Thursday, May 21, 2015

Palak Khichadi (पालक खिचडी)

पालक खिचडी रात्रीच्या जेवणासाठी अगदी योग्य पर्याय आहे. बनवायला सोप्पी, पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम…Read this recipe in English.......click here. 


साहित्य:
 • तांदूळ - १ कप (बासमती घेण्याची गरज नाही, रोजच्या वापरातला किंव्हा कोलम तांदूळ वापरावा) 
 • मुगडाळ- १/२ कप 
 • शेंगदाणे- १/४ कप (आवडत असल्यास अजून जास्त वापरा) 
 • पालक, चिरून- ३ कप (१ छोटी गड्डी/जुडी)
 • कांदा, चिरून- ३/४ कप (१ मोठा)
 • टोमॅटो, चिरून- १/२ कप (१ मध्यम)
 • लसूण, ठेचुन किंवा बारीक चिरून- ६ पाकळ्या
 • राई/ मोहरी- १/२ टीस्पून 
 • जीरे- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/४ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून 
 • घरगुती मसाला / मिरची पूड- २ टीस्पून 
 • गोडा मसाला- २ टीस्पून 
 • तेल- ३ टेबलस्पून
 • गरम पाणी- अंदाजे २  १/२ ते ३ कप (तांदूळ नवा आहे कि जुना यावर अवलंबुन आहे.) 
 • मीठ- चवीनुसार 
 • खवलेले ओले खोबरे- १/२ कप
 • साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक) 

कृती:
 • किमान १ तास शेंगदाणे पाण्यात भिजत घाला. 
 • पालक निवडुन धुवून आणि चिरून घ्या. कोवळी देठे घ्या.
 • तांदूळ व मूगडाळ धुवून आणि बाजूला ठेवा.
 • कुकरमध्ये तेल गरम करा. राई टाका.
 • राई तडतडली की जिरे, लसूण आणि कांदा घालून परता.
 • कांदा गुलाबी झाल्यावर  हळद, हिंग, तिखट घाला आणि थोडावेळ परता.
 • आता टोमॅटो, पालक, शेंगदाणे आणि गोड मसाला घालून एक मिनीट परतून घ्या.
 • तांदूळ आणि डाळ घालून जरास परता. 
 • नंतर पाणी आणि मीठ घाला. झाकण लावून ३ शिट्ट्या काढा.
 • वाफ गेल्यावर कुकर उघडा आणि व्यवस्थित मिक्स करा. 
 • वाढताना भातावर साजूक तूप आणि ओले खोबरे टाकून कोशिंबीर व पापडाबरोबर सर्व्ह करा.

टीप: पालका ऐवजी मेथी वापरू शकता.


Thursday, May 14, 2015

Baby Corn-Shimala Mirachi Masala (बेबी कॉर्न- शिमला मिरची मसाला)

चटपटीत, पटकन होणारी बेबी कॉर्नची भाजी……… साहित्य:
 • बेबी कॉर्न, चकत्या कापून - १ कप 
 • सिमला मिरची, चौकोनी कापून- १ कप 
 • कांदा, बारीक चिरून- १ कप 
 • टोमॅटो, बारीक चिरून- १/२ कप
 • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा ठेचून- २ टिस्पून 
 • आले लसूण पेस्ट- २ टिस्पून
 • हळद- १/२ टिस्पून
 • हिंग- चिमुटभर 
 • कढाई मसाला किंवा पंजाबी गरम मसाला- १/२ टिस्पून
 • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप
 • तेल- ४ ते ६ टेबलस्पून
 • मीठ- चवीनुसार

कृती:
 • बेबी कॉर्न धुवून कापून घ्या आणि ब्लांच करा (उकळत्या पाण्यात टाकून फक्त १-२ मिनिटे शिजवा व निथळत ठेवा.)
 • एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मिरची आणि कांदा घाला. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. 
 • त्यात हळद, हिंग, आले- लसूण पेस्ट, टोमॅटो आणि मीठ घाला. २-३ मिनिटे परतून घ्या.
 • बेबी कॉर्न घालून चांगले मिक्स करा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवा. 
 • शिमला मिरची आणि गरम मसाला घालून चांगले मिक्स करा. झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवा. 
 • वरून कोथंबीर घालून गरमागरम चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करा.

बेबी कोर्न ऐवजी कोळंबी वापरून पण हि भाजी करता येईल.  

