Showing posts with label लोणची/ मुरांबे /जॅम. Show all posts
Showing posts with label लोणची/ मुरांबे /जॅम. Show all posts

Wednesday, August 10, 2016

Jayfalache Lonache (जायफळाचे लोणचे)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला खूप आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. जायफळाची गोडसर चव लोणच्यात अजिबात जाणवत नाही. मुरल्यानंतरही साल थोडीशी कडक राहते.
जायफळाची फळे मधोमध कापून घेतली असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. काही ठिकाणी त्याचे सरबतही बनवतात.



साहित्य:
  • जायफळाची फळे  - १२
  • घरगुती किंवा तयार लोणचे मसाला- १०० ग्रॅम  ( मी केप्रचा कैरी लोणचे मसाला वापरला)
  • हळद- १ टीस्पून 
  • हिंग- १/२  टीस्पून 
  • तेल- अंदाजे १ कप (२ वाट्या)
  • मीठ- ५  टीस्पून किंवा चवीनुसार 
कृती:
  • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाच्या भागाचे तुकडे करू घ्यावेत.  
  • जायफळाच्या तुकडयांना मीठ व हळद लावून रात्रभर ठेवा. शक्यतो चिनी मातीचे  किंवा काचेचे किंवा प्लास्टिकचे  वाडगे/बरणी वापरा. 
  • सकाळी त्याला जे थोडेसे पाणी सुटते, ते पूर्णपणे काढून टाका. सुती  कपड्यावर पसरवून  थोड्या वेळासाठी पंख्याखाली ठेवा.  
  • नंतर जायफळाचे तुकडे आणि मसाला एकत्र करा.   
  • तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावरत्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी लोणच्यावर घालून निट मिक्स करावे. 
  • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे १० ते १५ दिवसात लोणचे मुरते.
    लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल.

Tuesday, April 19, 2016

Kairicha Moramba / Sakharamba (मोरांबा / साखरांबा)

मोरांबा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. यालाच 'साखरांबा' असेही म्हटले जाते. काहीजण  कैरीच्या बारीक फोडी करतात पण आमच्या घरात किसलेल्या कैरीचा मोरंबा आवडतो.  



Read this recipe in English...click here.

साहित्य:
  • कैरी - १ किलो /साधारण  ४ मध्यम (२ कप किस)  
  • साखर- ४ कप (यापेक्षा थोडी कमी-जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे)   
  • वेलची पूड- १ टीस्पून 
  • लवंग- ६ ते ८
  • मीठ- चिमुटभर 

कृती:
  • प्रथम कैऱ्या सोलून व किसून घ्याव्यात. कोय किंवा बाटा टाकून द्यावा. 
  • एका जाड बुडाच्या स्टेनलेस स्टील किंवा नॉन-स्टिक भांड्यात कीस, साखर, मीठ व लवंगा एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण १ तास तसेच ठेवून द्यावे. त्यामुळे कैरीला भरपूर रस सुटतो.   
  • हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर ठेवून शिजवावे. लक्ष ठेवून मधून मधून ढवळत रहावे. 
  • साखर वितळून त्याचा पाक होऊ लागेल. पाक हळूहळू घट्ट होवू लागेल. २ तारी पाक झाला की गॅस बंद करावा.  मधाप्रमाणे पाक दिसेल.    
  • त्यात वेलची पूड घालावी आणि छान ढवळून घ्यावे.  
  • गार झाल्यावर निर्जंतुक व कोरड्या बरणीत भरून ठेवावा.
  • कोरड्या हवेत हा मोरंबा वर्षभर टिकतो. दमट हवामानात २ महिने बाहेर चांगला राहील पण नंतर फ्रीजमध्ये ठेवावा.   

टिपा :
शक्यतो राजापुरी कैऱ्या वापराव्यात. घट्ट व मांसल असणाऱ्या या कैऱ्या लोणचे व मोरांबा बनवण्यासाठी आदर्श मानल्या जातात.   

Saturday, March 12, 2016

Karamat (करमट)

करमट....वर्षभरासाठी आपण जे लोणचे घालतो त्या मोठ्या कैऱ्या बाजारात यायला अजून वेळ आहे. पण कैऱ्या तर यायला लागल्यात. मेथांबा, गुळांबा इत्यादी सारखी पटकन होणारी लोणची तर आपण करतो. पण तेवढाही धीर नसेल तर कैरी बारीक कापा, त्यात चवीप्रमाणे मीठ, मसाला टाका. चिमुटभर साखर आणि जरास तेल की झाल "करमट" तयार.



