Showing posts with label पावसाळी भाज्या. Show all posts
Showing posts with label पावसाळी भाज्या. Show all posts

Thursday, June 14, 2018

वालाच्या कोवळ्या रोपांची भाजी

पहिल्या पावसानंतर दोन दिवसातच हि भाजी बाजारात दिसू लागते आणि त्यानंतर साधारण आठवडाभर मिळते. वालाच्या शेंगा काढल्यावरही काही शेंगा किंवा दाणे शेतात पडून असतात. पावसाचे पाणी पडल्यावर त्याला कोंब धरतात, लगेच १-२ दिवसात त्याची अशी छोटी रोपे तयार होतात. अशी हि कोवळी रोपे खुडून त्याची भाजी केली जाते. गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हि भाजी खूप मस्त लागते. 



साहित्य:
  • वालाची कोवळी रोप कापून, चिरून - १ कप (एक जुडी)
  • कांदा, चिरून- १माध्यम किंवा १ कप 
  • लसूण पाकळ्या, ठेचून - ५ ते ७
  • मोहरी-  ½ टीस्पून 
  • जीरे- ½ टीस्पून 
  • हिंग- ¼ टीस्पून 
  • हळद- ½ टीस्पून 
  • घरचा मिक्स मसाला- २ टीस्पून किंवा (१ टीस्पून मिरची पूड +१ टीस्पून गोडा मसाला)
  • गुळ- ¼ टीस्पून (ऐच्छिक) 
  • कोकम/आमसूल- १
  • मीठ- चवीप्रमाणे 
  • तेल- २ ते ३ टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खोवुन - २ टेबलस्पून (ऐच्छिक) 

कृती:
  • रोपांची मुळे आणि वालांना चिकटलेली साले काढून टाका. भाजी स्वच्छ धुवून घ्या, माती असते.
  • भाजी चिरून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की जीरे, कांदा, लसुण टाकून परतावे.   
  • कांदा गुलाबीसर झाला की त्यात हळद, हिंग, मसाला (मिरचीपूड टाकत असाल तर ती) टाकून जरासं परतून घ्यावं. 
  • आता त्यात चिरलेली भाजी व मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावं. वरून थोडसं पाणी शिंपडून झाकण ठेवावं १५ ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवावं. झाकणावर पाणी ठेवलं तरी चालेल, करपायची भीती नाही. शिजताना भाजी मध्ये मध्ये हलवावी. 
  • भाजी व्यवस्थित शिजली की त्यात गुळ, कोकम आणि खोबरं घालावं. मस्त परतून मिक्स करावी.  
  • गरमागरम भाकरी सोबत किंवा डाळ-भातासोबत वाढावी. 


नोट्स: 

  • मसाला ऐवजी हि भाजी हिरवी मिरची फोडणीत चालून पण करतात. 
  • भाजी थोडी कडवट असते म्हणून थोडासा गुळ किंवा साखर लागते. 
  • मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, भाजी शिजल्यावर आळते. 
  • तुम्ही हि भाजी घरी सुद्धा उगवू शकता. ट्रे मध्ये वाल पेरून हे शक्य आहे. 

Tuesday, April 10, 2018

घोसाळ्याचं भरीत

घोसाळ्याचं भरीत करण्याची पद्धत वांग्याच्या भरीतापेक्षा खूप वेगळी आहे, पण त्याच्यासारखाच अतिशय चविष्ट आणि खमंग लागतं.  



घोसाळी (Green Sponge Gourd) :


साहित्य:
घोसाळे - ३
कांदा, बारीक चिरून - १ कप
कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर
हिरवी मिरची, तुकडे करून- ३ ते ४
मोहरी- १ टीस्पून
हळद- १/२  टीस्पून
हिंग- १/२  टीस्पून
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
गुळ- चिमूटभर किंवा आवडीनुसार
चिंच- बोराएवढी

कृती:
  • चिंच आणि गुळ एकत्र करून त्याचा घट्ट कोळ बनवा.  
  • घोसाळी धुवून घ्या आणि त्याच्या सालीचा खरखरीत भाग खरडून काढा. बटाट्यासारखी त्याची साले काढू नका. घॊसळी कवळी असतील तर सालं खरडायाची पण गरज नाही. 
  • बटाट्याच्या काचऱ्या करतो तश्या काचऱ्या करा. 
  • जाड बुडाची कढई घ्या. मी भाकरीसाठी वापरला जाणारा खोलगट लोखंडी तवा वापरते. या तव्यामुळे घोसाळे छान खमंग परतले जाते.  
  • तवा/कढई गरम करून त्यात तेल गरम करा. मोहरी टाका, ती तडतडली कि त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून खमंग परता. 
  • त्यावर हळद हिंग घालून  जरासं परता.  
  • घोसाळ्याच्या काचऱ्या टाका आणि परता.  
  • मीठ टाकून मिक्स करून घ्या आणि परतत रहा जोपर्यन्त घोसाळ्याला सुटलेले पाणी आटुन त्याचा लगदा तयार होईल आणि तेल सुटू लागेल. 
  • हा शिजलेला घोसाळ्याचा लगदा एका बाउल मध्ये काढून घ्या. (लोखंडी भांडे असेल तर लगेच काढायला हवा नाहीतर त्याचा एक विशिष्ट वास भाजीला येतो.) 
  • थंड झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ टाकून मिक्स करा. भरीत तयार आहे.  
  • हे भरीत गरमागरम भाकरीसोबत अतिशय रुचकर लागत.  

Friday, September 18, 2015

Rushichi Bhaji (ऋषीची भाजी) ~ ऋषि पंचमीची भाजी

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी.
पण हि आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरायच्या. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत अजिबात तेल-तूप वापरले जात नाही. शिवाय या भाजीत मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत, तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली हि भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचे कारण म्हणजे सेंद्रीय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव.

ऋषी पंचमीचे व्रत किंवा उपवास हा आपल्या सप्तर्षींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एकप्रकारे तत्कालीन ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक मिळते. शरीरा सोबत आत्म्याची शुद्धता करण्याचे असे हे ऋषी पंचमीचे व्रत आहे. पण हे व्रत फक्त स्त्रियाच करतात, हे काही माझ्या मनाला पटलेले नाही.

माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण एकदम लहानपणी भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि हळूहळू हि भाजी आवडू लागली. बरेच जणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेली 'ऋषीची भाजी' मात्र आवडते. मीही त्याला अपवाद नाही. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.

Read this recipe in English........click here.


हि भाजी कोकणतल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी येथे आमची पद्धत देते ​​आहे.

साहित्य:
  • अळूची पाने आणि देठे, सोलुन आणि चिरून- 1 कप
  • लाल भोपळा, सोलुन आणि कापून- ½ कप 
  • माठ, चिरून- ½ कप 
  • कुरडूस, (रानातली पालेभाजी), चिरून- ½ कप (ऐच्छिक)
  • सुरण, सोलुन आणि कापून- ¼ कप (ऐच्छिक)
  • भेंडी, चिरून- ¼ कप
  • श्रावण घेवडा, चिरून- ¼ कप
  • गवार, चिरून- ¼ कप
  • पडवळ, चिरून- ¼ कप
  • शिराळे, सोलुन आणि चिरून- ¼ कप
  • घोसाळे, चिरून- ¼ कप
  • हिरव्या मिरच्या, चिरून- 3 ते 5 किंवा वैयक्तिक आवडीनुसार
  • चिंचेचा कोळ - ½ ते 1 टिस्पून किंवा चवीनुसार
  • खवलेले ओले खोबरे- ¼ कप ते ½ कप /आवडीनुसार
  • खडे मीठ- चवीनुसार

कृती:
  • अळू, कुरडूस आणि माठ स्वच्छ धुवून बारीक चिरा. 
  • अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुवून टाका. 
  • लाल भोपळ्याची सालं काढून त्यांचे छोटे तुकडे करा. 
  • सुरणाची सालं काढून त्याचे अगदी छोटे तुकडे करून चिंचेचा कोळ चोळून ठेवा. 
  • शिराळ्याची सालं काढून त्यांचे तुकडे करा. 
  • भेंडी आणि घोसाळे चिरून घ्या. 
  • पडवळाचेही आतल्या बिया काढून तुकडे करा.
  • गवार व घेवडा शीरा काढून मोडून घ्या. 
  • सर्व भाज्या धुवून घ्या. 
  • मिरच्यांचे तुकडे करा. तिखट आवडत असेल तर ठेचा करा. 
  • एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मिरच्या आणि मीठ असं सर्व एकत्र करा. 
  • पातेल्यावर स्टीलचे ताट ठेवून पाणी ठेवा. मध्यम ते मंद आचेवर भाजी शिजवा. भाजीत जास्तीचे पाणी टाकू नका. शिजताना भाजीला पाणी सुटते. त्यातच भाजी शिजते. वरून पाणी टाकले तर भाजी पांचट लागते.     
  • मधून मधून ढवळत रहा. पण जोरजोराने ढवळू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल. शिजायला कठीण असणाऱ्या भाज्या बोटाने दाबून बघा. त्या शिजल्या कि भाजी शिजली. 
  • आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि ओले खोबरे घालून एक वाफ काढा. 
  • गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सोबत वाढा. 

टिपा:
  • ऋषी पंचमीच्या ३-४ दिवस आधी या खास ऋषीच्या भाज्या बाजारात येऊ लागतात.
  • माझ्या माहेरी घरच्या अंगणात उगवणाऱ्या सर्व भाज्या या भाजीसाठी वापरतात, अगदी टोमॅटो सुद्धा.
  • तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी इथे भाज्यांचे प्रमाण दिले आहे. पण प्रत्यक्षात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या प्रमाणात त्या भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करावे. 
  • उपलब्धेनुसार वर उल्लेख केलेल्या एक किंवा अधिक भाज्या वगळू शकता. किंवा दुसऱ्या भाज्या वाढवू शकता. 
  • माझ्या सासूबाई भाजी शिजली की वरून थोडेसे घरचे लोणी घालतात. 
  • भोपळा आणि ओले खोबरे या भाजीला गोडवा देतात.
  • रताळे, पांढरा गावरान मका, काकडी, कच्ची केळी, दुधी भोपळा सारख्या इतर पावसाळी/ हंगामी भाज्या पण वापरू शकता. 
  • मका वापरणार असाल तर आधी प्रेशर कुकर मध्ये मीठ टाकून उकडून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करून भाजीत घाला.
  • ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदुळ मिळतात ते सुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदुळाला 'पायनु' असं म्हणतात.    
  • या ताटात दिसणाऱ्या चटणीत फक्त ओले खोबरे आणि मिरची आहे.

Tuesday, August 11, 2015

Shiralyachi/Dodakyachi Bhaji (शिराळ्याची/ दोडक्याची भाजी)

शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. या मोसमात अगदी छान चव असते या भाजीला. आमच्याकडे एकूण चार-पाच प्रकारे (बटाटा घालून, चण्याची डाळ घालून, बिर्ड घालून, भरली शिराळी आणि मिरचीवर परतून) हि भाजी करतात. त्यातला एक प्रकार आज इथे देत आहे.


Read this recipe in English........click here. 

साहित्य:
  • शिराळी किंव्हा दोडके- ३ मध्यम (२५० ग्रॅम)
  • बटाटा- १ मध्यम
  • कांदा, चिरून- १ मध्यम
  • तेल- ३ टेबलस्पून
  • लसूण, ठेचून- ४ ते ६पाकळ्या
  • मोहरी- १ टिस्पून
  • जिरे- १/२ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून
  • हळद- १/२ टिस्पून
  • घरगुती मिश्र मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टिस्पून+ गोडा मसाला- १ टिस्पून)
  • गोडा मसाला- १ टिस्पून
  • गूळ- जरासा चिमूटभर (ऐच्छिक) 
  • मीठ- चवीनुसार
  • कोथिंबीर, बारीक चिरून- ३ टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खवून- २ टेबलस्पून 


कृती:
  • शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. त्याचे साधारण १ ते १.५ इंचाचे तुकडे करा.   
  • बटाटा सोलून त्याचे अर्धा इंचाचे तुकडे करा. 
  •  नॉन -स्टिक पॅन किंवा कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी टाका. मोहरी तडतडली कि जिरे, चिरलेला कांदा आणि लसूण ठेचून टाका. 
  • कांदा गुलाबी होईपर्यंत चांगले परता व त्यात हिंग व हळद घाला.
  • त्यात घरगुती मसाला किंवा लाल मिरची पावडर घालून मिक्स करा आणि जरासं परता.
  • त्यात बटाटे आणि थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करून झाकण ठेवा. मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजू द्यावे.
  • नंतर त्यात शिराळ्याचे तुकडे, गोडा मसाला आणि मीठ घालून चांगले मिक्स करा,  झाकण ठेवुन मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. साधारण ८-१० मिनिटे लागतात. (जास्ती पाणी वापरू नका. शिराळे शिजताना पाणी सोडते. अगदी आवश्यक असल्यास, फक्त पाणी शिंपडावे.) 
  • आता भाजीत गूळ, कोथिंबीर, खोबरे टाका आणि नाजूक हाताने छान मिक्स करून घ्यावे.  झाकण ठेवून एक वाफ काढा. 
  • चपाती किंवा डाळ-भात बरोबर गरम गरम सर्व्ह करावे.


टीप:
साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल. त्याची चटणीही करतात.
शिराळ्याच्या /दोडक्याच्या सालांची भाजी: रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

Wednesday, July 8, 2015

Fodashichi Bhaji (फोडशी/कुलुची भाजी)

फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते. ओळखीच्या भाजीवाली कडूनच किंवा जाणकार व्यक्तीकडूनच रानभाज्या विकत घ्याव्यात, चुकीच्या भाज्या विषारी असू शकतात. 

Read this recipe in English.......click here.

# पध्दत १ (सुकट घालून)



साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
सुकट /सुका जवळा- १/२ कप
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६ ते ८
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
कोकम/आमसूल- ३
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून

कृती:
  • सुकट  निवडून पाण्यात किमान १५ मिनिटे भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून घट्ट पिळुन घ्या.  
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात काळजीपुर्वक स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ आणि पानांच्या चुणेत माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजवून पिळुन घेतलेली सुकट टाका व जराशी परतून घ्या. 
  •  नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • गरमागरम भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
.................................................................................................... ……………

# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
चणा डाळ - २ टेबलस्पून
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेला लसूण पाकळ्या - ६
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम मसाला- १ टीस्पून)
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून
खवलेले ओलं खोबरं- २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती:
  • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा. 
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. 
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • वरून ओलं खोबरं पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

टिपा:
  • हि भाजी पातीच्या कांद्याप्रमाणे दिसते. पतीचा कांदा फार लवकर शिजतो पण ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो.
  • तुम्ही वरील पद्धतीने सुकट घालुन पातीच्या कांद्याची भाजी करू शकता.
  • हि भाजी किंचित कडू असते पण अगदी मेथी इतकी कडू नसते.
  • या भाजीच्या पानांची भजी पण करता येते. पालक किंवा मेथीची गोळा भजी करतो तशी.  

Tuesday, June 30, 2015

Dinde Bhaji (दिंड्याची भाजी)

दिंडे किंवा दिंडा या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते.  इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात.
हि भाजी म्हणजे पावसात उगवणाऱ्या एका वनस्पतीची देठ असतात. यातही दोन प्रकार येतात. काही दिंड्यांची देठ हिरवी तर काहींची लाल असतात.
हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी  व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते.

Read this recipe in English.......click here.

सौजन्य: प्राजक्ता म्हात्रे 


# पध्दत १ (वाल घालून)

साहित्य:
  • दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
  • मोड आणून सोललेले वाल-  १/२  कप
  • चिरलेला कांदा- १/२ कप
  • ठेचलेल्या  लसूण पाकळ्या - ६
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • जिरे- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+गोडा मसाला- १ टीस्पून)
  • गूळ- १/४ टीस्पून
  • कोकम/आमसूल- २
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
  • खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून
कृती:
  • दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.    
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.  
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि जिरे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.  
  • त्यात सोललेले वाल व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.  
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. 
  • नंतर गुळ, कोकम, कोथिंबीर व ओलं खोबर टाकून एक वाफ काढा. 
  • वरून कोथिंबीर व ओलं खोबर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

# पध्दत २ (डाळ  घालून)
साहित्य:
  • दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
  • चणा डाळ -  २ टेबलस्पून 
  • चिरलेला कांदा- २ कप
  • ठेचलेला लसूण पाकळ्या - ७ ते ८
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम  मसाला- १ टीस्पून)
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
कृती:
  • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा.  
  • दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.    
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.  
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.  
  • त्यात भिजलेली डाळ  व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या.  
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. 
  • वरून कोथिंबीर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

# पध्दत ३ (कोलंबी  घालून)
साहित्य:
  • दिंडे - १ जुडी (साधारणपणे ५ देठ )
  • सोललेली कोलंबी -  १/२  कप
  • चिरलेला कांदा- १/२ कप
  • आले-लसूण पेस्ट- २ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून 
  • कोकम/आमसूल- ३
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
कृती:
  • कोलंबी सोलून त्यातील मधला काळा दोरा काढा व धुवून घ्या. कोलंबीला आल-लसुन पेस्ट, हळद व मीठ चोळून १ तास मुरत ठेवा.    
  • दिंड्याची देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे आतील मऊ, पांढरा भाग दिसेपर्यंत सोला. काही दोरे असतील तर काढून टाका.    
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. साधारणपणे १ १/४ कप एवढी भाजी मिळेल.  
  • एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता.  
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १२ मिनिटे शिजू द्या. 
  • त्यात कोलंबी टाकुन मिक्स करा. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. 
  • वरून कोथिंबीर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

Tuesday, August 13, 2013

Shralyachya / Dodakyachya Salanchi Chuteny/Bhaji (शिराळ्याच्या /दोडक्याच्या सालांची चटणी/भाजी)

शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. याची साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची चटणी/भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल.


Read this recipe in English............


साहित्य:
  • शिराळी - २५० ग्रॅम (आपल्याला फक्त त्यांच्या सालांचाच उपयोग करायचा आहे )
  • कांदा, चिरून - १ कप / १ मोठा
  • मिरची, कापून - ३ ते ४
  • लसुण , ठेचून - ६ पाकळ्या
  • मोहरी - १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • खवलेला ओला नारळ- १/४ कप


कृती:
  • शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. खल-बत्ताच्या साह्याने साले कुटा. कुटताना थोडे मीठ टाका म्हणजे पाणी सुटून लवकर कुटले जाईल. 
  • हि कुटलेली चटणी एका बाउल मध्ये काढा. त्यात पाणी टाका आणि नंतर ती चटणी किव्हा ठेचा हाताने घट्ट पिळून घ्या. म्हणजे जास्तीचे मीठ निघून जाईल.
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद, हिंग टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • नंतर त्यात पिळलेला ठेचा व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. मध्ये मध्ये भाजी हलवत रहा. 
  • वरून ओलं खोबर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.




Wednesday, July 24, 2013

Kantolichi Bhaji (कंटोलीची भाजी)

कंटोली हि कंटूर्ली, कर्टुल, कर्टुले, काटेली, फागल इत्यादी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. छोट्या कार्ल्यासारखी दिसणारी हि रान भाजी खूपच उपयुक्त आहे. निसर्गाने प्रत्येक मोसमात काही फळ आणि भाज्या उपलब्द्ध करून दिल्या आहेत. ज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. म्हणून आपण सुद्धा निसर्गाचा मान राखून मोसमी फळ आणि भाज्यांचा आस्वाद घेतला पाहिजे.


Read this recipe in English............

ओळख:


साहित्य:
  • कंटोली - १ जुडी (साधारणपणे १०-१५)
  • मोड आणून सोललेले वाल-  १/४ कप
  • चिरलेला कांदा- २ कप
  • ठेचलेला लसूण पाकळ्या - ७ ते ८
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - १ टीस्पून (किंव्हा मिरची पूड आणि थोडा गोडा मसाला जास्त वापरावा.)
  • गोडा मसाला- १ टीस्पून
  • खिसलेला गूळ- १/४ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- २ टेबलस्पून
  • खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून

कृती:
  • कंटोली उभी मध्यभागी चिरून दोन भाग घ्या. त्याच्या बिया चमच्याच्या मागच्या बाजूने काढा. 
  • नंतर चिरून घ्या. थोडं मीठ टाकून हलक्या हाताने चुरा. थोडावेळ तसेच ठेऊन द्या. म्हणजे पाणी सुटेल व ते मऊ पडतील. वाहत्या पाण्याखाली धुऊन, पिळून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात सोललेले वाल व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ७-८ मिनिटे शिजू द्या.  नंतर त्यात कंटोली व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. नंतर गुळ टाकून एक वाफ काढा. वरून कोथिंबीर व ओलं खोबर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

दुसरी पद्धत :
एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि २-३ मिरच्या कापून टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
 नंतर त्यात कंटोली व मीठ टाका.  व्यवस्थित एकत्र करून घ्या.
त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत  शिजू द्या. वरून ओलं खोबर पेरा.  गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

Sunday, June 16, 2013

Bharangichi Bhaji (भारंगीची भाजी)

भारंगी हि एक रानभाजी आहे. हि भाजी फक्त पावसाळ्यातच बाजारात येते. हि भाजी पोटाच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे. आपल्या आयुर्वेदात या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी हि भाजी नक्की खाल्ली पहिजे.



साहित्य:
  • भारंगीची पाने- २ वाटे (चिरून अंदाजे २ कप)
  • वाल किंवा पावटे - १/४ कप 
  • कांदा,चिरून - १ मध्यम आकाराचा 
  • लसूण पाकळ्या, ठेचून - ६ ते ८
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंव्हा मिरची पावडर- २ टीस्पून 
  • तेल- ३ ते ५ टेबलस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून (ऐच्छिक )

भारंगीची पाने:

कृती:
  • आदल्या दिवशी रात्री, वाल/पावटे स्वच्छ धूऊन पाण्यात भिजत घालावेत. 
  • प्रथम पाने व्यवस्तीत धुऊन घ्यावीत . फार बारीक चिरू नयेत किंव्हा हाताने तोडून घ्यावीत . 
  • चिरलेली पाने व भिजवलेले वाल एकत्र करून कुकरमध्ये तीन शिट्या काढून उकडून घ्यावेत. 
  • एका पँन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात हळद, हिंग व मसाला टाकून परतून घ्या. मीठ व उकडलेली भाजी पिळून त्यात टाका. भाजी फार घट्ट पिळू नका नाहीतर भाजी खूपच कोरडी होइल. 
  • छान एकत्र करून झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा. 
  • भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत गरमागरम वाढा.
दुसरी पद्धत :
भाजी कापून उकडून घ्या . तेलावर कांदा, लसुन आणि ४-५ लाल सुक्या मिरच्या तोडून टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात उकडलेली भाजी पिळून टाका. मीठ टाकून भाजी परतून घ्या. झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.

वालाच्या एवजी छोट्या लाल चवळ्या वापरू शकता.