Friday, May 8, 2015

Sabudana Chakali (साबुदाणा चकली)

साबुदाणा चकली  उपासाला चालते आणि बच्चे कंपनीला तर फारच आवडते.
साहित्य:
 • साबुदाणा- १ कप
 • उकडलेले बटाटे, किसून- ३
 • लाल मिरची पूड- २ टिस्पून
 • जिरे- १ टिस्पून
 • मीठ- चवीनुसार

कृती:
 • साबुदाणे धुवुन ८-१० तास किंवा रात्रभर २ कप पाण्यात भिजवून ठेवा. 
 • एका  वाडगयात  भिजवलेला साबूदाणा, किसलेले बटाटे, लाल मिरची पूड, जिरे, मीठ एकत्र करा. चांगले मळून घ्या. 
 • चकली साचा वापरून प्लास्टिक पेपरवर चकल्या पाडा. (छोट्या चकल्या बनवा, तळलेल्या चकल्या खूप फुलतात.)
 • कडक उन्हात ४-५ दिवस किंवा पूर्णपणे कोरड्या होईपर्यंत वाळवा.
 • हवाबंद डब्यात भरून ठेवा.
 • जेंव्हा हव्या तेव्हा तळा, कुरकूरीत आणि चवदार साबुदाणा चकली तयार. 

टिपा:
 • मळलेले पीठ खूप सैल वाटत असेल तर, थोडेसे वरीचे पीठ घालावे.
 • चकल्या निट पडत नसतील किंवा तुमच्याकडे चकली साचा नसेल तर छोटे छोटे सांडगे बनवा आणि वाळवा.  

Tuesday, May 5, 2015

Kokam Sarbat/ Amrut Kokam (कोकम सरबत/अमृत कोकम)

कोकम सरबत हे आंबट-गोड चवीचे अतिशय रुचकर, पाचक, आम्लपित्तनाशक असे गुणकारी पेय आहे. उन्हाळ्यातच नाही तर संपुर्ण वर्षभर प्यायले जाणारे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. कोकमाची फळे "रातांबे" या नावाने सुद्धा ओळखली जातात. कोकणात एप्रिल-मे मध्ये मुबलक प्रमाणात येऊ लागतात. याची साले सुकवुन जेवणात आंबटपणासाठी वापरली जातात. त्यालाच कोकम, आमसुलं किंव्हा सोलं अस म्हटलं जात. याचा सरबतासाठी लागणारा गोड पाक/सिरप कसा बनवायचा ते पाहू या….


Read this recipe in English......click here.

कोकम पाक/सिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
कोकम फळे- ३०
साखर- १  १/२ कप
कृती:
कोकम फळे धुवून फडक्याने पुसून कोरडी करा. कोकम फळाचे दोन भाग करून आतला पांढरा गर काढा.
कोकमाच्या वाटीत साखर भरा. स्वच्छ, कोरडी बरणी घ्या आणि तळाशी थोडी साखर पसरवा. एकावर एक अशा त्या कोकमाच्या वाट्या ठेवा. वरून पुन्हा थोडी साखर टाका. 
बरणीच्या तोंडाला सुती कापड बांधा आणि ८-१० दिवस कडक उन्हात ठेवा. उन्हात ठेवण्यापूर्वी दररोज नीट ढवळून घ्यावे.
८-१० दिवसांत छान घट्ट, गडद गुलाबी-लालसर रंगाचा पाक तयार होईल. 
साले घट्ट पिळून काढा आणि गाळून घ्या. 
स्वच्छ, कोरड्या, हवाबंद बाटली मध्ये हा पाक भरून ठेवा. व्यवस्थित काळजी घेतली तर वर्षभर टिकतो.  

टीप:
रस काढलेल्या सालांचा काही उपयोग नसतो. माझ्या लहानपणी, माझी आई काही सालाना पुन्हा थोडी साखर लावून ती वाळवत असे. आम्ही खायचो पण खूप आंबट लागायची आणि आमची नखे ​​व दात पिवळे धम्मक व्हायचे खावून झाल्यावर. आजही आठवल कि हसू येत.

कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य साहित्य: (१ ग्लास साठी)
 • कोकम सिरप- १ टेबलस्पून
 • थंड पाणी- साधारण २०० मिली (म्हणजे एका ग्लासात राहील इतके)
 • शेंदेलोण/सैंधव मीठ किंवा पादेलोण किंवा साधे मीठ- लहान चिमूटभर
 • भाजलेल्या जीऱ्याची पूड- १/४  टिस्पून किंवा चवीनुसार
 • पिठीसाखर- आवश्यकतेनुसार (गरज असल्यास, कोकमांच्या आंबटपणावर अवलंबून आहे.)
 • पुदिना पाने- सजावटीसाठी (ऐच्छिक)
 • बर्फाचे तुकडे किंवा चुरा- आवश्यकतेनुसार 

कृती:
एका काचेच्या ग्लासमध्ये कोकम सिरप, थंड पाणी, मीठ, जिरेपूड, पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे.
पुदीना पाने तोडून घालावी. बर्फाचे तुकडे घातले की सरबत पिण्यास तयार.