Friday, September 21, 2018

आठवणीतील पदार्थ

आठवणीतील पदार्थ लिहायचे झाले तर मला कुठल्या हॉटेलात काय खाल्लं यापेक्षा लहांपणीच्याच आठवणी जास्त येतात. बालपणीच्या आठवणी जितक्या निर्मळ, सुखद, चिंतेचा लवलेशही नसलेल्या असतात तितक्या कुठल्याही नसाव्यात. आणि या आठवणी खास असतात त्या आजी-आजोबा, गाव, खेळताना केलेली मजा आणि अर्थातच खादाडी.

आयुष्यातली पहिली दहा वर्ष मुरुड सारख्या छोट्या गावात गेली. टीव्ही असून नसल्यासारखा. हॉटेल नव्हती आणि बाहेर जाऊन जेवायचीची पद्धतही नव्हती.  पण तरीही आई-आजीच्या हाताच्या त्या साध्याश्या स्वयंपाकाची  आणि गावात मिळणाऱ्या काही पदार्थांची चव अजून जिभेवर रेंगाळते. आजही ते पदार्थ खाल्ले की जुन्या आठवणी मनात रुंजी घालतात.

आई आणि आजीच्या हाताच्या पदार्थांची यादी भली मोट्ठी आहे. कांदेपोहे, दडपे पोहे, फोडणीचा भात, वालाचे बिरडे, अळूवड्या, कोबीचे भानवले, घावणे-गुळवणी, वालाच्या डाळीची आमटी, शेंगांची आमटी, कोकमाचे सार (सोल कढी नाही), पन्ह,  माठाची भाजी आणि रोठ (हे रोठ म्हणजे पुरीच्या आकारापेक्षा छोट्या भाकऱ्या आणि ते फक्त श्रावणातल्या शनिवारीच व्हायचे), ओल्या काजूची उसळ, मच्छीचं कालवण, भरलेल्या चिंबोरीचं कालवण, मेथीचे लाडू, ओल्या खोबऱ्याचे रवा लाडू, लसणाची चटणी, सुक्या बोंबलाची चटणी, खरवस, माडी घालून केलेलं सांदण, चुलीवरच मटण ....  अजून खूप आहे. यातले काही पदार्थ मी बनवते पण त्याला आजी-आईच्या हाताची सर येत नाही. माझ्यासाठी माझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्यांना अख्या जगात तोड नाही. तिची पोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ होते, तोंडात विरघळते जणु.


आजी सकाळी उठली की खिमटाचं मोठ्ठ पातेलं चुलीवर ठेवायची. उकळी आली की पातेल वैलावर जायचं आणि रटरटत राहायचं. आम्ही चुलीसमोर बसून आईने ढोसेपर्यंत दात घासत बसायचो. यथावकाश सगळ उरकलं की खिमट खायला बसायचं. उपवासाच्या वारी लोणचं व भाजलेला तांदळाचा पापड आणि इतर दिवशी चुलीत भाजलेले सुके बोंबील किंवा वाकट्या तोंडीलावण म्हणुन मिळायच्या. ते गरम गरम खिमट ओरपताना ब्रम्हानंदी टाळी लागायची. रीसोतोच्या तोंडात मारेल अशी चव.

अशीच एक आठवण आहे ती 'ऋषीची भाजी'ची. माझ्या लहानपणी, माझी आजी हि भाजी चुलीवर मोठ्या मातीच्या भांड्यात बनवायची. फक्त बायकांचाच उपवास असल्याने प्रथम नेहमीचे जेवण आणि नैवेद्य व्हायचा. आजी आणि मोठी काकू मागच्या पडवीत भाज्या सोलत-चिरत बसलेल्या असायच्या. आम्हा मुलांचे आणि पुरुषांचे जेवण एक वाजताच उरकायचे. मग आम्ही सगळी मुलं मागच्या अंगणात डोकावायला जायचो. या बायकांचा हा कुठला खास पदार्थ चाललाय या बाबत कुतुहल असायचं. आजी बोलवायची खायला. पण भाजीचा रंग आणि त्यातल्या पालेभाज्या बघून पळून जायचो. मग एकदा कधीतरी हि भाजी चाखून बघितली. आणि मग नंतर खाताखाता हळूहळू हि भाजी आवडू लागली. आजीच्या त्या मातीच्या भांड्यातील भाजीची चव काय औरचं होती. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. आणि आज हे तिला सांगायला आजीही नाही आणि मोठी काकूही नाही. आजही ऋषी पंचमीला आजीची आणि काकूची खूप आठवण येते.


आमच्या गावाला खूप यात्रा असायच्या. खेळणी आणि चक्रवाराच्या घोड्यावर बसण्याशिवाय अजुनही खास आठवते ती यात्रेतील कांद्याची भजी, उसाचा रस आणि सुतरफेणी. त्यावेळेला ह्या छोट्याश्या गोष्टीच पण फार अप्रूप होत. हनुमान जयंतीची यात्रा एप्रिल मध्ये शेजारच्या 'खारांबोली' गावात असायची. तिथे आमचे एक ओळखीचे कुटुंब राहायचे. यात्रेला गेलोकी त्यांच्या शेतघरावर जाण ठरलेलं असायचं. तिथे त्यांच्या मळ्यातील ताजी ताजी रसदार कलींगडे आणि उकडलेल्या वालाच्या शेंगा. आहा ! 

गोकुळ अष्टमीला आमच्याकडे एक खास नैवेद्य असायचा. तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे नंतर ते सुकवून, भाजून दळायचे शक्यतो जात्यावरच. त्यापिठाचे लाडू बनवायचे. अष्टमीला मध्यरात्री हे लाडू, थालीपीठ, दही आणि दह्यात भिजवलेले हे पीठ असा नैवेद्य असे. हे पीठ म्हणजे जादूच वाटायची. दह्यात, दुधात, गुळाच्या पाण्यात किंव्हा अगदी चहात पण हे पीठ भिजवून खायचो. आज मला स्वतःलाच आश्चर्य वाटत की हे मी कस खायची, पण खरंच कशातही बुडवून खाल्लेल ते पीठ तेव्हा जाम आवडायचं.    

माझा खिसा (त्यावेळी फ्रॉकला मोठ्ठाले खिसे असायचे) अल्लुद्दीनचा खजिना असायचा. चणे-शेंगदाणे, चिंचा, बोरं, आवळे, भाजलेले चिंचुके आणि अगदी बोरांच्या बीयापण. बोरांच्या बीयापण सोडल्या नाहीत आम्ही, फोडून आतला गर खायचो. माझी आजी मला रोज मधल्या सुट्टीत चार आणे द्यायची. त्यात काय काय यायचं. १० पैशाला मिळणार आवळा सुपारीच पाकीट, पेपरमिंटच्या गोळ्या लिमलेटच्या गोळ्या. शिवाय आम्ही मैत्रिणी एका आवळ्याच्या बदल्यात एक बोर इत्यादी प्रकारचे व्यवसाय करायचो. एकदा आवळा सुपारी ऐवजी मिलन सुपारी घेतली आणि कस कोण जाणे ते आजीला कळलं आणि असा मार मिळाला आहे ना आजीकडून कि त्या मिलन सुपारीकडे बघायची पुन्हा हिंमत झाली नाही. शिवाय पुढे कितीतरी दिवस चार आणे मिळायचे बंद झाले होते. हा खिश्याचा खजिना दिवाळी फराळ बनवताना पण चांगलाच फुगायचा. पुढ्यातल्या थाळ्यातून हाताला येतील तितक्या चकल्या, शंकरपाळ्या आणि बोर बचाकभर उचलायची आणि खिश्यात भरायची आणि मग निवांत तुटलेल्या भिंतीवर नाहीतर सतीच्या पारावर बसून निवांत खायची. बोरावरून आठवलं, एकदा बोरं खाताना हलणारा दुधाचा दात हातात आला होता. हि बोरं म्हणजे तांदळाचे पीठ गुळाच्या पाण्यात घट्ट भिजवायचे आणि बोराएवढ्या आकाराचे गोळे करून तळायाचे. कडक असतात हि बोरं, तोंडात धरून चघळून चघळून मऊ होतात मग खायची.

मुरुडला घराच्या आजूबाजूला सगळीकडे वाड्या. त्यात नारळीफोपळीच्या जोडीला आंबे, पेरू, जांभळ, जाम, फणस अशी किती तरी झाड, झाडावर चढुन नाहीतर दगड मारून हि फळं पडायचो. खापट्या कैऱ्या आणि पेरू पाडून तिखट-मीठ लावून खायचो. मग आजीच्या लक्षात आलं की म्हणायची अरे त्यांना जरा त्यांना मोठं तर होऊ द्या, घसा खवखवेल अश्याने. पण आम्हाला कुठला धीर. त्यावेळी घसाही खवखवला नाही कि कधी दातही आंबले नाहीत. आता तर काही आंबट खायच्या कल्पनेनंच माझे दात आंबतात. जामाला गुलाबी रंगाची फुल येतात ती पण खायचो. आता नाव आठवत नाही पण कुठलीतरी फुल असायची त्याचा गोड गोड  रस चुपायचो. कुंपणाला चिंचणीची झाड येतात त्याला शेंगा असतात, त्या पण खायचो. कहर म्हणजे चिंचेचा आंबट कोवळा पाला पण खायचो आम्ही.        

मुरुडला एक भेळवाले पितांबरभय्या होते. तिथली भेळ हि तिच्या सारखी तीच. कुठल्याही चटण्या नसलेली, उकडलेले पांढरे वाटाणे आणि जाडी गाठी असणारी ती एक अदभूत भेळ होती. आजही ते दुकान आहे पण तशी भेळ मिळत नाही. गद्रेंचा बटाटावडा आणि रामूभय्याचा हिरव्या वाटण्याचं सारण असलेला पातीचा सामोसा खायला मिळणं  म्हणजे पर्वणीच. फक्त वडाच मिळायचा, खऱ्या खोबऱ्याच्या चटणीसह. वडापाव हा प्रकार नसायचा. पाव फक्त बेकरीतच. आता गद्रेंच हॉटेल बंद झालय आणि रामूभय्याचा सामोश्याची चव पार रसातळाला गेलीय.

मुरुडला पूर्वी बेकरीत एक 'बिस्कुट' नावाचा प्रकार मिळायचा. हा पाव आणि बटर (चहात बुडवून खायचे) याच्या मधला पदार्थ होता. पाव सारख्याच त्याच्या लाद्या असायच्या. दुपारी चहा वाजले कि एक पाववाला 'पाव-बिस्कुट-खारी' असं ओरडत यायचा. त्याची साद ऐकून घरोघरी चुलीवर चहाची आधण चढत असतील. खारी त्यामानाने बरीच महाग असायची, त्यामुळे 'बिस्कुट' घेण्यावरच सगळ्यांचा भर असायचा. अर्थात ती बिस्कुट चहासोबत लागायची पण भारी. त्याच्याकडे 'लिमजी' पण मिळायची. नानखटाईच्या जवळपासचा हा पदार्थ, पण मला हा फारसा आवडत नसे. 'सर्दी खोकला, झटकन मोकला' असं ओरडत एक आलेपाकवाले आजोबा यायचे. सर्दी झाली असो कि नसो पण ते आजोबा आले कि माझी आजी त्यांच्याकडून १-२ आलेपाक विकत घ्यायचीच. आज मला असं वाटत कि त्यांना थोडीफार मदत व्हावी असा तिचा हेतू असावा. शिवाय फार महागही नसे आणि चांगला असायचा, एकदम घरगुती चव.
       
