Showing posts with label रस्सा भाजी. Show all posts
Showing posts with label रस्सा भाजी. Show all posts

Thursday, February 15, 2018

मेथीगोळ्यांची रस्सा भाजी

मेथीच्या भाजीला नाक मुरडणारे सुद्धा हि भाजी आवडीनं खातात असा अनुभव आहे. कडूपणा अजिबात जाणवत नाही. गरमागरम भाकरीसोबत तर मेथीगोळ्यांची रस्सा भाजी फारच छान लागते.



साहित्य -
मेथी गोळे बनवण्यासाठी:
  • बारीक चिरलेली मेथी - १ ते सव्वा कप
  • बेसन किंवा भाजणी- १/२ ते पाऊण कप
  • तीळ- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला किंवा लाल तिखट - १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • मीठ - चवीनुसार

रस्सा बनवण्यासाठी:
  • तेल - ३ टीस्पून 
  • मोहरी - १/२ टीस्पून 
  • जिरे - १/२ टीस्पून 
  • हिंग - १/२ टीस्पून 
  • हळद - १/२ टीस्पून 
  • कांदा- १ मध्यम (१/२ कप)
  • लसूण पेस्ट किंवा भरड - २ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंवा काळा मसाला - ३ टीस्पून किंवा ( १ १/२ टीस्पून मिरची पूड+ १ टीस्पून गरम मसाला + १/२ टीस्पून धणे पूड)
  • भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- १ टीस्पून (कारण हा रस्सा पातळच असतो आणि गोळ्यातील बेसन पण रश्श्यात उतरून थोडा घट्टपणा येतो.)
  • मीठ - चवीनुसार

कृती-
  • मेथी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. चाळणीवर टाकून निथळुन घ्यावी व बारीक चिरून घ्यावी.
  • मेथी गोळे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावे. 
  • एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिऱ्याची फोडणी करावी. त्यात कांदा आणि लसुण घालून गडद तपकिरी रंगावर परतून घ्यावे. 
  • त्यात हळद, हिंग, मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यावे. 
  • त्यातच खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • त्यात साधारण २ वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर त्यात मेथीचे छोटे छोटे गोळे एक-एक करीत सोडावेत. 
  • उकळी आल्यावर झाकून २-३ मिनिटे वाफवावे. 
  • गॅस बंद करून रस्सा झाकून ठेवावा म्हणजे रस्सा गोळ्यात मुरेल. गरमागरम ज्वारीच्या किंवा कुठल्याही भाकरीसोबत सर्व करावे. 
टिपा-
  • गोळे बनविताना त्यात तिखटाऐवजी वाटलेली हिरवी मिरचीही वापरता येइल. 
  • प्रथम गोळे तळून नंतर रश्श्यात सोडता येतील. 

Monday, January 29, 2018

भेंडीची आमटी

तळकोकणात व गोवा-कारवार कडे या पद्धतीची भाज्यांची आमटी केली जाते. हि आमटी वाफाळत्या भातासह रवा लावून तळलेल्या सुरण किंवा नीर फणसाच्या काप्यासह फारच अप्रतिम लागते. कधीतरी आपल्या नेहमीच्या डाळीच्या आमटीला सुट्टी देऊन करायला काहीच हरकत नाही.





साहित्य:
  • भेंडी- २५० ग्रॅम
  • मीठ- चवीनुसार 
  • कोथिंबीर, चिरून- १ टेबलस्पून
  • कांदा- १ लहान 
  • ओले खोबरे, खोवून- १/२ कप 
  • लसूण- ४ पाकळ्या
  • लाल सुक्या बेडगी मिरच्या- ४ ते ५ (किंवा मिरची पूड- १ टीस्पून )
  •  धणे- १ टीस्पून
  • जीरे-  १ टीस्पून
  • बोराएवढी चिंच (किंवा १ टेबलस्पून चिंचेचा कोळ)
  • मेथीदाणे- १/४  टीस्पून 
  • मोहोरी- १ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२  टीस्पून 
  • कढीपत्ता- ५ पाने 
  • तेल- ३ टेबलस्पून (कृती मध्ये याविषयी सविस्तर वाचावे.) 

कृती:
  • चिरलेला कांदा, ओले खोबरे, लसूण, सुक्या मिरच्या, धणे, जिरे आणि चिंच  असे सर्व एकत्र साधारण १/४ कप गरम पाण्यात भिजवावेत. १५-२० मिनिटानी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
  • भेंडी धुवून पुसून घ्यावी. दोन्ही कडेची देठं कापून उभी चिरावीत. जर भेंडी आकाराला लहान असेल तर अख्खीच वापरावी. नाहीतर दोन तुकडे करावे. 
  • कढईत ३ टेबलस्पूनतेल गरम करावे. त्यात चिरलेली भेंडी मिडीयम हाय फ्लेमवर ब्राउन होईस्तोवर तळावी. याला साधारण ७-८ मिनिटे लागतात. कमी तेलात तळत असल्याने भेंडी कालथ्याने सतत परतत राहा. भेंडी तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. (किंवा घाई असेल तर भेंडी जास्त तेलात सरळ डीप फ्राय करून घ्या. पण मग फोडणीसाठी फक्त १ टेबल्स्पून तेल वापरा.) 
  • त्याच उरलेल्या तेलात मोहोरी, मेथीदाणे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करा त्यात वाटलेला मसाला घाला आणि मोठ्या आचेवर परता. मिश्रण बऱ्यापैकी कोरडे झाले आणि थोडे तेल सुटायला लागले कि त्यात पाणी घाला. पाणी घालून आवश्यक तेवढे पातळ करा. आमटीत मीठ व  कोथिंबीर घाला.
  • आमटीला उकळी फुटली कि तळलेल्या भेंडी घालाव्यात आणि २-३ मिनिटे उकळू द्यावे. गॅस बंद करून आमटीवर झाकण ठेवा. ५ मिनिटे आमटी मुरू द्या आणि लगेच वाफाळत्या भाताबरोबर सर्व्ह करा.



Tuesday, March 29, 2016

Olya Kajuchi Bhaji/Usal (ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ)

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. आमच्या घरात ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. पण काजू सोलताना त्याच्या चिकानं हाताची साले निघतात. पण चव इतकी अप्रतिम की हाताची साले गेली तरी बेहत्तर……….
ओल्या काजूंची भाजी किंवा उसळ करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ब्राम्हणी पद्धतीची उसळ आंबट-गोड अशी असते. माझी आहे हि मालवणी पद्धत.



Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
  • ओले काजू, सोललेले - २ कप 
  • बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक, भाजी पुरेशी होण्यासाठी घालावा.)   
  • कांदा,  चिरून- १ मध्यम 
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ टेबलस्पून  
  • आले लसूण वाटण- २ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४  टीस्पून
  • मालवणी मसाला किंव्हा घरगुती मसाला- ३ टीस्पून
  • गरम मसाला- १ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 

 कृती:
  • काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
  • एका कढईत तेल गरम करून कांदा तपकिरी रंगावर परतून घ्यावा. 
  • त्यात हिंग, हळद आणि मसाला टाकून काही  वेळ परतावा. 
  • त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं. 
  • त्यात काजू, बटाट्याचे तुकडे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
  • त्यात गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. 
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
  • कोथिंबीर टाकून भांडे उतरावे. 
  • चपाती किंवा भाकरी सोबत गरमागरम खायला द्यावे.

टिप:
  • तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वापरू शकता. 
  • मालवणी किंव्हा घरगुती मसाला नसेल तर (१ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गरम मसाला किंव्हा गोड मसाला) असे वापरा. 
  •  काजू आकाराने मोठे असले तर शिजायला वेळ लागतो. अर्धवट शिजलेले ओले काजू  अजिबात चांगले नाहीत.  
  • सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात. 
  • ओले काजु उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत. अर्थात ओल्या काजूंचा स्वाद त्याला नाही येत.
  • या भाजीत उकडलेले अंड खूप छान लागते. भाजी शिजली कि उकडलेल्या अंड्याचे चार तुकडे करून भाजीत वरून अलगद घालावेत. 

Tuesday, February 10, 2015

Kokani Val, Vange, Batata, Shenga Mishrbhaji (वाल, वांगी, बटाटा, शेंगा यांची मिश्र रस्सा भाजी)

हिवाळा म्हणजे भाज्यांची रेलचेल. फेब्रुवारीत शेवग्याच्या शेंगा येऊ लागतात. वालाचे दाणे, वांगी, बटाटा आणि शेंगा अशी हि मिक्स रस्सा भाजी एकदम मस्त लागते.



Read this recipe in English...... click here.


साहित्य:
  • ताजे वालाचे किंवा पावट्याचे दाणे- साधारण २ कप (५०० ग्रॅम शेंगांपासून) 
  • वांगे - १ मध्यम आकाराचे किंव्हा ३ छोटी वांगी 
  • बटाटा- १ मध्यम 
  • शेवग्याच्या/शेकटाच्या शेंगा - ४ ते ५ 
  • कांदा, बारीक चिरून- १ मध्यम 
  • लसूण, ठेचुन- ५ ते ६ पाकळ्या 
  • घरगुती मसाला किंवा कोल्हापुरी मसाला किंव्हा लाल मिरची पावडर- ३ ते ४ टीस्पून 
  • मोहरी- १ टिस्पून 
  • हळद - १/२ टिस्पून 
  • हिंग- १/४ टिस्पून 
  • जिरे- १ टिस्पून 
  • गोडा मसाला- २ टिस्पून 
  • गूळ- १/२ टिस्पून (ऐच्छिक ) 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- २ ते ३ टेबलस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून 
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- ३ ते ४ टेबलस्पून 
  • पाणी- आवश्यकतेनुसार 
कृती:
  • शेवग्याच्या शेंगाचे ३-४ इंचाचे तुकडे करून सोला. बटाटे सोला आणि १ इंचाचे तुकडे करा. वांग्याचे साधारण१.५ इंचाचे तुकडे करा. सर्व भाज्या धुवून घ्या. 
  • मोठ्या पॅनमध्ये किंवा पातेल्यात तेल तापत ठेवावे. राई, लसूण, जिरे टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. 
  • नंतर हिंग, हळद आणि मसाला टाकून परतावे. त्यात खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. 
  • वालाचे दाणे आणि थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून ५-६ मिनीटे शिजवावे. 
  • नंतर त्यात शेंगा, वांगी, बटाटे, मीठ व गोडा मसाला टाकावा. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालावे व छान मिक्स करावे. 
  • भाजी शिजली कि त्यात गुळ घालावा. (आवडत असल्यास कच्चे/हिरवे टोमॅटो किंव्हा लाल टोमॅटो घालू शकता. कच्च्या टोमॅटोला लाल टोमॅटो पेक्षा शिजायला वेळ लागतो.) 
  • चांगले मिक्स करावे आणि ३-४ मिनिटे शिजवावे. 
  • सर्व भाज्या निट शिजल्यावर गॅस बंद करून भाजीत कोथिंबीर घालावी. 
  • हि भाजी कुकरला पण शिजू शकता. 
  • पोळी किंवा भाकरीबरोबर गरमगरम सर्व्ह करावी. 



Monday, December 22, 2014

Matar Hariyali (मटार हरियाली)

हिरव्या रस्श्यातला मटार गरम गरम पोळी बरोबर खूप छान लागतो. 



Read this recipe in English, click here. 

साहित्य :
  • मटार- १ कप 
  • कांदा, चिरून- १ मध्यम 
  • टोमॅटो, मोठे तुकडे करून - १ (ऐच्छिक) 
  • हळद- १/४ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • तेल- २ टेबलस्पून 
  • बटर- १ ते २ टेबलस्पून 
  • चीज- सजावटीसाठी (ऐच्छिक) 
हिरव्या वाटणासाठी :

  • कोथिंबीर- मुठभर
  • लसुण- ५ ते ६ पाकळ्य़ा
  • आलं- अर्धा इंच
  • ओलं खोबरे, खवुन किंव्हा काजू तुकडा- ३ टेबलस्पून
  • हिरवी मिरची- ३ ते ४
  • जिर- १ टीस्पून
  • बडीशेप- १ टीस्पून
  • दालचीनी- १ इंच
  • लवंग- २
  • हिरवी वेलची- २
  • मिरे- ४ ते ५
  • खडे मिठ- चवीनुसार (नसल्यास साधे मिठ टाका)
  • साखर- चिमुटभर
  • लिंबाचा रस- २ टेबलस्पून


कृती:
  • पाणी उकळत ठेवा. त्यात चिमुटभर खायचा सोडा टाका. त्या पाण्यात मटार टाका. १ मिनिटानंतर आच बंद करून मटार चाळणीत ओता. त्यावर थंड पाणी घाला. म्हणजे मटारचा हिरवा रंग कायम राहील. 
  • वाटणाचे साहित्य पाणी घालुन वाटुन घ्या.
  • पॅन मध्ये तेल व बटर एकत्र गरम करा. त्यात कांदा गुलाबी होइसतोपर्यंत परता. हिंग व हळद घालुन जरास परता. 
  • मग वाटण घालुन तेल सुटेपर्यंत परता. 
  • मटार घालुन ज्या प्रमाणात रस्सा हवा तसे गरम पाणी घाला. चव घेऊन मिठ कमी जास्त बघा. 
  • टोमॅटो घाला आणि झाकण ठेऊन ७ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. 
  •  गरमा गरम चपाती बरोबर छान लागते.



Monday, September 15, 2014

Valache Birade (वालाचे बिरडे)

वालाचे बिरडे किंवा बिरडं म्हणजे आमच्या कोकणी माणसांचा विक पॉइंट. सणवार असो की कुठलाही समारंभ असो बिरडे हे हवेच. आमचे नैवेद्याचे ताट बिरड्याशिवाय अपूर्ण आहे. दर महिन्याला येणारी संकष्टी आणि बिरडे हे समीकरण तर अतूट आहे. आठवड्यातून एकदा आमच्याकडे बिरडे करावेच लागते. बिरडे सोलणे हा एक वैताग असला तरी बिरड-भाताचा पहिला घास तोंडात गेल्यावर सगळा वैताग विसरायला होतो. बिरड्याचा शिजताना येणारा वास, अनेकांना घरची आठवण देतो. असा आहे बिरड्याचा महिमा…

Read this recipe in English....click here.


पूर्वतयारी: 
बिरडे म्हणजे मोड आणून सोललेली कडधान्य. वाल, पावटा, मुग, चवळी या कडधान्यापासून बिरड केली जातात. पण अर्थात लोकप्रिय आहे ते "वालाचे बिरडे". कडवे वाल हे बिरड्यासाठी उत्तम समझले जातात.
आमच्या "पेणचे" कडवे वाल फारच चवदार असतात आणि म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत.
दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा बिरडे शनिवारी करायचे असेल तर गुरुवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
  • वाल पाण्यात रात्रभर किंव्हा १० ते १२ तास भिजत ठेवावे. खूप थंडी असेल तर कोमट (गरम नव्हे, नाहीतर मोड येणार नाहीत) पाण्यात भिजत ठेवावे. 
  • सकाळी पाणी काढून टाकून धुवून घ्यावेत, असे केल्याने नंतर वाल चिकट (बिळबिळीत)  होत नाहीत.  
  • सुती कापडात बांधून ठेवावे. हे गाठोडं एका डब्यात किंव्हा भांड्यात ठेऊन झाकून ठेवावेत. हे भांडे उबदार जागी (शक्यतो ओट्याच्या खाली) १६ ते २० तास ठेवावे. उष्ण हवामान असेल तर लवकर मोड येतील आणि थंड हवामान असेल तर अर्थात मोड यायला वेळ लागेल. 
  • करतेवेळी मोड आलेल्या वालांना कोमट पाण्यात किमान २ तास भिजवावे म्हणजे वाल पटापट सोलता येतात. बोटाच्या चिमटीत दाबून साले काढावीत.    

साहित्य:
  • वाल, मोड आणून सोललेले- २ कप (१ कप सुक्या वालापासून अंदाजे २ कप बिरडे/ डाळींब्या तयार होतात)
  • ओले खोबरे, खवलेले किंव्हा किसलेले- १/२ कप 
  • जीरे- १ टीस्पून 
  • लसुण पाकळ्या- ६
  • तेल-४ ते ५ टेबलस्पून 
  • मोहोरी- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/२  टीस्पून 
  • हळद-१/२ टीस्पून 
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ४ ते ५ टीस्पून (किंव्हा २  १/२ टीस्पून मिरची पूड/लाल तिखट + २ टीस्पून गोडा मसाला)
  • कांदा, चिरून- १ मध्यम 
  • गूळ- १/२ ते १ टीस्पून 
  • कोकम (आमसुलं)- ४ (किंव्हा घट्ट चिंचेचा कोळ- १ टीस्पून ) 
  • कोथिंबीर- २ टेबलस्पून 
  • मीठ-चवीनुसार


कृती:
  • ओले खोबरे, जीरे, लसुण पाकळ्या आणि थोड पाणी टाकून सर्व एकत्र वाटून घ्या. (फ्रीझरमधले खोबरे वापरणार असाल तर वाटणासाठी गरम पाणी वापरा.)  
  • एका भांड्यात तेल गरम करा. मोहोरी घालून तडतडू द्यावी. कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर हिंग, हळद आणि मसाला किंव्हा लाल तिखट घालून जरासं परतून लगेचच त्यात धुतलेले बिरडे/ डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. थोड पाणी घालावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
  • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
  • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.

दुसरी पद्धत : (ही आहे माझ्या आजीची पारंपारिक पद्धत आणि सी. के. पी. लोक सुद्धा हीच पद्धत वापरतात.)    
  • एका भांड्यात बिरडे/ डाळींब्या, तेल, कांदा, हिंग, हळद, मसाला किंव्हा लाल तिखट घालून थोड पाणी घालून छान एकत्र करावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
  • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
  • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.  

सूचना:
  • बिरड्याचे दाणे /डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने ढवळावे. त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. 
  • बिरडे अति शिजले तर त्याचा डाळी सारखा लगदा होईल. आणि मग तो चवीला अतिशय वाईट लागेल. 
  • बिरड्यात पाणी घालताना गरम पाणी वापरावे त्यामुळे बिरडे चांगले शिजते. झाकणाच्या ताटावरचे गरम पाणी वापरले तरी चालेल.   
  • काही लोक यात बटाटा घालतात, पण माझ्या मते त्यामुळे बिरड्याची चव बिघडते.     



  

Wednesday, July 30, 2014

Takatali Patal Palebhaji (ताकातली पातळ पालेभाजी)

नेहमी नेहमी एकाच प्रकारच्या पालेभाज्या करून आणि खाऊन कंटाळा येतो. ही आजी करायची तशी पारंपारिक पण विस्मृतीत गेलेली एक पाककृती. गुळमट पंजाबी पालक-पनीर पेक्षा खूप जास्त चविष्ट आणि खमंग भाजी. ही भाजी केली तर वरण/आमटीची पण गरज नाही. काही लोक अश्या प्रकारे केलेल्या पालकाच्या भाजीलाच "पालकची कढी" अस म्हणतात. 


Read this recipe in English......click here.

साहित्य :
  • पालक/ चाकवत/ मेथी - १ जुडी (मी इथे पालक वापरला आहे. ) 
  • ताक- २ कप (साधारण ३ वाट्या) 
  • शेंगदाणे- १/४ कप 
  • चणा डाळ- १ टेबलस्पून 
  • बेसन- २ टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्या, चिरून - २ ते ४ आवडीप्रमाणे 
  • तूप किंव्हा तेल- २ टेबलस्पून 
  • जीरे- १/२ टीस्पून 
  • हळद- १/४ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • लाल सुकी मिरची, तोडून - २ (मी इथे ५ छोट्या बोर मिरच्या वापरल्या आहेत.) 
  • साखर- चिमुटभर 
  • मीठ- चवीप्रमाणे 

