Monday, November 14, 2016

शाळेचा डबा

शाळेचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. पौष्टिकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. ही भाजी नको - ती भाजी नको अशा एक ना अनेक तक्रारींनी नुसता वैताग आणतात ही मुलं. नावडीची भाजी असली की बरीचशी मुलं डबा संपवतच नाहीत. साधारण आठ तास मुलं घराबाहेर असतात. अश्यावेळी योग्य आहार पोटात न गेल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. मुलांच्या अभ्यासाइतकंच मुलांच्या खाण्यापिण्याकडेही गांभीर्यानं बघायला हवं. शाळेत खाल्लं नाही तर घरी आल्यावर खातील अशी समजुत करून घेणे अत्यंत घातक आहे. ठराविक कालावधीनंतर पोटात आहार गेला नाही तर मुलांची एनर्जी कायम कशी राहणार आणि न काही खाता पिता त्यांचं शाळेत लक्ष कसं लागाणार ? शिवाय घरी आल्यावर मुलं इतकी भुकेलेली असतात कि त्यांचा गोड किंवा तेलकट असे अनहेल्दी पदार्थ खाण्याकडे कल राहतो आणि आईही बरेचदा ते प्रेमापोटी किंवा अपराधी भावनेने सहन करते. आई नोकरी करत असेल तर हि मुलं बेबीसिटरकडे अश्या अनहेल्दी खाण्यासाठी फार हट्ट करतात. परिणाम मुलांच्या वजनावर होतो.

लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे, त्यांच्या आवडीचे ३-४ डबे आणून ठेवावेत. पदार्थाच्या प्रकार व रंगानुसार डब्याची निवड करावी. मुलांच्या डब्याला कधी लसणाचा किंवा इतर उग्र वास येत असेल तर लिंबाची फोड डब्यावर घासावी.

माझ्या मुलींच्या शाळेत फॅन्सी पदार्थ चालतच नाहीत. त्यांना एक दीर्घ आणि एक लघू अशी मधली सुट्टी असते. त्यापैकी दीर्घ सुट्टीत पोळी/भाकरी/घावन + भाजी, पराठा किंवा थालीपीठ असेच पूर्णान्न पदार्थ चालतात. फक्त शनिवारी इडली, डोसा, अप्पे, पुलाव इत्यादी पोटभरीचे पदार्थ चालतात.

मी दीर्घ मधल्या सुट्टीसाठी पुढील प्रमाणे डबा देते :
१. मी आठवड्यातून एक-दोनदा मोड आलेल्या कडधान्याची उसळ देते.
२. एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे करते.
३. ज्या भाज्या आवडत नाहीत त्यांचे पराठे करते. उदा. पालक, मेथी, दुधीभोपळा इत्यादी. आठवड्यातून एकदा पराठे देते. सोबत घरचं लोणचं किंवा चुंदा देते.
४. आठवड्यातून एकदा थालीपीठ देते. मी थालीपीठ भाजणी मध्ये तांदुळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, चणाडाळ, मुगडाळ, उडीदडाळ, मसूरदाळ, कुळीथ, सोयाबीन, गहू, धणे, जीरे समावेश करते. थालीपीठासोबत ताज घट्ट दही देते. कधी कधी थालीपीठात कांद्याऐवजी काकडी, पालक, मेथी, कोबी, कांद्याची पात इत्यादी भाज्या पण बारीक चिरून घालते. तसेच थालीपीठात आळशी पूड व तीळ घालते तर कधी कधी मेथी पूड पण घालते.
५. काकडी, मुळा, गाजर, बीट असं थोडस सलाड देते. सोबत छोट्या झिपलॉक पिशवीत चाटमसाला देते.
६. फळ शक्यतो देत नाही. सफरचंद वै. फळ कापून दिली तर काळी पडतात आणि पूर्ण फळ हे लोक खात नाहीत. शिवाय कलिंगड, पपई सारख्या काही फळांना पाणी सुटत. केळ लिबलिबीत आणि काळ होत बॅगमधील उष्णेतेमुळे शिवाय बॅगेत केळ्याचा घमघमाट सुटतो त्यामळे मुली अजिबात तयार होत नाहीत केळ न्यायला. मात्र सीझनप्रमाणे छोट्या डब्यात स्ट्रॉबेरी, द्राक्ष, जांभळं, संत्र-मोसंबीच्या फोडी देते. छोटी संत्री आणि छोटी सफरचंद बाजारात मिळाली तर अख्खीच देते.

अजून काही छोट्या टिप्स :
१. काही मुलांना पोळीला भाजी लावून खायचा कंटाळा असतो आणि म्हणूनच पोळी-भाजी ऐवजी पोळी-भाजीचा रोल द्यावा.
२. अगदी लहान मुलांना चपातीचे तुकडे करता येत नाहीत किंवा तुकडे करून चपाती खाण्यात फार वेळ लागतो आणि मग सुट्टी संपली तरी डबा तसाच राहतो. म्हणून मुलांना पोळीचे छोटे छोटे तुकडे करून द्यावेत.
३. कधीतरी भाजी बिघडली किंवा करपली किंवा घरात दुसरं काहीच नाहीये, आणि घाई पण आहे, दुसरं काही नवीन बनवायला वेळ नाही अश्या वेळी जाडसर चपाती लाटून त्यावर थोडस तेल, मसाला/मिरची पूड, मीठ, तीळ, ओवा किंवा कसुरी मेथी पसरवुन त्याची पुन्हा घडी घालून पोळी लाटावी. अशी हि झटपट मसाला चपाती दही, केचप किंवा लोणच्यासोबत छान लागते. अश्याच प्रकारे मुलांना आवडत असेल तर चटणी किंव्हा मेतकुट घालून झटपट पराठाही बनावता येतो. शिवाय फ्रिजमध्ये उकडलेला बटाटा असेल तर तो किसून घेऊन काही जिरे-धने पूड, मिरची पूड घालून झटपट आलू पराठा तसेच बटाटा+चीज+चिलीफ्लेक्स झटपट चीज पराठा करता येतो.
४. रस्सेदार, तेलकट आणि खूप तिखट भाज्या मुलांना डब्यात अजिबात देऊ नये. लहान मुलांना मिरची काढून घेऊन भाजी द्यावी, सगळं लक्ष खेळण्यात असल्यामुळे मिरची तोंडात जाऊ शकते.
५. दप्तरात डब्याच्या कप्प्यात एक छोटा नॅपकिन ठेवावा.
६. एकदम घट्ट झाकणाचे किंवा उघडायला जड असे डबे देऊ नये.
 ७. रोज घरी आल्यावर डबा सगळा संपवलास का? भाजी आवडली का? मित्र/मैत्रिणीने काय आणलं होत? आज काय मजा केलीस डबा खाताना? असे प्रश्न हसत हसत विचारावे. मग मुलंही त्यावर आपल्याशी बोलतात. यामुळे आपल्याला पण अंदाज येतो मुलं डब्यामुळे खुश आहेत कि नाही. किंवा डबा खाताना काही अडचणी तर येत नाहीत ना. काय खाल्ल्यामुळे किंवा कशाच्या वासामुळे त्रास होतो, कारण घरी खाल्लेली भाजीचा वास आणि चव तीच असू शकते असं नाही. काय पदार्थ दिला तर वेगळा लागतो. अश्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. त्यावरून डब्यात काय द्यावं आणि काय देऊ नये हे ठरवता येत. मोठी मुलं ह्या गोष्टी स्वतःहून सांगू शकतात पण लहान मुलं विचारल्याशिवाय सांगत नाहीत.
८. मुलांचं दप्तर पण रोज तपासावं. काही मुलं न आवडणारे पदार्थ दप्तरात टाकतात शिवाय इतर कचराही असतोच.

लघू मधल्या सुट्टीसाठी किंवा पूर्वप्राथमिक शाळा कमी वेळच्या असतात त्यासाठी काही पर्याय सुचवत आहे : 
१. खजूर, सुका मेवा ओट्स, बीट, मटार, गाजर वैगरे पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून ठेवल्यास त्याही डब्यात पूरक अन्न म्हणून देता येतील. त्यात साखरेऐवजी गूळ घातल्यास मुलांना अजून ऊर्जा मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या पण मुलांसाठी उत्तम.
२. उकडलेले शेंगदाणे/हरभरे/मोडाचे मूग, टोमॅटो, कांदा, लिम्बुरस, जीरेपूड किंवा मिरीपूड एकत्र करा, हव तर त्यात कॉर्न फ्लेक्स टाका. सैंधव/मीठ वेगळे द्या किंवा देऊच नका. कडधान्ये उकडताना मीठ टाकले तर ती नंतर मीठाशिवायही खाता येतात. कॉर्न फ्लेक्स पण वेगळ्या डबीत द्या. टोमॅटोच्या बिया काढून टाका, सँडविचमध्येही बीयाविरहित टोमॅटो द्या. काकडी पण खूप पाणीदार असेल तर त्याच्याही बिया काढून टाका.
३. सँडविच आणि मोमो हे डब्याला दिले कि मुलांना मजा आणतात. सँडविच मध्ये अक्षरशः वाटेल ते घालता येते. तसेच मोमोच्या आत आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचं फिलिंग करता येतं. पालक पनीर, छोले, उसळी याचे मोमोज तयार करता येतात. फक्त मोमो मैद्याचे न बनवता गहू, तांदूळ+नाचणी चे बनवावे आणि शक्यतो उकडलेलेच द्यावे. करंजीच्या साच्यानं आपण मोमो करू शकतो. तांदूळ+नाचणी पीठाचे बनवायचे असतील तर मोदकासारखी उकड काढावी आणि फूडप्रोसेसरमध्ये छान मऊसर मळून घ्यावे.
४. पोळीचे चतकोर तुकडे करून त्यावर भाजी पसरून, वरून चीज किसून घालावं. ही पोळी ओव्हनमध्ये बेक करावी किंवा तव्यावर झाकून चीज वितळेपर्यंत ठेवावी. असा पोळी पिझ्झा मुलांना नक्की आवडेल.
५. हेल्दी स्टफ चिला- चिला बनवण्यासाठी बेसन+कणिक+बारीक रवा, मिरची-आले-लसुन-जिरे याचे वाटण, हळद, मीठ सर्व एकत्र करून ताकात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्याचे पोळे करून घ्या. स्टफिंग बनवण्यासाठी- मोड आलेले मुग, काकडी,टोमाटो, कांदा, चाट मसाला, मीठ टाकून एकत्र करा. तयार पोळ्यावर मेयोनीज पसरवा. त्यावर स्टफिंग पसरवा. टोमाटो केचप सोबत देऊ शकता.
६. छोटे उत्तपे मुलांना आकर्षित करतात. न्याहारी आणि मुलांच्या डब्याला उत्तम. वरून नुसता कांदा घालण्या ऐवजी गाजर, बीट, कोबी किंव्हा पालक या सारख्या भाज्या किसून किंव्हा बारीक चिरून घालू शकता.
७. इडली तर आपण नेहमीच खातो, पण त्यात गाजर, पालक, बीट, मटार या सारख्या भाज्या टाकल्या तर ती अजून पौष्टिक होईलच शिवाय चवीत बदल पण होईल. चटण्याही वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतील. डोसे/उत्तपे करताना सुद्धा वेगवेगळी पीठे आणि भाज्या वापरून वैविधता आणता येईल.
८. उकडलेली कंदमुळं जसे रताळं, अळकुडी, कणकं सुद्धा सोलुन देता येतील.
९. एका लहानशा डबीत चार पाच मनुके, एखादा बदाम, एक काजू, एक लहानसा अक्रोड, खारकांचे तुकडे किंवा सीडलेस खजुर किंवा एखाद अंजीर द्यावे. अगदी भाजलेले शेंगदाणे किंवा चणे पण उत्तम सोबत नैसर्गिक गुळ म्हणजे मूल्यवृध्दीच.
१०. कुरमुऱ्याचा चिवडा किंवा शेव-पोहे पण मुलांना आवडतात.
११. उन्हाळ्यात मुलांना पाण्याच्या दोन बाटल्या द्याव्या लागतात. त्याऐवजी कधीतरी एकात लिंबाचं/कोकमाचं /आवळ्याचं सरबत किंवा ग्लुकॉन-डी टाकून पाणी द्यावं. पन्ह सुद्धा द्यायला हरकत नाही.
१२. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट सुद्धा मुलांना फार आवडतात. सोबत ब्राऊन ब्रेडची स्लाइस दिली तर पूर्ण आहार होईल. सोबत कधीतरी एखादी चीज स्लाइस देखील चालेल.
१३. वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक कुकीज देता येतील.
१४. शाळेत पास्ता/नुडल्स द्यायची परवानगी असेल तर गव्हाचा पास्ता मिळतो तो आणावा. वेगवेगळ्या भाज्या घालून पास्ता/नुडल्स करता येतील.
१५. शाळेत चालत असेल तर उकडलेले अंड देता येईल.

असे असंख्य पर्याय आहेत. जेवढे आठवले तेवढे लिहिले. सुचेल तशी भर घालत राहीन.

(हा लेख अनाहिताच्या बालदिन विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.) 

Wednesday, October 26, 2016

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या

गोरी पान करंजी नावेसारखी दिसते,
पोटातले खाताच आणखी खावी वाटते!


Read this recipe in English, click here.

साहित्य:
रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार
पारी-

 • मैदा- १ कप (२ वाट्या)
 • बारीक रवा- १/२  कप (१ वाटी) 
 • मीठ- चिमुटभर 
 • गरम रिफाइंड तेल किंवा वनस्पती तूप (मोहन)- ५ टेबलस्पून 
 • दुध किंवा दूध+पाणी- अंदाजे १/२  कप  

सारण/चुरण-

 • बारीक रवा- १/२ कप (१ वाटी)
 • सुके खोबरे, बारीक खिसुन- १/२ कप (पाऊण वाटी ते १ वाटी)
 • पिठीसाखर- अंदाजे ३/४ कप (१ वाटी) ~ आपल्या चवीप्रमाणे थोडे कमी-जास्त घ्यावे पण सारण जास्त गोडच हवे, कारण नंतर करंजी खाताना ते बरोबर लागते.
 • खसखस- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
 • चारोळी- १ टेबलस्पून 
 • वेलची पूड- १ टीस्पून
 • जायफळ पूड- १/२ टीस्पून
 • साजूक तूप- १ टीस्पून


कृती :

 • प्रथम खोबरे चुरचुरीत भाजून घ्या व हाताने बारीक चुरा, खसखस भाजून त्याची भरड पुड करावी, नाही केली तरी चालेल. 
 • १ टीस्पून तुपावर रवा खमंग भाजून घ्यावा. 
 • नंतर दिलेले सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. 
 • रवा-मैदा एकत्र करून त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे व मोहन घालावे. थोडं थंड झाल्यावर सर्व पीठ हाताने चोळून घ्यावे म्हणजे सर्व पीठाला मोहन लागते. 
 • दुधाने घट्ट पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. २ तासानंतर पीठ कुटून घ्यावे किंवा फूडप्रोसेसरला बारीक तुकडे करून फिरवावे. 
 • भिजवलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करावे. 
 • त्याच्या पुऱ्या लाटाव्यात. एकदम पातळ पण नको आणि जाड पण नको. 
 • सारण भरून घ्यावे व पुरीच्या कडेला बोटाने जरासं दूध लावून घडी करून दाबावे म्हणजे सारण बाहेर येणार नाही. नंतर कातण्याने कापून घ्यावे. अश्या प्रकारे करंज्या तयार करून घ्याव्यात.  तयार कारंज्यावर ओले (भिजवून घट्ट पिळलेले) फडके ठेवा म्हणजे त्या सुकत नाहीत. 
 • कढईत तेल/तूप चांगले तापवून घ्यावे. मात्र करंज्या मध्यम ते मंद आचेवरच तळाव्यात. तळताना करंजीवर तेल घालत घालत तळावे. 
 • तळलेल्या करंज्या टिशु पेपर किंव्हा कोऱ्या पेपरवर पसरून ठेवाव्यात.
 • करंज्या पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भराव्यात. 


टीप:
आम्ही सारण जरा जास्तच करून ठेवतो. कारण तुळशीच्या लग्नाच्या वेळेला पुन्हा करंज्या कराव्या लागतात. सारण उरले तर फ्रिज मध्ये ठेवावे, ६ महिने टिकते. पुन्हा करंज्या करायचा कंटाळा आला तर कणकेचे लाडू किंवा मेथीचे लाडू मध्ये घालावे.   

Tuesday, October 4, 2016

उपवासाची कढीसाहित्य:
 • ताज आणि घट्ट ताक - २ कप 
 • आलं, चिरून - १ इंचाचा तुकडा 
 • हिरव्या मिरच्या- २ ते ३
 • ओले खोबरे, खोवुन- २ टेबलस्पून 
 • साजूक तूप-  १ टेबलस्पून 
 • जिरे- १ टीस्पून 
 • साखर- चिमूटभर किंवा आवडीप्रमाणे 
 • मीठ- चवीनुसार 

कृती:
 • मिरच्या, आलं आणि खोबरे शक्यतो पाणी न वापरता किंवा जरासं पाणी घेऊन वाटून घ्या. 
 • कढईत तूप गरम करून जिरे टाका, जिरे तडतडले की मिरची-खोबऱ्याचे वाटण घालून जरासं परता. 
 • त्यात ताक, मीठ व साखर घाला. मंद आचेवर कढईच्या बाजूला बुडबुडे दिसेपर्यन्त गरम करा. 
 • उकळू नका. सतत ढवळत रहा.  
 • वरीचा भात किंवा उपवासाच्या थालीपीठासोबत गरमागरम वाढा. 

टीप:
 • ताक उपलब्ध नसेल तर १कप दह्यात साधारण १ ते दीड कप पाणी घालून चांगलं घुसळून ताक बनवा. 
 • कढी घट्ट हवी असेल तर ताकाला १ चमचा शिंघाडा पीठ लावा. 
 • उपासाला चालत असेल तर कोथिंबीर चिरून कढीत घाला. 
     
    

Saturday, September 3, 2016

Panage ~ पानगे / पानगी

कोकणात पानगे/पानगी आणि पातोळे हे दोन पदार्थ केले जातात. हे दोन्ही पदार्थ पूर्णपणे वेगळे आहेत. पानगे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.
एक प्रकार म्हणजे केळ किंवा काकडी वापरून बनवलेले गोड पानगे, दुसरा प्रकार म्हणजे  जिरे, मिरची, आलं चे वाटण लावून बनवलेले तिखट पानगे आणि तिसरा प्रकार म्हणजे भाकरीप्रमाणे  ना गोड ना तिखट, चटणी किंव्हा कुठल्याही रश्यासोबत खायचे.
आज मी त्यातला गोड प्रकार दाखवणार आहे. गौरीचे आगमन झाल्यावर त्या संध्याकाळी नैवेद्यात हे पानगे आमच्याकडे बनवतात.    
केळीच्या पानात भाजल्याने पानग्यांना एक छान सुवास येतो.

Read this recipe in English, plz click here.


साहित्य:

 • तांदूळ पीठ- १/२  कप
 • रवा- १ टेबलस्पून
 • गुळ- १/४  कप किंवा आवडीप्रमाणे कमीजास्त
 • जायफळ पूड- चिमूटभर
 • पिकलेली केळी- २
 • मीठ- एक छोटी चिमूटभर
 • साजूक तूप- १ टेबलस्पून
 • केळीची पाने- गुंडाळण्यासाठी


कृती:

 • गुळ हाताने मोडून किंवा किसून घ्या.  आणि अगदी थोड्याश्या पाण्यात विरघळून घ्या.
 • केळ कुस्करून घ्या.
 • त्यात रवा, तांदुळाचे पीठ , मीठ घालून व्यवस्थित कालवून घ्या.  
 • नंतर त्यात गुळाचे पाणी टाकून मळून घ्या. तूप टाकून पुन्हा मळून घ्या. कणिक फार घट्टही नको आणि सैलही.
 • अर्धा तास हे कणिक झाकून ठेवा.
 • अर्ध्या तासानंतर पुन्हा मळून त्याचे ३ ते ४ गोळे करा.
 • पाण्याचा हात लावून केळीच्या पानावर भाकरीप्रमाणे थापून घ्या. खुप जाड थापू नका. (माझ्या सासूबाई फार पातळ थापत नाहीत पण तुम्ही आमच्या पानगीपेक्षा पातळ थापले तरी चालेल.)
 • पानगा थापून झाला कि पण दुमडून त्याचे पाकीट बनवावे.
 • हे पाकीट गरम तव्यावर झाकण ठेवून २-३ मिनिटे भाजून घ्यावे.
 • नंतर दुसऱ्या बाजूने २-३ मिनिटे भाजून घ्यावे. केल्याचा 
 • भाजून झाल्यावर पानातून हलकेच सोडवावे.
 • गरम गरम पानगे साजूक तूप आणि दुधाबरोबर खायला द्यावेत.  

टीप: आम्ही एकदा तांदुळाच्या पीठाऐवजी गव्हाचे पीठ आणि चिमूटभर बेकिंग पावडर वापरून पानगे केले होते. छान झाले होते.
Thursday, September 1, 2016

Talalele Modak (तळलेले मोदक)

आमच्याकडे गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक तर अनंत चतुर्दशीला तळलेले मोदक करायची पद्धत आहे. शिवाय उकडीच्या मोदकांपेक्षा करायला सोप्पे आणि झटपट. त्यामुळे संकष्टीला पण बरेच वेळा केले जातात.  साहित्य:
तळण्यासाठी वनस्पती तूप किंवा रिफाईंड तेल- आवश्यकतेनुसार 

वरच्या पारीसाठी:-
 • गव्हाचं पीठ किंवा मैदा- १ कप  (साधारण २ वाट्या)
 • बारीक रवा- १/२  कप  
 • मीठ- १ चिमुटभर 
 • मोहन- १ टेबलस्पून 
सारणासाठी:-
 • ओले खोबरे, खोवलेले-  १  १/२  कप  (साधारण २ मध्यम आकाराचे नारळ, फक्त पांढरा भाग घ्यावा )
 • गूळ, चिरलेला- १  १/४  कप 
 • वेलची पूड- १ टीस्पून 
 • मीठ- १ छोटी चिमटी 
 • साजुक तूप- १ टीस्पून 

कृती:
 • रवा १० मिनिटे १/४ कप  पाण्यात भिजत घाला. गव्हाचे पीठ चाळून घ्यावे. गव्हाचे पीठ किंवा मैदा मध्ये मीठ घालून मिक्स करावे. मोहन पीठावर सर्वत्र पसरून घालावे व पीठ हाताने चोळून मिक्स करावे. नंतर त्यात भिजवलेला रवा घालावा. जरूरीनुसार पाणी वापरून अगदी घट्ट कणिक मळावे. हे कणिक एक तास झाकून ठेवावे.
 • जाड बुडाच्या पातेल्यात किंव्हा नॉन-स्टिक पॅनमध्ये खवलेल ओलं खोबर, गूळ, खसखस व तूप एकत्र करून मध्यम ते मंद आचेवर १५ मिनिटे शिजववे. सतत हलवत रहावे , करपणार नाही याची काळजी घ्यावी. रंग बदलला आणि जरा घट्ट होऊ लागले कि वेलची पूड टाकून, व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा. जास्त शिजवू नये, चिक्कीसारखे घट्ट होईल. याप्रमाणे सारण आधीच तयार करून ठेवावे.
 • भिजलेले कणिक हाताने चांगले मळून घेऊन लाटया कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन कळ्या पाडून त्यात सारण भरावे व कळ्या जोडून मोदकाचे तोंड बंद करावे. असे सर्व मोदक भरून घ्यावेत. 
 • कढईत तेल किंव्हा तूप कडकडीत गरम करावे. मध्यम ते मंद आचेवर सर्व मोदक हलक्या तपकिरी रंगावर तळून घ्यावे. तळताना आवरणावर झार्‍याने तूप किंवा तेल हळूहळू उडवून तळावेत म्हणजे टोकाकडे मोदक कच्चा राहत नाही.

टीप: 
मोदक तळायला वेळ असेल तर ओलसर कापडाने झाकून ठेवावेत नाहीतर तडे जातात. 

Wednesday, August 10, 2016

Jayfalache Lonache (जायफळाचे लोणचे)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला खूप आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. जायफळाची गोडसर चव लोणच्यात अजिबात जाणवत नाही. मुरल्यानंतरही साल थोडीशी कडक राहते.
जायफळाची फळे मधोमध कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. काही ठिकाणी त्याचे सरबतही बनवतात.साहित्य:
 • जायफळाची फळे  - १२
 • घरगुती किंवा तयार लोणचे मसाला- १०० ग्रॅम  ( मी केप्रचा कैरी लोणचे मसाला वापरला)
 • हळद- १ टीस्पून 
 • हिंग- १/२  टीस्पून 
 • तेल- अंदाजे १ कप (२ वाट्या)
 • मीठ- ५  टीस्पून किंवा चवीनुसार 
कृती:
 • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाच्या भागाचे तुकडे करू घ्यावेत.  
 • जायफळाच्या तुकडयांना मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. शक्यतो चिनी मातीचे  किंवा काचेचे किंवा प्लास्टिकचे  वाडगे/बरणी वापरा. 
 • सकाळी त्याला जे थोडेसे पाणी सुटते, ते पूर्णपणे काढून टाका. सुती  कपड्यावर पसरवून  थोड्या वेळासाठी पंख्याखाली ठेवा.  
 • नंतर जायफळाचे तुकडे आणि मसाला एकत्र करा.   
 • तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावरत्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी लोणच्यावर घालून निट मिक्स करावे. 
 • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे १० ते १५ दिवसात लोणचे मुरते.
  लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल.

Tuesday, June 28, 2016

Fanasache Umbar (फणसाचे उंबर)

फणसाचे उंबर  ही कोकणातील एक पारंपरिक पाककृती आहे. पावसाळ्यात भाजीप्रमाणे ही गरम गरम उंबर खायला सुद्धा मजा येते. 

साहित्य: 
 • फणसाचे गरे, आठळ्या काढुन आणि चिरून- २ कप 
 • गुळ- १/२ कप 
 • रवा- १ कप 
 • ओले खोबरे, खोवलेले- १/४ ते १/२ कप 
 • काळे किंवा पांढरे तीळ- १ टेबलस्पून 
 • वेलची पूड- १/४ टीस्पून 
 • जायफळ पूड- १/२ टीस्पून 
 • मीठ- चिमूटभर 
 • खायचा सोडा- चिमूटभर 
 • तळण्यासाठी तेल- जरुरीनुसार 

कृती:
 • रवा थोडासा मंद आचेवर भाजून घ्या, त्यामुळे त्याचा कच्चटपणा निघून जाईल. 
 • गरे आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्रित पाणी न घालता वाटून घ्या. अगदी पेस्ट झाली पाहिजे. 
 • ही फणसाची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात रवा, वेलची व जायफळ पूड, खायचा सोडा, मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. 
 • हे मिश्रण २० ते ३० मिनिटे तसेच ठेवा. किंचित चाखून बघा, गोड पुरेसे आहे ना यासाठी. नसेल तर जरासा गूळ कुस्करून घाला. 
 • कढईत तेल गरम करा. तेल व्यवथित तापले की आच कमी करून मध्यम ते मंद आचेवर वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोळे हाताने किंवा चमच्याने तेलात सोडा व खरपूस टाळून घ्या. (गुळामुळे गडद तपकिरी रंग येतो)

टिपा: 
 • या मिश्रणाचे अप्पे सुद्धा करता येतात. यासाठी मिश्रण थोडसं पाणी टाकून सैल करा व नेहमीप्रमाणे अप्पे करा. 
 • शक्यतो यासाठी बारीक रवा वापरु नये. 
 • हे उंबर गव्हाचे पीठ वापरून देखील करतात, पण ते तितकेसे खुसखुशीत लागत नाहीत. 
 • फणसाऐवजी पिकलेल्या केळ्याचा वापर करून देखील उंबर बनवतात. 
 • फणसाच्या मिश्रणात रव्याऐवजी त्यात मावेल एवढे गव्हाचे पीठ घालून पुरी प्रमाणे घट्ट कणिक मळावे व त्याच्या पुऱ्या बनवाव्या. आमच्या गावी आषाढी/दीप आमावस्येला फणसाच्या पुऱ्या व तांदळाची खीर  याचा नैवेद्य देवाला दाखवतात.   

Saturday, June 18, 2016

Roasted Red Pepper Pasta (रोस्टेड रेड बेल पेपर पास्ता)

रेड बेल पेपर म्हणजे लाल सिमला मिरच्या, त्या भाजून त्यापासून हा चविष्ट सोस बनवला जातो. व्हाईट सॉस, टोमॅटो/रेड सॉस मधला पास्ता आपण नेहमी खातो, हा वेगळ्या चवीचा पास्ता सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल.


Read this recipe in English, click here.

साहित्य:
 • पास्ता (कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे)- २५० ग्रॅम  
 • रेड बेल पेपर /लाल सिमला मिरच्या - ४ मध्यम
 • कांदा, चिरून - २ मध्यम
 • लसूण, चिरून - ६ ते ८ पाकळ्या
 • काळी मिरी पूड किंवा ताजी क्रश करून- १ टीस्पून
 • मिक्स हर्ब्स- १ टीस्पून
 • चिली फ्लेक्स- १ टीस्पून
 • मिरची पूड- १/२  टीस्पून
 • हेवी क्रीम (अमुल फ्रेश क्रीम)- १/४  कप किंवा आवडत असेल तर अजून थोडे जास्त 
 • बटर- ४ टेबलस्पून 
 • ऑलिव ऑईल- १ टेबलस्पून 
 • पाणी- अंदाजे १ कप 
 • मीठ- चवीप्रमाणे 
 • पार्सली किंवा कोथिंबीर, बारीक चिरून- २  टेबलस्पून 
 • पामेझान चीज किंवा प्रोसेसड/साधे चीज, किसुन- आवडीप्रमाणे     

कृती:
 • पाकिटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे मीठ पाण्यात घालून पास्ता शिजवून घ्यावा. नंतर चाळणीत ओतून पाणी गाळावे. थंड पाण्याखाली धरून सर्व पाणी निथळून घ्यावे. जरासे ऑईल किंवा बटर चोळून ठेवले तर एकमेकांना चिकटणार नाही. 
 • भरतासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे  गॅसवर लाल सिमला मिरच्या भाजून घ्याव्यात. 
 • एका भांड्यात किमान १५ मिनिटे झाकून ठेवाव्यात, त्यामुळे साले सहज काढता येतात. 
 • करपलेली साले काढून मिरच्या कापून घ्याव्यात. 
 • एका मोठ्या नॉन-स्टिक पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर गरम करून त्यात कांदा व लसुन गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात भाजलेल्या लाल सिमला मिरचीचे तुकडे आणखी थोडावेळ परतून घ्यावेत. 
 • थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकजीव वाटून घ्यावे. 
 • त्याच पॅनमध्ये २ टेबलस्पून बटर व ऑलिव ऑईल गरम करून त्यात सिमला मिरचीचे वाटण, पाणी, मिरची पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड आणि मीठ टाकून छान मिक्स करून उकळी आणावी. हा तयार झाला रेड पेपर सॉस.  
 • आच मंद करून त्या सॉसमध्ये क्रीम टाकून ढवळावे व उकडलेला पास्ता टाकावा. 
 •  पास्ता सॉसमध्ये मिक्स करून घ्यावा. मंद-मध्यम आचेवर पास्ता सॉसमध्ये परतावा. सुका होवून देवू नये.  
 •  गरम गरम पास्ता प्लेट मध्ये काढून त्यावर जराशी पार्सली आणि आवडीप्रमाणे पामेझान चीज भुरभुरावे.  

Wednesday, May 18, 2016

Sukatichi Chutney (सुकट /सुका जवळा चटणी)

आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या खाल्या असतील. पण हि चटणी सुक्या जवळ्याची. मत्स्यप्रेमींची जीव्हा तृप्त करेल यात शंका नाही.Read this recipe in English, click here.

साहित्य:
 • सुकट /सुका जवळा /सुका कोलीम /सुंगठा - १/२  कप 
 • खवलेले ओले खोबरे- ३ ते ४ टेबलस्पून 
 • चिंचेचा घट्ट कोळ- २ टीस्पून 
 • लसुण- ४ ते ५ पाकळ्या 
 • सुक्या लाल मिरच्या, तोडुन - ३ ते ५  (किंवा लाल मिरची पूड- २ टीस्पून)
 • मीठ- चवीनुसार 
 • तेल- १ टीस्पून (ऐच्छिक)
 • पाणी- अगदी जरास /चमचाभर    

कृती:
 • सुकट निवडून, पाखडून घ्या. (सुकट ताजी, स्वच्छ, पांढरी असावी.)
 • सुकट खोलगट तव्यावर किंवा कढईत लालसर रंगावर आणि घमघमाट येईपर्यंत भाजावी चांगली चुरचुरीत भाजली गेली पाहिजे. 
 • वरील सर्व साहित्य आणि सुकट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यावे. 
 • कुठल्याही भाकरी सोबत मस्त लागते. 


टीप- ओल्या खोबऱ्याएवजी सुके खोबरे पण वापरता येईल. चव वेगळी लागेल थोडी.            

Thursday, April 21, 2016

Chitrann (चित्रान्न ~ कैरी भात)

चैत्र महिन्यातील खासीयत असलेल्या चित्रान्न या पदार्थाचे मुळ कर्नाटकात असले तरी हा भात महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातही बनवला जातो. दाक्षिणात्य 'लेमन राइस' च्या चवीशी साधर्म्य असणारा हा भाताचा एक प्रकार आहे. यासाठी शिळा भातही चालेल.

   


Read this recipe in English, click here.

साहित्य:
 • शिजलेला मोकळा भात- ३ कप (बासमती वापरण्याची गरज नाही, मी रोजच्या वापरातील 'कोलम' तांदुळ वापरला आहे. )  
 • कैरीचा कीस- १/२  ते १ कप 
 • खवलेले ओले खोबरे- १/४  कप 
 • हिरव्या मिरच्या, चिरून- २ ते ३
 • कढीपत्ता- १ डहाळी 
 • शेंगदाणे- मुठभर 
 • काजू तुकडे- १ टेबलस्पून (ऐच्छिक) 
 • चणाडाळ- १ टेबलस्पून 
 • उडीद डाळ- १ टीस्पून 
 • लाल सुक्या मिरच्या, तोडून- २
 • मोहरी- १ टीस्पून 
 • हिंग- १/४  टीस्पून 
 • हळद- १/२  टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार
 • साखर- चिमुटभर (ऐच्छिक) 
 • तेल- २  टेबलस्पून 
 • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४  कप 

कृती:
 • सडसडीत भात शिजवून घ्यावा. थंड झाल्यावर हलक्या हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात भाताच्या प्रमाणात मीठ घालून मिसळून घ्यावा.  
 • कढईत तेल गरम करावे. तेलात शेंगदाणे आणि काजू खरपुस तळून घ्यावेत. झाऱ्याने बाहेर काढून भातावर टाकावेत. 
 • त्याच तेलात मोहरी टाकावी, ती तडतडली की चणाडाळ व उडीदडाळ टाकून सोनेरी तपकिरी रंगावर तळून घ्यावी. 
 • त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे व कडीपत्ता टाकून जरासे परतावेत. 
 • त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि हिंग घालून जरासे परतावे. 
 • आता त्यात हळद, कैरीचा किस, साखर व जरास मीठ घालुन ३-४ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. 
 • त्यात खवलेले खोबरे घालून पुन्हा जरावेळ परतावे. 
 • आता त्यात शेंगदाणे व काजू घातलेला भात टाकून चांगला मिसळून घ्यावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी. 
 • नंतर त्यात कोथिंबीर टाकुन पुन्हा एकदा जरासा परतून घ्यावा. 
 • चित्रान्न तयार आहे. भात पापडासोबत वाढावा.        

टीपा:
 • मला स्व:ताला फारसे आंबट आवडत नाही त्यामुळे मी १/४  कप एवढाच कैरीचा किस वापरते. तुम्ही सुद्धा तुमच्या आंबटपणाच्या आवडीवर किसाचे प्रमाण ठरवा. 
 • कैरी आधीच चाखून बघा म्हणजे ती किती आंबट आहे हे कळेल, त्यावरून किसाचे प्रमाण ठरवा. 
 • भात फोडणीला घालताना तो पुरेसा थंड झाला असावा. 
 • शिळा भात संपवण्याचा एक रुचकर उपाय.
 • साखर जास्त घालू नका. हा साखरभात नाही.       
 • बदल म्हणून भाताऐवजी पोहे वापरावे. कांदे पोह्याला जसे पोहे भिजवतो तसे भिजवून वर सांगितलेली फोडणी करावी.       


Tuesday, April 19, 2016

Kairicha Moramba / Sakharamba (मोरांबा / साखरांबा)

मोरांबा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यालाच 'साखरांबा' असेही म्हटले जाते. काहीजण  कैरीच्या बारीक फोडी करतात पण आमच्या घरात किसलेल्या कैरीचा मोरंबा आवडतो.  Read this recipe in English...click here.

साहित्य:
 • कैरी - १ किलो /साधारण  ४ मध्यम (२ कप किस)  
 • साखर- ४ कप (यापेक्षा थोडी कमी-जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे)   
 • वेलची पूड- १ टीस्पून 
 • लवंग- ६ ते ८
 • मीठ- चिमुटभर 

कृती:
 • प्रथम कैऱ्या सोलून व किसून घ्याव्यात. कोय किंवा बाटा टाकून द्यावा. 
 • एका जाड बुडाच्या स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक भांड्यात कीस, साखर, मीठ व लवंगा एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण १ तास तसेच ठेवून द्यावे. त्यामुळे कैरीला भरपूर रस सुटतो.   
 • हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर ठेवून शिजवावे. लक्ष ठेवून मधून मधून ढवळत रहावे. 
 • साखर वितळून त्याचा पाक होऊ लागेल. पाक हळूहळू घट्ट होवू लागेल. २ तारी पाक झाला की गॅस बंद करावा.  मधाप्रमाणे पाक दिसेल.    
 • त्यात वेलची पूड घालावी आणि छान ढवळून घ्यावे.  
 • गार झाल्यावर निर्जंतुक व कोरड्या बरणीत भरून ठेवावा.
 • कोरड्या हवेत हा मोरंबा वर्षभर टिकतो. दमट हवामानात २ महिने बाहेर चांगला राहील पण नंतर फ्रीजमध्ये ठेवावा.   

टिपा :
शक्यतो राजापुरी कैऱ्या वापराव्यात. घट्ट व मांसल असणाऱ्या या कैऱ्या लोणचे व मोरांबा बनवण्यासाठी आदर्श मानल्या जातात.   

Friday, April 15, 2016

Purnann Appe (पूर्णान्न अप्पे)

'वन डिश मील' म्हणजे जेवणासाठी एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही  हवा. रात्रीची वेळ असल्यामुळे पचण्यास हलका हवा. मसाले सुद्धा अतिशय कमी लागतात. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.  


साहित्य:
 • मुग डाळ- १ टीस्पून  
 • मसूर डाळ- १ टीस्पून  
 • चणा डाळ- १ टीस्पून  
 • तूर डाळ- १ टीस्पून  
 • उडीद डाळ- १ टीस्पून  
 • लसूण पाकळ्या- २
 • हिरवी मिरची- ३ ते ४ 
 • आल- १ इंच
 • जिरे- १/२ टीस्पून
 • बारिक चिरलेला पालक - १/२  कप
 • गाजर, सोलून व किसून-  १/२  कप
 • उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४  कप  
 • रोल ओटस- १/२  कप
 • रवा- १/२  कप
 • हिंग- १/४  टीस्पून
 • हळद- १/२  टीस्पून
 • दही- १/४ कप 
 • खाण्याचा सोडा- १/२  टीस्पून
 • पाणी- अंदाजे १/२  कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
 • मीठ- चवीप्रमाणे
 • तेल- जरुरीप्रमाणे 

कृती:
 • सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
 • सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे.
 • वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
 • दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात  दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
 • ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा  थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे.
 • अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
 • त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे.
 • एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
 • छान टम्म फुगतात.  टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.


टीपा :
 • जर अप्पे पात्र नसेल तर या मिश्रणाचे उत्तपे करू शकता.
 • हे अप्पे गरम असतानाच खावे. पारंपारिक अप्पे फारसे खरपूस भाजून घ्यावे लागत नाहीत परंतु यात ओटस असल्यामुळे खरपूस भाजून घ्यावेत, नाहीतर गिळगिळीत लागतात.


Tuesday, March 29, 2016

Olya Kajuchi Bhaji/Usal (ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ)

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. आमच्या घरात ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. पण काजू सोलताना त्याच्या चिकानं हाताची साले निघतात. पण चव इतकी अप्रतिम की हाताची साले गेली तरी बेहत्तर……….
ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ब्राम्हणी पद्धतीची उसळ आंबट-गोड अशी असते. माझी आहे हि मालवणी पद्धत.Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
 • ओले काजू, सोललेले - २ कप 
 • बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक, भाजी पुरेशी होण्यासाठी घालावा.)   
 • कांदा,  चिरून- १ मध्यम 
 • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ टेबलस्पून  
 • आले लसूण वाटण- २ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/४  टीस्पून
 • मालवणी मसाला किंव्हा घरगुती मसाला- ३ टीस्पून
 • गरम मसाला- १ टीस्पून (ऐच्छिक)
 • मीठ- चवीनुसार 
 • तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
 • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 

 कृती:
 • काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
 • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
 • एका कढईत तेल गरम करून कांदा तपकिरी रंगावर परतून घ्यावा. 
 • त्यात हिंग, हळद आणि मसाला टाकून काही  वेळ परतावा. 
 • त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं. 
 • त्यात काजू, बटाट्याचे तुकडे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
 • त्यात गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. 
 • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
 • कोथिंबीर टाकून भांडे उतरावे. 
 • चपाती किंवा भाकरी सोबत गरमागरम खायला द्यावे.

टिप:
 • तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वापरू शकता. 
 • मालवणी किंव्हा घरगुती मसाला नसेल तर (१ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गरम मसाला किंव्हा गोड मसाला) असे वापरा. 
 •  काजू आकाराने मोठे असले तर शिजायला वेळ लागतो. अर्धवट शिजलेले ओले काजू  अजिबात चांगले नाहीत.  
 • सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात. 
 • ओले काजु उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत. अर्थात ओल्या काजूंचा स्वाद त्याला नाही येत.
 • या भाजीत उकडलेले अंड खूप छान लागते. भाजी शिजली कि उकडलेल्या अंड्याचे चार तुकडे करून भाजीत वरून अलगद घालावेत. 

Sunday, March 20, 2016

Puranpoli (पुरणपोळी)

'होळी रे होळी पुरणाची पोळी' अस समीकरणं असलं तरी खरतरं इतरही बऱ्याच सणावारी आपल्याकडे पुरणपोळी करायची पद्धत आहे. पण प्रत्येक ठिकाणाची पुरणपोळी करायची पद्धत वेगळी आहे. देशावर जास्तकरून पूर्णपणे कणिक वापरूनच पोळी केली जाते. काही ठिकाणी अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरून पोळ्या बनवतात. काही ठिकाणी तेल पोळ्या तर काही ठिकाणी खापरावरच्या पोळ्या. काही ठिकाणी साखर वापरतात तर काही ठिकाणी गुळ. मुख्यत्वे पुरणासाठी चणाडाळच वापरली जाते पण काही ठिकाणी तुरीच्या डाळीचेही पुरण बनवतात. माझ्या माहेरी पुरणपोळी साठी पूर्ण मैदाच वापरला जातो. मैद्यामुळे  पोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ होते, तोंडात विरघळते जणु. माझ्यासाठी माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्यांना अख्या जगात तोड नाही. इथे मी तिचीच रेसीपी देत आहे.


Read this recipe in English.......click here.

वाढणी: १५ ते २० पोळ्या

साहित्य:
पुरणासाठी- 
 • चणाडाळ- २५० ग्रॅम
 • गुळ, किसुन- २५० ग्रॅम (यातील ३ टेबलस्पून गुळ काढून त्याऐवजी तेवढीच साखर* घालावी. चांगली चव येते.)
 • साखर*- ३ टेबलस्पून 
 • हळद- चिमुटभर
 • मीठ- चिमुटभर किंवा चवीनुसार
 • वेलची पूड-  १/२ टीस्पून
 • जायफळ पूड- १/४ टीस्पून
पोळीसाठी-
 • मैदा- २५० ग्रॅम
 • हळद- चिमुटभर
 • मीठ- चिमुटभर 
 • पाणी- अंदाजे  १/४  कप
 • तेल-१/२  कप
 • तांदुळाचे पीठ- जरुरीनुसार (नसेल तर मैदाच वापरा. पण तांदूळ पीठाने पोळ्या सरसर लाटता येतात. ) 
 • साजुक तूप- जरुरीनुसार 

कृती:
पुरणासाठी- 
 • डाळ स्वच्छ धुवून पुरेश्या पाण्यात अर्धा तास भिजवावी. 
 • चिमुटभर हळद व मीठ टाकुन कुकरला शिजवुन घ्या. कुकरच्या भांड्यात ठेवा, म्हणजे खालून करपायची भीती नाही. बाहेर शिजवतो त्यापेक्षा डाळीत पाणी कमी ठेवावे. २ शिट्ट्या घ्याव्या. (बाहेर शिजायला अंदाजे ४०-५० मिनिटे लागतात. सारखे लक्ष ठेवावे लागते.)  डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे अन्यथा पुन्हा शिजवावी पण वरणासाठी करतो तसा गाळ व्हायला नको. अख्खीच दिसली पाहिजे पण बोटाने दाबल्यास फुसकन तुटली पाहिजे. 
 • डाळ शिजल्यावर सर्व पाणी गाळुन काढून बाजूला ठेवावे. (हेच पाणी वापरून कटाची आमटी करतात.) 
 • जाड बुडाच्या भांड्यात गुळ टाकुन थोडा विरघळला की शिजवलेली डाळ टाकावी. 
 • गुळ विरघळेपर्यंत चांगली परतून घ्यावी. मिश्रण एकजीव झाले की गरम असतानाच पुरण यंत्रावर किंवा पाट्यावर वाटावे. फुड-प्रोसेसरवर पण वाटता येते.   (वाटून झाल्यावर पुरण फारच सैल वाटत असेल तर स्वच्छ व सुती कपड्यावर पसरावे. कपडा पाणी शोषून घेतो व पुरण कोरडे होते.)
 • पुरण वाटून झाल्यावर वेलची पूड व जायफळ पूड टाकावी आणि पुन्हा छान मळून घ्यावे.  
पोळीसाठी-
 • मैदा चाळून घ्यावा. साधारण त्यातील १/४ कप मैदा बाजूला काढून ठेवा. 
 • मैद्यात चिमुटभर हळद व मीठ टाकून मिक्स करा. 
 • आता मैद्यात हाताने मिक्स करत करत हळूहळू पाणी घालत घ्या. अगदी चमच्याने घातलेत तरी चालेल. अंदाजे १/४ कप म्हणजे साधारण अर्धी वाटी पाणी लागेल. खूप चिकट होतो. (म्हणूनच थोडा मैदा बाजूला काढून ठेवावा, जर भिजवलेले पीठ खूपच सैल वाटले तर वरून मैदा घालता येतो.) 
 • हाताला थोडेसे तेल लावून त्याचा गोळा करून साधारण १/२ कप म्हणजे साधारण एक वाटी तेलात ३ ते ४ तास भिजत ठेवावा. एवढ्या वेळात मैदा त्यातील तेल शोषून घेतो. 
 • पोळ्या करायला घेताना हा मैद्याचा गोळा परातीत घेवून पुन्हा चांगला मळून घ्या. थोडेफार जे तेल उरलेले असते ते पण तो मैद्याचा गोळा शोषून घेतो. अगदी त्या गोळ्याला तन्यता येईपर्यंत मळायचे आहे. 
 • पुराणाचे समान आकाराचे गोळे करून घ्यावेत. याचे २० गोळे होतात. 
 • छोट्या लिंबाएवढ्या आकाराचा मैद्याचा गोळा घेऊन हातानेच दाबून पुरीसारखा आकार करून त्यात पुरणाचा गोळा भरून तो सर्व बाजुंनी सारख्या प्रमाणात ताणत ताणत नेवुन त्याची टोक जुळवून टाकावीत. वर आलेले जास्तीचे कणिक पिळुन काढून टाकावे.  
 • पोळपाटावर तांदुळाचे पीठ भुरभुरून हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. लाटताना मध्यभागीच जोर देऊ नये, नाहीतर पुरण मध्येच राहत आणि नुसती मैदाची पोळी बाजूनी वेगळी होते. कडा जाड लाटू नये, चिवट लागतात. 
 • तवा व्यवस्थित गरम करून घ्या. शक्यतो नॉन-स्टिक तवाच वापरा, पोळी चिकटण्याची शक्यता कमी असते. 
 • पोळीवरील जास्तीचे पीठ स्वच्छ रुमालाने हलकेच झटका. हलक्या हाताने पोळी उचलून तव्यावर टाका. मध्यम ते मंद आचेवरच भाजा, हलक्या हाताने उलटा. भाजताना दोन्ही बाजूंनी तूप लावा. 
 • गरमागरम पोळीवर साजुक तुपाची यथेच्छ धार सोडा आणि दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत वाढा. कोकणात काही वेळा गुळवणी (गोड नारळाचे दुध) सोबत पुरणपोळी वाढतात. देशावर काही ठिकाणी बासुंदी सोबत तर काही ठिकाणी आमरसासोबत पुरणपोळी वाढतात.  
 • डब्यात भरताना पोळ्या थंड झाल्यावरच भरा.   

टिपा :
 • पुरण आदल्या दिवशी वाटून फ्रीजमध्ये ठेवले तर आयत्या वेळेला घाई होत नाही. पण पोळ्या करायच्या आधी १ तास आधी बाहेर काढून ठेवावे.  
 • सकाळी लवकरच पहिले मैदा भिजवून तेलात ठेवून द्यावा. म्हणजे दुपारी पोळी करायला घेईपर्यंत त्याने सर्व तेल शोषुन तो छान मुलायम झालेला असतो. 
 • पिवळा गुळ वापरा.  नैसर्गिक केमिकल विरहित गुळ नको, नाहीतर पोळ्या काळ्या दिसतील.  

Saturday, March 12, 2016

Tandulachya Kuradaya (तांदळाच्या कुरडया)तांदूळ निवडुन ४ दिवस भिजत घालायचे. रोज त्यातले पाणी बदलायचं. ४ दिवसांनंतर पाणी काढून चाळणीत निथळून घ्यायचे.

हे तांदूळ उन्हामध्ये पूर्ण सुकवून घ्यायचे. थोड्याश्या जीऱ्यासोबत गिरणीतून अगदी बारीक दळून आणायचे.

ज्या दिवशी कुरडया करायच्या आहेत त्यादिवशी एका मोठय़ा जाड बुडाच्या पातेल्यात पीठ घेवून त्यात मोठ्या चमच्याने हळूहळू, ढवळत-ढवळत, गुठळ्या मोडत पाणी घ्यालायचं. जवळजवळ पिठाच्या तिप्पट पाणी लागेल. इडलीच्या पिठाप्रमाणे दिसेल. ते उकळायला ठेवायचं. त्यात चवीनुसार मीठ घालायचं. सतत ढवळत रहायचं. त्याच्या गाठी होऊ द्ययच्या नाहीत की ते खाली लागू द्यायचं नाही. हा चीक चांगला रटारट शिजू द्यायचा. पण तो पापडय़ांना करतो तसा पळीवाढी शिजवायचा नाही. शिजला जॅम प्रमाणे घट्ट दिसू  लागला  कि झाला असा समजावे. तो शिजला की घट्ट होतो शिवाय त्याचा पांढरा रंग बदलून तो धुवट पारदर्शक होतो. आता तो गॅसवरून खाली उतरवायचा. कुरडया शक्यतो चीक गरम असतानाच करायच्या असतात. नाहीतर त्या तुटतात. प्लास्टिकच्या मोठ्या पेपरवर सोऱ्याने पटापट कुरडया पडून घ्यायच्या. २-३ सोरे आणि मदतीला माणसे असतील तर उत्तम. कडकडीत उन्हात कुरडया छान वाळवून घ्यायच्या.

आम्हा कोकण्यांना गव्हाच्या कुरडयाऐवजी तांदळाच्या कुरडयाच जास्त आवडतात.

Karamat (करमट)

करमट....वर्षभरासाठी आपण जे लोणचे घालतो त्या मोठ्या कैऱ्या बाजारात यायला अजून वेळ आहे. पण कैऱ्या तर यायला लागल्यात. मेथांबा, गुळांबा इत्यादी सारखी पटकन होणारी लोणची तर आपण करतो. पण तेवढाही धीर नसेल तर कैरी बारीक कापा, त्यात चवीप्रमाणे मीठ, मसाला टाका. चिमुटभर साखर आणि जरास तेल की झाल "करमट" तयार.Read this recipe in English, click here....
http://purvasfoodfunda.blogspot.in/2014/03/karmat.html

Friday, February 26, 2016

मटारचे फलाफेल वापरून मराठमोळे पॉकेट सँडविच

नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही.
आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की. हे थोडस वेगळ आपण भाकरीच्या आत भरुया. खायला आणखी सोप्पं.

Read this recipe in English, click here.


(पिटा पॉकेट सँडविच हा मध्य-पूर्व आशिया मधील पदार्थ आहे. भाकरीप्रमाणे दिसणारा गोल फुगलेला आणि आतून पोकळ असणारा ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड. त्याचे दोन भाग करून त्यात हर्ब्स घातलेले दही, ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट लावतात. त्यात लेट्युस सारखी सलाडाची पाने, कांदा इत्यादी पसरवतात. सुक्या काबुली चण्यापासून भजी सदृश्य 'फलाफेल' त्यावर ठेवले कि झाले पिटा पॉकेट सँडविच)

वाढणी- ४
साहित्य:
मटारचे फलाफेल /वडे -
 • मटार - १ कप (मटारऐवजी हिरवा ओला हरभरा, ओले तूर वापरले तरी चालतील. मी सगळ्याचे वडे करून पाहिलेत. चवीत अगदी थोडासा फरक जाणवतो. पण सगळेच रुचकर लागतात.)
 • कांदा, बारीक चिरून- २ टेबलस्पून
 • कोथिंबीर- १/४ कप
 • आले- १/२ इंचाचा तुकडा
 • लसुण- ३ ते ४ पाकळ्या
 • जीरे- १/२ टीस्पून
 • बडीशेप- १/४  टीस्पून 
 • मिरची- १
 • मिरची पूड/लाल तिखट- १/४ टीस्पून
 • हिंग- चिमुटभर
 • मीठ- चवीनुसार
 • बेसन- २ ते ३ टेबलस्पून
 • तांदूळ पीठ- १ टीस्पून 
 • तेल- जरुरीनुसार
चटणी-
 • दही- १/४ कप
 • शेंगदाणे, भाजून सोललेले - २ टेबलस्पून
 • तीळ, भाजलेले- १/२ टीस्पून
 • लसुण- २ पाकळ्या
 • मिरची पूड- १/२ टीस्पून
 • मीठ- चवीनुसार
इतर-
 • ज्वारी~बाजरी जाडसर भाकरी - २
 • पालकाची कोवळी ताजी पाने- १६
 • काकडी- १
 • कांदा- १
 • टोमॅटो- १

कृती:
मटारचे फलाफेल -

 • मटार, जीरे, बडीशेप, कोथिंबीर, आले, लसुण, मिरची एकत्र पाणी न वापरता मिक्सर मध्ये भरडसर वाटून घ्यावे. (कोथिंबीर, आले, लसुण, मिरची हे बारीक चिरून घ्यावे म्हणजे व्यवस्थीत वाटले जाते.)
 • एका वाडग्यात वरील वाटण, मीठ, हिंग, मिरची पूड, कांदा व बेसन एकत्र करावे.
 • सर्व एकत्र मळून त्याचे आवळ्याएवढे गोळे करावे. मध्यम ते मंद आचेवर तळावेत. किंवा थोडे चपटे करून दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस भाजून /शालो फ्राय करून घ्यावेत. (तळले तर जास्त रुचकर लागतात.)चटणी-
शेंगदाणे आणि तीळ आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावेत. त्यातच दही, मीठ, मिरची पूड टाकून वाटून चटणी करावी.

वाढण्यासाठी रचना-
 • पालक धुवुन पुसून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या.
 • भाकरी भाजून झाली कि लगेच तिचे दोन तुकडे करून पापुत्रा सोडवून ठेवा.
 • त्या अर्ध्या भाकरीला आतुन चटणी लावा, त्यावर पालकाची ३-४ पाने पसरा. त्यावर काकडी-टोमॅटोच्या चकत्या पसरा. त्यावर हरभऱ्याचे ३ वडे ठेवून त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवा आणि थोडीशी चटणी शिंपडा. 
 • पटकन खाऊन टाका. नाहीतर नंतर मऊ पडेल.

टीप:
 • वडे शालो फ्राय करायचे असतील तर मटार/हरभरा/तूर  ब्लांच करून घ्या.  
 • वडे शालो फ्राय करायचे असतील तर बेसन थोडेसे भाजून घ्यावे म्हणजे बेसन कच्चट लागत नाही. 
 • वडे करताना बेसन ऐवजी भाजणी वापरली तरी चालेल.   


Monday, February 1, 2016

Patti Samosa (पट्टी समोसा)

पटकन होणारा, चविष्ट एवढे वर्णन पुरेसे आहे, नाही ? पंजाबी समोस्यापेक्षा खूपच खुसखुशीत होतात. वेगवेगळ्या प्रकारचे (व्हेज, नॉन-व्हेज, गोड, चीज असं काहीही) सारण वापरून आपण हे समोसे बनवू शकतो.  तळलेले नको असतील तर बेकही करता येतात.


Read this recipe in English.......click here.

साहित्य:
 • तयार समोसा पट्टी (Switz Frozen Samosa Patti)- 1 पॅक
 • तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार
सारणासाठी: -
 • बटाटे, उकडुन- 2 मोठे
 • मटार, वाफवुन-  1½ कप
 • हिरव्या मिरच्या - 4
 • जिरे- 1 - टिस्पून
 • गरम मसाला- 2 टिस्पून
 • आले-लसूण पेस्ट - 2 टिस्पून
 • आमचुर पावडर - ½ टिस्पून
 • हळद- ½ टिस्पून
 • हिंग- ¼ टिस्पून
 • मीठ- चवीनुसार
 • तेल- 2 टेबलस्पून
पेस्ट साठी: -
 • मैदा - 2 टिस्पून
 • पाणी - 2 ते 3 टेबलस्पून

कृती:
 • बटाटे सोलून अगदी बारीक चीरा किंवा हातानेच चुरा.  
 • हिरव्या मिरच्या व जिरे आणि भरडसर वाटून घ्या.
 • नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून त्यात मिरची-जिरे ठेचा, आले-लसूण पेस्ट, हिंग, हळद घालून फोडणी करा. 
 • काही सेकंद परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी आणि मटार घालावेत. मीठ घालुन सर्व एकत्र करून परता. मंद आचेवर झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवावे. 
 • नंतर त्यात गरम मसाला, आमचुर टाकून जरा वेळ परता. एक वाफ काढा.  
 • गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पावभाजी मॅशर किंवा चमच्याने मिळून येण्यासाठी थोडेसे मॅश करा.  
 • मैदा  आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट करा.
 • समोसा पट्टी घेवून पुढील फोटोत दाखवल्याप्रमाणे समोसा तयार करा. शेवटी पेस्ट लावून चिकटवून टाका. अशाच प्रकारे सर्व समोसे करा.  
 • समोसे भरताना पट्ट्या आणि झालेले समोसे ओलसर कापडाने झाकून ठेवा. अन्यथा पट्ट्या आणि समोसे सुकून त्यांना तडे जातात व  फुटतात. 
 • कढईत तेल गरम करून समोसे सोनेरी रंगावर तळून घ्या. (किंवा सामोश्याना ब्रशने थोडे तेल लावा. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 200° C ला एक बाजू ८ ते १० मिनिटे व दुसरी बाजू ७-८ मिनिटे बेक करा.
 • चिंच-खजूर चटणी आणि पुदिना चटणी सोबत समोसे गरम गरम सर्व्ह करावे.

टिपा:
 • फ्रीझरमधल्या पट्ट्या वापर करताना समोसे करण्यापूर्वी फ्रीजमधून 20 मिनिटे अगोदर बाहेर काढा.
 • उरलेल्या पट्ट्या फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता.
 • सारण भरून समोसे तयार करून सुद्धा फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता. जेंव्हा हवे असतील १०-१५ मिनिटे आधी बाहेर काढून तळावे.  
 • मटार नसतील तर हिरवे वाटाणे भिजवून व उकडून वापरतात. हे पण खूप रुचकर लागतात.   


Friday, January 22, 2016

Aalepak (आले पाक / आल्याच्या वड्या)

लहानपणी एक आजोबा आलेपाक विकायला आणायचे. "सर्दी-खोकला, झटकन मोकळा" अशी त्यांची खणखणीत आवाजातली साद ऐकून आम्ही पटकन बाहेर यायचो. आजही 'आलेपाक' हा शब्द ऐकला की जुनी आठवण ताजी होते.  
आले हे कफनाशक, पित्तनाशक व पाचक आहे. कुठल्याही रुपात आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.        


Read this recipe in English.....click here.

साहित्य: 
 • आले, सोलून व चिरून- १ कप
 • साखर- २ कप 
 • सायीसकट दुध- १/२  कप 
 • तूप- १ छोटा चमचा   

कृती:
 • आले अगदी थोडं पाणी वापरून गुळगुळीत मिक्सरवर वाटून घ्या. 
 • एका चौकोनी बर्फी ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या.    
 • एका जाड बुडाच्या किंवा नॉन-स्टीक पॅनमध्ये वाटलेले आले, साखर आणि दुध एकत्र करा. 
 • मध्यम आचेवर ठेवून सतत हलवत रहा. हळूहळू साखर वितळून घट्ट होऊ लागेल. 
 • लक्ष्यपूर्वक ढवळत राहा. मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल. याचा अर्थ ते तयार आहे. गॅस बंद करा.  
 • मिश्रण ट्रे मध्ये ओतून गरम  सुरीने चौकोनी तुकडे पाडा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या करा. 
 • हवाबंद डब्यात भरून ठेवा.    

Wednesday, January 13, 2016

Bhogichi Bhaji (भोगीची भाजी)

नव्या वर्षाचे स्वागत केल्यावर येणारा पहिला सण मकरसंक्रात ! महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी अनेक प्रकारच्या भाज्यांची एकत्र भाजी केली जाते…हीच ती भोगीची लेकुरवाळी भाजी.  
संक्रांतीच्या सुमारास म्हणजेच जानेवारी महिन्यात भाजीपाला व फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हेमंत ऋतूचे हे दिवस हे मस्त थंडीचे असतात. या काळाला धुंदुर मास असही म्हणतात. याकाळात नैसर्गिकरित्या खूप भूक वाढते, पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्न शरीरालाही लागते. त्यामुळे  थंडीमध्ये पोषक ठरतील, असे पदार्थ केले जातात.
बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळयात खाणे अधिक हितकारी आहे. बाजरी ही बलकारक, उष्ण, अग्निदीपक, कफनाशक असते. त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी बनवावी. थापताना वरून तीळ लावावेत. 
तीळ आणि शेंगदाणे स्निग्ध असल्याने शरीरातील, त्वचेतील रुक्षपणा कमी करण्यास मदत करतात. यासोबत दुध, तुप, दही , लोणी, ताक यासारख्या पदार्थांचे मोठया प्रमाणात सेवन करावे.

Read this recipe in English....click here. साहित्य:
 • वांग्याच्या फोडी - १/२ कप
 • बटाट्याच्या फोडी-  १/२ कप 
 • तुरीचे दाणे - १/४ कप 
 • मटारचे दाणे - १/४ कप 
 • वालाचे/पावट्याचे दाणे- १/४ कप 
 • ओल्या हरभऱ्याचे दाणे - १/४ कप 
 • ओले शेंगदाणे/भुईमुग- १/४ कप 
 • गाजराचे तुकडे - १/४ कप 
 • घेवडा, सोलून मोडलेला - १/४ कप 
 • शेवग्याचे ३ इंचाचे तुकडे, सोलून  - ६ नग 
 • तोंडली- १/४ कप 
 • पिकलेली घट्ट बोरे - ५ ते ६ नग *
 • उसाचे १ इंचाचे तुकडे, सोलून- ३
 • कोथिंबीर- मुठभर  
 • सुके खोबरे, किसून भाजून- १ टेबलस्पून 
 • तीळ - १ टेबलस्पून + १ टीस्पून 
 • शेंगदाणे, भाजून सोलून-  १ टेबलस्पून
 • चिंचेचा घट्ट कोळ - १ टीस्पून 
 • गूळ - चिमुटभर 
 • काळा मसाला / गोडा मसाला - १ टेबलस्पून
 • मिरची पूड / लाल तिखट - १ टीस्पून किंवा आवडीप्रमाणे 
 • मोहरी - १ टीस्पून 
 • जिरे- १ टीस्पून 
 • हिंग - १/४  टीस्पून 
 • हळद - १/२ टीस्पून 
 • मीठ - चवीनुसार
 • तेल - ४ ते ५ टेबलस्पून

कृती: 
 • सगळ्या भाज्या चिरून-निवडून व धुवून घ्याव्यात. 
 • तीळ खरपूस भाजावेत. थंड झाल्यावर तीळ, शेंगदाणे व सुके खोबरे एकत्र वाटून घ्यावेत. 
 • तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद फोडणी करावी. 
 • त्यात मिरची पूड घालून लगेच थोडे पाणी टाकावे. 
 • त्यात तुरीचे, मटारचे दाणे, हरभऱ्याचे दाणे, पावट्याचे दाणे, शेंगदाणे घालून ५ मिनिट मंद आचेवर वाफवावे. 
 • नंतर गाजर, वांगे, घेवडा, उस आणि शेवगा घालून शिजवावे. जरुरीप्रमाणे पाणी घालावे. मध्ये मध्ये हलवावे. 
 • भाज्या शिजत आल्या की त्यात बोरे, कोथिंबीर, तयार केलेला कूट, काळा मसाला, चिंचेचा कोळ, गुळ आणि मीठ घालून मिक्स करावे. जरूर असल्यास पाणी शिंपडावे. एक वाफ आणावी. 
 • गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर भाजीचा आस्वाद घ्या. शिवाय जोडीला मुगाची खिचडी, ताकाची कढी आणि तीळाची झणझणीत चटणी हवीच. 


 
टिपा: 
 • भाजीला फार रस्सा ठेवायचा नाही, अंगाबरोबर रस्सा ठेवा.   
 • ज्या भाज्या आवडत असतील आणि उपलब्ध असतील त्या वापरा, आवडत नसतील त्या वगळा. भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदलावे.
 • वालपापडी व मुळ्याचे तुकडे पण घालू शकता. 
 • सुक्या खोबऱ्याऐवजी खवलेले ओले खोबरे पण वापरू शकता. अगदी शेवटी कोथिंबीर बरोबर घालावे.