Sunday, July 21, 2013

पापलेटचे कालवण (रत्नागिरी पद्धतीचे )

माझ्या आजीचे गाव "हर्णे", रत्नागिरीतील एक समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण.  माझी आई बरचस माझ्या आजीच्या पद्धतीच जेवण बनवते. माझ्याही  जेवण करण्याच्या पद्धतीवर या दोघींची छाप पडली आहेच.
आजीच्या पद्धतीने केलेले हे कालवण मला फार आवडतं. हे कालवण मालवणी आणि गोवन करी पेक्षा वेगळ आणि करायला फारच सोप्प आहे.



Read this recipe in English .....click here.

साहित्य:
  • पापलेटचे तुकडे- ५ ते ६ (दुसरे मासे वापरले तरी चालतील जसे हलवा, घोळ, सुरमई, रावस)
  • खोवलेलं ओलं खोबर- ३/४ ते १ कप (ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे)
  • लसुण  पाकळ्या- ८ ते १० (कृपया या कालवणासाठी 'आले' अजिबात वापरू नये)
  • धणे - १/२ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४  टीस्पून
  • घरगुती मसाला / मालवणी मसाला / संडे मसाला - २ ते ४ टीस्पून (किंवा तुमच्या आवडीप्रमाणे)
  • कोकम पाकळ्या- ४ ते ५  किंव्हा चिंचेचा घट्ट कोळ - १ टीस्पून (पण आम्ही कोकमच वापरतो)
  • बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या, दोन भाग करून - २ ते ३
  • मीठ चवीप्रमाणे
  • तेल- ४ टेबलस्पून
  • पाणी- आवश्यकतेनुसार

कृती:
  • एका पॅनमध्ये  स्वच्छ  धुतलेले पापलेटचे तुकडे, हळद, हिंग, मसाला, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, कोकम, मीठ आणि तेल घ्या.  सर्व मसाला एकत्र करा आणि हलक्या हाताने माश्यावर चोळा. १५  ते २० मिनिटे मसाल्यात चांगले मुरु द्या.
  • खोवलेल खोबर, लसुण, धणे आणि जरुरीनुसार पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटा. (कृपया या कालवणासाठी 'आले' अजिबात वापरू नये, खरी चव मिळणार नाही. कोकणी पद्धतीच्या कुठल्याही माश्यांच्या कालवणासाठी आले वापरत नाहीत अपवाद फक्त कोलंबी आणि खेकडे.)  
  • फ्रीझर मधले खोबरे असल्यास वाटणासाठी गरम पाणी वापरा. नाहीतर चव आणि टेक्चर बदलते. 
  • हे खोबऱ्याचे  वाटण आणि जरुरीनुसार पाणी घालावे.  (ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे.) व्यवस्थित एकत्र करा.
  • झाकण लाऊन मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवा.
  • जास्त शिजऊ  नका. जोरजोराने ढवळू नका. माश्याचे तुकडे मोडतात. हलक्या हाताने वाढा.
  • गरमागरम भातासोबत किंव्हा तांदळाच्या भाकरी सोबत वाढा.



5 comments:

  1. फार छान जर अशा छान रेसिपी चे पुस्तक मिळाले तर खुप छान होईल तसे कळवा !

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद. सध्या तरी पुस्तक काढायचा विचार नाही. आणि ब्लॉग हा एक प्रकारचे इ-पुस्तकच असते.

      Delete
    2. छान धन्यवाद

      Delete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.