 28, 2015

Narali Bhat (नारळी भात)

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे नेहमी एकाच दिवशी असतं. नारळी पौर्णिमा आली की प्रथम आठवतो तो नारळी भात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात या दिवशी समुदात नारळ अर्पण करून पावसामुळे खवळलेल्या समुदास शांत करतात. कारण नारळ म्हणजे की शीत, सर्वांना शांत करणारा. नारळाचं दूध शरीरास खूप थंड असतं. काही वेळेला नारळीभात एक गोड पदार्थ जेवणात असावा म्हणून पण बनवला जातो.


Read this recipe in English......click here. 

साहित्य:
  • जुना तांदूळ (बासमती तुकडा किंवा आंबेमोहर) - १ कप 
  • पाणी- २+ १/४  कप (तांदूळ नवा असेल तर पाणी कमी वापरा.)   
  • साजूक तूप- ३ ते ४ टेबलस्पून 
  • लवंगा- ४
  • वेलची पूड- १/२  टीस्पून 
  • जायफळ पूड- १/२  टीस्पून 
  • गूळ, किसलेला- ३/४ कप ते १ कप 
  • ओले खोबरे, खोवलेले- २  कप  (१ मोठा नारळ) 
  • काजू, तुकडे करून- १/४ कप  
  • मनुका/बेदाणे (पिवळे किंवा काळे) - २ टेबलस्पून
  • केशर- चिमुटभर (ऐच्छिक) 
  • मीठ- चिमुटभर 

कृती:
  • तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत अर्धा ते एक तास निथळत ठेवावेत.
  • पातेल्यात २ टेबलस्पून तूप गरम करून लवंगा घालून काही सेकंद परता. 
  • निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परता.
  • तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर पाणी गरम करत ठेवा.  
  • गरम पाणी परतलेल्या तांदूळावर घाला. मीठ घालून ढवळून घ्या.  
  • पातेल्यावर झाकण ठेवून भात शिजवावा. भात शिजला की हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • भात शिजत असताना खोबरे, वेलची-जायफळ पूड आणि गूळ एकत्र  करावे. हलक्या हाताने चुरून घ्यावे.  
  • परतीतील भात कोमट असतानाच खोबऱ्याचे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
  • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या कढईत/भांड्यात तूप गरम करून काजू सोनेरी रंगावर तळून घ्यावे. मनुका टाकून जराश्या परताव्यात. 
  • लगेच आच मंद करून त्यात भात घाला. झाकण ठेवून साधारण १० ते १५ मिनीटे शिजवा. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. भांड्याखाली तवा ठेवल्यास करपण्याची भीती राहत नाही. आणि हळूहळू शिजल्यामुळे गुळ भातात चांगला मुरतो. 
  • सुरूवातीला भात पातळ होईल आणि काही वेळाने आळू लागेल.  
  • भात आळला की गॅस बंद करावा. झाकण ठेवून १५ मिनिटे तसाच ठेवावा. भात खुप कोरडा करू नये. थोडा आसट/ मऊ भात चांगला लागतो. फडफडीत/मोकळा भात चांगला लागत नाही.      

टीपा:
  •  मी भात करताना केमिकल विरहित नॅचरल गुळ वापरला आहे. हा गुळ गडद तपकिरी असतो. म्हणून भाताला तपकिरी रंग आला आहे. तुम्ही नेहमीचा पिवळा गुळ वापरू शकता.    
  • तुम्हाला जसे गोड आवडते त्या प्रमाणात गूळाचे प्रमाण पाऊण कप ते १ कप ठेवा.
  • तांदूळ पूर्णपणे शिजला पाहिजे. अन्यथा भात जर कमी शिजला असेल तर गुळ टाकल्यावर परतला तरी नंतर शिजत नाही. 
  • भात आळला की  नंतर शिजवू नये . भातातल्या गुळाचा पाक नंतर घट्ट होवू लागतो. त्यामुळे भात कडकडीत होतो. 
  • गुळाऐवजी तेवढीच साखर वापरू शकता. किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरा. 
  • विशेष करून साखर वापरल्यास भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो. चिमुटभर केशरी रंग टाकला तरी चालेल.  

