आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी खात असतो. वालाची/पावट्याची डाळ हा प्रकार फारसा प्रचलित नाही. महाराष्ट्र आणि गुजरात मध्येच हि डाळ वापरली जाते. त्यातही कोकणातच त्याचा वापर जास्त केला जात असावा. वाफाळलेल्या भातासोबत हि वालाची आमटी आणि तव्यात खरपूस परतून घेतलेली भेंड्याची भाजी किंवा तळलेली मासळी किंव्हा तव्यात कांद्यात परतलेली सुकट/सुका जवळा म्हणजे माझ्यासाठी ब्रम्हानंदच !
वालाची डाळ:
आम्ही दरवर्षी वाल घेतो. मग निवडताना त्यातले लाल रंगाचे वाल असतात ते कुचार किंवा मुके असतात म्हणजे त्यांना मोड येत नाहीत ते बाजूला काढायचे. त्याची गिरणीत डाळ करून मिळते. वरील फोटोमधील डाळ गिरणीतून करून आणली आहे. पण दुकानातही वालाची डाळ मिळते.
साहित्य:
- वालाची/पावट्याची डाळ- १/२ कप (साधारण १ वाटी)
- ओलं खोबरं, खोवून किंवा किसून- २ टेबलस्पून
- जीरे- १ टीस्पून
- लसूण- ४ ते ५ पाकळ्या
- कांदा, चिरून- १ छोटा किंवा १/४ कप
- घरगुती मिक्स मसाला/ मालवणी मसाला- १ टीस्पून (१/२ टीस्पून मिरची पूड + १/२ टीस्पून गोडा मसाला)
- तेल- २ टेबलस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- मोहरी- १ टीस्पून
- कडीपत्ता- ४ ते ५ पाने
- गूळ- १/४ टीस्पून
- आमसूल/कोकमं - २ ते ३
- मीठ- चवीनुसार
- कोथिंबीर- १/४ कप
कृती:
- वालाची/पावट्याची डाळ स्वच्छ धुवून किमान २-३ तास भिजत ठेवावी.
- ओले खोबरे, जिरे आणि लसूण वाटून घ्यावे. (काही मिक्सरला असं इटुकलं पिटुकलं वाटण कधी कधी नीट होत नाही. पूर्वी पाट्यावर केलं जायचं छान ! अश्या छोट्या वाटणाला माझी आजी खोबऱ्याची गोळी म्हणायची.)
- डाळ शिजतानाच त्यातच हे वाटण घालावे. मस्त वास येतो डाळीला. काही लोक डाळ उकळताना पण घालतात.
- तूरडाळीप्रमाणेच हि डाळ कुकरला शिजवून घ्यावी. हि डाळ शिजायला जरा जास्त वेळ लागतो. अंदाज घेऊन १-२ शिट्टी जास्त घ्यावी.
- डाळ चांगली शिजल्यावर घोटून घ्यावी.
- एका कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. मोहरीची फोडणी द्यावी, तडतडली कि त्यात कांदा, कढीपत्ता, हिंग, हळद, मोहरी घालावे आणि थोडा वेळ परतून घ्यावे.
- त्यात घरचा मिक्स मसाला किंवा (मिरची पूड+गोडा मसाला) घालावा व जरासं परतून
- त्यावर घोटलेली डाळ घालावी. जरुरीप्रमाणे पाणी घालावं.
- त्यात चवीप्रमाणे मीठ, गूळ, आमसूल घालवं आणि छान उकळी काढावी.
- वरून कोथिंबीर टाकावी. झाली तयार आमटी. गरमागरम भाताबरोबर वाढावी.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.