Showing posts with label चटक-मटक. Show all posts
Showing posts with label चटक-मटक. Show all posts

Tuesday, January 16, 2018

भाताचे वडे

भात उरला की नेहमी फोडणीचा भात केला जातो, असे वडे केल्यास चवीत मुलांना एक चटपटीत पदार्थ मिळेल. खरंतर चुकून एखाद्या दिवशी भात नरम झाला तर तो संपणे मुश्किल असते, असा नरम भात याच पद्धतीने संपवणे नक्कीच चांगले.   



साहित्य:
भात-  १ कप 
बेसन-  १/४ कप
ज्वारीचे पीठ किंवा भाजणी-  १/४ कप 
बारिक चिरलेली कोथिंबिर- १/४ कप
बारिक चिरलेला कांदा- १ मध्यम   
बारिक चिरलेला कढीपत्ता- ५ ते ६  पाने
बारिक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- ५ ते ६ 
हळद-  १/२ टीस्पून 
धणे पूड- १ टीस्पून  
जिरे- १ टीस्पून  
ओवा- १/२  टीस्पून  
तीळ-  १ टीस्पून  
मीठ- चवीनुसार 
तेल तळणासाठी- आवश्यकतेनुसार 

कृती:
हे वडे बनवण्यासाठी भात जरा नरमचं हवा पण जर मोकळा असेल तर थोडस पाणी शिंपडून वाफवून नरम करून घ्यावा. मायक्रोवेव्हमध्ये केल्यास पटकन होईल.
एका बाउल मध्ये भात व इतर सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण छान मळून घ्यावे .
मळलेल्या पीठाचे गोळे करून घ्या आणि तळव्यावर दाबून त्यांना चपटा आकार द्या. मेदूवड्याप्रमाणे मध्ये भोक केलं तरी चालेल.
तेल गरम करून मध्यम आचेवर वडे खरपूस तळावेत.
गरमागरम वडे टॉमेटो सॉस सोबत सर्व्ह करा. हे वडे गरमच चांगले लागतात, गार झाले कि मऊ पडतात.

Friday, February 26, 2016

मटारचे फलाफेल वापरून मराठमोळे पॉकेट सँडविच

नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही.
आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की. हे थोडस वेगळ आपण भाकरीच्या आत भरुया. खायला आणखी सोप्पं.

Read this recipe in English, click here.


(पिटा पॉकेट सँडविच हा मध्य-पूर्व आशिया मधील पदार्थ आहे. भाकरीप्रमाणे दिसणारा गोल फुगलेला आणि आतून पोकळ असणारा ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड. त्याचे दोन भाग करून त्यात हर्ब्स घातलेले दही, ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट लावतात. त्यात लेट्युस सारखी सलाडाची पाने, कांदा इत्यादी पसरवतात. सुक्या काबुली चण्यापासून भजी सदृश्य 'फलाफेल' त्यावर ठेवले कि झाले पिटा पॉकेट सँडविच)

वाढणी- ४
साहित्य:
मटारचे फलाफेल /वडे -
  • मटार - १ कप (मटारऐवजी हिरवा ओला हरभरा, ओले तूर वापरले तरी चालतील. मी सगळ्याचे वडे करून पाहिलेत. चवीत अगदी थोडासा फरक जाणवतो. पण सगळेच रुचकर लागतात.)
  • कांदा, बारीक चिरून- २ टेबलस्पून
  • कोथिंबीर- १/४ कप
  • आले- १/२ इंचाचा तुकडा
  • लसुण- ३ ते ४ पाकळ्या
  • जीरे- १/२ टीस्पून
  • बडीशेप- १/४  टीस्पून 
  • मिरची- १
  • मिरची पूड/लाल तिखट- १/४ टीस्पून
  • हिंग- चिमुटभर
  • मीठ- चवीनुसार
  • बेसन- २ ते ३ टेबलस्पून
  • तांदूळ पीठ- १ टीस्पून 
  • तेल- जरुरीनुसार
चटणी-
  • दही- १/४ कप
  • शेंगदाणे, भाजून सोललेले - २ टेबलस्पून
  • तीळ, भाजलेले- १/२ टीस्पून
  • लसुण- २ पाकळ्या
  • मिरची पूड- १/२ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार
इतर-
  • ज्वारी~बाजरी जाडसर भाकरी - २
  • पालकाची कोवळी ताजी पाने- १६
  • काकडी- १
  • कांदा- १
  • टोमॅटो- १

कृती:
मटारचे फलाफेल -

  • मटार, जीरे, बडीशेप, कोथिंबीर, आले, लसुण, मिरची एकत्र पाणी न वापरता मिक्सर मध्ये भरडसर वाटून घ्यावे. (कोथिंबीर, आले, लसुण, मिरची हे बारीक चिरून घ्यावे म्हणजे व्यवस्थीत वाटले जाते.)
  • एका वाडग्यात वरील वाटण, मीठ, हिंग, मिरची पूड, कांदा व बेसन एकत्र करावे.
  • सर्व एकत्र मळून त्याचे आवळ्याएवढे गोळे करावे. मध्यम ते मंद आचेवर तळावेत. किंवा थोडे चपटे करून दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस भाजून /शालो फ्राय करून घ्यावेत. (तळले तर जास्त रुचकर लागतात.)



चटणी-
शेंगदाणे आणि तीळ आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावेत. त्यातच दही, मीठ, मिरची पूड टाकून वाटून चटणी करावी.

वाढण्यासाठी रचना-
  • पालक धुवुन पुसून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या.
  • भाकरी भाजून झाली कि लगेच तिचे दोन तुकडे करून पापुत्रा सोडवून ठेवा.
  • त्या अर्ध्या भाकरीला आतुन चटणी लावा, त्यावर पालकाची ३-४ पाने पसरा. त्यावर काकडी-टोमॅटोच्या चकत्या पसरा. त्यावर हरभऱ्याचे ३ वडे ठेवून त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवा आणि थोडीशी चटणी शिंपडा. 
  • पटकन खाऊन टाका. नाहीतर नंतर मऊ पडेल.

टीप:
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर मटार/हरभरा/तूर  ब्लांच करून घ्या.  
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर बेसन थोडेसे भाजून घ्यावे म्हणजे बेसन कच्चट लागत नाही. 
  • वडे करताना बेसन ऐवजी भाजणी वापरली तरी चालेल.   


Monday, February 1, 2016

Patti Samosa (पट्टी समोसा)

पटकन होणारा, चविष्ट एवढे वर्णन पुरेसे आहे, नाही ? पंजाबी समोस्यापेक्षा खूपच खुसखुशीत होतात. वेगवेगळ्या प्रकारचे (व्हेज, नॉन-व्हेज, गोड, चीज असं काहीही) सारण वापरून आपण हे समोसे बनवू शकतो.  तळलेले नको असतील तर बेकही करता येतात.


Read this recipe in English.......click here.