दुसरी पद्दत:-
  • एका मोठ्या नारळाचे दुध काढावे.  (२ कप दुध हवे, तेवढे नसल्यास थोडे पाणी वाढवावे.) 
  • तांदूळ धुऊन निथळत ठेवून द्यावेत. 
  • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा, काजू परतून घ्यावेत. 
  • त्यातच तांदूळ टाकून थोडेसे परतवून घ्यावेत. 
  • त्यावर नारळाचं दूध व मीठ टाकून हलवावं.  
  • मंद गॅसवर भात शिजू द्यावा. 
  • भात पूर्ण शिजल्यावर त्यात किसलेला गूळ, केशर, मनुका, वेलची-जायफळ पूड टाकून मंद गॅसवर ठेवून मिश्रण हलवत राहावं. 
  • गूळ विरघळल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. 
  • भात आळला कि  गॅस बंद करावा.  


Friday, January 23, 2015

Khava Modak (खव्याचे मोदक)

आज गणेश जयंती निमित्त बाप्पाला नैवेद्य ……


साहित्य :

  • खवा/मावा - १ कप 
  • बारीक साखर- १/२ ते ३/४ कप 
  • वेलची पूड- १/२ टीस्पुन 
  • साजूक तूप- मोदकाच्या मोल्डला लावण्यासाठी  

कृती :
  • खवा मळून घेवून त्यात साखर मिसळावी .
  • जाड बुडाचे पातेले किंव्हा नॉन-स्टिक प्यान घेवून त्यात खवा घालून मंद गॅस वर ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळेल आणि खवा पातळ होऊ लागेल.  
  • मधून मधून गोळी होत आली का पहावी, गोळी करताना मावा बोटाला चिकटता कामा नये. गोळी झाली कि गॅस बंद करून पातेले खाली उतरावे. 
  • वेलची पूड घालावी व नीट मिक्स करावे.  
  • मावा थंड होवू दयावा.
  • छोटे मोदकाचे मोल्ड बाजारात मिळतात. त्यात थोडेसे तूप लावून खवा दाबून भरावा. 
  • अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.    

Thursday, December 18, 2014

Sabudana Kheer (साबुदाणा खीर / पेज)

साबुदाणा खीर हि उपवासासाठी केली जाते पण इतर वेळी गोड पदार्थ म्हणुन करू शकता. मस्त चवदार आणि पोटभरीची आहे. मी "साबुदाणा खीर" असा उल्लेख केला आहे पण आमच्या कोकणात हिला "साबुदाण्याची पेज " असे म्हटले  जाते.



Read this recipe in English........ click here.

साहित्य:
  • साबुदाणा- १/४  कप
  • साखर- २  टेबलस्पून
  • दुध- १ कप (+ १/४  कप, पातळ खीर आवडत असल्यास घालावे)
  • वेलची पूड - १/४  टिस्पून
  • केशर- एक चिमूटभर (ऐच्छिक - फक्त सजावटीसाठी)
  • बदाम, भाजून कप केलेले - १ टिस्पून (ऐच्छिक - फक्त सजावटीसाठी)
  • पाणी- १/२  कप (साबुदाणा भिजवण्यासाठी)

कृती:
  • साबुदाणे धुवुन घ्या आणि रात्रभर किंवा किमान ३-४ तास तरी पाण्यात भिजवून ठेवा.
  • एका पातेल्यात साबुदाणा, दूध, साखर, वेलची पावडर एकत्र करा.
  • मध्यम आचेवर साबुदाणा शिजू द्या. गुठळ्या होऊ नये म्हणुन सतत ढवळत रहा. साबुदाणा शिजला की पारदर्शक होऊ लागतो. 
  • साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ तो शिजला आहे.
  • अजुन पातळ खीर हवी असल्यास १/४ कप दूध घालून, ढवळुन गॅस बंद करावा. 
  • खीर वाढताना वरून सजावटीसाठी केशर आणि बदामाचे काप घालून गरमागरम सर्व्ह करावी.



