Wednesday, April 26, 2017

कैरीची कढी / कैरीचे सार ( Kairichi Kadhi / Kairiche Sar)

महाराष्ट्रात कैरीची कढी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. हि आहे खास कोकणातील रेसिपी. कैरीचा आंबटपणा आणि नारळाच्या दुधाचे माधुर्य याच्या सुरेख मिश्रणाने या कढीला एक सुंदर अशी चव मिळते.



साहित्य:
  • कैरी, उकडून- १ माध्यम (कैरीचा गर साधारण १/२ कप होईल. कैरी आंबट असेल तर इतकाच पुरे आंबट नसेल तर जास्त घ्यावा. )
  • हिरवी मिरची- १ ते २
  • जीरे- १ टीस्पून
  • लसूण- १ ते २ पाकळ्या
  • आले- अर्धा इंच
  • तेल किंवा साजूक तूप- २ टेबलस्पून
  • हिंग- १/२  टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून (ऐच्छिक)
  • कढीपत्ता- १ डहाळी / ७-८ पाने
  • राई- १ टीस्पून
  • मेथी दाणे- १/४  टीस्पून  (ऐच्छिक)
  • लाल सुक्या मिरच्या, तुकडे करून- २ (मी ब्याडगी मिरची वापरते)
  • गुळ किंवा साखर- १ टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून

कृती:
  • कैरी उकडून साल आणि बाटा/कोय काढून तिचा गर बाहेर काढा. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्या. 
  • मिरच्या, आलं, लसूण आणि जीरे शक्यतो पाणी न वापरता किंवा जरासं पाणी घेऊन वाटून घ्या. 
  • कढईत तेल/तूप गरम करून राई टाका, राई तडतडली की त्यात मेथीदाणे, कढीपत्ता, लाल मिरच्यांचे तुकडे, हळद आणि हिंग घालून जरासं परता. 
  • नंतर त्यात वाटण घालून परता. जरा तेल सुटू लागलं कि त्यात कैरीचा गर टाकून थोडासा परतून घ्या.  
  • त्यात साधारण १ कप पाणी व गुळ  घाला व मिश्रणाला उकळी येऊ द्या. 
  • उकळी आली कि त्यात नारळाचे दूध घालून सतत हलवत रहा. गरज असल्यास पाणी घाला. 
  • मीठ घाला. फार उकळू नका नाहीतर नारळाचे दूध फाटते. बाजूनी थोडे बुडबुडे दिसले की गॅस बंद करा.  वरून कोथिंबीर टाका. 
  • मसालेभात, वालाच्या खिचडी सोबत उत्तम लागते. नाहीतर वाफाळलेला भात त्यावर साजूक तूप आणि वरून गरमागरम कैरीची कढी व या सोबत पापड..... नुसती कल्पना करू नका बनवून पहा.