Tuesday, January 6, 2015

Undhiyu (उंधियु)

उंधियु हिवाळ्यात केला जाणारा पारंपारिक गुजराती पदार्थ आहे. या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्यांची रेलचेल असते. उंधियु म्हणजे बर्‍याच भाज्यांचे मिश्रण. उंधियुची एक खासियत म्हणजे प्रत्येक भाजीची विशिष्ट चव आपल्याला चाखता येते. कमी मसाले वापरले असल्यामुळे मसाल्याची तीव्र चव भाज्यांच्या चवीला मारत नाही तर त्यांना खुलवते. प्रत्येकाची कृति थोडीफार वेग़ळी असतेच. आमच्या शेजारच्या गुजराती काकुंकडून (सौ. भारती शहा) मी  उंधियु शिकले. मी यात थोडे बदल केले आहेत.




Read this recipe in English.......... click here.

वाढणी: ४
पूर्वतयारी:
# १   हिरवा मसाला करण्यासाठी:- 
साहित्य:
  • कोथिंबीर, चिरलेली- १/२ कप
  • लसूण-  १० पाकळ्या (हिरव्या लसणीची पात वापरली तरी चालेल)
  • हिरव्या मिरच्या- ५ ते ७ (आपल्याला झेपतील तश्या)
  • आले तुकडा- १ इंच 
  • दाण्याचा कुट - १/४  कप
  • तीळ- १  १/२  टेबलस्पून
  • ओले खोबरे, खवलेले- १  टेबलस्पून
  • साखर- १ टीस्पून 
  • लिंबू - १ 
  • मीठ - चवीनुसार 
कृती:
तीळ भाजून घ्यावेत.
लिंबाचा रस काढा.
हिरव्या मिरच्या, लसूण व आले हे एकत्र. पाणी न वापरता भरडसर ठेचावे किंव्हा वाटावे.
हा मिरची ठेचा व वर उल्लेख केलेल्या सर्व जिन्नस एकत्र करा.

# २ मेथी मुठीया  बनवण्यासाठी :-
साहित्य:
  • मेथी, चिरून- १ कप  
  • गव्हाचे पीठ /कणिक - १/२  कप (पीठ रवाळ असेल तर उत्तम)
  • बेसन - १/४  कप
  • ज्वारी किंवा तांदूळ पीठ- २ टेबलस्पून 
  • लाल मिरची पूड- १ टिस्पून
  • हळद- १/२ टिस्पून
  • धणे पूड - १/२ टिस्पून
  • हिंग- १/४  टिस्पून
  • तीळ- १ टिस्पून
  • लिंबाचा रस- अर्धा भाग लिंबापासून 
  • साखर- १  १/२ टिस्पून
  • मीठ - चवीनुसार 
  • खायचा सोडा-१/२  टिस्पून
  • तेल - १ टिस्पून
  • पाणी- १/४  कप
  • तेल तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 
कृती:
मेथी धुवून आणि कापून घ्यावी. तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करा. घट्ट कणिक मळा.
तेल टाकून पुन्हा मळा. छोटे लांबट गोळे बनवुन घ्या. टूथपिकने भोके पाडा. 
मंद- मध्यम आचेवर तळा, अन्यथा ते आत कच्चट राहतील. (तळलेले नको हवे असतील तर मुठिया वाफवू शकता.)

आता मुख्य पाककृतीकडे वळू या …उंधियु
साहित्य:
  • सुरती पापडी (वाल पापडी), चिरून - १ कप
  • सुरण, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कोनफळ, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • रताळे, छोटे तुकडे करून- १/२  कप
  • कच्चे केळे, तुकडे करून- १
  • लहान वांगी - २
  • छोटे बटाटे- ३ 
  • मटार - १/४  कप
  • तुरीचे दाणे - १/४ कप 
  • हळद- १ टिस्पून 
  • हिंग- १/२ टिस्पून
  • रजवाडी गरम मसाला- २ ते ३ टिस्पून 
  • ओवा- १/२ टिस्पून
  • तेल- ६ टेबलस्पून (मुठिया तळण्यासाठी जे तेल वापरले त्याच तेलाचा वापर करा, मेथीची चव त्यात उतरली असते) 
  • पिवळी शेव- सजावटीसाठी 
  • लिंबू- अर्धा भाग (सुरणाला चोळण्यासाठी) 


