Wednesday, July 30, 2014

Takatali Patal Palebhaji (ताकातली पातळ पालेभाजी)

नेहमी नेहमी एकाच प्रकारच्या पालेभाज्या करून आणि खाऊन कंटाळा येतो. ही आजी करायची तशी पारंपारिक पण विस्मृतीत गेलेली एक पाककृती. गुळमट पंजाबी पालक-पनीर पेक्षा खूप जास्त चविष्ट आणि खमंग भाजी. ही भाजी केली तर वरण/आमटीची पण गरज नाही. काही लोक अश्या प्रकारे केलेल्या पालकाच्या भाजीलाच "पालकची कढी" अस म्हणतात. 


Read this recipe in English......click here.

साहित्य :
  • पालक/ चाकवत/ मेथी - १ जुडी (मी इथे पालक वापरला आहे. ) 
  • ताक- २ कप (साधारण ३ वाट्या) 
  • शेंगदाणे- १/४ कप 
  • चणा डाळ- १ टेबलस्पून 
  • बेसन- २ टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्या, चिरून - २ ते ४ आवडीप्रमाणे 
  • तूप किंव्हा तेल- २ टेबलस्पून 
  • जीरे- १/२ टीस्पून 
  • हळद- १/४ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • लाल सुकी मिरची, तोडून - २ (मी इथे ५ छोट्या बोर मिरच्या वापरल्या आहेत.) 
  • साखर- चिमुटभर 
  • मीठ- चवीप्रमाणे 

कृती :
  • शेंगदाणे व चणाडाळ धुऊन २-3 तास भिजवून ठेवावी. 
  • पालेभाजी निट निवडून स्वच्छ धुवून चिरावी. 
  • कुकरच्या भांड्यात पालेभाजी, चिरलेल्या मिरच्या व थोडे पाणी चालावे. त्याच भांड्यामध्ये एक वाडग्यात डाळ व शेंगदाणे थोडे पाणी घालून ठेवावेत. भाजी शिजून घ्यावी. (समजा डाळ व दाणे शिजले नसतील तर पुन्हा शिजून घ्यावेत. कारण कच्चे राहण्याची शक्यता असते.) 
  • शिजवलेली पालेभाजी डावाने चांगली घोटून घ्यावी, बेसन घालून पुन्हा घोटावी. 
  • थोडे पाणी घालून ढवळून भाजी उकळायला ठेवावी , एक उकळ आली की ताक, साखर व मीठ घालून ढवळावे. उकळी येईपर्यंत ढवळत राहावे, नाहीतर ताक फुटते. 
  • भाजीला उकळी यायला लागली की कढल्यात किंवा छोट्या पॅनमध्ये फोडणीसाठी तूप/तेल घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात जीरे, लाल मिरच्या, हळद व हिंग घालावे, नंतर शिजवलेले (पाणी निथळून घेऊन) शेंगदाणे व डाळ फोडणीमध्ये घालून परतावे. (जर थोडे कच्चे राहिले असतील तर त्यात शिजवावे.)  
  • हि फोडणी उकळत्या भाजीत ओतावी व भाजीवर लगेच झाकण ठेवावे. गॅस बंद करावा. 
  • थोड्यावेळाने भाजी ढवळून घ्यावी. चपाती किंव्हा वाफळत्या भातासोबत झक्कास लागते. 

सुचना :
  • भाजी उकळेपर्यंत ढवळल्याने ताक फुटत नाही. 
  • ताक वापरायचे नसेल तर चिंचेचा कोळ घालावा, पण मग साखरेऐवजी गुळ घालावा. बेसन २ टेबलस्पून ऐवजी ४ टेबलस्पून वापरले तर भाजी दाटसर होते. अश्या भाजीत थोडा गोडा मसाला घालावा व हिरव्या मिरची ऐवजी लाल तिखट वापरले तरी चालते. एक गुपित सांगू अशी बेसन घातलेल्या भाजीवर नुसत्या लाल केलेल्या लसणाची आणि हिंगाची फोडणी पण झक्कास लागते. आहाहा नुसत्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं. 
  • भाजीत ताक व बेसन न घालता साधे वरण घालून पण पातळ भाजी करता येईल. 

3 comments:

  1. Me ya prakare ch palaka che varan banavte. Chirlela palak, turi chi daal ani chinch ekatra karun shikavun ghyave. Tyala ghotun ghyave ravi ne. Ani mag telat jira,mohri, barik chirlela kanda, mirchya, hing ghalun ghotlele varan fodni karave. Mast lagte..pan jara tikhat ch bare vatte. So mirchya jast ghalavyat.

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.