Tuesday, December 16, 2014

Methi Ladu (मेथीचे लाडू)

आम्ही प्रत्येक हिवाळ्यात मेथीचे लाडू करतो. थंडीत आरोग्यास अतिशय उत्तम, उर्जावर्धक असतात. शिवाय मेथीचे लाडू  स्तनपान देणाऱ्या मातांसाठी  विशेष करून केले जातात. बाळंतीणीची रोग-प्रतीकारशक्ती आणि दुधाचे प्रमाण वाढावे तसेच बाळाला जन्म दिल्यामुळे झालेली शरीराची झीज भरून येण्यासाठी जी पोषणमूल्ये  आणि उष्मांक आवश्यक असतात ती देण्यासाठी मेथी व  लाडूतील अन्य घटक मदत करतात. हि सोप्पी पाककृती माझी आजी बनवायची त्याप्रमाणे आहे.

Read this recipe in English......click here.


साहित्य:
  • मेथी पीठ/पुड - २५० ग्रॅम (बाजारात मिळते)
  • बारीक रवा- १ किलो
  • सुके खोबरे, किसुन - २५० ग्रॅम
  • गूळ, चिरून- १ किलो
  • हलीम/हळीव/अहळीव- १०० ग्रॅम
  • डिंक- ३०० ग्रॅम
  • जायफळ पुड- १ टेबलस्पून 
  • खसखस- २० ग्रॅम
  • बदाम - १०० ग्रॅम
  • खारीक- १०० ग्रॅम
  • साजुक तूप- साधारण ५०० ग्रॅम
  • पाणी- अर्धा कप (साधारण एक वाटी)

कृती:
  • मेथी पीठात  १/४ कप तूप घाला व हाताने चोळून चोळून व्यवस्थित एकत्र करा आणि ते किमान २ दिवस तसेच ठेवा. मात्र रोज एकदातरी ते पीठ चोळावे.  
  • २ ते ८ दिवसानंतर लाडू करायला घ्या. रवा निवडून घ्या. 
  • कढईत ३-४ टेबलस्पून तूप घालुन रवा खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर १ टिस्पून तूप घालुन हलीम खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर खसखस खमंग भाजा. बाजुला ताटात काढून ठेवा.  
  • त्यानंतर किसलेले सुके खोबरे तांबूस रंग येईपर्यंत चुरचुरीत भाजून घ्या. भाजल्यावर हाताने थोडेसे चुरा. बाजुला ताटात काढून ठेवा. 
  • त्यानंतर कढईत तूप गरम करून, डिंक फुलेपर्यंत तळा. थंड झाल्यावर हाताने थोडेसे चुरा. बाजुला ताटात काढून ठेवा. 
  • खारकांच्या बिया काढून टाका व त्याचे छोटे छोटे करा.  
  • त्यानंतर त्याच तूपात बदाम आणि खारका तळा. थंड झाल्यावर खलबत्त्यात भरडसर कुटा किंवा मिक्सरवर भरड दळा.   
  • मोठ्या परातीत वरील भाजलेले सर्व साहित्य एकत्र करावे. जायफळ पूड घालावी आणि चांगले मिक्स करावे. बाजूला ठेवा.
  • जाड बुडाच्या कढईत किंव्हा पातेल्यात १ टेबलस्पून तूप गरम करावे. गूळ आणि पाणी घालावे. मध्यम आचेवर सतत ढवळत रहावे. गुल वितळुन हळुहळू पाक उकळायला लागेल. २ तारी पाक व्हायला हवा. आच कमी करा. पाक जास्त शिजला तर लाडू कडक होतात.  
  • पाक उकळायला लागला की लगेच त्यात परातीतील कोरडे मिश्रण त्यात टाकावे. चांगल्या मजबूत चमच्याने ढवळुन सर्व पटापट व्यवस्थित एकत्र करावे. 
  • थोडावेळ सतत ढवळत रहावे. सगळ छान एकजीव झाल पाहिजे. 
  •  गॅस बंद करून पातेले खाली उतरवा. हाताला जरासं तूप चोळुन पटापट लाडू वळा. हे मिश्रण थंड होण्याआधीच लाडू वळा. नंतर मिश्रण कडक होऊन लाडू वळले जात नाहीत. (मंद गॅस वाट जड तवा ठेवून त्यावर पातेले ठेवले, तर मिश्रण गरम रहाते.) 
  • पूर्णपणे थंड झाल्यावर लाडू डब्यात भरून ठेवा.

टीपा: 
  • काजू घातले तरी चालतील. बदामाप्रमाणेच काजू तुपात टाळून कुटून घ्यावेत. काजू घातले तर लाडू अधिक रुचकर बनतात. पण काजू आरोग्यास फारसे उपयुक्त नसल्याने टाळावे.   
  • २ तारी पाक म्हणजे चमच्याने थोडासा पाक काढून किंचित थंड करून दोन बोटाच्या चिमटीत धरून पाहावा. पाक बोटाला चिकट लागतो आणि बोटं लांब केल्यावर २ ते अधिक तारा दिसतात. (पाक जास्त शिजून १ तरी होईल. तरमग लाडू दगडासारखे कडक होतील.)   
  • थंडीत रोज सकाळी १ लाडू खाणे चांगले असते.  

Friday, October 24, 2014

Shevaya Kheer (शेवयांची खीर)

करायला अतिशय सोप्पी आणि खायला अतिशय रुचकर ………. शेवयांची खीर



Read this recipe in English...click here. 

साहित्य :
जाड शेवया- १ कप
साजुक तूप- १ टेबलस्पून
पाणी- १/२  कप
सायीसह दुध- १ १/२ ते २ कप
साखर-  ५ ते ६ टेबलस्पून (किंव्हा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
वेलची पूड- १/२  टीस्पून
केशर- चिमूटभर (ऐच्छिक)
बदाम- ६
काजू- ६
मनुका/बेदाणे- २ टेबलस्पून

कृती :
बदाम आणि काजूचे काप करा किंवा बारीक तुकडे करा.
एका नॉन-स्टिक किंव्हा जड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात शेवया घालून परताव्या. 
शेवयांना छान सोनेरी तांबूस रंग यायला लागल्यावर त्यात बदाम-काजूचे कप व पाणी घालून झाकून मंद आचेवर २ मिनिटे शिजवावे. (आपण पाण्याऐवजी दूध वापरू शकता, मी पण पूर्ण दूधच वापरते.)
शेवया शिजल्यावर मग साखर घालावी.
व्यवस्थित ढवळुन त्यात केशर व दूध घालावे. दुधाला छान उकळी येऊ द्यावी.
वेलची पूड आणि बेदाणे घालुन व्यवस्थित ढवळुन अगदी मिनिटभर मंद आचेवर शिजवा.
खीर जर जास्त दाटली आवश्यकतेनुसार दूध वाढवावे. पण या शेवयांची खीर थोडी दाटसरच चांगली लागते.
गॅस बंद करून शेवया झाकून ठेवा.
बदामाचे काप आणि केशर घालून गरम किंवा थंड सर्व्ह करावी.


Wednesday, October 15, 2014

Shankarpali (शंकरपाळी)

