Wednesday, October 16, 2013

मासळी विकत घेतानाची परिक्षा (Fish Test)

मासळी तर सगळ्यांनाच आवडते पण खरेदी करताना मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. भरपूर मोबदला मोजून घरी आणलेली मासळी चांगली निघेलच याची खात्री नाही. म्हणूनच काही सूचना इथे दिल्या आहेत. ९० % तरी त्या उपयोगास येतील. १० % अर्थातच तुमच नशीब.


  • मासे नेहमी चकचकीत दिसले पाहिजेत. कडक असावेत, कुजका वास नसावा. 
  • माश्याची खवले घट्ट असली तर ते ताजे, खवले सुटायला लागली असतील तर शिळे. 
  • माश्याचे कल्ले लाल भडक असायला हवेत, म्हणजे ते मासे ताजे आहेत. कल्ले काळपट असतील व मासे कापताना कुसकरत असतील तर ते शिळे मासे असतात. बोटांनी दाबले असता बोट आत जाते, ते मासे शिळे असतात. 
  • माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत. 
  • व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत. 
  • ज्या कोलंबीची साल पटकन सोलली जातात ती शिळी असते. 
  • पापलेटचे कल्ले दाबले असता कल्ल्यातून पांढरे पाणी आले पाहिजे. लाल पाणी आले तर पापलेट शिळे आहे. पापलेटचा चंदेरी थर हाताला लागत असेल तर, ते पापलेट शिळे आहे. तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. 
  • खेकडे विकत घेताना ते जिवंत, चालणारे व काळसर रंगाचे असले पाहिजेत. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खाण्यायोग्य मासं त्यात मिळत नाही. 
  • अमावस्येच्या आसपासच्या दिवसांत मिळणारे खेकडे जास्त चविष्ट व मांसाने भरलेले असतात. 
  • शिंपल्याचा खूप कुजकट घाण वास येत असेल तर त्या शिळ्या असतात. ज्या कच्च्या असताना अजिबात उघडत नाहीत, त्या ताज्या असतात. ज्या उकडल्यावर उघडत नाहीत त्या खराब असतात. 
  • ओला जवळा घेताना पांढरा स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा. 
  • तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते. 
  • कापलेला घोळ माश्याचा तुकडा लालसर गुलाबी असायला हवा, पांढरट- पिवळट नको. 
  • बोंबीलाचे तोंड लालसर असायला हवे, म्हणजे ते ताजे. पांढरट, पिवळट आणि लीबलीबित पडलेले बोंबील शिळे असतात. 
  • बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. काळसर रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात. 
  • भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे. लिबलिबीत नको.  
  • पांढऱ्या स्वच्छ, घट्ट व चमकदार दिसणाऱ्या मुडदुशा (रेणव्या) ताज्या असतात. त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो. मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात. 
  • पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली मांदेली ताजी असतात. मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला नारंगी रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात. 
  • काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते. जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो. 
  • कालवे घेताना पाढऱ्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत. शिळी कालवे त्याच्या पाण्यात विरघळायला लागतात, त्या पाण्याचा रंग पांढरट दिसतो व त्या पाण्याला वास येतो. छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात. 
  • आपण कितीही काळजी घेतली तरी मासे विकणारे काही लोक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. पापलेट ताज दिसावं म्हणजेच कल्ल्यातून पांढरे पाणी याव म्हणून कल्ल्यात कालव भरतात. बोंबील लालसर दिसण्यासाठी त्याला लाल रंग चोळतात. शिळ्या माश्याच्या कल्ल्याला व कापलेल्या तुकड्यांना दुसऱ्या माश्यांचे रक्त लावतात, जेणे करून ते मासे ताजे दिसावेत. त्यामुळे सावधान राहाण गरजेचं आहे. शक्यतो ओळखीच्या व खात्रीच्या विक्रेत्याकडूनच मासे विकत घ्यावेत. अनेकदा रंगरूप सारखे असणारे दुसरे बनावट मासे आपल्या नेहमीच्या माश्याऐवजी विकतात.

माहितीचा स्त्रोत: आजी, आई, पप्पा आणि नचिकेत घरत.       

4 comments:

  1. thanks a ton for this valuable information.
    Mashache marathi naav photosobat takun mahiti dilyas pardeshat rahnarya mazyasarkhya anekana khoop upayukta tharel.
    Punha ekda varil mahitisathi dhanyavad.
    Bhupali.

    ReplyDelete
  2. Kharach upyogee padanari mahiti dilit tyasathi thanks..

    Nilam

    ReplyDelete
  3. Thankx for this valuable information

    ReplyDelete
  4. Really helpful. Especially about buying from regular fish seller.

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.