कृती:
  • सुरती पापडी धुवून घ्या, दोरे काढून तुकडे करा.
  • रताळ्याचे स्वच्छ धुवून छोटे चौकोनी तुकडे करा.
  • सुरणाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा. (सुरण खाजरा असतो म्हणून कापताना हाताला थोडेसे तेल चोळा तसेच खाताना घश्याला खाजू नये म्हणून त्यावर मीठ व लिंबाचा रस टाकून चोळून बाजूला १५ मिनीटे ठेवा, वापरायच्या वेळेला ते तुकडे धुवून घ्या.) 
  • कोनफळाची साले काढून छोटे चौकोनी तुकडे करा.  
  • बटाट्याची साले काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांग्याची देठे काढून अधिक च्या आकारात चिरा मारा. 
  • वांगी व बटाट्यात वर तयार केलेला हिरवा मसाला भरा.  
  • उर्वरित हिरवा मसाला सुरण, कोनफळ, रताळे, कच्चे केळे याला चोळा. 
  • हिरवा मसाला लावलेल्या ह्या भाज्या अर्धा तास मुरु द्या. 
  •  एका मोठ्या कढईत किंवा हंडी मध्ये तेल गरम करावे. 
  • ओवा, हिंग, हळद याची फोडणी करावी. त्यात बटाटे आणि वांगी टाकावी. परतून घ्यावे आणि थोडे पाणी शिंपडावे. झाकण ठेऊन मध्यम गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • केळी, सुरण, रताळे आणि कोनफळ चे तुकडे मसाल्यासकट टाकून परतावे. परतून आणि झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • सुरती पापडी, मटार, तुरीचे दाणे  आणि रजवाडी गरम मसाला टाकावा. छान एकत्र  करून परतून घ्यावे. 
  • थोडे पाणी शिंपडावे.   झाकण ठेऊन मंद गॅसवर ८-१० मिनीटे शिजू द्यावे. मधेमधे हलवत रहावे अन्यथा खालून करपेल. गरज असेल तसे थोडे-थोडे पाणी शिंपडावे.
  • भाज्या शिजल्या की  त्यात मुठीया घालाव्यात. हलक्या हाताने मिक्स करून झाकण ठेऊन मंद गॅसवर ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
  • वाढताना वरून शेव भुरभुरावी.  
  • गरमगरम  नाश्ता म्हणून नुसतेच किंवा चपाती/ पराठा सोबत भाजी म्हणून करावे.

टिपा:
  • अजुन तिखट करायचे असेल तर १ टीस्पून मिरची पावडर गरम मासाल्यासोबत भाजीत टाकावी. 
  • गुजराती लोक उंधियुमध्ये जरा जास्तच तेल वापरतात. पण मी जास्त तेल वापरलेले नाही.   
  • आवडत असल्यास गाजर, वाल, ओले हरभरे, शेवगाच्या शेंगा इत्यादी भाज्या वापरू शकता.  

उंधियु करण्यासाठी कामांचा क्रम :
  1. मेथी निवडा.
  2. सुरण सोलुन, कापुन त्यावर मीठ आणि लिंबाचा रस चोळा.
  3. मटार आणि तुरीच्या शेंगा सोला. वाल पापडी मोडून घ्या.  
  4. इतर सर्व भाज्या कापा.  
  5. हिरवा  मसाला तयार करून भाज्यांना लावा. 
  6. मुठीया तयार करून तळुन ठेवा.   
  7. आता मुख्य उंधियु करायला सुरुवात करा.  
हे कार्य नियोजन तुम्हाला घाईच्या वेळेला उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे. :)

1 comment:

  1. खुपच छान आणि सविसतरपणे रेसेपी दिलीत.

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.