खुसखुशीत आणि करायला अगदी सोप्पी ………



साहित्य :
  • मैदा- ५०० ग्रॅम 
  • बारीक रवा- १०० ग्रॅम (१ वाटी) 
  • दुध- १ कप (दीड वाटी) 
  • साखर- १ कप (सव्वा वाटी) 
  • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- अर्धा कप (१ वाटी) 
  • मीठ- चिमुटभर 
  • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती:
  • एका पातेल्यामध्ये रवा, दुध, साखर व तूप एकत्र करून गरम करण्यास ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे. सतत हलवावे नाहीतर गुठळ्या होतील. या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करावा. मिश्रण पेजेसारखे (खिरीसारखे) दिसेल. 
  • मैदा परातीत चाळून घ्यावा. मधे खड्डा करून वरील मिश्रण त्यात ओतावे. हळू हळू कणिक मळून घ्यावी. घट्ट कणिक मळावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर अगदी थोडेसे पाणी किंव्हा दुध शिंपडावे आणि मळून घ्यावे किंव्हा पाण्याच्या हाताने मळावी. 
  • कणिक तयार झाली की ती १-२ तास झाकून ठेवावी. त्यामुळे कणिक लाटण्यायोग्य सैल होते. 
  • आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर कणकेचे छोटे छोटे तुकडे करून फूड-प्रोसेसर मध्ये फिरवुन घ्यावेत. (आमच्याकडे पाट्यावर कुटून घेतात म्हणजे कणिक सैल होते.) 
  • मग या कणकेचे मोठे गोळे करून ते चपातीप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. हि चपाती फार जाड नको आणि फार पातळही नको. लाटण्यासाठी वरून मैदा लावण्याची आवश्यकता नाही. 
  • कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. झालेल्या शंकरपाळ्या आणि कणिक फडक्याने झाकून ठेवावे. 
  • सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की भरपूर तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. प्रखर(मोठ्या) आचेवर तळल्या तर बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे नंतर मऊ पडतात. 
  • जोडीला दुसरे कुणी असेल एकाने लाटाव्यात, एकाने तळाव्यात . 

Monday, September 1, 2014

Pakatale Rava-Khobare Ladu (पाकातले रवा-खोबरे लाडू)

ओल्या नारळाचा वापर करून केलेले कोकणाची मधुरता असलेले रवा लाडू ........



Read this recipe in English.

साहित्य:
  • बारीक रवा- १ कप
  • ओले खवलेले खोबरे- १ कप  
  • पाणी- १/२ कप 
  • साखर- ३/४ कप ते १ कप 
  • साजूक तूप- १/४  कप 
  • वेलची पूड- १/२ टीस्पून 
  • चारोळ्या- १ टेबलस्पून 
  • मनुका/बेदाणे- १ टेबलस्पून 
  • बदाम,काजू,पिस्ता यांचे काप- १ टेबलस्पून (ऐच्छिक)


कृती:
  • रवा मंद ते मध्यम आचेवर तूपावर खमंग, गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. 
  • त्यात खोबरे टाकून अजून ४-५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यावे. रवा चांगला फुलाला पाहिजे नाहीतर लाडू कच्चट लागतात. 
  • रवा-खोबरे भाजून झाले की त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावेत व अजून थोडावेळ परतावे.  
  • पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. साखर वितळली की ३-४ मिनिटात पाक (एकतारी  पाक हवा) तयार होतो.  
  • गॅस बंद करून त्यात रवा व वेलची पूड घालावी.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.  
  • २-३ तासांनी मिश्रण आळून लाडू वळण्याजोगे होईल. मग लाडू वळावेत. 
  • लाडू जास्त दिवस ठेऊ नयेत. ओल्या खोबऱ्यामुळे लाडू लवकर खराब होतात.  ५-६ दिवसांपेक्षा जास्त राहिले तर फ्रीज मध्ये ठेवावेत.


Sunday, August 10, 2014

Naralipak (नारळीपाक/ खोबऱ्याच्या वड्या)

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!! 


Read this recipe in English.........click here.


साहित्य: 
  • खवलेलं खोबरं-  १ कप (कपात खोबरं जेवढे दाबून भरता येईल तेवढे भरावे )
  • साखर- १ कप
  • साईसकट  दुध- १/२ कप
  • वेलची पावडर- १/२ टीस्पून
  • साजुक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून

कृती:
  • नारळ खवताना शेवटपर्यंत खवू नये. फक्त पांढर खोबरच वापरावे. 
  • ताटाला तूप चोळून ठेवावे नंतर घाई होते. 
  • नॉन स्टिक किंव्हा जाड बुडाच्या एका मोठ्या कढईत तूप गरम करावे. 
  • त्यात खवलेलं खोबरं,साखर आणि दुध एकत्र करून मध्यम आचेवर परतावे. सतत ढवळावे नाहीतर खाली लागेल. 
  • प्रथम साखर वितळेल आणि मिश्रण पातळ होईल पण नंतर मिश्रण घट्ट होऊ लागेल. 
  • त्यात वेलचीपूड घाला आणि परतत रहा. थोड्यावेळानी कढईच्या कडेने मिश्रण सुटू लागेल व कोरडं पडायला लागेल. याचा अर्थ मिश्रण तयार झाले. (मिश्रण जास्तीवेळ शिजले तर वड्या पडणार नाहीत आणि गार झाल्यावर मिश्रणाचा चुरा होईल.)
  • मिश्रण गॅसवरून उतरावे व तूप लावलेल्या ताटात सर्वत्र सारखे पसरावे. 
  • ते गरम असतानाच सुरीने वड्या पाडा. गार झाल्यावर वड्या काढून घ्या. 
  • हवाबंद डब्यात ठेवा. लवकर संपवून टाका त्या फार काळ बाहेर टिकत नाहीत. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.  (पण फ्रीझमध्ये वड्यांची चव बदलते.)    


वैविध्य: 
  • वरील दुधात चिमुटभर केसर टाकला तर छान रंग आणि स्वाद येईल. (आमच्या गावी दुकानात जो नारळीपाक मिळतो त्यात ते लोक केशरी रंग वापरतात.) 
  • दुधाऐवजी १०० ग्रॅम खवा किंव्हा अर्धा डबा कण्डेन्स्ड मिल्क वापरले तर वड्या बर्फीसारख्या लागतात. 
  • दुधाऐवजी टोमाटोचा घट्ट रस वापरला तर वड्यांना छान आंबट-गोड चव व रंग येतो. 
  • दुधाऐवजी आंबा रस वापरला कि झाल्या आंबा-खोबरे वड्या. 
  • वड्यांमध्ये गाजराचा किंव्हा बीटाचा कीस वापरता येतो. कसे ते पाहायचे आहे का? मग माझी "बीट -खोबऱ्याच्या वड्या" हि रेसिपी वाचा. (रेसिपी वाचण्यासाठी रेसिपीच्या नावावर क्लिक करा.)         

Monday, March 10, 2014

खव्याची पोळी

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला  अप्रतिम लागते.  करायलाही खूप सोप्पी. पेढे-बर्फी उरली आहे का?…… मग त्यापासूनही करता येण्यासारखी.     



Read this recipe in English........... click here. 


साहित्य :
  • तांदूळ पीठ  किंव्हा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी 
  • साजूक तूप-  आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी 
पोळीसाठी :
  • गहू पीठ (कणिक)-  १ कप 
  • मैदा- १/२ कप 
  • बारीक रवा- १/४ कप 
  • तेल (मोहन)- १/४ कप 
  • मीठ- १/४ टीस्पून 
  • पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप 
सारणासाठी :
  • खवा- १ कप (२०० ग्रॅम )
  • खसखस- १ टेबलस्पून  
  • पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप 
  • जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून 
  • कणिक- १/४ कप 
  • साजूक तूप- १ टीस्पून  
  • दुध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )

कृती :
  • कणिक, मैदा, रवा, मीठ एकत्र करावे व कडकडीत मोहन घालून कणिक दोन तास भिजवून ठेवावी. कणिक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.   
  • खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.  
  • कणिक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी.  दुसऱ्या बाउल मध्ये काढून ठेवावी.  
  • खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा. खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा. 
  • खवा, भाजलेली कणिक, पिठीसाखर, खसखस कुट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण  खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.   
  • सारणाचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • कणकेचे सुद्धा लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • हाताला तूप लाऊन कणकेचा एक गोल घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे. 
  • तांदळाच्या पीठावर  नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. 
  • पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अश्या प्रकारे  सर्व पोळ्या करून घ्याव्यात. 
  • गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी. 
टीप: 
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल.  फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दुध आणि चवीप्रमाणे पिठी साखर टाकून छान मळून घ्या.। सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.   

Saturday, January 25, 2014

उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी /सांजोरी /खांटोळी

किती सोप्पी आणि सहज घरात असणाऱ्या पदार्थांपासून होणारी ही पाककृती. पण उपवास म्हटला की आपण साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा याच्या पलीकडे जाताच नाही. उपवासाच्या दिवसात पोटाला आराम देणारी आणि तेलकट नसलेली एक छानशी पारंपारिक आणखी एक विस्मृतीत गेलेली आजीची पाककृती.......
ज्या दिवशी उपास नसेल तेव्हा हा पदार्थ तांदुळाच्या रव्यापासून पण बनवला जातो.


साहित्य:
  • वरीचे तांदूळ- १ कप 
  • साखर किंव्हा चिरलेला गुळ - १ कप   
  • खवलेले ओले खोबरे- १ कप  
  • वेलची पूड- १ टीस्पून   
  • साजूक तूप- २ टीस्पून 
  • पाणी- १ १/२ कप  
कृती:
  • वरी तांदूळ निवडून, धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळून द्यावेत.  
  • एकीकडे पाणी गरम करत ठेवावे. 
  • नॉन-स्टीक  कढईत तूप गरम करून धुतलेले वरीचे तांदूळ गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.
  • त्यावर उकळते पाणी घालून हलवावे. झाकण ठेऊन दोन वाफा काढाव्यात. 
  • वरी तांदूळ शिजले की ओले खोबरे, साखर किंव्हा गुळ, वेलची पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेऊन वाफ काढावी. 
  • थाळीला तूप लाऊन शिजलेले मिश्रण थापावे. 
  • थोडे थंड झाले की त्याच्या वड्या कापाव्या.      

Wednesday, January 8, 2014

Tilgul (तीळगुळ)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तीळगूळ घ्या गोड गोड बोला !!



Read this recipe in English........click here.


साहित्य:
  • तीळ (पॉलीशचे) - ५०० ग्रॅम 
  • चिक्कीचा गूळ- ५०० ग्रॅम 
  • शेंगदाणे- २०० ग्रॅम 
  • सुके खोबरे- १ वाटी/ कवड 
  • वेलची पूड- २ टिस्पून 
  • साजूक तूप- २ टिस्पून 

कृती: 
  • सुक्या खोबऱ्याच्या वाटीची बाहेरची बाजू किसून त्याचा काळा भाग काढून टाका. नंतर किसा, त्यामुळे पांढरे शुभ्र खोबरे मिळेल. मंद आचेवर नकरपवता हलकेसे भाजून घ्या. 
  • शेंगदाणे भाजून, सोलून घ्या. भरड कुट करा. मी त्यासाठी लाटणे वापरते. 
  • तीळ खमंग भाजून घ्यावेत. 
  • तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड परातीत एकत्र करा. चांगले मिसळून ठेऊन द्या. 
  • जाड बुडाच्या कढईत किंव्हा नॉन-स्टिक पॅन मध्ये, २ टेस्पून तूप गरम करून गूळ घालावा. आच मध्यम असावी. 
  • सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. नंतर त्याला उकळी येउन रंग बदलू लागेल, साधारण लालसर होऊन गुळाचा छान वास येऊ लागेल. आच कमी असावी. 
  • पाक तयार झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा जरासा पाक चमच्याने बाहेर काढून अंदाज घ्यावा. एकतारी पाक तयार व्हायला हवा. किंव्हा त्या पाकाची कडक गोळी झाली पाहिजे तर पाक तयार आहे असे समजावे. 
  • पाक झाला की त्यात तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड चे मिश्रण घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत, नाहीतर लाडू वळले जात नाहीत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही. 
  • मिश्रण थंड होऊ लागले तर जाड तवा गरम करा. नंतर गॅसची आच मंद करून तव्यावर मिश्रणाची कढई ठेवा. तिळगुळाचे मिश्रण सैल होऊ लागेल.  
  • सर्व लाडू वळून घ्या व त्यांना थंड होऊ द्या. नंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवा. 

