Showing posts with label शीळ्या अन्नापासून नवीन पदार्थ. Show all posts
Showing posts with label शीळ्या अन्नापासून नवीन पदार्थ. Show all posts

Tuesday, January 16, 2018

भाताचे वडे

भात उरला की नेहमी फोडणीचा भात केला जातो, असे वडे केल्यास चवीत मुलांना एक चटपटीत पदार्थ मिळेल. खरंतर चुकून एखाद्या दिवशी भात नरम झाला तर तो संपणे मुश्किल असते, असा नरम भात याच पद्धतीने संपवणे नक्कीच चांगले.   



साहित्य:
भात-  १ कप 
बेसन-  १/४ कप
ज्वारीचे पीठ किंवा भाजणी-  १/४ कप 
बारिक चिरलेली कोथिंबिर- १/४ कप
बारिक चिरलेला कांदा- १ मध्यम   
बारिक चिरलेला कढीपत्ता- ५ ते ६  पाने
बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- ५ ते ६ 
हळद-  १/२ टीस्पून 
धणे पूड- १ टीस्पून  
जिरे- १ टीस्पून  
ओवा- १/२  टीस्पून  
तीळ-  १ टीस्पून  
मीठ- चवीनुसार 
तेल तळणासाठी- आवश्यकतेनुसार 

कृती:
हे वडे बनवण्यासाठी भात जरा नरमचं हवा पण जर मोकळा असेल तर थोडस पाणी शिंपडून वाफवून नरम करून घ्यावा. मायक्रोवेव्हमध्ये केल्यास पटकन होईल.
एका बाउल मध्ये भात व इतर सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण छान मळून घ्यावे .
मळलेल्या पीठाचे गोळे करून घ्या आणि तळव्यावर दाबून त्यांना चपटा आकार द्या. मेदूवड्याप्रमाणे मध्ये भोक केलं तरी चालेल.
तेल गरम करून मध्यम आचेवर वडे खरपूस तळावेत.
गरमागरम वडे टॉमेटो सॉस सोबत सर्व्ह करा. हे वडे गरमच चांगले लागतात, गार झाले कि मऊ पडतात.

Thursday, April 21, 2016

Chitrann (चित्रान्न ~ कैरी भात)

चैत्र महिन्यातील खासीयत असलेल्या चित्रान्न या पदार्थाचे मुळ कर्नाटकात असले तरी हा भात महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातही बनवला जातो. दाक्षिणात्य 'लेमन राइस' च्या चवीशी साधर्म्य असणारा हा भाताचा एक प्रकार आहे. यासाठी शिळा भातही चालेल.

   


Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • शिजलेला मोकळा भात- ३ कप (बासमती वापरण्याची गरज नाही, मी रोजच्या वापरातील 'कोलम' तांदुळ वापरला आहे. )  
  • कैरीचा कीस- १/२  ते १ कप 
  • खवलेले ओले खोबरे- १/४  कप 
  • हिरव्या मिरच्या, चिरून- २ ते ३
  • कढीपत्ता- १ डहाळी 
  • शेंगदाणे- मुठभर 
  • काजू तुकडे- १ टेबलस्पून (ऐच्छिक) 
  • चणाडाळ- १ टेबलस्पून 
  • उडीद डाळ- १ टीस्पून 
  • लाल सुक्या मिरच्या, तोडून- २
  • मोहरी- १ टीस्पून 
  • हिंग- १/४  टीस्पून 
  • हळद- १/२  टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • साखर- चिमुटभर (ऐच्छिक) 
  • तेल- २  टेबलस्पून 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४  कप 

कृती:
  • सडसडीत भात शिजवून घ्यावा. थंड झाल्यावर हलक्या हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात भाताच्या प्रमाणात मीठ घालून मिसळून घ्यावा.  
  • कढईत तेल गरम करावे. तेलात शेंगदाणे आणि काजू खरपुस तळून घ्यावेत. झाऱ्याने बाहेर काढून भातावर टाकावेत. 
  • त्याच तेलात मोहरी टाकावी, ती तडतडली की चणाडाळ व उडीदडाळ टाकून सोनेरी तपकिरी रंगावर तळून घ्यावी. 
  • त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे व कडीपत्ता टाकून जरासे परतावेत. 
  • त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि हिंग घालून जरासे परतावे. 
  • आता त्यात हळद, कैरीचा किस, साखर व जरास मीठ घालुन ३-४ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. 
  • त्यात खवलेले खोबरे घालून पुन्हा जरावेळ परतावे. 
  • आता त्यात शेंगदाणे व काजू घातलेला भात टाकून चांगला मिसळून घ्यावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी. 
  • नंतर त्यात कोथिंबीर टाकुन पुन्हा एकदा जरासा परतून घ्यावा. 
  • चित्रान्न तयार आहे. भात पापडासोबत वाढावा.        

