रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Read this recipe in English.........click here.
साहित्य:
- खवलेलं खोबरं- १ कप (कपात खोबरं जेवढे दाबून भरता येईल तेवढे भरावे )
- साखर- १ कप
- साईसकट दुध- १/२ कप
- वेलची पावडर- १/२ टीस्पून
- साजुक तूप- १ टेबलस्पून + १ टीस्पून
कृती:
- नारळ खवताना शेवटपर्यंत खवू नये. फक्त पांढर खोबरच वापरावे.
- ताटाला तूप चोळून ठेवावे नंतर घाई होते.
- नॉन स्टिक किंव्हा जाड बुडाच्या एका मोठ्या कढईत तूप गरम करावे.
- त्यात खवलेलं खोबरं,साखर आणि दुध एकत्र करून मध्यम आचेवर परतावे. सतत ढवळावे नाहीतर खाली लागेल.
- प्रथम साखर वितळेल आणि मिश्रण पातळ होईल पण नंतर मिश्रण घट्ट होऊ लागेल.
- त्यात वेलचीपूड घाला आणि परतत रहा. थोड्यावेळानी कढईच्या कडेने मिश्रण सुटू लागेल व कोरडं पडायला लागेल. याचा अर्थ मिश्रण तयार झाले. (मिश्रण जास्तीवेळ शिजले तर वड्या पडणार नाहीत आणि गार झाल्यावर मिश्रणाचा चुरा होईल.)
- मिश्रण गॅसवरून उतरावे व तूप लावलेल्या ताटात सर्वत्र सारखे पसरावे.
- ते गरम असतानाच सुरीने वड्या पाडा. गार झाल्यावर वड्या काढून घ्या.
- हवाबंद डब्यात ठेवा. लवकर संपवून टाका त्या फार काळ बाहेर टिकत नाहीत. ८ दिवसापेक्षा जास्त ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात. (पण फ्रीझमध्ये वड्यांची चव बदलते.)
वैविध्य:
- वरील दुधात चिमुटभर केसर टाकला तर छान रंग आणि स्वाद येईल. (आमच्या गावी दुकानात जो नारळीपाक मिळतो त्यात ते लोक केशरी रंग वापरतात.)
- दुधाऐवजी १०० ग्रॅम खवा किंव्हा अर्धा डबा कण्डेन्स्ड मिल्क वापरले तर वड्या बर्फीसारख्या लागतात.
- दुधाऐवजी टोमाटोचा घट्ट रस वापरला तर वड्यांना छान आंबट-गोड चव व रंग येतो.
- दुधाऐवजी आंबा रस वापरला कि झाल्या आंबा-खोबरे वड्या.
- वड्यांमध्ये गाजराचा किंव्हा बीटाचा कीस वापरता येतो. कसे ते पाहायचे आहे का? मग माझी "बीट -खोबऱ्याच्या वड्या" हि रेसिपी वाचा. (रेसिपी वाचण्यासाठी रेसिपीच्या नावावर क्लिक करा.)
खूपच सुरेख ब्लॉग.. आप जियो हजार साल..!
ReplyDelete-- तात्या..
खूप खूप धन्यवाद !
Delete