टीप: भाजताना काहीही जळऊ नका कारण तीळगुळात जर काळा भाग असेल तर चांगला दिसत नाही.









Friday, November 29, 2013

Mugache Ladu (मुगाचे पौष्टीक लाडू)

साधारणपणे मुगाचे लाडू हे नेहमीच्या (साल काढलेल्या ) डाळीच्या पीठापासून बनवले जातात.  परंतु मी (खरतरं माझ्या सासूबाईंनी) इथे थोडा बदल केला आहे. सालवाली मुगाची डाळ आणि इतर साहित्य वापरून  हे लाडू अधिक पौष्टीक  बनवले आहेत.  

हे लाडू उपवासाला पण चालतात. थंडीच्या दिवसांत भरपूर उष्मांक देतात. शिवाय गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीयांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे लाडू आहेत. 


साहित्य:
  • सालवाली मुगाची डाळ- २५० ग्रॅम 
  • पिठीसाखर- १०० ते १२५ ग्रॅम (तुम्हांला कितपत गोड आवडत त्याप्रमाणात )
  • साजूक तूप- १२५ ग्रॅम 
  • बदाम पूड- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • खारीक पूड-  १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • डिंक- २ टेबलस्पून 
  • काळ्या मनुका- १/४ कप (साधारण अर्धी वाटी )
  • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
  • वेलची पूड- १ टीस्पून 

कृती :

  • सालवाली मुगाची डाळ खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. थंड झाल्यावर मिक्सरवर दळावी. 
  • डिंक थोड्याश्या तूपात फुलवून (तळून ) घ्यावा. मिक्सरवर जाडसर दळून घ्यावा. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून, ती चाळून घ्यावी.
  • एका जाड  बुडाच्या भांड्यात/कढईत किंव्हा नॉन-स्टिक प्यानमध्ये गरजेप्रमाणे तूप घेऊन  मुगाचे पीठ खमंग वास येईपर्यंत मध्यम  ते मंद आचेवर (  जसे बेसन लाडू साठी बेसन भाजतो तसे ) भाजावे.  सतत हलवावे अन्यथा खालून जळण्याची भिती असते.
  • थंड झाल्यावर चवीप्रमाणे पिठीसाखर  इतर सर्व पदार्थ त्यात मिसळून लाडू बांधावेत.
टीप: साखर वापरायची नसेल तर मेथीच्या लाडूला जसा आपण गुळाचा पाक करतो तसा करून भाजलेले मुगाचे पीठ व इतर सर्व साहित्य पिठीसाखर वगळून त्यात घालून लाडू वळावेत. यात तूप कमी वापरले तरी चालते.  

Tuesday, October 29, 2013

Besan Ladu (बेसन लाडू)

दिवाळीत तर करायलाच पाहिजेत असे बेसन लाडू ...........पण लांबच्या प्रवासात सोबत न्यायला सुद्धा उत्तम.
  

Read this recipe in English....... click here.

साहित्य:
  • चणाडाळ - ५०० ग्रॅम
  • साजूक तूप- २५० मिली  
  • पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
  • वेलचीपूड- २ टीस्पून 
  • बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)

कृती:
  • डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.)  
  • गिरणीतून दळून आणावी. 
  •  बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते  मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर  नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील. 
  • बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.) 
  • बेसन पूर्ण गार होवू द्यावे. 
  • पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी. 
  • नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव  घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी.  
  • नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
  • साजूक  वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात,  ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.

सुचना: 
  • जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ  होतात.
  • बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल.   
  • पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
  • किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
  • कधीही भाजलेले  बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या  तयार होऊन लाडू बिघडतात.      
  • घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.       


शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे  बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे.