सोलकढी म्हणजे कोकमाचा अर्क आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली चवदार, पित्तनाशक, भूकवर्धक व पाचक कढी. कोकम शीत प्रकृतीचे असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला चांगली. तसेच नारळाचे दुध नैसर्गिक ताण नाशक आहे.
कोकणातील जेवणात सोलकढीला अगदी माशांइतकच अढळ स्थान. सोलकढीशिवाय मांसाहारी जेवणाची सांगता होत नाही. शेवटी भाताबरोबर सोलकढी ओरपावी ही तर कोकणी माणसाच्या सुखाची परमावधी. पण मला तर सोलकढी नुसतीच प्यायला फार आवडते. सोलकढीची चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते.सर्व कोकणी हॉटेलांच्या मेनूत सोलकढी हमखास दिसते आणि आता तर सोलकढीनं पंचतारांकित हॉटेलातही अव्वल स्थान मिळवलं आहे.
साहित्य:
- कोकमं/आमसुलं/सोलं- एक मूठभर / १० ते १२ (किंवा कोकम आगळ- ६ टेबलस्पून)
- ओले खोबरे- २ कप (१ मोठ्या नारळा पासून)
- लसूण पाकळ्या- ४
- हिरव्या मिरच्या- १ ते २
- जिरे- १ टिस्पून
- मीठ किंवा सैंधव- चवीनुसार
- गरम पाणी- साधारण ३ कप
- कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
कृती:
- कोकमं गरम पाण्यात ३० मिनिटे भिजत घाला. नंतर कोकमं त्याच पाण्यात घट्ट पिळुन घ्या. घट्टसर गडद गुलाबी रंगाचा रस तयार होईल.
- नारळ खवून घ्यावा. तळाकडील काळा भाग घेवू नये, पांढरे खोबरेच घ्यावे.
- मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खोबरे, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि कोमट पाणी एकत्र करा व वाटून घ्या. (चवीत बदल म्हणून आल्याचा छोटा तुकडा घातला तरी चालेल. मात्र मुळ पाककृतीत आल्याचा वापर नाही.)
- मोठ्या गाळण्याने किंवा जाळीच्या भांड्यामध्ये वरील वतन टाकून गाळून घ्या.
- उरलेला चोथ्यात कोमट पाणी घालून पुन्हा वाटून घ्या. पुन्हा गाळून घ्या. असे २ वेळा करा. (साधारण ३ कप नारळाचे दुध मिळेल. पातळ हवे असल्यास अजून थोडे पाणी घालावे. पण फार पातळ चांगले लागत नाही.)
- ह्या नारळाच्या दुधात काढलेला कोकम रस किंवा कोकम आगळ आणि मीठ घालून एकत्र करा.
- त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
- अर्धा ते एक तास फ्रिजमध्ये थंड करून सर्व्ह करा.
टीप:
- कोकमाचे आगळ हल्ली सहजपणे मिळू लागले आहे, शक्यतो तेच वापरावे. त्यामुळे सोलकढी बनवण्याचा वेळही वाचतो आणि तिला सुंदर गुलाबी रंगही येतो.
- आमच्याकडे 'कोकमाचे सार' पण बनवतात. त्याची कृती थोडी वेगळी आहे. ती नंतर कधीतरी ….