Read this recipe in English, click here....
http://purvasfoodfunda.blogspot.in/2014/03/karmat.html

Tuesday, April 21, 2015

Methamba (मेथांबा)

झटपट होणारे आंबट-गोड, तिखट लोणचे. मोहरी आणि मेथीच्या फोडणीचा खमंगपणामुळे लोणचे मस्त चटकदार होते.


Read this recipe in English....click here.

साहित्य:
  • कैऱ्या - २ मध्यम 
  • गुळ, चिरून- १/२  कप (कैरीच्या आंबटपणा नुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.)
  • मेथीचे दाणे- १/२  टिस्पून
  • तेल- १ टेबलस्पून
  • मोहरी- १/४  टिस्पून
  • हिंग- १/४  टिस्पून
  • हळद- १/४  टिस्पून
  • लाल तिखट/मिरची पूड- १ टिस्पून किंवा चवीनुसार
  • मीठ - १/२  टिस्पून किंवा चवीनुसार
  • पाणी-१/२  कप


कृती:
  • कैऱ्या धुवा आणि फडक्याने पुसून कोरड्या करा. 
  • कैऱ्या सोला व बाटे/कोय काढून टाका. छोटे छोटे चौकोनी तुकडे करा.
  • पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी टाका. 
  • मोहरी तडतडली की हिंग, हळद आणि मेथी दाणे घालून किंचित तपकिरी होईपर्यंत परता. 
  • कैरीचे चौकोनी तुकडे आणि मिरची पावडर घाला. अगदी थोडा वेळ परता.  
  • आता पाणी आणि मीठ घालावे.  छान एकत्र करा. 
  • झाकण ठेवून कैरीचे तुकडे मंद आचेवर शिजू द्यावे.
  • तुकडे शिजले की पॅनमध्ये कडेला करून मध्ये गूळ घाला. चमच्याने गुळ दाबून रसात मिक्स करा. आवश्यक असेल तर थोडे पाणी घालावे. (रसाचे प्रमाण आपल्या पसंतीनुसार कमीजास्त ठेवावे.)
  • चांगले मिक्स करावे आणि झाकण न ठेवता मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजू द्यावे. रस पाकाप्रमाणे थोडा घट्ट आणि चिकट झाला पाहिजे. थंड झाल्यावर तो अधिक घट्ट होईल. 
  • मेथांबा आता तयार आहे. चपाती किंवा पराठा बरोबर मस्त लागतो. फ्रीझमध्ये ठेवल्याने जास्त दिवस टिकेल.

Friday, April 10, 2015

Karvand Lonche (करवंद लोणचे)

बाजारात काजू, कैरी, करवंद यायला लागली कि समजावे उन्हाळा आला. आधी कच्ची करवंदे विकायला येतात आणि नंतर काळी गोड अशी पिकलेली करवंदे.  कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.
चला तर आज करू मस्त लोणचे .........




साहित्य:
  • कच्ची करवंदे - २ कप
  • तयार कैरी लोणचे मसाला-  १२ ते १५ टिस्पून 
  • मीठ- ५ टिस्पून किंवा चवीनुसार
  • हळद- १/२  टिस्पून
  • हिंग- १/२ टिस्पून
  • तेल- १० ते १२  टेबलस्पून 

कृती:
  • करवंदांची देठे काढून टाका आणि स्वच्छ धुवा.
  • चाळणीत थोडा वेळ निथळू द्या, नंतर फडक्याने पुसून कोरडी  करा.
  • एक-एक करवंद घेऊन हळूच ठेचा. (करवंद फक्त फुटले पाहिजे, चेंदा-मेंदा करू नका.)      
  • ठेचलेली करवंदे  काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या वाडग्यात घेऊन त्यांना ४ टीस्पून मीठ चोळा व रात्रभर तशीच झाकून ठेवा. (यामुळे करवंदांचा चीक जाईल आणि ती मऊ पण होतील.)  
  • दुसऱ्या दिवशी करवंदे दाबुन त्यांच्या आतील बिया बाहेर काढा. एखाद-दुसरी बी राहिली तरी काही हरकत नाही, खाताना काढता येते. (तुम्हाला हे काम किचकट वाटत असेल तर ठेचण्याऐवजी करवंदाचे दोन भाग करून आतील बिया काढा. मीठ लाऊन रात्रभर झाकून ठेवा.)
  • करवंदांना जर सकाळी पाणी सुटले असेल तर ते काढून टाका. हलक्या हाताने दाबलीत तरी चालतील.)
  • आता त्यात लोणचे मसाला, हळद आणि १ टिस्पून मिठ घालावे. चांगले मिक्स करावे.
  • तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावर त्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी वाडग्यात घालून निट मिक्स करावे. 
  • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे ८ ते १० दिवसात लोणचे मुरते. 
  • लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल. नको असल्यास वरचे तेल काढून टाका. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या/पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता.)    