टीपा:
  • मला स्व:ताला फारसे आंबट आवडत नाही त्यामुळे मी १/४  कप एवढाच कैरीचा किस वापरते. तुम्ही सुद्धा तुमच्या आंबटपणाच्या आवडीवर किसाचे प्रमाण ठरवा. 
  • कैरी आधीच चाखून बघा म्हणजे ती किती आंबट आहे हे कळेल, त्यावरून किसाचे प्रमाण ठरवा. 
  • भात फोडणीला घालताना तो पुरेसा थंड झाला असावा. 
  • शिळा भात संपवण्याचा एक रुचकर उपाय.
  • साखर जास्त घालू नका. हा साखरभात नाही.       
  • बदल म्हणून भाताऐवजी पोहे वापरावे. कांदे पोह्याला जसे पोहे भिजवतो तसे भिजवून वर सांगितलेली फोडणी करावी.       


Monday, March 10, 2014

खव्याची पोळी

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला  अप्रतिम लागते.  करायलाही खूप सोप्पी. पेढे-बर्फी उरली आहे का?…… मग त्यापासूनही करता येण्यासारखी.     



Read this recipe in English........... click here. 


साहित्य :
  • तांदूळ पीठ  किंव्हा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी 
  • साजूक तूप-  आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी 
पोळीसाठी :
  • गहू पीठ (कणिक)-  १ कप 
  • मैदा- १/२ कप 
  • बारीक रवा- १/४ कप 
  • तेल (मोहन)- १/४ कप 
  • मीठ- १/४ टीस्पून 
  • पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप 
सारणासाठी :
  • खवा- १ कप (२०० ग्रॅम )
  • खसखस- १ टेबलस्पून  
  • पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप 
  • जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून 
  • कणिक- १/४ कप 
  • साजूक तूप- १ टीस्पून  
  • दुध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )

कृती :
  • कणिक, मैदा, रवा, मीठ एकत्र करावे व कडकडीत मोहन घालून कणिक दोन तास भिजवून ठेवावी. कणिक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.   
  • खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.  
  • कणिक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी.  दुसऱ्या बाउल मध्ये काढून ठेवावी.  
  • खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा. खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा. 
  • खवा, भाजलेली कणिक, पिठीसाखर, खसखस कुट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण  खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.   
  • सारणाचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • कणकेचे सुद्धा लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • हाताला तूप लाऊन कणकेचा एक गोल घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे. 
  • तांदळाच्या पीठावर  नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. 
  • पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अश्या प्रकारे  सर्व पोळ्या करून घ्याव्यात. 
  • गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी. 
टीप: 
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल.  फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दुध आणि चवीप्रमाणे पिठी साखर टाकून छान मळून घ्या.। सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.   

Monday, April 29, 2013

मोडाच्या मुगाचा भात

मोड आलेल्या मुगाची उसळ किंव्हा आमटीच आपण करतो. पण हा भात सुद्धा छान लागतो.




Read this recipe in English....... click here.


साहित्य:
  • शिजवलेला (किंव्हा शिळा) भात - १ कप
  • उकडलेले मोडाचे मुग- १/२ कप
  • चिरलेला कांदा- १/२ कप
  • चिरलेली सिमला मिरची - १/४ कप
  • जिरे- १/२ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • लाल मिरची पूड- १ टीस्पून
  • गरम मसाला- १/२ टीस्पून
  • तेल- २ टेबलस्पून
  • मीठ चवीप्रमाणे
  • कोथिंबीर आणि टोमाटो चकत्या सजावटीसाठी


कृती:
  • भाताची शीते हलक्या हाताने मोकळी करून घ्यावी. 
  • एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, शिमला मिरची, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, मिरची पूड, मुग टाकून १-२ मिनिट परतून घ्यावा. त्यात भात आणि मीठ टाकून छान एकत्र करून झाकण लाऊन एक वाफ द्यावी. 
  • कोथिम्बिर आणि टोमाटोने सजून गरमागरम वाढा.