कृती :
  • शेंगदाणे व चणाडाळ धुऊन २-3 तास भिजवून ठेवावी. 
  • पालेभाजी निट निवडून स्वच्छ धुवून चिरावी. 
  • कुकरच्या भांड्यात पालेभाजी, चिरलेल्या मिरच्या व थोडे पाणी चालावे. त्याच भांड्यामध्ये एक वाडग्यात डाळ व शेंगदाणे थोडे पाणी घालून ठेवावेत. भाजी शिजून घ्यावी. (समजा डाळ व दाणे शिजले नसतील तर पुन्हा शिजून घ्यावेत. कारण कच्चे राहण्याची शक्यता असते.) 
  • शिजवलेली पालेभाजी डावाने चांगली घोटून घ्यावी, बेसन घालून पुन्हा घोटावी. 
  • थोडे पाणी घालून ढवळून भाजी उकळायला ठेवावी , एक उकळ आली की ताक, साखर व मीठ घालून ढवळावे. उकळी येईपर्यंत ढवळत राहावे, नाहीतर ताक फुटते. 
  • भाजीला उकळी यायला लागली की कढल्यात किंवा छोट्या पॅनमध्ये फोडणीसाठी तूप/तेल घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात जीरे, लाल मिरच्या, हळद व हिंग घालावे, नंतर शिजवलेले (पाणी निथळून घेऊन) शेंगदाणे व डाळ फोडणीमध्ये घालून परतावे. (जर थोडे कच्चे राहिले असतील तर त्यात शिजवावे.)  
  • हि फोडणी उकळत्या भाजीत ओतावी व भाजीवर लगेच झाकण ठेवावे. गॅस बंद करावा. 
  • थोड्यावेळाने भाजी ढवळून घ्यावी. चपाती किंव्हा वाफळत्या भातासोबत झक्कास लागते. 

सुचना :
  • भाजी उकळेपर्यंत ढवळल्याने ताक फुटत नाही. 
  • ताक वापरायचे नसेल तर चिंचेचा कोळ घालावा, पण मग साखरेऐवजी गुळ घालावा. बेसन २ टेबलस्पून ऐवजी ४ टेबलस्पून वापरले तर भाजी दाटसर होते. अश्या भाजीत थोडा गोडा मसाला घालावा व हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट वापरले तरी चालते. एक गुपित सांगू अशी बेसन घातलेल्या भाजीवर नुसत्या लाल केलेल्या लसणाची आणि हिंगाची फोडणी पण झक्कास लागते. आहाहा नुसत्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं. 
  • भाजीत ताक व बेसन न घालता साधे वरण घालून पण पातळ भाजी करता येईल. 

Friday, July 11, 2014

Sode, Vang, Batata aani Fanasachya Biyanchi Bhaji (सोडे घालून वांग, बटाटा आणि फणसाच्या बियांची भाजी)

ज्यांना सोडे आवडतात त्यांना सोडे घालून केलेला कुठलाही पदार्थ चांगला लागतो ……… आणि मलाही सोडे फार आवडतात. तुम्ही पण करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल.


Read this recipe in English....... click here.

साहित्य:

  • सोडे किंव्हा सुकट/सुका जवळा - १/२ कप
  • कांदा, बारीक चिरून - १ मध्यम
  • वांगे, तुकडे करून - १ मध्यम
  • बटाटा, तुकडे करून- १ मध्यम
  • फणसाच्या बिया-  १० ते १२ (उपलब्ध असतील तर)
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून
  • आले-लसूण वाटण- २ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून
  • कोकम- ३ ते ४
  • तेल- ३ टेबलस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • कोथिंबीर, बारीक चिरून  - २ टेबलस्पून


कृती:

  • सोड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. पाण्यात किमान १५ मिनिटे भिजू द्या. नंतर घट्ट पिळून घ्या.
  • फणसाच्या बिया ठेचा किंव्हा मध्ये २ भागात कापून घ्या आणि सोलून घ्या.
  • छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करा.  त्यात कांदा लालसर परतून घ्या.
  • त्यात हळद, हिंग, मसाला, आले-लसुन वाटण, भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  • त्यात सोडे टाकून जरासे परता.
  • त्यात सर्व भाज्या, कोकम व मीठ घाला. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घाला. जास्त पाणी घालू नका कारण याचा अंगासरशीच (घट्ट) रस्साच  चांगला लागतो.
  • कुकरला २-३ शिट्ट्या घ्या.  वाढताना कोथिम्बिर टाका.
  • भाकरी किंव्हा चपाती बरोबर मस्त लागतं.


टीप: सोड्या ऐवजी सुकट/सुका जवळा घालून सुद्धा हि भाजी खूप मस्त लागते. करायची अगदी हीच पद्धत आहे. पण सुकट घालत असाल तर रस्सा न ठेवता सुकीच करावी, खोबऱ्याचे वाटण घालू नये.

(भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- सुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत गडद तपकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे. हे वाटण फ्रिझरला ठेवले तर २-३ महिने व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही खमंग भाजलेले खोबरे वाटले जाते, पटकन भरड वाटणे अन्यथा तेल सुटते. जास्त दिवस टिकते. फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.)
   

Wednesday, March 12, 2014

Ole Kaju-Matar Rassa (ओले काजू आणि मटारची रस्सा भाजी)

मार्च सुरु झाला की कोकणात ओले काजू यायला लागतात. आदिवासी बायका हे ओले काजू विकायला आणतात. ते खरेदी करायला खव्वयांची एकच झुंबड उडते. आमच्या घरात ओले काजूगर म्हणजे जीव की प्राण. पण काजू सोलताना त्याच्या चिकानं हाताची साले निघतात. पण चव इतकी अप्रतिम की हाताची साले गेली तरी बेहत्तर……….
हे ओले काजू वांग्याच्या भाजीत किंव्हा अंड्यासोबत किंव्हा चिकन मध्ये चांगले चांगले लागतात. आज पाहू या मटार सोबत.


Read this recipe in English........... click here. 


साहित्य:
  • ओले काजू, सोललेले - १ कप 
  • मटार- १ कप 
  • बटाटा- १ मध्यम 
  • कांदा,  चिरून- १ कप 
  • टोमाटो, चिरून- १/२ कप 
  • आले लसूण वाटण- २ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४  टीस्पून
  • मालवणी मसाला किंव्हा घरगुती मसाला- ३ टीस्पून
  • गरम मसाला- १ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 


 कृती:
  • काजू व्यवस्थित सोलून घ्यावेत. काजू सोलताना हाताला तेल चोळावे. नाहीतर हात फार खाजतात आणि काळे होतात. ओले काजु थोडा वेळ पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील. सालं काढल्यावर काजू पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत.
  • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
  • एका कढईत तेल गरम करून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. 
  • त्यात हिंग, हळद आणि मसाला टाकून काही वेळ परतावा. 
  • त्यात आले-लसूण पेस्ट टाकून जरास परतावं. 
  • त्यात काजू, मटार, बटाटे टाकून थोडस पाणी टाकून व्यवस्थित मिसळून मंद आचेवर ५-६ मिनिटे झाकण ठेऊन शिजवावे. 
  • त्यात टोमाटो, गरम मसाला आणि मीठ टाकून  छान एकत्र करून पुन्हा एक वाफ काढावी. 
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेऊन काजू, बटाटा शिजेपर्यंत शिजू द्यावे. 
  • कोथिम्बिर टाकून भांडे उतरावे. 
  • चपाती सोबत गरमागरम खायला द्यावे.

टिप:
  • तुम्ही तुमचा स्वतःचा घरगुती मसाला वापरू शकता. 
  • मालवणी किंव्हा घरगुती मसाला नसेल तर (१ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गरम मसाला किंव्हा गोड मसाला) असे वापरा. 
  •  काजू आकाराने मोठे असले तर शिजायला वेळ लागतो. अर्धवट शिजलेले ओले काजू  अजिबात चांगले नाहीत.  
  • मटार फ्रोझन असतील तर जर उशिराने घाला नाहीतर जास्त शिजतील.  
  • रस्सा घट्ट करण्यासाठी थोडेसे भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण वापरू शकता, पण मी या भाजीसाठी नाही वापरत. 
  • सालं काढून काजू फ़्रीजर मध्ये ठेवले तर महिनाभर चांगले रहातात.