साहित्य:
  • तयार समोसा पट्टी (Switz Frozen Samosa Patti)- 1 पॅक
  • तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार
सारणासाठी: -
  • बटाटे, उकडुन- 2 मोठे
  • मटार, वाफवुन-  1½ कप
  • हिरव्या मिरच्या - 4
  • जिरे- 1 - टिस्पून
  • गरम मसाला- 2 टिस्पून
  • आले-लसूण पेस्ट - 2 टिस्पून
  • आमचुर पावडर - ½ टिस्पून
  • हळद- ½ टिस्पून
  • हिंग- ¼ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार
  • तेल- 2 टेबलस्पून
पेस्ट साठी: -
  • मैदा - 2 टिस्पून
  • पाणी - 2 ते 3 टेबलस्पून

कृती:
  • बटाटे सोलून अगदी बारीक चीरा किंवा हातानेच चुरा.  
  • हिरव्या मिरच्या व जिरे आणि भरडसर वाटून घ्या.
  • नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून त्यात मिरची-जिरे ठेचा, आले-लसूण पेस्ट, हिंग, हळद घालून फोडणी करा. 
  • काही सेकंद परतल्यावर त्यात बटाट्याच्या फोडी आणि मटार घालावेत. मीठ घालुन सर्व एकत्र करून परता. मंद आचेवर झाकण ठेवून २-३ मिनिटे शिजवावे. 
  • नंतर त्यात गरम मसाला, आमचुर टाकून जरा वेळ परता. एक वाफ काढा.  
  • गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर पावभाजी मॅशर किंवा चमच्याने मिळून येण्यासाठी थोडेसे मॅश करा.  
  • मैदा  आणि पाणी एकत्र करून घट्ट पेस्ट करा.
  • समोसा पट्टी घेवून पुढील फोटोत दाखवल्याप्रमाणे समोसा तयार करा. शेवटी पेस्ट लावून चिकटवून टाका. अशाच प्रकारे सर्व समोसे करा.  
  • समोसे भरताना पट्ट्या आणि झालेले समोसे ओलसर कापडाने झाकून ठेवा. अन्यथा पट्ट्या आणि समोसे सुकून त्यांना तडे जातात व  फुटतात. 
  • कढईत तेल गरम करून समोसे सोनेरी रंगावर तळून घ्या. (किंवा सामोश्याना ब्रशने थोडे तेल लावा. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 200° C ला एक बाजू ८ ते १० मिनिटे व दुसरी बाजू ७-८ मिनिटे बेक करा.
  • चिंच-खजूर चटणी आणि पुदिना चटणी सोबत समोसे गरम गरम सर्व्ह करावे.

टिपा:
  • फ्रीझरमधल्या पट्ट्या वापर करताना समोसे करण्यापूर्वी फ्रीजमधून 20 मिनिटे अगोदर बाहेर काढा.
  • उरलेल्या पट्ट्या फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता.
  • सारण भरून समोसे तयार करून सुद्धा फ्रीजर मध्ये airlock पिशवीत ठेवू शकता. जेंव्हा हवे असतील १०-१५ मिनिटे आधी बाहेर काढून तळावे.  
  • मटार नसतील तर हिरवे वाटाणे भिजवून व उकडून वापरतात. हे पण खूप रुचकर लागतात.   


Wednesday, November 4, 2015

खारी शंकरपाळी (Khari Shankarpali)

दिवाळीच्या फराळाचा अविभाज्य भाग पण इतर वेळीही संध्याकाळच्या चहाची रंगत वाढवणारी ……. खारी शंकरपाळी.


Read this recipe in English... click here.


साहित्य:
  • मैदा- २५० ग्रॅम 
  • मोहन- ४ टेबलस्पून 
  • मिरे, भरडून- १ टीस्पून (तिखट आवडत असल्यास प्रमाण वाढवणे) 
  • जिरे, भरडून- १ टीस्पून 
  • ओवा- १/२ टीस्पून 
  • मीठ- १ टीस्पून किंवा चवीप्रमाणे 
  • पाणी- १/२ कप 
  • रिफाइंड तेल, तळण्यासाठी - जरुरीप्रमाणे 

कृती:
  • मैदा परातीत चाळून घ्यावा. त्यात कुटलेले जिरे व मिरे, ओवा आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. 
  • मोहन घालून आधी चमच्याने व नंतर हाताने पीठ चोळून मिक्स करावे. 
  • पाणी घालुन घट्ट कणिक मळावी. कणिक तयार झाली की ती १-२ तास झाकून ठेवावी. त्यामुळे कणिक लाटण्यायोग्य सैल होते. 
  • आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. (मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर कणकेचे छोटे छोटे तुकडे करून फूड-प्रोसेसर मध्ये फिरवुन घ्यावेत.) 
  • मग या कणकेचे मोठे गोळे करून ते चपातीप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. हि चपाती फार जाड नको आणि फार पातळही नको. (गोड शंकरपाळीपेक्षा पातळ हवी.) लाटण्यासाठी वरून मैदा लावण्याची आवश्यकता नाही. 
  • कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. झालेल्या शंकरपाळ्या आणि कणिक फडक्याने झाकून ठेवावे. 
  • सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की भरपूर तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. प्रखर(मोठ्या) आचेवर तळल्या तर बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे नंतर मऊ पडतात. 

टीपा:
  • या कणकेची शंकरपाळी ऐवजी कडक पुरी पण बनवू शकता. तळण्याआधी पुरीला टोचे मारून घ्या. 
  • मिरी ऐवजी लाल तिखट/मिरची पूड घालून तिखट शंकरपाळी बनवू शकता. 
  • कसुरी मेथी, तीळ, कलौन्जी, लसूण तसेच पालक, बीट किंवा टोमॅटो प्युरी असे वेगवेगळे जिन्नस वापरून चवीत वेगवेगळे प्रयोग करू शकता. 

Tuesday, August 25, 2015

Bhajaniche Vade (भाजणीचे वडे)

भाजणीचे वडे अतिशय रुचकर लागतात. विशेषतः मंगळागौरीच्या नैवेद्याला करण्याची प्रथा आहे.


Read recipein English.........click here. 

साहित्य:
  • थालीपिठाची भाजणी- १ कप
  • कोथिंबीर, बारीक चिरून- मूठभर 
  • तीळ- १ टेबलस्पून
  • मिरची पूड- १ टिस्पून 
  • हिंग- १/४  टिस्पून
  • हळद- १/२  टिस्पून
  • ओवा- १ टिस्पून (ऐच्छिक)
  • मीठ- चवीनुसार 
  • गरम तेल (मोहन) - १ टेबलस्पून
  • कोमट पाणी- साधारण ३/४  कप
  • तेल,तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • परातीत भाजणी, मिरची पूड, हळद, हिंग, तिळ, ओवा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ एकत्र करा.
  • त्यावर मोहन ओता आणि चमच्याने एकत्र करा. 
  • थोड थंड झाल्यावर कोमट पाणी घालून घट्ट मळुन घ्यावी आणि किमान १५ मिनिटे झाकून ठेवावी. 
  • तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवा. 
  • भिजवलेली भाजणी पुन्हा चांगली मळुन त्याचे १० ते १२ छोटे गोळे करावे.  
  • प्लॅस्टिकच्या कागदाला पाण्याचा हात लावून १ गोळा पुरी एवढ्या आकाराचा थापावा. मध्ये भोक पाडावे. 
  • गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तळावा. अश्याप्रकारे सर्व वडे करून घ्यावेत.       
  • गरमगरम वडे दह्याबरोबर सर्व्ह करा.

टिपा:
  • भाजणी करताना धान्य व्यवस्थित भाजलेले नसेल तर, वडा खरपुस होत नाही.
  • वडे तळताना तुटत असतील तर, त्यात गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ घाला आणि त्यानुसार तिखट-मीठाचे प्रमाण वाढवा. 
  • भोक पाडले नाही तर वडे पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.    
'थालीपीठ भाजणी' ची कृती वाचण्यासाठी ...... येथे क्लिक करा.

Friday, June 26, 2015

Chicken Popcorn ( चिकन पॉपकॉर्न्स)

घरी बनवलेले चिकन पॉपकॉर्न्स हे केएफसी पेक्षा जास्त चविष्ट लागतात आणि स्वस्तही. करायला सोप्पे आहेत मग करून पाहणार नं ? 




साहित्य:
  • बोनलेस चिकन- २५० ग्रॅम
  • कॉर्न फ़्लोवर- १ टीस्पून 
  • अंड - १
  • लसूण पावडर- १/२  टिस्पून किंवा लसूण पेस्ट- १ टीस्पून 
  • कांदा पावडर- १/२  टिस्पून किंवा कांदा पेस्ट- १ टीस्पून 
  • मिरची पावडर- २ टिस्पून किव्हा आवडीनुसार 
  • मिक्स हर्ब्स- १/२  टिस्पून
  • मिरपूड- १ टीस्पून  किंवा चवीनुसार
  • Worcestershire सॉस किंवा लिंबाचा रस- १ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
  • मक्याचे पोहे (चिवड्यासाठी वापरतात ते), भरड चुरा करून - २ कप
  • तळण्यासाठी तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • चिकन धुवून त्याचे छोट्या आकाराचे तुकडे करा.  
  • एक वाडग्यात  लसूण व कांदा पावडर, मिरची पावडर, मिक्स  हर्ब्स , मिरपूड, Worcestershire सॉस आणि मीठ एकत्र करा. 
  • मिश्रण चांगले मिक्स करून त्यात चिकनचे तुकडे घालावे. चिकनच्या तुकड्यांना मिश्रण व्यवथित चोळावे आणि किमान २ तास चिकन मुरु द्यावे. 
  • नंतर त्यात अंड्याचा पांढरा भाग व कॉर्न फ्लोअर घालावे. सर्व काही चांगले मिक्स करावे.
  • एका कढईत तेल गरम करायला ठेवा.  
  • एका डिशमध्ये मक्याच्या पोह्यांचा चुरा घ्या. एकएक चिकन तुकडा त्यात घोळवा.  बाजूने तो चुरा चिकनला चिकटला पाहिजे. 
  • अश्या प्रकारे सर्व चिकनचे तुकडे सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावेत. टिशू पेपरवर काढावेत.  
  • गरमागरम चिकन पॉपकॉर्न्स टोमॅटो केचप आणि सलाड सोबत सर्व्ह करावे.  

टिपा:
  • मक्याच्या पोह्यांचा चुऱ्याच्याऐवजी  ब्रेडक्रम्ब्स किंवा कॉर्न  फ्लेक्सचा चुरा वापरू शकता.
  • हेच चिकन पॉपकॉर्न्स भारतीय चवीत बनवायचे  असतील तर वर नमूद केलेले मसाले वापरण्याऐवजी  टिक्का मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घाला.

Tuesday, January 20, 2015

Kothimbir Vadi (कोथिंबीर वडी)

खुसखुशीत आणि रुचकर, लहान-थोर सगळ्यांना आवडणारी कोथिंबीर वडी !




Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • कोथिंबीर, कापुन- १ मोठी जुडी (अंदाजे ४ कप) 
  • बेसन- २ १/४ कप 
  • तांदळाचे पीठ- १ टेबलस्पून 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग- १/२ टिस्पून 
  • मिरची पुड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे) 
  • जिरे पुड - १/२ टेस्पून 
  • तीळ - 2 टेबलस्पून 
  • खसखस- १ टिस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- आवश्यकतेनुसार 
  • पाणी- फार थोडे (अगदी १ टेबलस्पून) 

कृती:
  • कोथिंबीर निवडून घ्या. लहान, कोवळी देठे पण घ्या. 
  • कोथिंबीर धुवा आणि चाळणीत ठेऊन निथळून घ्या. पाणी निथळल्यावर कोथिंबीर चिरून घ्यावी. 
  • तेल आणि पाणी वगळता कोथिंबीर आणि सर्व साहित्य परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे. 
  • १ टेबलस्पून तेल गरम करून मिश्रणात ओतावे. चमच्याने मिक्स करावे. 
  • थोडे थोडे पाणी घालावे आणि छान एकत्र मळून गोळा बनवा. 
  • त्याचे २ भाग करून लंबगोल आकाराचे गोळे/उंडे करा. 
  • भांड्याला आतून थोडे तेल लाऊन घ्या, त्यात ते गोळे ठेवा. 
  • २० मिनीटे वाफवुन घ्या. (मी मायक्रो-ओव्हन मध्ये वाफवले, साधारण ६ ते ८ मिनीटे लागतात.) 
  • वाफवून झाले कि त्या गोळ्यात सुरी किंव्हा टूथ-पिक टोचा, ती बाहेर स्वच्छ आली तर वडी शिजली आहे. 
  • थंड झाल्यावर साधारण पाव इंचाचे काप करा. 
  • वड्या सोनेरी रंगावर तळून (शालो फ्राय किंवा डीप फ्राय) घ्या. 
  • एक नाश्ता म्हणून हिरव्या चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर किंवा जेवणात तोंडीलावणे म्हणुन कोथिंबीर वडी गरम सर्व्ह करावी. 

टिप:
दुसऱ्या पद्धतीने कोथिंबीर वडी करू शकतो. थाळीला तेल लाऊन त्यात कोथिंबीरीचे मिश्रण थापावे. वाफवून घेऊन थंड झाल्यावर चौकोनी वड्या पाडाव्यात.

Tuesday, January 6, 2015

Undhiyu (उंधियु)

उंधियु हिवाळ्यात केला जाणारा पारंपारिक गुजराती पदार्थ आहे. या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्यांची रेलचेल असते. उंधियु म्हणजे बर्‍याच भाज्यांचे मिश्रण. उंधियुची एक खासियत म्हणजे प्रत्येक भाजीची विशिष्ट चव आपल्याला चाखता येते. कमी मसाले वापरले असल्यामुळे मसाल्याची तीव्र चव भाज्यांच्या चवीला मारत नाही तर त्यांना खुलवते. प्रत्येकाची कृति थोडीफार वेग़ळी असतेच. आमच्या शेजारच्या गुजराती काकुंकडून (सौ. भारती शहा) मी  उंधियु शिकले. मी यात थोडे बदल केले आहेत.




Read this recipe in English.......... click here.

वाढणी: ४
पूर्वतयारी:
# १   हिरवा मसाला करण्यासाठी:- 
साहित्य:
  • कोथिंबीर, चिरलेली- १/२ कप
  • लसूण-  १० पाकळ्या (हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल)
  • हिरव्या मिरच्या- ५ ते ७ (आपल्याला झेपतील तश्या)
  • आले तुकडा- १ इंच 
  • दाण्याचा कुट - १/४  कप
  • तीळ- १  १/२  टेबलस्पून
  • ओले खोबरे, खवलेले- १  टेबलस्पून
  • साखर- १ टीस्पून 
  • लिंबू - १ 
  • मीठ - चवीनुसार 
कृती:
तीळ भाजून घ्यावेत.
लिंबाचा रस काढा.
हिरव्या मिरच्या, लसूण व आले हे एकत्र. पाणी न वापरता भरडसर ठेचावे किंव्हा वाटावे.
हा मिरची ठेचा व वर उल्लेख केलेल्या सर्व जिन्नस एकत्र करा.

# २ मेथी मुठीया  बनवण्यासाठी :-
साहित्य:
  • मेथी, चिरून- १ कप  
  • गव्हाचे पीठ /कणिक - १/२  कप (पीठ रवाळ असेल तर उत्तम)
  • बेसन - १/४  कप
  • ज्वारी किंवा तांदूळ पीठ- २ टेबलस्पून 
  • लाल मिरची पूड- १ टिस्पून
  • हळद- १/२ टिस्पून
  • धणे पूड - १/२ टिस्पून
  • हिंग- १/४  टिस्पून
  • तीळ- १ टिस्पून
  • लिंबाचा रस- अर्धा भाग लिंबापासून 
  • साखर- १  १/२ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार 
  • खायचा सोडा-१/२  टिस्पून
  • तेल - १ टिस्पून
  • पाणी- १/४  कप
  • तेल तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 
कृती:
मेथी धुवून आणि कापून घ्यावी. तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करा. घट्ट कणिक मळा.
तेल टाकून पुन्हा मळा. छोटे लांबट गोळे बनवुन घ्या. टूथपिकने भोके पाडा. 
मंद- मध्यम आचेवर तळा, अन्यथा ते आत कच्चट राहतील. (तळलेले नको हवे असतील तर मुठिया वाफवू शकता.)

आता मुख्य पाककृतीकडे वळू या …उंधियु
साहित्य:
  • सुरती पापडी (वाल पापडी), चिरून - १ कप
  • सुरण, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कोनफळ, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • रताळे, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कच्चे केळे, तुकडे करून- १
  • लहान वांगी - २
  • छोटे बटाटे- ३ 
  • मटार - १/४  कप
  • तुरीचे दाणे - १/४ कप 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग- १/२ टिस्पून
  • रजवाडी गरम मसाला- २ ते ३ टिस्पून 
  • ओवा- १/२ टिस्पून
  • तेल- ६ टेबलस्पून (मुठिया तळण्यासाठी जे तेल वापरले त्याच तेलाचा वापर करा, मेथीची चव त्यात उतरली असते) 
  • पिवळी शेव- सजावटीसाठी 
  • लिंबू- अर्धा भाग (सुरणाला चोळण्यासाठी) 


कृती:
  • सुरती पापडी धुवून घ्या, दोरे काढून तुकडे करा.
  • रताळ्याचे स्वच्छ धुवून छोटे चौकोनी तुकडे करा.
  • सुरणाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा. (सुरण खाजरा असतो म्हणून कापताना हाताला थोडेसे तेल चोळा तसेच खाताना घश्याला खाजू नये म्हणून त्यावर मीठ व लिंबाचा रस टाकून चोळून बाजूला १५ मिनीटे ठेवा, वापरायच्या वेळेला ते तुकडे धुवून घ्या.) 
  • कोनफळाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा.  
  • बटाट्याची साले काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांग्याची देठे काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांगी व बटाट्यात वर तयार केलेला हिरवा मसाला भरा.  
  • उर्वरित हिरवा मसाला सुरण, कोनफळ, रताळे, कच्चे केळे याला चोळा. 
  • हिरवा मसाला लावलेल्या ह्या भाज्या अर्धा तास मुरु द्या. 
  •  एका मोठ्या कढईत किंवा हंडी मध्ये तेल गरम करावे. 
  • ओवा, हिंग, हळद याची फोडणी करावी. त्यात बटाटे आणि वांगी टाकावी. परतून घ्यावे आणि थोडे पाणी शिंपडावे. झाकण ठेऊन मध्यम गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • केळी, सुरण, रताळे आणि कोनफळ चे तुकडे मसाल्यासकट टाकून परतावे. परतून आणि झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • सुरती पापडी, मटार, तुरीचे दाणे  आणि रजवाडी गरम मसाला टाकावा. छान एकत्र  करून परतून घ्यावे. 
  • थोडे पाणी शिंपडावे.   झाकण ठेऊन मंद गॅसवर ८-१० मिनीटे शिजू द्यावे. मधेमधे हलवत रहावे अन्यथा खालून करपेल. गरज असेल तसे थोडे-थोडे पाणी शिंपडावे.
  • भाज्या शिजल्या की  त्यात मुठीया घालाव्यात. हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • वाढताना वरून शेव भुरभुरावी.  
  • गरमगरम  नाश्ता म्हणून नुसतेच किंवा चपाती/ पराठा सोबत भाजी म्हणून करावे.

टिपा:
  • अजुन तिखट करायचे असेल तर १ टीस्पून मिरची पावडर गरम मासाल्यासोबत भाजीत टाकावी. 
  • गुजराती लोक उंधियुमध्ये जरा जास्तच तेल वापरतात. पण मी जास्त तेल वापरलेले नाही.   
  • आवडत असल्यास गाजर, वाल, ओले हरभरे, शेवगाच्या शेंगा इत्यादी भाज्या वापरू शकता.  

उंधियु करण्यासाठी कामांचा क्रम :
  1. मेथी निवडा.
  2. सुरण सोलुन, कापुन त्यावर मीठ आणि लिंबाचा रस चोळा.
  3. मटार आणि तुरीच्या शेंगा सोला. वाल पापडी मोडून घ्या.  
  4. इतर सर्व भाज्या कापा.  
  5. हिरवा  मसाला तयार करून भाज्यांना लावा. 
  6. मुठीया तयार करून तळुन ठेवा.   
  7. आता मुख्य उंधियु करायला सुरुवात करा.  
हे कार्य नियोजन तुम्हाला घाईच्या वेळेला उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. :)

Friday, January 2, 2015

Veggie Mayonnaise Sandwich (मेयोनिझ व्हेजी सँडविच)

झटपट होणारे रुचकर सँडविच

Read this recipe in English........ click here.

साहित्य:
  • ब्रेड स्लाईस - १ पॅकेट (आपण ब्राऊन ब्रेड वापरू शकता)
  • बटर/लोणी - आवश्यकतेनुसार 
सारण:
  • बटाटे, उकडडून सोललेले - 2 मध्यम 
  • स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/२  कप
  • गाजर, किसुन  किंवा बारीक चिरून - १/२  कप
  • कांदा, चिरून- १/२  कप
  • सिमला मिरची, चिरून- १/२  कप
  • आइसबर्ग लेट्युस किंव्हा ताजा छोटा कोबी, चिरून- १ कप
  • लसूण, बारीक चिरून- १ टेस्पून
  • ऑलिव्ह तेल- १ टिस्पून (ऐच्छिक)
  • मिरपूड - 2 टिस्पून किंवा आपल्या आवडीनुसार 
  • एगलेस मेयोनिझ - ६ टेबलस्पून किंवा आपल्या आवडीनुसार 
  • मीठ- चवीनुसार 

कृती:
  • एका वाडग्यामध्ये सारणाचे सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा.
  • दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये सारण भरून नोंस्तिक तव्यावर बटर सोडून खरपूस भाजा. किंव्हा सँडविच मेकर वापरा.
  • टोमॅटो केचपबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.


टीपा: 
  • सँडविच टोस्ट केले (भाजले) नाही तरी चालेल, असे देखील चांगले लागते.
  • आपण आपल्या वैयक्तिक आवडीनुसार इतर भाज्या घालु शकता किंव्हा वगळु शकता. भाज्या प्रमाण देखील लवचिक आहे.
  • आइसबर्ग लेट्युस हा सहज उपलब्ध नाही. त्यामुळे कोबी वापरू शकता, चवीत फारसा फरक पडत नाही. 
  • तिखट आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकु शकता.

Saturday, November 15, 2014

Kanda Bhajee (कांद्याची खेकडा भजी)

बेधुंद कोसळणारा पाऊस आणि कपभर चहासोबत गरमागरम कांदाभजी म्हणजे पावसाच अस्सल समीकरण. हा पाऊस मोसमी असो व बेमोसमी  त्यात काही फरक पडत नाही.


साहित्य-
कांदे- ३
बेसन- १/२ कप
मीठ- चवीनुसार
जिरे पूड- १ टीस्पून
धणे पूड- १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लाल तिखट/मिरची पूड- १ टीस्पून किंव्हा आवडीनुसार
खायचा सोडा- चिमुटभर
तेल तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार

कृती-
कांदे लांब पातळ चिरून घ्यावे.
त्यात वरील पैकी तेल सोडून सर्व साहित्य टाकावे.मिक्स करून अगदी थोडेसे पाणी टाकावे. (मिश्रण तयार केल्यावर लगेच भजी करावी नाहीतर कांद्याला पाणी सुटते व भजी कुरकुरीत होत नाहीत)
मग तेल तापवून त्यात ४ चमचे गरम तेलाचे मोहन टाकावे. हाताने थोडे थोडे मिश्रण घेऊन तेलात सोडावे. व तळून घ्यावे. ही भजी गरम गरम चटणीबरोबर खावी.

Tuesday, November 4, 2014

Palak-Batata Cutlet (पालक-बटाटा कटलेट)

संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी चविष्ट आणि हेल्दी कटलेट ………….



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • पालक,चिरून - १+१/२ कप 
  • बटाटे, उकडून कुस्करलेले- १ कप (साधारण २ मोठे)
  • रताळे, उकडून कुस्करलेले- १/२ कप (साधारण १)
  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४
  • लसुण- ६ पाकळ्या
  • जिरे पूड- १/२ टिस्पून
  • चाट मसाला- १ टिस्पून 
  • कॉर्न फ्लोअर - १ टेबलस्पून
  • मीठ-चवीनुसार (चाट मसाल्यात मीठ असते त्यानुसार मीठ घाला) 
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • बटाटे आणि रताळे उकडून, सोलून कुस्करावे. (रताळे नसेल तर फक्त बटाटा वापरला तरी चालेल, चिमुटभर साखर घाला.) 
  • लसूण व हिरव्या मिरच्या भरडसर वाटून घ्याव्यात. 
  • पालक निवडून, धुवुन व बारीक चिरून घ्यावा.  
  • तेल सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा. मळुन गोळा तयार करा. (चिकट वाटत असेल तर ब्रेडचा चुरा घालावा.) 
  • लहान गोळे करून हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा.  
  • एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून शालो फ्राय करावे. 
  • तयार झाल्यावर वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा आणि चिंचगूळाची चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर गरम वाढावेत. 

Tuesday, October 28, 2014

Tomato Omelette (टोमॅटो ऑम्लेट)

चटकदार आणि झटपट होणारा पदार्थ.……. 


साहित्य:
  • टोमॅटो, चिरून- ४ मोठे 
  • बेसन- १ कप 
  • तांदूळ पिठ- २ टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्या, चिरून- ३
  • लसूण पाकळ्या- ६
  • जिरे पूड- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून 
  • मिरपूड - १/४ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप 
  • तेल- आवश्यकतेनुसार तळण्यासाठी 
  • बटर, टोमॅटो केचप, पुदीना चटणी - आवश्यकतेनुसार
  • ब्रेड स्लाइस- ६

कृती:
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र मिक्सरमध्ये वाटा. पाणी वापरण्याची गरज नाही. पण गरज असल्यास, अगदी थोडेसे पाणी वापरा. 
  • या टोमॅटो रसात दोन्ही पीठे, हिंग, हळद, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड आणि मीठ घालून चांगले ढवळून मिक्स करावे. गुठळ्या राहू देवू नयेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
  • नॉनस्टीक तव्याला तेल लावून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस कमी करून एक डावभर मिश्रण तव्यावर घालून डावेनेच गोलाकार पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू भाजून खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू भाजावी. 
  • टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. (मुंबईला टोमॅटो ऑम्लेटबरोबर बटर लावलेला स्लाईस ब्रेड देतात, छान लागतो.)

Saturday, October 11, 2014

Sabudana Vada (साबुदाणा वडे)



Read this recipe in English....click here.

साहित्य :
साबुदाणा- १ कप
पाणी (साबुदाणा भिजवायला)- अर्धा कप 
दाण्याचे कूट-  अर्धा कप
उकडलेले बटाटे- ३ मध्यम
जीरं-  २ टीस्पून
लाल मिरची पूड- दीड टीस्पून किंव्हा हिरवी मिरची, ठेचून- २ ते ३
मीठ- चवीनुसार
तळणीसाठी तेल- आवश्यकतेनुसार


कृती :
प्रथम साबुदाणा धुवून घ्यावा. साबुदाणा रात्रभर किंव्हा किमान ५ ते ६ तास भिजवावा.
बटाटा हाताने कुस्करून किंव्हा जाडसर किसून  घ्यावा.
भिजवलेला साबुदाणा, बटाटा, दाण्याचे कूट, जीरं, मीठ,  लाल मिरची पूड हे सर्व जिन्नस एकत्र करून मळून घ्यावे. 
हाताला थोडे पाणी लाऊन त्याचे चपटे वडे करून घ्यावेत.
तेल गरम करावे व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
उपवासाच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत गरम गरम वाढावेत.

टीपा: 
तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर पाव कप  बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
मिश्रण फारच मऊ आणि चिकट झाले तर त्यात वरीचे किंव्हा साबुदाण्याचे किंव्हा राजगीरा पीठ घालावे.
यामध्ये काही ठिकाणी कुरकुरीतपणासाठी वरीचे तांदूळ घातले जातात. तुम्हाला आवडत असल्यास घालावेत.
  

Wednesday, October 8, 2014

Chakalya (भाजणीच्या चकल्या)

चक चक चकली काट्याने माकली, तुकडा मोडताच खमंग लागली ……….किती चकलीची कौतुके तशीच तिची चव………. सर्वांना आवडणारी चकली !
माझ्या आजीची हमखास यशस्वी होणारी सोप्पी पाककृती, याप्रमाणे केल्यामुळे गेली १०-१२ वर्ष माझ्या चकल्या छान होतात.  


Read this recipe in English.....click here.

चकलीची भाजणी तयार करण्यासाठी:

साहित्य:
  • जुना जाडा तांदूळ - १ किलो (जाडा तांदूळ वापरल्याने भाजणी फुलते व चिकट होते)
  • चणाडाळ - ५०० ग्रॅम
  • उडीद डाळ - ५० ग्रॅम
  • मुग डाळ - २०० ग्रॅम
  • साबुदाणे - १०० ग्रॅम
  • पोहे - १०० ग्रॅम
  • जीरे- २५ ग्रँम
  • धणे - २५ ग्रँम

कृती:
  • तांदूळ, डाळी व इतर साहित्य चाळून आणि निवडून घ्या.
  • तांदूळ धुवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापड वर पसरुन सावली मध्ये दिवसभर खडखडीत वाळवा.
  • प्रत्येक डाळ वेगवेगळी (स्वतंत्रपणे) सोनेरी भुऱ्या रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावी. खमंग वास दरवळू लागला की झालं असे समजावे.  
  • तांदूळ सोनेरी भुऱ्या (पिवळट/फिक्कट तपकिरी) रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावेत. एक  दाणा दाताखाली चावावा,  कुरकुरीत झाला म्हणजे तांदूळ व्यवथित भाजले गेलेत. 
  • पोहे  मंद-मध्यम आचेवर नकरपवता सोनेरी भुऱ्या रंगावर एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. भाजण्यापुर्वी पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास येतो.  
  • साबुदाणा मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावा. साबुदाणा फुलतो म्हणजे झाला 
  • जिरे आणि धणे सुद्धा खमंग भाजून घ्यावेत.
  • सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले की गिरणीतून बारीक दळून आणावे.
  • चकल्या करताना प्रथम भाजणीचे पीठ चाळून घ्यावे.

आता मुख्य कृती पाहू या ….
एका वेळी खूप पीठ मळून घेऊ नका. पीठाची रया जाऊन चकल्या चांगल्या होत नाहीत.  थोड थोड पीठ मळून चकल्या बनवा. त्रास पण कमी होतो.

साहित्य:
  • भाजणी पीठ- २ कप
  • घरगुती मसाला किंवा लाल मिरची पूड - १ टेबलस्पून किंवा आवडीनुसार
  • तिळ - ३ टिस्पून
  • ओवा - १ टिस्पून (ऐच्छिक)
  • तेल (मोहन)- ३ टेबलस्पून
  • पाणी - अंदाजे १ कप (थोडे कमी-जास्त लागू शकते, पाण्याचे प्रमाण तांदळाच्या प्रतीवर तसेच तो नवा आहे कि जुना आहे यावर अवलंबून असते.)     
  • मीठ - १ टिस्पून किंवा चवीनुसार
  • तेल- तळण्यासाठी

कृती:
  • परातीत भाजणी, तिळ, ओवा, लाल तिखट आणि मीठ एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
  • लहान कढईत तेल गरम करावे. परातीतल्या पीठावर सगळीकडे गरम तेल (मोहन) घालावे. एकाच जागी घालू नये.
  • थोडे थोडे पाणी घेऊन कणिक भिजवावे. गरम पाणी वापरण्याची गरज नाही.
  • चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही.
  • सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. कागदाचे छोटे तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्यावर एक-एक चकली पाडावी. म्हणजे चकली उचलायला आणि कढईत सोडायला सोप्पे जाते. 
  • चकली सोडायच्या आधी तेल चांगले गरम असावे. चकल्या तेलात सोडल्यावर गॅस कमी करावा व मध्यम आचेवर चकल्या सोनेरी रंगावर खमंग तळून घ्याव्यात. एकावेळी फक्त ३-४ घालाव्यात, गर्दी करू नये.
  • हळूहळू चकल्या रंग बदलून व बुडबूडे बंद होवून खाली बसू लागतील. म्हणजे चकल्या झाल्या.
  • कढईतून चकल्या काढल्यावर अधिकचे तेल शोषण्यासाठी कागदावर पसरवाव्यात.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्याच्या तळाशी आणि मधेमधे कागद पसरऊन घालुन त्यावर चकल्या ठेवाव्यात. म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाते.  

सूचना:
  • चकलीसाठी दोन प्रकारच्या चकत्या येतात. एक छोटा स्टार आणि मोठा स्टार. तर छोटा स्टारची चकती वापरावी, कारण त्यामुळे चकल्या हमखास खुसखुशीत होतात. तळायलाही वेळ कमी लागतो.     
  • प्रथम एक-दोन चकल्या करून तळून घ्याव्यात. चाखून पहाव्यात. म्हणजे चवीचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे तिखट, मीठ व जरूर असल्यास धने-जिरे पूड घालावी.     
  • चकल्या खूप लालसर तळू  नयेत. कारण त्या कढईतून काढल्यावर पण थोडावेळ गरम तेलामुळे शिजत राहतात आणि थोड्या वेळाने काळपट लाल दिसू लागतात.
  • चकल्या मध्यम आचेवरच तळाव्यात.
  • चकल्या मोठ्या आचेवर तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील आणि बाहेरून करपतील. त्यामुळे त्या मऊ /वातड होतील आणि चवीला कडू लागतील.
  • चकल्या मंद आचेवर तळल्या तर त्या तेलकट आणि कडक होतात.
  • भाजणी बिघडली तर चकल्या बिघडतात. म्हणजे भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर चकल्या खुसखुशीत होत नाहीत आणि करपवले तर चकल्या कडवट लागतात.
  • चकलीचे पिठ प्रमाणापेक्षा नरम भिजवल्यास चकल्या  मऊ होतात अर्थातच त्या मळलेल्या पिठात थोडी भाजणी घालावी व त्या प्रमाणात तिखट-मीठ पण वाढवावे आणि पुन्हा मळून घ्यावे.
  • चकल्या पाडताना तुटत असल्यास, पिठ प्रमाणापेक्षा जास्त घट्ट झाले आहे पुन्हा पाण्याच्या हाताने मळून घ्यावे.
  • पिठात मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात घातल्यावर फुटतात.
  • उकडीच्या चकल्या  खुसखुशीत आणि चटकदार होतात यात शंकाच नाही पण मी दिलेल्या या पाककृतीमुळे चकल्या खमंग होतातच आणि उकडीच्या चकलीप्रमाणे खूप तेल पित नाहीत म्हणजेच फार तेलकट नाहीत. शिवाय उकडीच्या चकल्यांचा व्याप पण फार असतो, या चकल्या त्यामानाने झटपट होतात. 
  • काही लोक डाळी आणि तांदुळ दोन्ही धुवून घेऊन वापरतात. पण आमच्याकडे डाळी आणि तांदुळ दोन्ही न धुता भाजले जातात. मात्र डाळी आणि तांदुळ स्वच्छ असायला हव्यात. थालीपीठाची भाजणी करताना कुठे आपण धान्य धुवून घेतो? 
  • तुम्ही तांदूळ धुवून वापरू शकता. तांदूळ सुकावताना सावलीतच सुकवावे. पंख्याखाली सुकवले तरी चालतील. तांदूळ धुतल्यावर चाळणीत किंवा रवळीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळले की सुती कपड्यावर वाळत घालावेत. खडखडीत सुकवावेत.    
  • तांदूळ आणि डाळी धुवुन घेणे गरजेचे असेल पण जागेची किंव्हा वेळेची कमतरता असेल तर त्यासाठी एक टीप आहे. एक स्वच्छ सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवुन घटत पिळून घ्यावा. त्यावर क्रमाक्रमाने तांदूळ व डाळी चोळून पुसून घ्याव्यात. मात्र प्रत्येक जिन्नस चोळून पुसून झाल्यावर तो कपडा पाण्यातून आगळून पिळुन घ्यावा. नंतर पंख्याखाली धान्ये वाळवावीत आणि नंतर भाजावीत.            


काही लोकांना चकली दही किंव्हा लोण्यासोबत खायला आवडते. पण खर सांगू का, मला कशी आवडते ते. मला आवडते चहासोबत. मस्त कपभर गरमागरम चहा घ्यायचा, त्यात चकल्यांचे तुकडे टाकायचे आणि …… आणि काय गट्टम करायचे. आणि तो उरलेला मसालेदार चहा पण काय मस्त लागतो.  :)

Wednesday, October 1, 2014

Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा)

चिवडा हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय दिवाळी फराळ आहे. तो अनेक प्रकारे केला जातो, आज मी एक अत्यंत सोप्पी आणि पटकन होणाऱ्या चिवड्याची कृती देत आहे. 


साहित्य:
  • पातळ पोहे- ५०० ग्रॅम 
  • शेंगदाणे- अर्धा कप 
  • काजू तुकडा - पाव कप 
  • डाळ्या (पंढरपूरी डाळं) - पाव कप 
  • सुके खोबरे, पातळ काप करून- पाव कप 
  • मनुका (बेदाणे) - पाव कप 
  • लाल तिखट/मिरची पूड- २ टिस्पून 
  • कढीपत्ता- पाव कप 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग (हळद) - ¼ टिस्पून 
  • खसखस- 2 टिस्पून (ऐच्छिक) 
  • तीळ- १ टेबलस्पून 
  • धणे पूड- १ टिस्पून 
  • जीरे- 2 टिस्पून 
  • मोहरी- १ टिस्पून 
  • तेल- १० ते १२ टेबलस्पून 
  • पिठी साखर- ३ टिस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • पिवळी शेव- आवडीनुसार (ऐच्छिक) 

कृती:
  • पोहे हलक्या हाताने चाळून आणि निवडून घ्यावेत. 
  • कढीपत्ता धुवून, पुसून कोरडा करून घ्यावा. 
  • जाड बुडाच्या कढईत २-२ मुठी पोहे मंद आचेवर चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. पोहे चुरचुरीत झाले की नाही हे बघण्याकरता चिमटीभर पोहे हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे चुरचुरीत झाले असे समजावे.(किंव्हा २ दिवस चांगले कडक उन्हात वाळवले तरी चालतात.) 
  • भाजलेले पोहे वर्तमान पत्रावर पसरवून घ्या. 
  • त्यावर मिरचीपूड, धणे पूड, मीठ आणि पिठी साखर टाका आणि पोहे हलक्या हाताने हलवून चांगले मिक्स करा. 
  • मोठ्या आकाराचे पातेले घ्या. त्यात तेल गरम करावे. 
  • सर्वात आधी शेंगदाणे, काजू आणि खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तळून झाले की झाऱ्याने काढून भाजलेल्या पोह्यावरच पसरून टाकावेत. 
  • आता त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी. त्यात कढीपत्ता घालावा आणि तळून कुरकुरीत होऊ द्यावा. 
  • नंतर त्यात जिरे, तिळ, खसखस, डाळं, मनुका घालून परतावे. 
  • आता गॅस बारीक करून हळद, हिंग घालून चमच्याने मिक्स करावे. 
  • आता सर्व तळलेल्या साहित्यासह भाजलेले पोहे पातेल्यात घालावे आणि नाजूक हाताने पटापट ढवळावे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. 
  • हळूहळू सर्व साहित्य छान मिक्स होऊन पोह्याचा रंग बदलेल आणि पोहे खमंग होतील. त्यावेळी गॅस बंद करा. (नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद केल्यावर ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून ठेवणे. 
  • थंड झाल्यावर अतिशय खरपूस असा चिवडा तयार. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. 

टिपा:
  • पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास चिवड्याला येतो. तसेच प्रत्येक वेळी भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती स्वच्छ पुसून घेऊनच दुसरे पोहे भाजावेत. 
  • मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरच्या वापरू शकता. कढीपत्त्यासोबत फोडणीत टाका आणि कुरकुरीत तळून घ्या. 
  • लसूण, मिरची, कोथिंबीर एकत्र भरड वाटून घ्या. मिरची पावडर ऐवजी हा ठेचा वापरू शकता. मस्त चव येते. 
  • २ टिस्पून बडीशेप जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, एक वेगळाच स्वाद येतो. 
  • पाव टिस्पून लिंबू फुल (सायट्रिक ऍसिड) जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, थोडीशी आंबट चव येते. 
  • अंदाज चुकल्याने चिवडा खारट, तिखट किंव्हा तेलकट झालाच तर थोडे भणंग/कुरमुरे भाजून घालावेत.

Friday, September 19, 2014

Mathari (मठरी)

मठरी हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे. ते लोक आंब्याच्या लोणच्याबरोबर याची मजा लुटतात. आपण दिवाळीसाठी तिखट पुरीला किंव्हा खाऱ्या शंकरपाळीला बदल म्हणून या मठरी करू शकतो.


Read recipe in English......click here.

साहित्य:
  • मैदा- २ कप
  • वनस्पती तूप (डालडा)- १/२ कप
  • जीरे, जाडसर कुटून-१/२ टीस्पून
  • काळे मीरे, जाडसर कुटून-१ टीस्पून 
  • कलौन्जी (कांद्याचे बी)- १ टीस्पून 
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार

कृती:
  • मैदा चाळून घ्यावा.
  • त्यात सर्व मसाले आणि मीठ घालावे.
  • तूप कडकडीत तापऊन त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे.
  • थोडस थंड झाल्यावर हाताने हळूहळू चोळून तूप मैद्यात सारखे मिसळून एकजीव करावे.
  • मग लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून मैदा घट्ट भिजऊन घ्यावा.
  • थोडा वेळ तसाच झाकून ठेवावा.
  • नंतर पुन्हा चांगले मळून घेऊन त्याच्या छोट्या लाट्या कराव्यात.
  • जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात व काट्याने त्यावर टोचे मारावेत. (नाहीतर पुरीसारख्या फुगतील आणि नंतर मऊ होतील.) लांबडे आयताकृती तुकडे पण करता येतील.
  • तेल तापून घ्या. थोड्या थोड्या पुऱ्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा. तरच त्या खुसखुशीत होतील. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

Saturday, August 16, 2014

Upavasachya Kachorya (उपवासाच्या कचोऱ्या)





Read this recipe in English......click here.


साहित्य:

  • उकडलेले बटाटे- ४ (२५० ग्रॅम )
  • आरारूट किंव्हा साबुदाणा पीठ- अंदाजे ६ टेबलस्पून 
  • लाल तिखट- १/४ टीस्पून 
  • जीरे पूड- १/४ टीस्पून 
  • ताजे खोवलेले खोबरे - १/२ कप 
  • मनुका- २ टेबलस्पून 
  • काजू तुकडे, तळून  किंव्हा भाजून - २ टेबलस्पून  
  • हिरवी मिरची, बारीक चिरून किंव्हा ठेचून- २
  • जीरे- १/२  टीस्पून
  • साखर- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
  • चवीपुरते मीठ
  • शेंगदाणा तेल किंव्हा तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • उकडलेले बटाटे कुस्करून किंव्हा किसणीवर किसून घ्यावेत. 
  • त्यात मिरची पूड, जिरे पूड, मीठ आणि आवश्यकतेनुसार आरारूटचे पीठ घालावे. व्यवस्थित मळून मऊसर गोळा बनवावा. 
  • मळलेल्या पीठाचे लिंबाएवढे गोळे बनवावे. तेलाच्या हाताने मोदकाच्या पारीप्रमाणे वाटीसारखा किंव्हा पुरी सारखा आकार देऊन त्यात चमचाभर सारण घालून कडा जुळवून कचोरी वळावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवाव्यात. 
  • पीठात  घोळऊन कचोऱ्या मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढाव्यात.
  • उपवासाच्या चटणीबरोबर किंव्हा गोड दह्यासोबत वाढाव्यात.

सूचना: 
  •  कचोऱ्या गरमच खाण्यास द्याव्यात. थंड झाल्यावर मऊ पडतात त्यामुळे चांगल्या लागत नाही.
  • कच्चे सारण आवडत नसेल तर थोड्याश्या तूपावर जिरे, हिरवी मिरची, खोबरे आणि इतर साहित्य नीट परतून सारण बनवावे.
  • सारणात चालत असल्यास कोथिंबीर घालू शकता.
  • आंबट-गोड चव आवडतं असेल तर सारणात अर्ध लिंबू पिळून घाला.  
  • कचोऱ्या उपवासासाठी करायच्या नसतील तर आरारूटच्या एवजी कॉर्न फ्लोअर वापरू शकता. 
  • साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तश्या ह्या कचोऱ्या गोडसरच असतात.  
  • वरील प्रमाणात १२ कचोऱ्या होतील.  

Tuesday, July 8, 2014

Mushroom Burger (मश्रूम बर्गर)

घरी केलेला  बर्गर बाहेरच्या महाग आणि पचकट बर्गरपेक्षा खूप स्वस्त आणि रुचकर होतो. आपल्या आवडीनुसार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर घरी बनवता येतील.  त्यातील हा एक प्रकार ………… 



Read this recipe in English......... click here.


साहित्य: 

बर्गर कटलेट बनवण्यासाठी :
मश्रूम, बारीक चिरून- २ कप (२०० ग्रॅम )
कांदा, बारीक चिरून - १/२ कप
शिमला मिरची, बारीक चिरून- १/२ कप
आलं-लसूण पेस्ट- २ टीस्पून
मिरची पूड- १ टीस्पून
मिक्स हर्ब्स- १  टीस्पून
काळी मिरी पूड- १ टीस्पून
टोबास्को किंव्हा हॉट चिली सॉस-  १/२ टीस्पून
मीठ- चवीनुसार
ताजे ब्रेड स्लाईस- २ (मिक्सरच्या साह्याने  बारीक चुरा /ब्रेड क्रम्बस करवेत.)

तेल किंव्हा बटर- जरुरीप्रमाणे
कॉर्न फ्लोअर घोळ (स्लरी)-  २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर + २ टेबलस्पून पाणी (एकत्र ढवळून घ्यावे)
कॉर्न फ्लेक्स, चुरून- १/२ कप

बर्गर सॉस बनवण्यासाठी:
मेयोनीज-   १/४ कप
टोमाटो केचप- १ टेबलस्पून
मस्टर्ड सॉस - १  टीस्पून
कांदा-लसूण पावडर किंव्हा लसूण, वाटून - १  टीस्पून
टोबास्को किंव्हा हॉट चिली सॉस- १  टीस्पून
मीठ आणि मिरी पूड- जरुरीनुसार

वरील सर्व साहित्य एकत्र ढवळून घ्याव.

बर्गर बनवण्यासाठी:
बर्गर बन-४
लेट्युस पाने-४
चीज स्लाईस - ४
टोमाटो गोल चकत्या-४
कांदा गोल चकत्या-४

कृती:
२ टेबलस्पून बटर किंव्हा तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात चिरलेले मश्रूम व शिमला मिरची टाकून अजून थोडावेळ परतून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, मिरची पूड, मिक्स हर्ब्स, काळी मिरी पूड, टोबास्को किंव्हा हॉट चिली सॉस व मीठ टाकून परतून घ्या. झाकण ठेऊन मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा.
मिश्रण थंड होऊ द्या.  त्यात ब्रेडचा चुरा टाकून मळून घ्या.
त्या मिश्रणाचे ४ सारखे भाग करा.  त्याचे जाडसर  कटलेट बनवा.


 ते कटलेट कॉर्न फ्लोअर घोलमध्ये बुडवा आणि कॉर्न फ्लेक्सच्या चुऱ्यात घोळउन शालो -फ्राय करा. 
बनचे दोन भाग करून जरास बटर लाऊन तव्यावर जरासे भाजा.  
दोन्ही भागांवर बर्गर सॉस लावा. 
एका भागावर लेट्युसचे पण ठेऊन त्यावर चीज स्लाईस  त्यावर कटलेट त्यावर टोमाटो व कांद्याची चकती ठेऊन, बनचा  वरील भाग ठेऊन जरासा दाबा. तुमचा बर्गर तयार ……… 
केचप व वेफर्स किंव्हा फ्रेंच फ्राईज सोबत बर्गरचा आस्वाद घ्या. 

लेट्युस नसेल तरी हरकत नाही. हव असल्यास कोबीची किंव्हा पालकाची कवळी  पाने वापरू शकता.  

Monday, March 24, 2014

Pasta with Tomato Sauce (पास्ता विथ टोमाटो सॉस)

पास्ता विथ टोमाटो सॉस ………… हा पास्त्याचा सगळ्यात रुचकर आणि लोकप्रिय प्रकार. चला तर मग पाहू या कसा बनवायचा.


Read this recipe in English....... click here. 


टोमाटो सॉस बनवण्यासाठी :

साहित्य:
  • टोमाटो- ६ मध्यम आकाराचे  (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)
  • कांदा, बारीक चिरून  - १ मोठा
  • लसुण, बारीक चिरून- १० पाकळ्या
  • मिक्स हर्ब्स - १ टीस्पून
  • काळी मिरी पूड किंव्हा कुटून-  १ टीस्पून
  • चिली फ्लेक्स- १ टीस्पून
  • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
  • टोमाटो केचप- २ टीस्पून
  • ऑलिव ओईल किंव्हा बटर - ३ टेबलस्पून
  • मीठ- चवीनुसार
  • पाणी- १ कप
कृती:
  • पाणी उकळत ठेवा. उकळी आली कि त्यात टोमाटो टाकून २-३ मिनिटे शिजवून घ्या.  सालाला तडे गेले कि समजावे टोमाटो शिजले.
  • थंड झाल्यावर साले काढून टोमाटोचे तुकडे करा आणि मिक्सर मध्ये वाटून त्याची प्युरी बनवा.
  • प्यान मध्ये तेल  गरम करून कांदा आणि लसूण गुलाबी रंगावर परतून घ्या.
  • त्यात मिरची पूड आणि मीठ घालून जरास परता.
  • त्यात टोमाटो प्युरी,  मिक्स हर्ब्स,  चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड,  टोमाटो केचप व पाणी टाका.  (शक्यतो टोमाटो शिजवण्यासाठी वापरलेलेच पाणी वापरा. )  छान एकत्र करून उकळी येऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा.
  • हा सॉस तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर थंड करून फ्रिझरमध्ये ठेवा.  महिनाभर चांगला राहील.

पास्ता बनवण्यासाठी:  

साहित्य:
  • पेने पास्ता किंव्हा इतर पास्ता- १ पाकीट (२५० ग्रॅम )
  • टोमाटो सॉस- वर कृती दिली आहे
  • गाजर, छोटे चौकोनी तुकडे करून- १/४ कप
  • ब्रोक्कोली- १/२ कप
  • सिमला मिरची- १/२ कप
  • बेबी कॉर्न्स, छोटे तुकडे करून -१/४ कप (किंव्हा स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/४ कप)  
  • ऑलिव ओईल किंव्हा बटर - जरुरीप्रमाणे 
  • चीज,किसलेले - १/४ कप 
  • मीठ- चवीनुसार
कृती:
  • पास्ता च्या पाकीटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता शिजऊन घ्यावा. (पाणी उकळत ठेवावे, त्यात मीठ घालावे. उकळी आली की पास्ता टाकून ८-१० मिनिटे शिजवावा. जास्त शिजऊ नये, मऊ पडतो. शिजला कि चाळणी मध्ये ओतून निथळत ठेवावा. वरून थंड पाणी ओता.)  
  • थोड्याश्या तेलावर मीठ आणि मिरी पूड घालून सर्व भाज्या एक एक करून २-३ मिनिटे परतून घ्याव्यात. 
  • वर सांगितलेला टोमाटो सॉस उकळत ठेवावा, त्यात परतलेल्या भाज्या, उकडलेला पास्ता, किसलेले चीज घालून व्यवथित एकत्र करून घ्या. 
  • वरून किसलेले चीज घालून गरमागरम वाढा आणि गरमागरम खा.  
सूचना:
  • भाज्या आवडत नसतील तर नाही वापरल्या तरी चालतील. नुसता सॉस व  चीज मधला पास्ता पण छान लागतो. 
  • भाज्यांच्या एवजी परतलेले चिकनचे तुकडे घातले की झाला चिकन पास्ता.         
  • पास्ता वेगवेगळ्या आकारात बाजारात उपलब्ध आहे.   











Friday, March 21, 2014

Ratale aani Gajarache Cutlet (रताळे आणि गाजराचे कटलेट)

रताळे आणि गाजराचे कटलेट खरच खूप छान लागत.  आपण नेहमी बटाटा वापरून कटलेट बनवत असतो, रताळे वापरल्याने एक वेगळी चव मिळते.



Read this recipe in English........ click here.


साहित्य:
रताळे - १ मोठे ( १ १/२ कप)
गाजरे, किसून - २  (१ कप)
हिरव्या मिरच्या- २ किंव्हा आवडीप्रमाणे
जीरे - १/२ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
गरम मसाला- १/२ टीस्पून
कॉर्न फ्लोअर- २ टीस्पून
कोथिंबीर, चिरून- मुठभर
मीठ- चवीप्रमाणे
बारीक रवा (वरून लावण्यासाठी)- आवश्यकतेनुसार
तेल (तळण्यासाठी )- आवश्यकतेनुसार

कृती:
रताळे स्वच्छ धुवून उकडून घ्या. साले काढून व किसून किंव्हा हाताने चुरून घ्या,
गाजरे किसून थोडी वाफऊन किंव्हा ३ मिनिटे मायक्रोवेव करून घ्या.  नंतर गरज असल्यास पिळून घ्या.
मिरच्या आणि जीरे खलबत्त्यात कुटून घ्या किंव्हा जाडसर वाटा.
रताळ, गजर, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, हळद, गरम मसाला, मीठ आणि  कॉर्न फ्लोअर सर्व एकत्र करून मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
रव्यात घोळवून त्याला कटलेटचा आकार द्या.
सोनेरी रंगावर शालो फ्राय करा.
गरमागरम कटलेट केचप किंव्हा चटणीसोबत वाढा.      

रताळे उपलब्ध नसेल तर बटाटा वापरला तरी चालेल. उपवासाला न चालणारे जिन्नस वगळून, कॉर्न फ्लोअर एवजी आरारोट वापरले कि मग हे कटलेट उपवासाला पण चालतील कि राव……