आमच्या मुरुडच्या बाजारात त्याकाळात फक्त स्थानिक फळ आणि भाज्यांचं मिळायच्या. आजूबाजूच्या खेडेगावातून भाज्या यायच्या. त्यात चवीला खास असणाऱ्या भाज्या असायच्या त्या कोर्लईच्या. कोर्लईच्या मायकडची रताळी आणि वांगी चवीला अप्रतिम. त्या मायशी बोलणं आणि भांडणं तर फारच सुंदर. ह्या माय म्हणजे भाजीवाल्या, पोर्तुगीज लोकांचे वंशज. त्यांचं ते हेल काढून बोलणं तर ऐकत रहावं.

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सगळ्यात आनंदाचा काळ. मनोसोक्त खेळणं आणि सगळ्या आवडत्या पदार्थांची रेलचेल. गुपचूप चोरून खाण्यात कसली मजा असते ना! आंबोशीसाठी सुकत घातलेल्या कैरीच्या फोडी, कोकमं, चिंच आणि पापड पण. काही वर्ज्य नव्हतं.  हापूस आंब्यांपेक्षा मला आवडायचे ते छोटे चुपायचे आंबे. आम्ही सगळे मिळून जवळजवळ  टोपलीभर आंबे दिवसभरात फस्त करून टाकायचो. फणसाचे गरे खाऊन तर नंतर कंटाळा यायचा. कोंबडा की कोंबडी करत करवंद खायचो. चिकटलेले ओठ सोडवत रांजणं खायचो. ओठाला जांभळाची लिपस्टिक लावायचो. काय काय केलं अन काय काय खाल्लं. दिवसभर काही ना काही चरत असायचो पण इतकं खेळायचो की जेवणाची वेळ होईपर्यंत कडकडून भूक लागलेली असायची. शिवाय एक कुल्फीवाला यायचा, सुट्टीत रोज दुपारी एक चार आण्याची कोनातली कुल्फी मिळायची. कधीकधी बर्फाचा गोळा तर कधी आईसप्रुट पण मिळायचा. आईसप्रुट म्हणजे आता मँगो कँडी येते तसलाच गावठी अवतार. मला सगळ्यात जास्त आवडायचा तो बर्फाचा गोळा, पण त्यासाठी आजीला फार मस्का लावावा लागे.      

अजूनही आठवते ती त्यावेळची मुंबईची कचोरी आणि मसका जीरा बटर. मावशी मुंबईवरून येताना खास घेऊन यायची. त्यावेळी ह्या गोष्टी स्वर्गीय वाटायच्या, आता काही त्यात मजा वाटत नाही. आणि मुरुड-मुंबई प्रवासात आवर्जून घ्यायची एक गोष्ट होती ती म्हणजे साळावची चिक्की. हो, तीच ती खोबऱ्याची चिक्की, जी अलिबाग-रेवदंड्यात मिळते. पूर्वी साळावची चिक्की म्हणून प्रसिद्द होती. तिच्या चवीतही खूप फरक पडला आहे.
      
आमच्या घरातले डबे बिस्किटं, चॉकलेट, केक, फरसाण अश्या पदार्थानी भरलेले नव्हते. लहानपणी हे पदार्थ कधी मला खायला मिळाले नाहीत असही नाही. पण बाकीच्या इतर गोष्टी इतक्या होत्या की या गोष्टींची चटकच लागली नाही.
अजून खूप काही लिहिण्यासारखं, पण आता इथे आवरतं घेते आहे. आठवणी जपण्यासाठी मी माझ्या ब्लॉगवर आजी-आईच्या जुन्या पाककृती संग्रहित करून ठेवण्याचा प्रयत्न करते आहे.
खरतरं ह्या खूप साध्या गोष्टी आहेत, खूप जणांनी  हे असं अनुभवलं असेल. तरीही मला हे लिहावंसं वाटलं, कारण या आठवणी खूप खास आहेत, मनाच्या कुपीतील अत्तरच जणु. अजूनही ती कुपी उघडली की घमघमाट सुटतो आणि मन वेडं होतं.        

 हा लेख 'मिसळपाव' या संकेतस्थळावर एका लेखमालेत पूर्वप्रकाशित झाला आहे. 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.