Friday, October 31, 2014

Sukat-Vang-Batata (सुकट वांग-बटाटा रस्सा )

लहानपनापासून सुकट मला आवडते. हि नुसतीच किंव्ह विविध भाज्यांसह व  विविध प्रकारे बनवता येते. एक प्रकार आज पाहू या.Read this recipe in English......click here.

साहित्य:
 • सुकट / सुका जवळा- १/२  कप
 • कांदा, बारीक चिरून- १ कप
 • लसूण, ठेचून - ८ पाकळ्या
 • वांगे- १ मध्यम
 • बटाटा - १ मध्यम
 • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ टिस्पून
 • हळद - १/२ टिस्पून
 • हिंग- १/४ टिस्पून
 • कोकम/आमसुलं - ३ ते ४ (कैरी किंव्हा आंबोशीचे तुकडे पण कोकमाऐवजी वापरी शकता)
 • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
 • तेल- ३  टेबलस्पून
 • मीठ- चवीनुसार 
कृती:
 • सुकट निवडून व्यवस्थित धुवा आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवून ठेवा आणि वापरण्यापूर्वी घट्ट दाबून पिळुन पाणी काढुन टाका.  
 • बटाटा सोलुन साधारण १ इंचाचे व वांग्याचे १. ५ इंचाचे तुकडे करा.
 • पॅनमध्ये किंव्हा छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण व कांदा घालून गुलाबी रंगावर परतावे.
 • त्यात हिंग, हळद घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मसाला व घट्ट दाबून पिळुन घेतलेली सुकट टाका आणि जर वेळ परता. 
 • त्यात वांगी, बटाटा, मीठ आणि कोकम टाका. 
 • ज्या प्रमाणात रस्सा हवा त्यानुसार थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करावे आणि कुकरच्या १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. बाहेर शिजवणार असाल तर बटाटा शिजल्यावरच कोकम टाकावे.  
 • हि भाजी वरून कोथंबीर घालून तांदूळ किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
 • जर हि सुकट कुकरमध्ये करणार नसाल तर वांग-बटाटा शिजत आल्यावरच कोकम किंव्हा इतर आंबट घाला. नाहीतर बटाटा शिजणार नाही.    
 • याच भाजीत शेवगाच्या/शेकाटाच्या शेंगा घाला, मस्त लागतात. कच्चे/हिरवे टोमॅटो पण यात छान लागतात.  
 • येथे मी सुकट वापरली आहे परंतु आम्ही अश्या प्रकारचा रस्सा सुकट, अंबाडीची सुकट, सोडे किंव्हा ताजी कोलंबी वापरून सुद्धा करतो.
 • सुकट वांगी, घेवडा, वाल पापडी, कांद्याची पात, बारीक मेथी इत्यादी भाज्या घालून केली जाते.


सुकट / सुका जवळा:

Thursday, October 30, 2014

Jambhalya Kobicha Paratha (जांभळ्या कोबीचा पराठा)

मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी करावा लागणारा हा प्रकार …… 


Read this recipe in English......click here.

साहित्य:
 • गहू पीठ- साधारण ३ कप  
 • जांभळा कोबी, बारीक चिरून किंवा किसून- २ कप (१ लहान आकाराचा कोबी) 
 • कांदा, बारीक चिरून- १ मध्यम 
 • हळद- १/४  टिस्पून 
 • हिंग- १/४  टिस्पून 
 • धणे पूड- १ टिस्पून 
 • तिळ- १ टिस्पून 
 • ओवा, खरडून- दिड टिस्पून 
 • जीरे - १ टिस्पून 
 • आले- 2 "तुकडा 
 • हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (आपल्या चवीनुसार) 
 • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
 • मीठ- चवीनुसार 
 • तेल किंवा बटर- २ टिस्पून + भाजण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती: 
 • पाणी न घालता आले, हिरव्या मिरची आणि जिरे भरड वाटावे. 
 • परातीमध्ये कोबी, कांदा, आलं-मिरच्याचा ठेचा, कोथिंबीर, धणेपूड, हळद, हिंग आणि मीठ एकत्र. हाताने चुरून चांगले मिक्स करावे आणि ५ मिनीटे तसेच राहू द्यावे. मुरून पाणी सुटते.   
 • त्यात गव्हाचे पीठ, तिळ, ओवा घालावे आणि मिक्स करावे.  
 • त्यात २ टिस्पून गरम तेल (मोहन) टाका. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालुन मळून घ्यावे. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. 
 • कणकेचे लहान गोळे करा.    
 • प्लास्टिकच्या कागदावर लाटा. लाटण्यासाठी प्लास्टिक कागद वापरल्याने जास्तीचे पीठ न वापरता पराठा लाटता येतो त्यामुळे भाजताना कमी तेल लागते. 
 • नॉन-स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. भाजताना कडेने थोडे थोडे तेल किंव्हा बटर सोडा. 
 • गरम गरम पराठा टोमॅटो केचप किंवा दही किंवा कोणत्याही लोणचे/चटणी बरोबर सर्व्ह करा. 

