चिवडा हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय दिवाळी फराळ आहे. तो अनेक प्रकारे केला जातो, आज मी एक अत्यंत सोप्पी आणि पटकन होणाऱ्या चिवड्याची कृती देत आहे. 
साहित्य:
- पातळ पोहे- ५०० ग्रॅम
 - शेंगदाणे- अर्धा कप
 - काजू तुकडा - पाव कप
 - डाळ्या (पंढरपूरी डाळं) - पाव कप
 - सुके खोबरे, पातळ काप करून- पाव कप
 - मनुका (बेदाणे) - पाव कप
 - लाल तिखट/मिरची पूड- २ टिस्पून
 - कढीपत्ता- पाव कप
 - हळद- १ टिस्पून
 - हिंग (हळद) - ¼ टिस्पून
 - खसखस- 2 टिस्पून (ऐच्छिक)
 - तीळ- १ टेबलस्पून
 - धणे पूड- १ टिस्पून
 - जीरे- 2 टिस्पून
 - मोहरी- १ टिस्पून
 - तेल- १० ते १२ टेबलस्पून
 - पिठी साखर- ३ टिस्पून
 - मीठ- चवीनुसार
 - पिवळी शेव- आवडीनुसार (ऐच्छिक)
 
कृती:
- पोहे हलक्या हाताने चाळून आणि निवडून घ्यावेत.
 - कढीपत्ता धुवून, पुसून कोरडा करून घ्यावा.
 - जाड बुडाच्या कढईत २-२ मुठी पोहे मंद आचेवर चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्यावेत. पोहे चुरचुरीत झाले की नाही हे बघण्याकरता चिमटीभर पोहे हाताने मोडून बघावेत. त्याचा चुरा झाला की पोहे चुरचुरीत झाले असे समजावे.(किंव्हा २ दिवस चांगले कडक उन्हात वाळवले तरी चालतात.)
 - भाजलेले पोहे वर्तमान पत्रावर पसरवून घ्या.
 - त्यावर मिरचीपूड, धणे पूड, मीठ आणि पिठी साखर टाका आणि पोहे हलक्या हाताने हलवून चांगले मिक्स करा.
 - मोठ्या आकाराचे पातेले घ्या. त्यात तेल गरम करावे.
 - सर्वात आधी शेंगदाणे, काजू आणि खोबऱ्याचे काप तळून घ्यावेत. तळून झाले की झाऱ्याने काढून भाजलेल्या पोह्यावरच पसरून टाकावेत.
 - आता त्याच तेलात मोहोरी घालून तडतडू द्यावी. त्यात कढीपत्ता घालावा आणि तळून कुरकुरीत होऊ द्यावा.
 - नंतर त्यात जिरे, तिळ, खसखस, डाळं, मनुका घालून परतावे.
 - आता गॅस बारीक करून हळद, हिंग घालून चमच्याने मिक्स करावे.
 - आता सर्व तळलेल्या साहित्यासह भाजलेले पोहे पातेल्यात घालावे आणि नाजूक हाताने पटापट ढवळावे. पटापट ढवळणे अशासाठी की फोडणी गरम असताना सर्व पोह्यांना समान तेल-तिखट-मीठ लागते.
 - हळूहळू सर्व साहित्य छान मिक्स होऊन पोह्याचा रंग बदलेल आणि पोहे खमंग होतील. त्यावेळी गॅस बंद करा. (नंतर चिवड्याची चव बघून जे काय कमी असेल त्याप्रमाणे ते घालून (तिखट, मीठ) लगेच पटापट ढवळणे. नंतर गॅस बंद केल्यावर ५ -१० मिनिटांनी परत एकदा ढवळून त्यावर वर्तमान पत्राचा कागद झाकण म्हणून ठेवणे.
 - थंड झाल्यावर अतिशय खरपूस असा चिवडा तयार. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
 
टिपा:
- पोहे चाळून घ्यावेत म्हणजे भूसा राहणार नाही. पोह्यांचा भूसा भाजताना पटकन जळतो व त्यामुळे जळका वास चिवड्याला येतो. तसेच प्रत्येक वेळी भाजून झाले की कढईतील पोहे काढल्यावर ती स्वच्छ पुसून घेऊनच दुसरे पोहे भाजावेत.
 - मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरच्या वापरू शकता. कढीपत्त्यासोबत फोडणीत टाका आणि कुरकुरीत तळून घ्या.
 - लसूण, मिरची, कोथिंबीर एकत्र भरड वाटून घ्या. मिरची पावडर ऐवजी हा ठेचा वापरू शकता. मस्त चव येते.
 - २ टिस्पून बडीशेप जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, एक वेगळाच स्वाद येतो.
 - पाव टिस्पून लिंबू फुल (सायट्रिक ऍसिड) जीऱ्यासोबत फोडणीला घालू शकता, थोडीशी आंबट चव येते.
 - अंदाज चुकल्याने चिवडा खारट, तिखट किंव्हा तेलकट झालाच तर थोडे भणंग/कुरमुरे भाजून घालावेत.
 

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.