Saturday, September 5, 2015

Gopalkala (गोपाळकाला)

जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

खरतरं 'गोपाळकाला' चे दोन अर्थ आहेत. एक आपला उत्साहाने भरलेला सण 'गोविंदा' किंवा 'दहीहंडी' आणि दुसरा म्हणजे जन्माष्टमीला आपल्या लाडक्या बाळकृष्णाला नैवेद्य दाखवून बाळगोपाळांना प्रसाद म्हणून वाटला जातो तो गोपाळकाला .

गोपाळकाला करायला अतिशय सोपा आणि झटपट. शिवाय पौष्टिक आणि रुचकर, पूर्णान्न आहे. फक्त प्रसाद म्हणून न करता इतर दिवशीही संध्याकाळचा हेल्दी नाश्ता म्हणून पण मस्त. 


Read this recipe in English.....click here. 

साहित्य:
  • दही - १ कप
  • पोहे - १ कप
  • लाह्या- एक मूठभर 
  • ओले खोबरे, खवलेले- २ टेबलस्पून 
  • काकडी, चिरून- १ कप
  • डाळिंब दाणे- १/४  कप
  • हिरव्या मिरच्या, चिरून किंवा ठेचून- १ टे 
  • आले, किसून- १/२  चमचा
  • शेंगदाणे, भाजून सोललेले- १/४  कप 
  • तळलेली चणा डाळ किंवा पंढरपूरी डाळं - १/४  कप 
  • मीठ- चवीनुसार 
  • साखर- १ टीस्पून 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- १/४  कप
  • साजुक तुप- १ टीस्पून 
  • जिरे- १ टीस्पून 

कृती:
  • पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा.  
  • दह्यात साखर आणि थोडेसे मीठ घालून ढवळा.
  • एका मोठ्या वाडग्यात दही, पोहे आणि लाह्या एकत्र करा. ५ मिनिटे भिजू द्या.
  • तेवढ्या वेळात कढल्यात/फोडणी पात्रात तूप गरम करून त्यात जिरे, हिरव्या मिरच्या घाला आणि जरासं परता.
  • हि फोडणी पोहे-दही मिश्रणावर ओता आणि चांगले मिक्स करा.
  • खोबरे, काकडी, डाळिंबाचे दाणे, आले, शेंगदाणे, मसाला चणाडाळ, कोथिंबीर आणि थोडे मीठ घाला. व्यवथित मिक्स करा.
  • नाश्ता म्हणून खाणार असाल तर लगेच खा, कारण थोड्या वेळाने त्यातील दाणे मऊ  पडतात.  

टिपा:
  • लाह्या उपलब्ध नसतील तर नाही वापरल्या तरी चालतील.  
  • तुम्हाला अंदाज यावा म्हणून मी साहित्याचे माप दिले आहे. खरतरं ज्याला जे पदार्थ आवडतात ते हव्या त्या प्रमाणात कमी-जास्त वापरा. याला निश्चित असे नाही. कारण हा गोपाळकाला आहे, आणि काला म्हणजे सगळे पदार्थ एकत्र करून केलेला. 
  • तुम्हाला आवडणारी इतरही फळे यात घालू शकता.

बोला श्री गोपाळकृष्ण महाराज की जय .......

1 comment:

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.