Wednesday, April 1, 2015

Panhe (पन्हे)

वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी गुढी पाडवा आला की होते. वसंतपालवीच्या या दिवसात उन्हाळाही वाढू लागतो. हा उन्हाळा शांत करण्यासाठी चैत्रपेय म्हणून ओळखले जाणारे पन्हे पिण्याची सर्वांना ओढ लागते. कैरीची/आंबा डाळ व पन्हे यांचा नैवेद्य चैत्रागौरीला दाखवला जातो. आंबा डाळ मला फारशी आवडत नाही पण गारेगार पन्हे मला फार आवडते. 




Read this recipe in English..........click here.

साहित्य:
  • कैऱ्या- ३ मध्यम आकाराच्या 
  • गुळ- २५० ग्रॅम (गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असते, त्यामुळे गुळ कमी-अधिक लागू शकतो.) 
  • वेलची पूड- १ टिस्पून
  • मीठ - चिमुटभर 
  • पाणी- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • कैऱ्या स्वच्छ धुवून देठाजवळील भाग गोल कापून काढून टाका. (देठाजवळ चीक असतो, जर तो खाल्ला गेला तर घसा खाजतो.)
  • कैऱ्या थोड्या पाण्यात घालुन सुमारे १०-१५ मिनिटे उकडा. कुकरला उकडल्या तरी चालतील. 
  • थंड झाल्यावर साले आतील कोय/बी काढून टाका. सालाला चिकटलेला गर सुद्धा चमच्याने काढा.
  • गुळ चिरून घ्यावा.  
  • कैरीचा गर, गूळ किंवा साखर, वेलची पूड आणि मीठ एकत्र करून हे मिश्रण रवीने घोटू शकता किंव्हा ब्लेंडरमध्ये वाटुन घ्या. (हे मिश्रण जास्त दिवस साठवायचे असेल तर हवाबंद डब्यात भरून फ्रिझरमध्ये ठेवा. ३-४ महिने तरी अगदी उत्तम राहील. जसे हवे तसे बाहेर काढून वापरावे.) 
  • मिश्रणात हव्या त्या प्रमाणात पाणी घालून ब्लेंडरमध्ये घुसळा. (हॅण्ड ब्लेंडरने तर अगदी सोयीचे होते.) फ्रिजमध्ये  ४-५ दिवस अगदी छान राहते अर्थात उरले तर ! 
  •  सर्व्ह करायचे असेल तेव्हा बर्फाचे तुकडे घालावे आणि गारेगार पन्हे गट्टम करावे.  

टिपा:
  • मी केलेल्या पन्ह्याला आलेला रंग हा नैसर्गिक आहे. गुळ मस्त पिवळा धम्मक होता.  कुठलाही रंग अथवा केशर वापरलेले नाही.   
  • गुळ  उपलब्ध नसेल किंवा आवडत नसेल तर २५० ग्रॅम गुळाऎवजी २ कप साखर वापरावी. 
  • पारंपारिक पद्धतीप्रमाणे गुळ वापरतात. गुळ वापरल्याने पन्ह्याला चांगली चव आणि चांगला रंग येतो. गुळ वापरणे केंव्हाही साखरेपेक्षा चांगले कारण त्यात लोह, पोटॅशियम इ. पोषक खनिज असतात. 
  • खरतरं मी रसायन विरहित/नैसर्गिक गुळ नेहमी वापरते. तो गुळ काळपट तपकिरी रंगाचा असतो त्यामुळे पन्ह्याला पण तसाच  तपकिरी रंग येतो. फक्त छान सोनेरी रंग फोटोत दिसावा म्हणून मी येथे नेहमीचा पिवळा गूळ वापरला आहे. 
  • घरातला गुळ संपला आणि पन्ह्यात आंबटपणा अजून आहे तर मग साखर घालायला काहीच हरकत नाही.   
  • एकाच वेळी संपूर्ण गूळ किंवा साखर पन्ह्यात घालू नये. चव घेऊन त्यानुसार गूळ किंवा साखर वाढवावी. 
  • साखर आणि गूळ हे अर्धे-अर्धे प्रमाणात वापरू शकता.
  • पन्हे हे घट्ट असावे, फार पातळ चांगले लागत नाही. अर्थात आवड तुमची आहे. 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.