Tuesday, September 2, 2014

Jayfal Muramba /Jam (जायफळाचा मुरंबा /जॅम)

आमच्याकडे चौल-अलिबाग व मुरुड भागात खूप जायफळ पिकतात. हि जायफळाची फळे चवीला आंबट असतात. त्यामुळे आमच्याकडे त्याचे लोणचे करण्याची पद्धत आहे. एकदा माझ्या सासूबाईंनी विचार केला की मुरंबा पण बनवून पाहावा. लगोलग कृती करण्यात आली आणि सादर करत आहे हि जायफळे वापरून बनवलेला मुरंबा......आंबट-गोड चवीचा मुरंबा मस्त लागतो आणि जायफळाचा वासही येतो. या मुरंब्याला सुंदर लालसर रंग येतो.


Read recipe in English, click here.

जायफळाच्या फळाची ओळख:
हि आहेत जायफळाची फळे. मधोमध कापून घेतले असता त्यातून बी निघते. बी वरील लाल आवरण म्हणजे जायपत्री. बीचे काळे कडक आवरण फोडले असता त्यातून जायफळ निघते. हि जी पांढरट फळे दिसत आहेत त्यापासूनच मुरंबा आणि लोणचे बनवतात. पावसाळ्यात हि फळे येऊन लागतात. 
   
साहित्य:

  • कच्च्या जायफळाची फळे  - ६
  • साखर- अंदाजे ५०० ग्रॅम (जेवढा कीस, तेवढीच साखर घ्यावी)  
  • लवंगा- ५

कृती:

  • जायफळ धुवून आणि कोरडी करून घ्यावीत. मध्ये चीर देऊन त्यातील आतील बी व जायपत्री काढावी. बाहेरील फळाचा भाग किसून घ्यावा.
  • एका जाड बुडाच्या किंव्हा नॉन-स्टिक भांड्यात जायफळाचा कीस, साखर आणि लवंगा एकत्र करून मध्यम आचेवर शिजवावे.
  • सतत ढवळावे अन्यथा करपण्याची शक्यता असते. थोड्या वेळाने साखर वितळू लागेल. साधारण अर्ध्या तासाने पाक घट्ट होऊ लागेल.
  • गॅस बंद करून मुरंबा थंड होऊ द्यावा. काचेच्या कोरड्या व स्वच्छ बरणीत मुरंबा भरावा.
  • चपाती किंव्हा ब्रेड बरोबर छान लागतो.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.