Wednesday, October 29, 2014

Kolambi Bhat (कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव)

कोकणातील पारंपारिक, लोकप्रिय आणि अत्यंत रुचकर असा हा भात……… 


Read this recipe in English..........click here. 

साहित्य:
सोललेल्या कोलंब्या- १ कप
बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)- २ कप
कांदा, उभा चिरून- २ मध्यम
टोमॅटो, चिरून- २ मोठे
आलं-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
घरगुती मसाला / मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून किंव्हा (२ टीस्पून लाल तिखट + १ टीस्पून गरम मसाला)
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लिंबू रस- १ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
साजुक तूप- १ टेबलस्पून
शहाजिरे - १ टीस्पून
तमालपत्र- ३
बाद्यान/चाक्रीफुल- २
मसाला वेलची- २
काळीमिरी- ८
लवंग- ५
दालचिनी- २ इंचाचा तुकडा
नारळाचे दुध- १ कप
गरम पाणी- ३ कप
कोथिंबीर- १/४ कप
तळलेला कांदा-१ कप (ऐच्छिक)


कृती:
 • कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास मुरत ठेवावी. 
 • तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा.  
 • पातेल्यात तेल गरम करा. अख्खे/खडे  मसाले फोडणीला घाला. 
 • त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
 • कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा. 
 • मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता. 
 • तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला. 
 • एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला. 
 • हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.
 • तळलेला कांदा व कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करा.

टीप : 
 • मोठ्या कोलंबी पेक्षा लहान कोलंबी या भातात चांगली लागते. 
 • नारळाचे दुध नसेल तर पूर्ण पाणी वापरले तरी चालेल. (म्हणजे २ कप तांदूळ = ४ कप पाणी)   


Tuesday, October 28, 2014

Malwani kolambi Rassa (मालवणी कोलंबी रस्सा)

अतिशय रुचकर …………बस एवढंच वर्णन पुरेसं आहे. बाकीच आपल्या जीभेवर सोपवा.


Read this recipe in English......click here.

साहित्य:
 • सोललेली कोळंबी, मध्यम आकाराची- १/२ कप
 • बटाटा- १ मध्यम  (ऐच्छिक)
 • कांदा, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम.)
 • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण - ३ ते ४ टेबलस्पून
 • आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
 • हळद - १/२ टिस्पून
 • हिंग-१/४  टिस्पून
 • दालचिनी- १ इंच
 • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ ते ४ टिस्पून
 • गरम मसाला - १ टिस्पून
 • कोकम/ आमसुलं- ४ ते ५
 • तेल- ३ टेबलस्पून
 • कोथिंबीर, बारीक चिरलेली- २ टेबलस्पून
 • पाणी- आवश्यकतेनुसार
 • मीठ- चवीनुसार

कृती:
 • कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ व हळद चोळून अर्धा तास मुरत ठेवावी. 
 • बटाटे सोलून साधारण १ इंचाचे तुकडे करावेत. 
 • मोठ्या पॅनमधे किंवा कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा, दालचिनी घालून तपकिरी रंगावर परतावे.
 • हिंग, हळद व मसाला, आले-लसुण पेस्ट आणि खोबऱ्याचे वाटण घालावे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतावा.
 • त्यात कोळंबी घालून एक मिनिट परतून घ्यावी.
 • पाणी, बटाटा घालून चांगले मिक्स करावे व झाकण ठेऊन मंद आचेवर ५-६ मिनीटे शिजवावे.
 • तुम्हाला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणे पाणी घालावे व गरज असल्यास मीठ घालावे. ४ ते ५ मिनिटे किंवा बटाटा शिजेपर्यंत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे.
 • कोकम, गरम मसाला, कोथिंबीर टाकून हलकेच ढवळा आणि झाकून ठेवा.  गॅस बंद करा.
 • पोळ्या किंवा भाकरी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा.

टिपा:
 • मालवणी मसाला नसेल तर, त्याऐवजी आपण (२ टिस्पून लाल तिखट + १ टिस्पून गरम मसाला) वापरू शकता. पण अस्सल मालवणी चवीसाठी नमूद केलेला गरम मसालाच वापरा.   
 • कोकम ऐवजी २ टिस्पून चिंचेचा कोळ वापरू शकता.
 • तुम्हाला आवडत नसेल तर बटाटा नाही घातला तरी चालेल. 
 • आमच्या कोकणात वांगी, कच्चा पपई, आलकोल/नवलकोल, दुधी भोपळा इ. भाज्या सुद्धा या रश्यात घातल्या जातात.  

