Saturday, August 22, 2015

South Indian Tomato Chutney (दक्षिण भारतीय पद्धतीची टोमॅटो चटणी)

टोमॅटो चटणी आंबट -तिखट, मस्त चटकदार लागते. हि चटणी इडली, डोसा किंवा अगदी पराठ्याबरोबर पण मस्त लागते.



Read this recipe in English........click here. 


साहित्य:
  • टोमॅटो, चिरून- ३ मध्यम 
  • कांदा, चिरून- १/४ कप किंवा १ लहान 
  • तेल- १ टेबलस्पून
  • चणाडाळ- १ टिस्पून
  • उडीद डाळ- १ टिस्पून
  • सुक्या लाल मिरच्या (ब्याडगी), तोडून- २ ते ३
  • हिरवी मिरची, चिरून- १
  • आले, चिरून-, १/४  इंच
  • ओला नारळ, खवुन- २ टेबलस्पून किंवा भाजलेले शेंगदाणे- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • साखर- चिमूटभर (ऐच्छिक)
  • हिंग- १/४  टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
फोडणीसाठी:
  • तेल- १ टेबलस्पून
  • मोहरी- १  १/२  टीस्पून
  • सुकी लाल मिरची (ब्याडगी), तोडून- १
  • कढीपत्ता- ७-८ पाने 
  • हिंग- चिमूटभर

कृती:
  • एका नॉन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दोन्ही डाळी मंद आचेवर लालसर रंगावर परता.  
  • त्यात हिंग, लाल मिरच्या आणि जरासं परता.
  • त्यात आले, हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून १मिनिटभर परता.  
  • त्यात टोमॅटो आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. झाकण लावून टोमॅटो मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावे. करपू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहावे.  
  • आता त्यात साखर आणि खोबरं घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
  • मिश्रण पूर्णपणे थंड होवू द्या आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्सरला वाटून घ्या. वाटण्यासाठी पाणी वापरायची गरज नाही. एका वाडग्यात चटणी काढा.
  • कढल्यात/ फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहोरी टाका.
  • मोहरी तडतडल्यावर गॅस कमी करून त्यात लाल मिरची, कढीपत्ता घाला आणि काही सेकंद परता.
  • त्यात हिंग घाला आणि लगेच गॅस बंद करा. लगेचच चटणीवर फोडणी ओता, जरा वेळ झाकून ठेवा. 
  • वाढताना छान मिक्स करा आणि इडली, डोसा किंवा मेदूवडा, डाळवड्यासोबत सर्व्ह करा.
  • २-३ दिवस फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात घालुन ठेवू शकता.

टिपा:
  • ओले खोबरे आणि साखर हे चटणीच्या मुळ कृती मध्ये नाही.  पण मी ते माझ्या मनाने वापरले आहेत. त्यामुळे चटणीला जरासा गोडवा येतो व तिची चव वाढते. खोबरे किंवा शेंगदाणे वापरल्यामुळे चटणी एकजीव होते. आवडत नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास नाही वापरले तरी चालेल.
  • ब्याडगी मिरची फारशी तिखट नसते पण रंगला छान असते. ब्याडगी मिरची ऐवजी काश्मिरी मिरची वापरू शकता.
  • चटणी जास्त तिखट हवी असेल तर, टोमॅटो परतताना त्यात थोडेसे लाल तिखट घालावे. सुक्या मिरच्या उपलब्ध नसतील तर ३ सुक्या मिरची ऐवजी १ टीस्पून लाल तिखट/मिरची पूड वापरली तरी चालेल.  

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.