Thursday, October 24, 2013

Masalebhat (मसालेभात)

लग्नासारखे शुभ समारंभ असले कि  मसालेभात हा हवाच. कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही !



Read this recipe in English.......click here.

साहित्य:
बासमती किंव्हा आंबेमोहर तांदूळ - १ १/२ कप  (उत्तम प्रतीचा जुना तांदूळ वापरावा, कोलम पण चालेल.)
मटार - १/२ कप
फ्लॉवरचे तुरे- १/२ कप
तोंडली,  चिरून - १/४ कप
वांग, उभ चिरून- १/४ कप
गाजर, सोलून आणि तुकडे करून- १/४ कप
फरसबी- तुकडे करून- १/४ कप
भिजवलेले शेंगदाणे- १/४ कप
काजू तुकडा- १/४ कप
मनुका- १ टेबलस्पून
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
कडीपत्ता- १ डहाळी
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
गरम पाणी- ३ ते ३ १/४ कप
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
खवलेले ओले खोबरे- १/२ कप
साजूक तूप- जरुरीनुसार

काळा मसाला-
खिसलेले  सुके खोबरे - १ टेबलस्पून
तीळ - १ टेबलस्पून
लवंग- ४
जीरे - २ टीस्पून
मसाला वेलची- २
दालचीनी- २ इंचाचे तुकडे
सुक्या लाल  मिरच्या - ३ ते  ४

(वरील सर्व जिन्नस थोड्याश्या तेलावर खमंग भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये दळून घ्यावेत. मिरची ब्याडगी वापरली आहे. जर काळा मसाला करायला वेळ नसेल तर १ ते १ १/२ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गोडा मसाला  वापरावा, चवीत फारसा फरक पडत नाही. मी सुद्धा बहुधा असाच वापरते. )

कृती:
तांदूळ आणि सर्व भाज्या धुउन  बाजूला ठेवाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की काजू, कडीपत्ता, हळद, हिंग टाकावा. सर्व भाज्या, शेंगदाणे, मनुका टाकून मिनिटभर परतून घ्याव्यात. नंतर त्यात तांदूळ, काळा मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा वेळ परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन मंद आचेवर भात शिजवावा.  मधेमधे हलक्या हाताने भात हलवावा.
हा भात प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येतो.
वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. गरमागरम भात मठ्ठ्या बरोबर वाढावा .


2 comments:

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.