शेकटाच्या शेंगा यायला लागल्या की दर दोन दिवासाआड हि आमटी आमच्याकडे होतेच. घाई आहे किंव्हा कधी जेवण करायला वेळ नाहीये अश्यावेळी नुसती आमटी केली, पापड भाजला की आणखी काही नको. हि आमटी शाकाहारी किंव्हा मासांहारी मेनू बरोबर उत्तम. म्हणजे नुसती भेंड्याची भाजी परतली किंव्हा एखादी पालेभाजी केली आणि हि आमटी कि झाल जेवण. कांद्यातली सुकट केली किंव्हा कोलंबी परतली किंव्हा नुसता अंड्याचा पोळा केला की जेवण तयार. या आमटीमध्ये भाज्या वापरल्यामुळे थोडक्यात सुद्धा पूर्ण आहार होतो. अशी हि आमची "कोकणी" लोकांची आवडती शेंगांची आमटी ……
Read this recipe in English...........click here.
साहित्य:
कृती:
सूचना व वैविधता:
Read this recipe in English...........click here.
साहित्य:
- तूरडाळ किंव्हा मुगडाळ - १/२ कप
- शेवग्याच्या शेंगा- ३ ते ४
- बटाटा- १ मध्यम (ऐच्छिक )
- वांगे - १ मध्यम (ऐच्छिक )
- टोमाटो, चिरून - १ मध्यम
- कांदा, चिरून- २ टेबलस्पून (ऐच्छिक, मी कधीतरीच वापरते)
- लसूण, ठेचून - ७ ते ८ पाकळ्या
- तेल- ३ ते ४ टेबलस्पून
- राई- १ टीस्पून
- जीरे- १ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- मेथी दाणे- ५ (ऐच्छिक )
- कढीपत्ता- १ डहाळी (१०-१२ पाने)
- घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून (जर हा मसाला तुमच्याकडे नसेल तर, "सूचना" मध्ये वाचा.)
- गोडा मसाला- १ १/२ टीस्पून
- गूळ, किसून- १ टेबलस्पून
- कोथिंबीर, बारीक चिरून- १/४ कप किंव्हा मुठभर
- मीठ- चवीनुसार
कृती:
- तूरडाळ किमान २-३ तास धुवून भिजत ठेवावी.
- शेंगा सोलून त्याचे साधारण ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. शेंगा जाड असतील तर मधून चीर द्यावी.
- बटाटा सोलून त्याचे साधारण १ इंचाचे तुकडे करून घ्यावेत.
- वांग्याचे जर मोठेच तुकडे ठेवावे. (शेंगा आणि बटाट्याच्या मानाने वांगे जरा लवकर शिजते.)
- कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. (डाळ पूर्ण शिजायला हवी. प्रत्येकाने आपल्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या घ्याव्यात. )
- पातेल्यात तेल गरम करावे. त्यात राई टाकावी, तडतडली की लसूण टाकून जर परतावा. नंतर कढीपत्ता, जीरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. लगेचच त्यात कांदा व मसाला घालून काही सेकंद परतावे.
- त्यात शेंगांचे तुकडे, बटाटे, वांगे आणि थोडे पाणी घालावे. या भाज्यांपुरते मीठ घालावे. (अंदाज असेल तर पूर्ण आमटीचे मीठ एकदाच चालेल.) झाकणावर पाणी ठेऊन भाज्या ७-८ मिनिटे मंद आचेवर शिजू द्याव्यात.
- नंतर त्यात टोमाटो, कोथिंबीर घालून पुन्हा थोडावेळ शिजू द्यावे.
- या दरम्यान, कुकर उघडून डाळ रवीने घोटून घ्यावी.
- तोपर्यंत बटाटे, शेंगा शिजतील. त्यात घोटलेली तूरडाळ, गुळ व गोडा मसाला घालावा. गरजेनुसार पाणी घालावे. (हि आमटी फार घट्ट चांगली लागत नाही. मी थोडी पातळच करते. माझ्या मुलीला तर ती सुप प्रमाणे प्यायला आवडते.) गरज असल्यास मीठ घालावे.
- पातेल्यावर झाकण ठेऊन मध्यम आचेवर आमटीला उकळ येईपर्यंत शिजवावे.
- ही आमटी भाताबरोबर वाढावी. चपातीसोबत पण छान लागते.
सूचना व वैविधता:
- तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर साधारण १ १/२ टीस्पून मिरची पूड आणि सोबत गोडा मसाला जरा जास्त म्हणजे २-३ टीस्पून घाला.
- टोमाटो ऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे कैरी, चिंच, कोकम किंव्हा आंबोशी ( वाळवलेल्या कैरीच्या फोडी) असं काही वापरलं तरी चालेल.
- तूरडाळीची आमटी चविष्ट लागते. पण काहींना तुरडाळ सोसत नाही. अर्धी तुरडाळ आणि अर्धी मुगडाळ घेतली तरी चालेल.
- आमटी नुसत्या शेंगा घालून केली तरी चालेल. पण वांग-बटाटा मस्त लागत. निदान बटाटा तरी घालावा.
- या प्रकारच्या आमटीत शेंगांसोबत किंव्हा शेंगांशिवाय दुधी, लाल भोपळा, घोसाळे इत्यादी भाज्या सुद्धा वापरता येतील.
- कोकणात या आमटीत वरून खवलेले ओले खोबरे घालायची पद्धत आहे. मला आमटीत खोबर घातलेलं नाही आवडतं. पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर वापरा.
- मी आमटी शिजतानाच कोथिंबीर घालते त्यामुळे आमटीला छान वास आणि चव येते. तुम्ही हव तर वरून पण घालू शकता.
- कोकणातल्या शेंगा देशावरच्या शेंगाप्रमाणे जाड नसतात त्यामुळे लवकर शिजतात. जर शेंगा फार जाड असतील तर आधी थोड्या शेंगा शिजऊन घेऊन नंतर वंग-बटाटा घाला.
very nice and thanks
ReplyDelete