Friday, September 18, 2015

Rushichi Bhaji (ऋषीची भाजी) ~ ऋषि पंचमीची भाजी

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी.
पण हि आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरायच्या. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत अजिबात तेल-तूप वापरले जात नाही. शिवाय या भाजीत मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत, तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली हि भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचे कारण म्हणजे सेंद्रीय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव.

ऋषी पंचमीचे व्रत किंवा उपवास हा आपल्या सप्तर्षींचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणाऱ्या फळ, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एकप्रकारे तत्कालीन ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक मिळते. शरीरा सोबत आत्म्याची शुद्धता करण्याचे असे हे ऋषी पंचमीचे व्रत आहे. पण हे व्रत फक्त स्त्रियाच करतात, हे काही माझ्या मनाला पटलेले नाही.

माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण एकदम लहानपणी भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि हळूहळू हि भाजी आवडू लागली. बरेच जणांना एरवी ज्या भाज्या अजिबात आवडत नाहीत त्या भाज्या घातलेली 'ऋषीची भाजी' मात्र आवडते. मीही त्याला अपवाद नाही. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.

Read this recipe in English........click here.


हि भाजी कोकणतल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी येथे आमची पद्धत देते ​​आहे.

साहित्य:
  • अळूची पाने आणि देठे, सोलुन आणि चिरून- 1 कप
  • लाल भोपळा, सोलुन आणि कापून- ½ कप 
  • माठ, चिरून- ½ कप 
  • कुरडूस, (रानातली पालेभाजी), चिरून- ½ कप (ऐच्छिक)
  • सुरण, सोलुन आणि कापून- ¼ कप (ऐच्छिक)
  • भेंडी, चिरून- ¼ कप
  • श्रावण घेवडा, चिरून- ¼ कप
  • गवार, चिरून- ¼ कप
  • पडवळ, चिरून- ¼ कप
  • शिराळे, सोलुन आणि चिरून- ¼ कप
  • घोसाळे, चिरून- ¼ कप
  • हिरव्या मिरच्या, चिरून- 3 ते 5 किंवा वैयक्तिक आवडीनुसार
  • चिंचेचा कोळ - ½ ते 1 टिस्पून किंवा चवीनुसार
  • खवलेले ओले खोबरे- ¼ कप ते ½ कप /आवडीनुसार
  • खडे मीठ- चवीनुसार

कृती:
  • अळू, कुरडूस आणि माठ स्वच्छ धुवून बारीक चिरा. 
  • अळूचे देठ सोलून घ्या आणि बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुवून टाका. 
  • लाल भोपळ्याची सालं काढून त्यांचे छोटे तुकडे करा. 
  • सुरणाची सालं काढून त्याचे अगदी छोटे तुकडे करून चिंचेचा कोळ चोळून ठेवा. 
  • शिराळ्याची सालं काढून त्यांचे तुकडे करा. 
  • भेंडी आणि घोसाळे चिरून घ्या. 
  • पडवळाचेही आतल्या बिया काढून तुकडे करा.
  • गवार व घेवडा शीरा काढून मोडून घ्या. 
  • सर्व भाज्या धुवून घ्या. 
  • मिरच्यांचे तुकडे करा. तिखट आवडत असेल तर ठेचा करा. 
  • एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मिरच्या आणि मीठ असं सर्व एकत्र करा. 
  • पातेल्यावर स्टीलचे ताट ठेवून पाणी ठेवा. मध्यम ते मंद आचेवर भाजी शिजवा. भाजीत जास्तीचे पाणी टाकू नका. शिजताना भाजीला पाणी सुटते. त्यातच भाजी शिजते. वरून पाणी टाकले तर भाजी पांचट लागते.     
  • मधून मधून ढवळत रहा. पण जोरजोराने ढवळू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल. शिजायला कठीण असणाऱ्या भाज्या बोटाने दाबून बघा. त्या शिजल्या कि भाजी शिजली. 
  • आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि ओले खोबरे घालून एक वाफ काढा. 
  • गरम गरम भाकरी किंवा भातासोबत सोबत वाढा. 

टिपा:
  • ऋषी पंचमीच्या ३-४ दिवस आधी या खास ऋषीच्या भाज्या बाजारात येऊ लागतात.
  • माझ्या माहेरी घरच्या अंगणात उगवणाऱ्या सर्व भाज्या या भाजीसाठी वापरतात, अगदी टोमॅटो सुद्धा.
  • तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी इथे भाज्यांचे प्रमाण दिले आहे. पण प्रत्यक्षात तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या प्रमाणात त्या भाज्यांचे प्रमाण कमी-जास्त करावे. 
  • उपलब्धेनुसार वर उल्लेख केलेल्या एक किंवा अधिक भाज्या वगळू शकता. किंवा दुसऱ्या भाज्या वाढवू शकता. 
  • माझ्या सासूबाई भाजी शिजली की वरून थोडेसे घरचे लोणी घालतात. 
  • भोपळा आणि ओले खोबरे या भाजीला गोडवा देतात.
  • रताळे, पांढरा गावरान मका, काकडी, कच्ची केळी, दुधी भोपळा सारख्या इतर पावसाळी/ हंगामी भाज्या पण वापरू शकता. 
  • मका वापरणार असाल तर आधी प्रेशर कुकर मध्ये मीठ टाकून उकडून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करून भाजीत घाला.
  • ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदुळ मिळतात ते सुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदुळाला 'पायनु' असं म्हणतात.    
  • या ताटात दिसणाऱ्या चटणीत फक्त ओले खोबरे आणि मिरची आहे.

3 comments:

  1. मी वाटच बघत होते मराठीतून या पाककृतीची :-)

    ReplyDelete
  2. ऋषि पंचमी ची भाजी फ़क्त ऐकून माहित होती पण इथे कृति मिळाली, ती मी नक्की करून घरात सर्वाना खायला देणार त्याबद्दल खूप खूप आभार।

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.