Tomato Omelette (टोमॅटो ऑम्लेट)

चटकदार आणि झटपट होणारा पदार्थ.……. 


साहित्य:
 • टोमॅटो, चिरून- ४ मोठे 
 • बेसन- १ कप 
 • तांदूळ पिठ- २ टेबलस्पून 
 • हिरव्या मिरच्या, चिरून- ३
 • लसूण पाकळ्या- ६
 • जिरे पूड- १/२ टीस्पून 
 • हिंग- १/४ टीस्पून 
 • हळद- १/२ टीस्पून 
 • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून 
 • मिरपूड - १/४ टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार
 • कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप 
 • तेल- आवश्यकतेनुसार तळण्यासाठी 
 • बटर, टोमॅटो केचप, पुदीना चटणी - आवश्यकतेनुसार
 • ब्रेड स्लाइस- ६

कृती:
 • टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र मिक्सरमध्ये वाटा. पाणी वापरण्याची गरज नाही. पण गरज असल्यास, अगदी थोडेसे पाणी वापरा. 
 • या टोमॅटो रसात दोन्ही पीठे, हिंग, हळद, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड आणि मीठ घालून चांगले ढवळून मिक्स करावे. गुठळ्या राहू देवू नयेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
 • नॉनस्टीक तव्याला तेल लावून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस कमी करून एक डावभर मिश्रण तव्यावर घालून डावेनेच गोलाकार पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू भाजून खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू भाजावी. 
 • टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. (मुंबईला टोमॅटो ऑम्लेटबरोबर बटर लावलेला स्लाईस ब्रेड देतात, छान लागतो.)

Friday, October 24, 2014

Shevaya Kheer (शेवयांची खीर)

करायला अतिशय सोप्पी आणि खायला अतिशय रुचकर ………. शेवयांची खीरRead this recipe in English...click here. 

साहित्य :
जाड शेवया- १ कप
साजुक तूप- १ टेबलस्पून
पाणी- १/२  कप
सायीसह दुध- १ १/२ ते २ कप
साखर-  ५ ते ६ टेबलस्पून (किंव्हा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
वेलची पूड- १/२  टीस्पून
केशर- चिमूटभर (ऐच्छिक)
बदाम- ६
काजू- ६
मनुका/बेदाणे- २ टेबलस्पून

कृती :
बदाम आणि काजूचे काप करा किंवा बारीक तुकडे करा.
एका नॉन-स्टिक किंव्हा जड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात शेवया घालून परताव्या. 
शेवयांना छान सोनेरी तांबूस रंग यायला लागल्यावर त्यात बदाम-काजूचे कप व पाणी घालून झाकून मंद आचेवर २ मिनिटे शिजवावे. (आपण पाण्याऐवजी दूध वापरू शकता, मी पण पूर्ण दूधच वापरते.)
शेवया शिजल्यावर मग साखर घालावी.
व्यवस्थित ढवळुन त्यात केशर व दूध घालावे. दुधाला छान उकळी येऊ द्यावी.
वेलची पूड आणि बेदाणे घालुन व्यवस्थित ढवळुन अगदी मिनिटभर मंद आचेवर शिजवा.
खीर जर जास्त दाटली आवश्यकतेनुसार दूध वाढवावे. पण या शेवयांची खीर थोडी दाटसरच चांगली लागते.
गॅस बंद करून शेवया झाकून ठेवा.
बदामाचे काप आणि केशर घालून गरम किंवा थंड सर्व्ह करावी.


Wednesday, October 22, 2014

Double Cheese Spinach Bread Roll (डबल चीज आणि पालक ब्रेड रोल)

साहित्य:
उभा कापलेला पालक -२ कप 
उकडलेले मक्याचे दाणे- १ टेबलस्पून 
मोझ्झेरेल्ला चीज- १ कप 
प्रोस्सेड चीज- १/२ कप 
बारीक चिरलेला लसुन- ६ पाकळ्या 
ओरेगनो- १ टीस्पून
काळी मिरी पूड- १ टीस्पून 
मीठ चवीप्रमाणे 
ऑलिव तेल किंव्हा  बटर - २ टीस्पून 
तेल (तळण्यासाठी)- आवश्यकतेनुसार 
ब्रेड स्लाइस -आवश्यकतेनुसार 

कृती :
एका पँन  मध्ये ऑलिव  तेल गरम करून त्यात लसूण  जरासा परता. त्यात कापलेला पालकमक्याचे दाणेओरेगनोमिरपूड आणि मीठ टाका. ३ ते ४ मिनिट परता. थंड झाल्यावर त्यात दोन्ही चीज घालून व्यवस्थित एकत्र करा.
ब्रेडच्या कडा काढून टाका. एक स्लाइस पाण्यात किंव्हा दुधात बुडून लगेच हातावर घेऊन दाबा. त्यात तयार केलेले सारण  भरून त्याला रोलचा आकार द्या. अशाप्रकारे सर्व रोल करून घ्या.
गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढा. चटणी आणि केचप बरोबर गरमागरम खा.Wednesday, October 15, 2014

Shankarpali (शंकरपाळी)

खुसखुशीत आणि करायला अगदी सोप्पी ………साहित्य :
 • मैदा- ५०० ग्रॅम 
 • बारीक रवा- १०० ग्रॅम (१ वाटी) 
 • दुध- १ कप (दीड वाटी) 
 • साखर- १ कप (सव्वा वाटी) 
 • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- अर्धा कप (१ वाटी) 
 • मीठ- चिमुटभर 
 • वनस्पती तूप किंव्हा रिफाइंड सनफ़्लॉवर तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती:
 • एका पातेल्यामध्ये रवा, दुध, साखर व तूप एकत्र करून गरम करण्यास ठेवावे. त्यात चिमुटभर मीठ घालावे. सतत हलवावे नाहीतर गुठळ्या होतील. या मिश्रणाला उकळी आली की गॅस बंद करावा. मिश्रण पेजेसारखे (खिरीसारखे) दिसेल. 
 • मैदा परातीत चाळून घ्यावा. मधे खड्डा करून वरील मिश्रण त्यात ओतावे. हळू हळू कणिक मळून घ्यावी. घट्ट कणिक मळावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर अगदी थोडेसे पाणी किंव्हा दुध शिंपडावे आणि मळून घ्यावे किंव्हा पाण्याच्या हाताने मळावी. 
 • कणिक तयार झाली की ती १-२ तास झाकून ठेवावी. त्यामुळे कणिक लाटण्यायोग्य सैल होते. 
 • आता ही कणिक पुन्हा थोडी मळून घ्यावी. मळण्यास फारच घट्ट वाटत असेल तर कणकेचे छोटे छोटे तुकडे करून फूड-प्रोसेसर मध्ये फिरवुन घ्यावेत. (आमच्याकडे पाट्यावर कुटून घेतात म्हणजे कणिक सैल होते.) 
 • मग या कणकेचे मोठे गोळे करून ते चपातीप्रमाणे जाडसर लाटून घ्यावेत. हि चपाती फार जाड नको आणि फार पातळही नको. लाटण्यासाठी वरून मैदा लावण्याची आवश्यकता नाही. 
 • कातण्याने किंवा सुरीने या लाटलेल्या पोळीचे चौकोनी तुकडे करावेत. या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घ्याव्यात. झालेल्या शंकरपाळ्या आणि कणिक फडक्याने झाकून ठेवावे. 
 • सगळ्या कणकेच्या शंकरपाळ्या तयार झाल्या की भरपूर तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडून सोनेरी रंगावर मंद ते मध्यम आचेवर तळून घ्याव्यात. प्रखर(मोठ्या) आचेवर तळल्या तर बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. त्यामुळे नंतर मऊ पडतात. 
 • जोडीला दुसरे कुणी असेल एकाने लाटाव्यात, एकाने तळाव्यात . 

Saturday, October 11, 2014

Sabudana Vada (साबुदाणा वडे)Read this recipe in English....click here.

साहित्य :
साबुदाणा- १ कप
पाणी (साबुदाणा भिजवायला)- अर्धा कप 
दाण्याचे कूट-  अर्धा कप
उकडलेले बटाटे- ३ मध्यम
जीरं-  २ टीस्पून
लाल मिरची पूड- दीड टीस्पून किंव्हा हिरवी मिरची, ठेचून- २ ते ३
मीठ- चवीनुसार
तळणीसाठी तेल- आवश्यकतेनुसार


कृती :
प्रथम साबुदाणा धुवून घ्यावा. साबुदाणा रात्रभर किंव्हा किमान ५ ते ६ तास भिजवावा.
बटाटा हाताने कुस्करून किंव्हा जाडसर किसून  घ्यावा.
भिजवलेला साबुदाणा, बटाटा, दाण्याचे कूट, जीरं, मीठ,  लाल मिरची पूड हे सर्व जिन्नस एकत्र करून मळून घ्यावे. 
हाताला थोडे पाणी लाऊन त्याचे चपटे वडे करून घ्यावेत.
तेल गरम करावे व वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
उपवासाच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत गरम गरम वाढावेत.

टीपा: 
तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर पाव कप  बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
मिश्रण फारच मऊ आणि चिकट झाले तर त्यात वरीचे किंव्हा साबुदाण्याचे किंव्हा राजगीरा पीठ घालावे.
यामध्ये काही ठिकाणी कुरकुरीतपणासाठी वरीचे तांदूळ घातले जातात. तुम्हाला आवडत असल्यास घालावेत.
  

Wednesday, October 8, 2014

Chakalya (भाजणीच्या चकल्या)

चक चक चकली काट्याने माकली, तुकडा मोडताच खमंग लागली ……….किती चकलीची कौतुके तशीच तिची चव………. सर्वांना आवडणारी चकली !
माझ्या आजीची हमखास यशस्वी होणारी सोप्पी पाककृती, याप्रमाणे केल्यामुळे गेली १०-१२ वर्ष माझ्या चकल्या छान होतात.  


Read this recipe in English.....click here.

चकलीची भाजणी तयार करण्यासाठी:

साहित्य:
 • जुना जाडा तांदूळ - १ किलो (जाडा तांदूळ वापरल्याने भाजणी फुलते व चिकट होते)
 • चणाडाळ - ५०० ग्रॅम
 • उडीद डाळ - ५० ग्रॅम
 • मुग डाळ - २०० ग्रॅम
 • साबुदाणे - १०० ग्रॅम
 • पोहे - १०० ग्रॅम
 • जीरे- २५ ग्रँम
 • धणे - २५ ग्रँम

कृती:
 • तांदूळ, डाळी व इतर साहित्य चाळून आणि निवडून घ्या.
 • तांदूळ धुवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावे. सुती कापड वर पसरुन सावली मध्ये दिवसभर खडखडीत वाळवा.
 • प्रत्येक डाळ वेगवेगळी (स्वतंत्रपणे) सोनेरी भुऱ्या रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावी. खमंग वास दरवळू लागला की झालं असे समजावे.  
 • तांदूळ सोनेरी भुऱ्या (पिवळट/फिक्कट तपकिरी) रंगावर मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावेत. एक  दाणा दाताखाली चावावा,  कुरकुरीत झाला म्हणजे तांदूळ व्यवथित भाजले गेलेत. 
 • पोहे  मंद-मध्यम आचेवर नकरपवता सोनेरी भुऱ्या रंगावर एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. भाजण्यापुर्वी पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास येतो.  
 • साबुदाणा मंद-मध्यम आचेवर नकरपवता खमंग भाजावा. साबुदाणा फुलतो म्हणजे झाला 
 • जिरे आणि धणे सुद्धा खमंग भाजून घ्यावेत.
 • सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले की गिरणीतून बारीक दळून आणावे.
 • चकल्या करताना प्रथम भाजणीचे पीठ चाळून घ्यावे.

आता मुख्य कृती पाहू या ….
एका वेळी खूप पीठ मळून घेऊ नका. पीठाची रया जाऊन चकल्या चांगल्या होत नाहीत.  थोड थोड पीठ मळून चकल्या बनवा. त्रास पण कमी होतो.

साहित्य:
 • भाजणी पीठ- २ कप
 • घरगुती मसाला किंवा लाल मिरची पूड - १ टेबलस्पून किंवा आवडीनुसार
 • तिळ - ३ टिस्पून
 • ओवा - १ टिस्पून (ऐच्छिक)
 • तेल (मोहन)- ३ टेबलस्पून
 • पाणी - अंदाजे १ कप (थोडे कमी-जास्त लागू शकते, पाण्याचे प्रमाण तांदळाच्या प्रतीवर तसेच तो नवा आहे कि जुना आहे यावर अवलंबून असते.)     
 • मीठ - १ टिस्पून किंवा चवीनुसार
 • तेल- तळण्यासाठी

कृती:
 • परातीत भाजणी, तिळ, ओवा, लाल तिखट आणि मीठ एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
 • लहान कढईत तेल गरम करावे. परातीतल्या पीठावर सगळीकडे गरम तेल (मोहन) घालावे. एकाच जागी घालू नये.
 • थोडे थोडे पाणी घेऊन कणिक भिजवावे. गरम पाणी वापरण्याची गरज नाही.
 • चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही.
 • सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. कागदाचे छोटे तुकडे करावेत. प्रत्येक तुकड्यावर एक-एक चकली पाडावी. म्हणजे चकली उचलायला आणि कढईत सोडायला सोप्पे जाते. 
 • चकली सोडायच्या आधी तेल चांगले गरम असावे. चकल्या तेलात सोडल्यावर गॅस कमी करावा व मध्यम आचेवर चकल्या सोनेरी रंगावर खमंग तळून घ्याव्यात. एकावेळी फक्त ३-४ घालाव्यात, गर्दी करू नये.
 • हळूहळू चकल्या रंग बदलून व बुडबूडे बंद होवून खाली बसू लागतील. म्हणजे चकल्या झाल्या.
 • कढईतून चकल्या काढल्यावर अधिकचे तेल शोषण्यासाठी कागदावर पसरवाव्यात.
 • थंड झाल्यावर हवाबंद डब्याच्या तळाशी आणि मधेमधे कागद पसरऊन घालुन त्यावर चकल्या ठेवाव्यात. म्हणजे अतिरिक्त तेल शोषले जाते.  

सूचना:
 • चकलीसाठी दोन प्रकारच्या चकत्या येतात. एक छोटा स्टार आणि मोठा स्टार. तर छोटा स्टारची चकती वापरावी, कारण त्यामुळे चकल्या हमखास खुसखुशीत होतात. तळायलाही वेळ कमी लागतो.     
 • प्रथम एक-दोन चकल्या करून तळून घ्याव्यात. चाखून पहाव्यात. म्हणजे चवीचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे तिखट, मीठ व जरूर असल्यास धने-जिरे पूड घालावी.     
 • चकल्या खूप लालसर तळू  नयेत. कारण त्या कढईतून काढल्यावर पण थोडावेळ गरम तेलामुळे शिजत राहतात आणि थोड्या वेळाने काळपट लाल दिसू लागतात.
 • चकल्या मध्यम आचेवरच तळाव्यात.
 • चकल्या मोठ्या आचेवर तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतील आणि बाहेरून करपतील. त्यामुळे त्या मऊ /वातड होतील आणि चवीला कडू लागतील.
 • चकल्या मंद आचेवर तळल्या तर त्या तेलकट आणि कडक होतात.
 • भाजणी बिघडली तर चकल्या बिघडतात. म्हणजे भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर चकल्या खुसखुशीत होत नाहीत आणि करपवले तर चकल्या कडवट लागतात.
 • चकलीचे पिठ प्रमाणापेक्षा नरम भिजवल्यास चकल्या  मऊ होतात अर्थातच त्या मळलेल्या पिठात थोडी भाजणी घालावी व त्या प्रमाणात तिखट-मीठ पण वाढवावे आणि पुन्हा मळून घ्यावे.
 • चकल्या पाडताना तुटत असल्यास, पिठ प्रमाणापेक्षा जास्त घट्ट झाले आहे पुन्हा पाण्याच्या हाताने मळून घ्यावे.
 • पिठात मोहन जास्त झाले तर चकल्या तेलात घातल्यावर फुटतात.
 • उकडीच्या चकल्या  खुसखुशीत आणि चटकदार होतात यात शंकाच नाही पण मी दिलेल्या या पाककृतीमुळे चकल्या खमंग होतातच आणि उकडीच्या चकलीप्रमाणे खूप तेल पित नाहीत म्हणजेच फार तेलकट नाहीत. शिवाय उकडीच्या चकल्यांचा व्याप पण फार असतो, या चकल्या त्यामानाने झटपट होतात. 
 • काही लोक डाळी आणि तांदुळ दोन्ही धुवून घेऊन वापरतात. पण आमच्याकडे डाळी आणि तांदुळ दोन्ही न धुता भाजले जातात. मात्र डाळी आणि तांदुळ स्वच्छ असायला हव्यात. थालीपीठाची भाजणी करताना कुठे आपण धान्य धुवून घेतो? 
 • तुम्ही तांदूळ धुवून वापरू शकता. तांदूळ सुकावताना सावलीतच सुकवावे. पंख्याखाली सुकवले तरी चालतील. तांदूळ धुतल्यावर चाळणीत किंवा रवळीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळले की सुती कपड्यावर वाळत घालावेत. खडखडीत सुकवावेत.    
 • तांदूळ आणि डाळी धुवुन घेणे गरजेचे असेल पण जागेची किंव्हा वेळेची कमतरता असेल तर त्यासाठी एक टीप आहे. एक स्वच्छ सुती कपडा घेऊन पाण्यात भिजवुन घटत पिळून घ्यावा. त्यावर क्रमाक्रमाने तांदूळ व डाळी चोळून पुसून घ्याव्यात. मात्र प्रत्येक जिन्नस चोळून पुसून झाल्यावर तो कपडा पाण्यातून आगळून पिळुन घ्यावा. नंतर पंख्याखाली धान्ये वाळवावीत आणि नंतर भाजावीत.            


काही लोकांना चकली दही किंव्हा लोण्यासोबत खायला आवडते. पण खर सांगू का, मला कशी आवडते ते. मला आवडते चहासोबत. मस्त कपभर गरमागरम चहा घ्यायचा, त्यात चकल्यांचे तुकडे टाकायचे आणि …… आणि काय गट्टम करायचे. आणि तो उरलेला मसालेदार चहा पण काय मस्त लागतो.  :)

Tuesday, October 7, 2014

Masala Dudh (मसाला दुध)

अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागरी किंव्हा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर येथे कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी "ज्येष्ठ अपत्य निरंजन" असते म्हणजेच ज्येष्ठ मुलाला/मुलीला या दिवशी ओवाळायचे असते.

महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते. असे मानले जाते की रात्री देवी लक्ष्मी घरोघरी येते आणि 'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागे आहे?' असे विचारून जे जागे आहेत त्यांना ती आशिर्वाद देते. म्हणूनच रात्री जागरण केले जाते. भजने आणि गाणी गात रात्र जगवायची असते पण हल्ली गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची वै.खेळ करत वेळ घालवला जातो. बटाटवडे आणि इतर चटकदार पदार्थांची मेजवानी सोबत असतेच. रात्री १२ वाजता मसाले दुधाचा देवाला नैवेद्य दाखून दुधाचे पातेले गच्चीवर नेउन त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसेल असे ठेऊन चंद्राची पूजा करून सगळ्यांना ते मसाला दुध वाटले जाते.

पण फक्त कोजागरी पौर्णिमेलाच मसाला दुध करावे असे नाही. सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू वै. सारखी इतर धार्मिक कार्ये असताना चहा-कॉफी किंवा शीतपेय इत्यादी ऐवजी मसाला दुध द्यावे. लहान मुल तसेच गर्भवती स्त्रियांसाठी मसाला दुधाचे सेवन करणे अतिशय उपयुक्त ठरते.
Read this recipe in English.........click here.साहित्य:
 • दूध - १ लिटर (शक्यतो म्हैशीचे दुध वापरा)
 • साखर - ५ ते ६ टेबलस्पून (किंवा आपल्या आवडीनुसार)
 • वेलची पूड- १ टिस्पून
 • जायफळ पूड - १ टिस्पून
 • बदाम - १५
 • पिस्ता - १५
 • काजू - ६
 • चारोळी - १ टिस्पून
 • केशर - १ टिस्पून
 • बदाम, पिस्ता व काजू यांच्या पातळ चकत्या - १ टिस्पून (सजावटीसाठी )


कृती:
 • बदाम, काजू आणि पिस्ता थोडे भाजून घ्यावेत. खलबत्त्यात किंव्हा मिक्सरवर भरडसर कुटावेत.
 • (एकदम बारीक पूड पण करू शकता पण मला असे तोंडात बारीक बारीक तुकडे आलेले आवडतात.)
 • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध, केशर, साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, चारोळी आणि कुटलेल्या सुकामेव्याची भरड एकत्र करा
 • सुमारे २० ते ३० मिनीटे मंद आचेवर दूध उकळा. मधेमधे नीट ढवळावे . दूध थोडे आटले पाहिजे
 • आपल्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व्ह करावे. पण सहसा गरमच प्यायले जाते.

Monday, October 6, 2014

Pudina Chutney (पुदिना चटणी)

आकर्षक रंगाची आणि एकदम चटकदार अशी हि पुदिना चटणी.


Read this recipe in English.........click here.

साहित्य:
पुदीना पाने- अर्धा कप
कोथिंबीर- पाव कप
कांदा, चिरून- पाव कप
हिरव्या मिरच्या - २ ते ३
जिरे- पाव टिस्पून
लिंबू रस- १ ते २ टीस्पून
मीठ किंवा सैंधव मीठ-  चवीनुसार
साखर- एक चिमूटभर
पाणी - आवश्यकतेप्रमाणे


कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र  करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. 
हि चटणी पराठा किंवा सँडविच किंवा तंदुरी पदार्थ किंव्हा कोणत्याही तळलेल्या पदार्थासोबत वाढावी. 

टीप:
आपण सँडविच करिता हि चटणी करत असाल तर चिमूटभर मिरपूड घालावी.
हि  चटणी घट्ट हवी असेल तर त्यात वाटतानाच ब्रेडची स्लाइस घालू शकता. जास्त प्रमाणात चटणी करित असताना, ही टीप तेथे उपयुक्त आहे.  (लिंकिंग रोड,मुंबई  येथील एका सँडविच वाल्याने मला हे गुपित सांगितले आहे.)
आपण या चटणी मध्ये अर्धा टोमॅटो टाकू शकता, अधिक चवदार होईल. 
आंबट करण्यासाठी त्यात अनारदाना पावडर किंवा आमचूर पावडर टाकू  शकता.
या चटणीत एक लसूण पाकळी टाकू शकता.


