नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे नेहमी एकाच दिवशी असतं. नारळी पौर्णिमा आली की प्रथम आठवतो तो नारळी भात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात या दिवशी समुदात नारळ अर्पण करून पावसामुळे खवळलेल्या समुदास शांत करतात. कारण नारळ म्हणजे की शीत, सर्वांना शांत करणारा. नारळाचं दूध शरीरास खूप थंड असतं. काही वेळेला नारळीभात एक गोड पदार्थ जेवणात असावा म्हणून पण बनवला जातो.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
टीपा:
दुसरी पद्दत:-
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- जुना तांदूळ (बासमती तुकडा किंवा आंबेमोहर) - १ कप
- पाणी- २+ १/४ कप (तांदूळ नवा असेल तर पाणी कमी वापरा.)
- साजूक तूप- ३ ते ४ टेबलस्पून
- लवंगा- ४
- वेलची पूड- १/२ टीस्पून
- जायफळ पूड- १/२ टीस्पून
- गूळ, किसलेला- ३/४ कप ते १ कप
- ओले खोबरे, खोवलेले- २ कप (१ मोठा नारळ)
- काजू, तुकडे करून- १/४ कप
- मनुका/बेदाणे (पिवळे किंवा काळे) - २ टेबलस्पून
- केशर- चिमुटभर (ऐच्छिक)
- मीठ- चिमुटभर
कृती:
- तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत अर्धा ते एक तास निथळत ठेवावेत.
- पातेल्यात २ टेबलस्पून तूप गरम करून लवंगा घालून काही सेकंद परता.
- निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परता.
- तांदूळ परतत असतानाच दुसर्या गॅसवर पाणी गरम करत ठेवा.
- गरम पाणी परतलेल्या तांदूळावर घाला. मीठ घालून ढवळून घ्या.
- पातेल्यावर झाकण ठेवून भात शिजवावा. भात शिजला की हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
- भात शिजत असताना खोबरे, वेलची-जायफळ पूड आणि गूळ एकत्र करावे. हलक्या हाताने चुरून घ्यावे.
- परतीतील भात कोमट असतानाच खोबऱ्याचे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
- नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या कढईत/भांड्यात तूप गरम करून काजू सोनेरी रंगावर तळून घ्यावे. मनुका टाकून जराश्या परताव्यात.
- लगेच आच मंद करून त्यात भात घाला. झाकण ठेवून साधारण १० ते १५ मिनीटे शिजवा. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. भांड्याखाली तवा ठेवल्यास करपण्याची भीती राहत नाही. आणि हळूहळू शिजल्यामुळे गुळ भातात चांगला मुरतो.
- सुरूवातीला भात पातळ होईल आणि काही वेळाने आळू लागेल.
- भात आळला की गॅस बंद करावा. झाकण ठेवून १५ मिनिटे तसाच ठेवावा. भात खुप कोरडा करू नये. थोडा आसट/ मऊ भात चांगला लागतो. फडफडीत/मोकळा भात चांगला लागत नाही.
टीपा:
- मी भात करताना केमिकल विरहित नॅचरल गुळ वापरला आहे. हा गुळ गडद तपकिरी असतो. म्हणून भाताला तपकिरी रंग आला आहे. तुम्ही नेहमीचा पिवळा गुळ वापरू शकता.
- तुम्हाला जसे गोड आवडते त्या प्रमाणात गूळाचे प्रमाण पाऊण कप ते १ कप ठेवा.
- तांदूळ पूर्णपणे शिजला पाहिजे. अन्यथा भात जर कमी शिजला असेल तर गुळ टाकल्यावर परतला तरी नंतर शिजत नाही.
- भात आळला की नंतर शिजवू नये . भातातल्या गुळाचा पाक नंतर घट्ट होवू लागतो. त्यामुळे भात कडकडीत होतो.
- गुळाऐवजी तेवढीच साखर वापरू शकता. किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरा.
- विशेष करून साखर वापरल्यास भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो. चिमुटभर केशरी रंग टाकला तरी चालेल.
दुसरी पद्दत:-
- एका मोठ्या नारळाचे दुध काढावे. (२ कप दुध हवे, तेवढे नसल्यास थोडे पाणी वाढवावे.)
- तांदूळ धुऊन निथळत ठेवून द्यावेत.
- नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा, काजू परतून घ्यावेत.
- त्यातच तांदूळ टाकून थोडेसे परतवून घ्यावेत.
- त्यावर नारळाचं दूध व मीठ टाकून हलवावं.
- मंद गॅसवर भात शिजू द्यावा.
- भात पूर्ण शिजल्यावर त्यात किसलेला गूळ, केशर, मनुका, वेलची-जायफळ पूड टाकून मंद गॅसवर ठेवून मिश्रण हलवत राहावं.
- गूळ विरघळल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी.
- भात आळला कि गॅस बंद करावा.
nice receips thanks
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete