Saturday, November 1, 2014

Tandul Ghavane (झटपट घावणे)

"घावणे" आमच्या कोकणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किव्हा जेवताना सुद्धा खाल्ले जातात. घावणे दोन प्रकारे केली जातात. रात्री तांदुळ भिजवुन सकाळी वाटुन त्याचे घावणे बनवायचे किंव्हा पुढे देत असलेल्या कृतीप्रमाणे तांदुळ पिठापासून झटपट घावणे बनवायचे.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे, फार बारीक दळू नये ) 
  • पाणी- १+ १/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे) 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंव्हा साजूक तूप - आवश्यकतेनुसार 

सूचना :
  • जाडा तांदूळ धुवून सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ, हलके आणि पांढरे शुभ्र होतील शिवाय बिघडण्याची शक्यता कमी होईल.
  • घावण्यासाठी पीठ ताजेच हव, जुन्या, रया गेलेल्या पीठाचे घावणे करताना तुटतात. 

कृती:
  • पीठ, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे. सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
  • नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील/तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. 
  • कडेने थोडेसे तेल सोडावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे. घावण डोश्यासारखे कुरकूरीत बनवू नका. 
  • गरम गरम घावणे नारळाची चटणी किंवा पिवळी सुकी बटाटा भाजीबरोबर मस्त लागतात. थंड झाले तरी चांगले लागतात. आम्ही नाश्ता मध्ये गूळ आणि तूपासोबत पण हे घावणे खातो. 
  • जेवणामध्ये मटण किंवा चिकन रश्यासोबत वाढतात. तसेच काळा वाटाणा किंव्हा चण्याच्या रश्यासोबत पण वाढतात. खरतरं हे कुठल्याही भाजीसोबत चांगले लागतात. 

टीपा:
  • चिमुटभर मेथी पूड टाकली तरी चालते, चांगली चव येते. 
  • ताक आणि मिरची घालून याचेच रुपांतर धिरड्यात होते. 

गोड पदार्थासाठी वापर: 
  • आमच्याकडे गणपतीत गौरी-शंकराला "घावण- घाटले" म्हणजेच  "घावणे- गुळवणी" याचा नैवेद्य दाखवला जातो. 
  • घाटले/ गुळवणी हे गूळ आणि नारळाचे दूध पासून बनवले जाते. बासुंदी सारखे दिसते. याची पाककृती मी नंतर देईन. 
  • उकडीच्या मोदकासाठी जसा आपण चव/सारण बनवतो, तो चव गरम घावण्यावर पसरून त्याची घडी घातली जाते. असे घावणे सुद्धा नैवेद्यात गोड पदार्थ म्हणून ठेवले जातात. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावणे बनवतात तेव्हा वरील जे प्रमाण दिले आहे त्यात १ टेबलस्पून गुळ टाकू शकता. त्यामुळे घावणे गोडसर लागतील. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावाने बनवतात तेव्हा तेलाऐवजी तूप आणि पाण्याऐवजी दुध किंव्हा नारळाचे दुध वापरले तर घावाने अजून रुचकर लागतील. 

2 comments:

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.