आपण या चटणी पासून पुदिनावाले आलू किंवा अरबी, पुदीना पुलाव, पुदीना पराठा करू शकता.

Wednesday, October 1, 2014

Chivada (पातळ पोह्यांचा चिवडा)

चिवडा हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय दिवाळी फराळ आहे. तो अनेक प्रकारे केला जातो, आज मी एक अत्यंत सोप्पी आणि पटकन होणाऱ्या चिवड्याची कृती देत आहे. 


साहित्य:
 • पातळ पोहे- ५०० ग्रॅम 
 • शेंगदाणे- अर्धा कप 
 • काजू तुकडा - पाव कप 
 • डाळ्या (पंढरपूरी डाळं) - पाव कप 
 • सुके खोबरे, पातळ काप करून- पाव कप 
 • मनुका (बेदाणे) - पाव कप 
 • लाल तिखट/मिरची पूड- २ टिस्पून 
 • कढीपत्ता- पाव कप 
 • हळद- १ टिस्पून 
 • हिंग (हळद) - ¼ टिस्पून 
 • खसखस- 2 टिस्पून (ऐच्छिक) 
 • तीळ- १ टेबलस्पून 
 • धणे पूड- १ टिस्पून 
 • जीरे- 2 टिस्पून 
 • मोहरी- १ टिस्पून 
 • तेल- १० ते १२ टेबलस्पून 
 • पिठी साखर- ३ टिस्पून 
 • मीठ- चवीनुसार 
 • पिवळी शेव- आवडीनुसार (ऐच्छिक) 

कृती:
 • पोहे हलक्या हाताने चाळून आणि निवडून घ्यावेत. 
 • कढीपत्ता धुवून, पुसून कोरडा करून घ्यावा. 
 • जाड बुडाच्या कढईत २-२ मुठी पोहे मंद आचेवर चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. पोहे चुरचुरीत झाले की नाही हे बघण्याकरता चिमटीभर पोहे हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे चुरचुरीत झाले असे समजावे.(किंव्हा २ दिवस चांगले कडक उन्हात वाळवले तरी चालतात.) 
 • भाजलेले पोहे वर्तमान पत्रावर पसरवून घ्या. 
 • त्यावर मिरचीपूड, धणे पूड, मीठ आणि पिठी साखर टाका आणि पोहे हलक्या हाताने हलवून चांगले मिक्स करा. 
 • मोठ्या आकाराचे पातेले घ्या. त्यात तेल गरम करावे. 
 • सर्वात आधी शेंगदाणे, काजू आणि खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तळून झाले की झाऱ्याने काढून भाजलेल्या पोह्यावरच पसरून टाकावेत. 
 • आता त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी. त्यात कढीपत्ता घालावा आणि तळून कुरकुरीत होऊ द्यावा. 
 • नंतर त्यात जिरे, तिळ, खसखस, डाळं, मनुका घालून परतावे. 
 • आता गॅस बारीक करून हळद, हिंग घालून चमच्याने मिक्स करावे. 
 • आता सर्व तळलेल्या साहित्यासह भाजलेले पोहे पातेल्यात घालावे आणि नाजूक हाताने पटापट ढवळावे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते. 
 • हळूहळू सर्व साहित्य छान मिक्स होऊन पोह्याचा रंग बदलेल आणि पोहे खमंग होतील. त्यावेळी गॅस बंद करा. (नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद केल्यावर ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून ठेवणे. 
 • थंड झाल्यावर अतिशय खरपूस असा चिवडा तयार. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. 

टिपा:
 • पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास चिवड्याला येतो. तसेच प्रत्येक वेळी भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती स्वच्छ पुसून घेऊनच दुसरे पोहे भाजावेत. 
 • मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरच्या वापरू शकता. कढीपत्त्यासोबत फोडणीत टाका आणि कुरकुरीत तळून घ्या. 
 • लसूण, मिरची, कोथिंबीर एकत्र भरड वाटून घ्या. मिरची पावडर ऐवजी हा ठेचा वापरू शकता. मस्त चव येते. 
 • २ टिस्पून बडीशेप जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, एक वेगळाच स्वाद येतो. 
 • पाव टिस्पून लिंबू फुल (सायट्रिक ऍसिड) जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, थोडीशी आंबट चव येते. 
 • अंदाज चुकल्याने चिवडा खारट, तिखट किंव्हा तेलकट झालाच तर थोडे भणंग/कुरमुरे भाजून घालावेत.