दिवाळीत तर करायलाच पाहिजेत असे बेसन लाडू ...........पण लांबच्या प्रवासात सोबत न्यायला सुद्धा उत्तम.
Read this recipe in English....... click here.
साहित्य:
- चणाडाळ - ५०० ग्रॅम
- साजूक तूप- २५० मिली
- पिठी साखर - ३५० ते ३७५ ग्रॅम (आवडीप्रमाणे थोडी कमी-जास्त वापरावी.)
- वेलचीपूड- २ टीस्पून
- बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे- आवडीनुसार (साधारण अर्धा कप)
कृती:
- डाळ अगदी २-३ मिनिट जराशी गरम करावी. (दमटपणा घालवण्यासाठी डाळ नुसती गरम करायची आहे, भाजायची नाही. सणसणीत उन्हात तापवली तरी चालेल.)
- गिरणीतून दळून आणावी.
- बेसन तूपामध्ये मंद ते मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे. भाजताना सारखे ढवळत राहावे. नाहीतर खालून करपेल. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि काही वेळाने पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये. मंद ते मध्यम आचेवरच भाजावे, नाहीतर नुसता रंगच बदलेल पण बेसन कच्चेच राहील.
- बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. (पिवळ्या रंगाचे लाडू कच्चट लागतात.)
- बेसन पूर्ण गार होवू द्यावे.
- पिठीसाखर चाळून आणि गुठळी मोडून घ्यावी.
- नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार पिठीसाखर घालावी. पिठीसाखर एकदम न घालता चव घेत थोडी-थोडी अंदाजाने टाकत जावी. आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे थोडी कमी-जास्त करावी.
- नीट एकत्र मळून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.
- साजूक वापरल्याने लाडू फार चविष्ट होतात पण मऊ होतात, ठेवले कि एकमेकांना चिकटतात. वाढतेवेळी पुन्हा वळून द्यावेत.
सुचना:
- जेव्हा तुम्ही साजूक तूप वापरता , तेव्हा २५० ग्रॅम मधले साधारण अर्धी वाटी बाजूला काढून ठेवावे. कारण लाडू जास्त मऊ होतात.
- बाजारात मिळणारे साजूक तूप बहुधा २५० मिली म्हणजे २२६ ग्रॅम असते. तेवढे सगळे तूप वापरले तरी चालेल.
- पण वनस्पती तूप (डालडा) वापरणार असाल तर पूर्ण २५० ग्रॅम वापरावे. पण शक्यतो साजूक तुपच वापरावे. लाडू चविष्ट होतात आणि तोंडात विरघळतात.
- किंव्हा १०० ग्रॅम डालडा + १५० ग्रॅम साजूक तूप असे प्रमाण घ्यावे.
- कधीही भाजलेले बेसन गरम असताना त्यात पिठी साखर घालू नये. आणि एकदा का बेसन मध्ये पिठी साखर घातली की ते मिश्रण कधीही गरम करू नये. यामुळे पिठी साखरेचे गोळे/गुठळ्या तयार होऊन लाडू बिघडतात.
- घाई नसेल तर आदल्या दिवशी बेसन भाजून आणि पिठी साखर वै. टाकून मळून ठेवावे. दुसऱ्या दिवशी मिश्रण थोडे चाखून बघावे. गोड कमी असेल तर अजून पिठी साखर लाडू वळावे. यामागचे कारण असे की बेसनात साखर मुरते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लाडू अगोड लागतात. साखरेचे प्रमाण अगदी योग्य हवे असेल तर लाडू दुसऱ्या वळावेत.
शेवटी काय तर …. संयम आणि तासंतास न कंटाळता, सावधपणे बेसन भाजणे यातच चविष्ट बेसन लाडूचे गुपित दडले आहे.
Lovely guidlines!!!
ReplyDelete