Monday, March 10, 2014

खव्याची पोळी

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला  अप्रतिम लागते.  करायलाही खूप सोप्पी. पेढे-बर्फी उरली आहे का?…… मग त्यापासूनही करता येण्यासारखी.     



Read this recipe in English........... click here. 


साहित्य :
  • तांदूळ पीठ  किंव्हा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी 
  • साजूक तूप-  आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी 
पोळीसाठी :
  • गहू पीठ (कणिक)-  १ कप 
  • मैदा- १/२ कप 
  • बारीक रवा- १/४ कप 
  • तेल (मोहन)- १/४ कप 
  • मीठ- १/४ टीस्पून 
  • पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप 
सारणासाठी :
  • खवा- १ कप (२०० ग्रॅम )
  • खसखस- १ टेबलस्पून  
  • पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप 
  • जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून 
  • कणिक- १/४ कप 
  • साजूक तूप- १ टीस्पून  
  • दुध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )

कृती :
  • कणिक, मैदा, रवा, मीठ एकत्र करावे व कडकडीत मोहन घालून कणिक दोन तास भिजवून ठेवावी. कणिक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.   
  • खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी. 
  • पिठीसाखारेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.  
  • कणिक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी.  दुसऱ्या बाउल मध्ये काढून ठेवावी.  
  • खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा. खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा. 
  • खवा, भाजलेली कणिक, पिठीसाखर, खसखस कुट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण  खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.   
  • सारणाचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • कणकेचे सुद्धा लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करावेत. 
  • हाताला तूप लाऊन कणकेचा एक गोल घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे. 
  • तांदळाच्या पीठावर  नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. 
  • पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अश्या प्रकारे  सर्व पोळ्या करून घ्याव्यात. 
  • गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी. 
टीप: 
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल.  फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दुध आणि चवीप्रमाणे पिठी साखर टाकून छान मळून घ्या.। सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.   

2 comments:

  1. Khavyachya polyanmadhe pithi sakhar kadhi vaprayachi?

    ReplyDelete
    Replies
    1. चूक लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी चूक दुरुस्त केली आहे. रेसिपी पुन्हा वाचा.

      Delete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.