Tuesday, September 2, 2014

Jayfal Muramba /Jam (जायफळाचा मुरंबा /जॅम)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. एकदा माझ्या सासूबाईंनी विचार केला की मुरंबा पण बनवून पाहावा. लगोलग कृती करण्यात आली आणि सादर करत आहे हि जायफळे वापरून बनवलेला मुरंबा......आंबट-गोड चवीचा मुरंबा मस्त लागतो आणि जायफळाचा वासही येतो. या मुरंब्याला सुंदर लालसर रंग येतो.


Read recipe in English, click here.

जायफळाच्या फळाची ओळख:
हि आहेत जायफळाची फळे. मधोमध कापून घेतले असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. 
   
साहित्य:

  • कच्च्या जायफळाची फळे  - ६
  • साखर- अंदाजे ५०० ग्रॅम (जेवढा कीस, तेवढीच साखर घ्यावी)  
  • लवंगा- ५

कृती:

  • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाचा भाग किसून घ्यावा.
  • एका जाड बुडाच्या किंव्हा नॉन-स्टिक भांड्यात जायफळाचा कीस, साखर आणि लवंगा एकत्र करून मध्यम आचेवर शिजवावे.
  • सतत ढवळावे अन्यथा करपण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने साखर वितळू लागेल. साधारण अर्ध्या तासाने पाक घट्ट होऊ लागेल.
  • गॅस बंद करून मुरंबा थंड होऊ द्यावा. काचेच्या कोरड्या व स्वच्छ बरणीत मुरंबा भरावा.
  • चपाती किंव्हा ब्रेड बरोबर छान लागतो.

Saturday, December 14, 2013

Oli halad aani Aale Lonache (ओली हळद आणि आल्याचे लोणचे)

थंडी सुरु झाली की बाजारात ओली हळद यायला लागते. आलंही छान मिळत.
नेहमीच्या लोणच्यापेक्षा काहीतरी वेगळ लोणचं, जे आरोग्यासही चांगले आहे. मग नक्की करून बघा.


Read this recipe in English.....click here.

साहित्य:
  • ओली हळद , बारीक चिरून- १  १/२ कप 
  • आले, बारीक चिरून- १ कप 
  • हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- १/२ कप 
  • मीठ- ४ टीस्पून किंवा चवीनुसार 
  • लिंब- ३ ते ४
  • मेथी दाणे- ८ ते १० दाणे 
  • मोहोरी- १/२  कप 
  • तेल- १ कप किंवा  गरजेनुसार 
  • हिंग- १ टीस्पून



कृती: 
  • मी काही वेळा हळद व आंबे हळद अश्या दोन प्रकारची हळद वापरून सुद्धा हे लोणचे केले आहे. आंबे हळदीने छान आंबट चव येते, पण चाखून पाहावी लागते आधी कारण आंबे हळद कधीकधी कडू असते. 
  • मोहोरी मंद आचेवर भाजून घ्यावी. करपवू नये अन्यथा कडवट होते. खलबत्त्यात कुटून घ्यावी. खलबत्ता नसेल तर मिक्सरवर भरड दळावी. 
  • ओली हळद व आले स्वच्छ धुवून सोलावे, कोरडी करून चिरून घ्यावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. 
  • एका वाडग्यात चिरलेली हळद, चिरलेले आले, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस व मीठ असे सर्व एकत्र करावे. छान मिक्स करावे. रात्रभर किंव्हा ५-६ तास तसेच ठेवावे. 
  • दुसऱ्या दिवशी त्यात कुटलेली मोहोरी टाकून मिक्स करावे. 
  • कढल्यात १ टेबलस्पून गरम करून त्यात मेथी दाणे परतून घ्यावेत. गॅस बंद करून हिंग टाकावी. हिंग फुलला पाहिजे. हि फोडणी लोणच्यावर ओतून  छान मिक्स करावे. 
  • स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
  • छोट्या पातेल्यात तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर लोणच्याच्या बरणीत ओतून खाली-वर हलवावे.  
  •  लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) हे लोणचे मुरायला जरा जास्त वेळ लागतो. अंदाजे १ ते दीड महिना लागेल, नाहीतर कडू लागत. 

टीपा :
  • हळद व आले सोलून किसून घेतली तरी चालते. मग मिरच्याही अगदी बारीकच चिराव्यात. 
  • मी तयार केलेले हे लोणचे फार तिखट नाही. कारण मला हळदीचा व आल्याचा खरा स्वाद अनुभवायाचा होता. पण ज्यांना तिखट आवडत असेल तर त्यांनी मिरच्यांचे प्रमाण वाढवायला हरकत नाही.  
  • तुम्हाला जर लोणच्यात जास्त तेल आवडत नसेल तर लोणचे मुरल्यावर वरचे तेल बारीक (चहासाठी वापरतो ती) प्लास्टिकच्या गाळणीने गाळुन काढावे. पण मग हे लोणचे फ्रीझमध्येच ठेवावे लागेल. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या बनवण्यास वापरू शकता.) 
  • आपल्या नेहमीच्या मीठाऐवजी सेन्देलोण (सैन्धव मीठ ) वापरू शकता. 
  • मी २५० ग्रॅम ओली हळद आणली होती. साले काढल्यावर व खराब झालेला भाग काढून टाकल्यावर मला १ १/२ कप हळदीचे तुकडे मिळाले. कदाचित तुम्हाला यापेक्षा जास्त किंव्हा कमी चांगले तुकडे मिळू शकतात, तुम्हाला कशी हळद मिळते यावर ते अवलंबून आहे. 

Thursday, June 13, 2013

Chunda (छुंदा)

छुंदा हे गुजराती पद्धतीचे आंबट-गोड-तिखट असे लोणचे आहे. मेथीचा ठेपला आणि छुंदा म्हणजे अगदी लोकप्रिय नाश्ता .


Read this recipe in English.......click here.


साहित्य:
  • खोबरी कैऱ्या - १ किलो (किसून साधारण २ कप होतात)
  • साखर- अंदाजे ४ कप (जेवढा कीस त्याच्या दुप्पट साखर अस ढोबळ प्रमाण असाल तरी साखर या पेक्षा कमी किंव्हा जास्त लागू शकते. कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे.) 
  • लाल मिरची पूड - ८ टीस्पून
  • जिरे, भाजून खरडलेले - २ टीस्पून
  • मीठ - २ टेबलस्पून 


कृती:
  • कैऱ्या धुऊन, पुसून व साले काढून घ्याव्यात. किसणीवर किसून घ्याव्यात.
  • कीस आणि साखर स्टीलच्या पातेल्यात एकत्र करून स्वच्छ  आणि कोरड्या बरणीत भरावा. (साखर एकदम घालू नये, चव पाहून साखरेचे प्रमाण ठरवावे)
  • बरणीचे तोंड मलमलच्या किंवा पातळ सुती कपड्याने बांधावे. (पातेल्यात ठेवले तरी चालते, हलवायला बरे पडते  पण पालेल्याचे तोंड सुद्धा कपड्याने बांधावे लागेल.)  
  • ही बरणी ८ ते १०  दिवस कडक उन्हात ठेवावी . रोज सकाळी उन्हात ठेवताना चांगले ढवळावे .
  • ८ ते १० दिवसांत साखर विरघळून सुटलेला रस चिकट होईल . त्यामध्ये मिरची पूड, जिरे आणि मीठ मिसळावे  व परत एक दिवस उन्हात ठेवावे. छुंदा तयार .
  • चपाती किंव्हा पराठ्या बरोबर उत्तम लागते . शिवाय उपवासालाही चालतो.


सुचना:
  • कैरीच्या किसाला मीठ चोळून ते पाणी काढून टाकू नये, असे केल्याने छुंदा खूप कोरडा होतो. असे न केल्याने छुंदा शेवटपर्यंत रसरशीत राहतो, म्हणून शेवटीच मीठ टाकावे.
  • मिरची पूड घातल्यावर छुंदा जास्त दिवस उन्हात ठेऊ नये, नाहीतर तो काळा  पडतो .
  • छुंदा एप्रिलच्या मध्यावर करावा, म्हणजे कडक उन्हाने तो लवकर तयार होतो .