बाजारात काजू, कैरी, करवंद यायला लागली कि समजावे उन्हाळा आला. आधी कच्ची करवंदे विकायला येतात आणि नंतर काळी गोड अशी पिकलेली करवंदे.  कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.
चला तर आज करू मस्त लोणचे .........
साहित्य:
- कच्ची करवंदे - २ कप
 - तयार कैरी लोणचे मसाला- १२ ते १५ टिस्पून
 - मीठ- ५ टिस्पून किंवा चवीनुसार
 - हळद- १/२ टिस्पून
 - हिंग- १/२ टिस्पून
 - तेल- १० ते १२ टेबलस्पून
 
कृती:
- करवंदांची देठे काढून टाका आणि स्वच्छ धुवा.
 - चाळणीत थोडा वेळ निथळू द्या, नंतर फडक्याने पुसून कोरडी करा.
 - एक-एक करवंद घेऊन हळूच ठेचा. (करवंद फक्त फुटले पाहिजे, चेंदा-मेंदा करू नका.)
 - ठेचलेली करवंदे काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या वाडग्यात घेऊन त्यांना ४ टीस्पून मीठ चोळा व रात्रभर तशीच झाकून ठेवा. (यामुळे करवंदांचा चीक जाईल आणि ती मऊ पण होतील.)
 - दुसऱ्या दिवशी करवंदे दाबुन त्यांच्या आतील बिया बाहेर काढा. एखाद-दुसरी बी राहिली तरी काही हरकत नाही, खाताना काढता येते. (तुम्हाला हे काम किचकट वाटत असेल तर ठेचण्याऐवजी करवंदाचे दोन भाग करून आतील बिया काढा. मीठ लाऊन रात्रभर झाकून ठेवा.)
 - करवंदांना जर सकाळी पाणी सुटले असेल तर ते काढून टाका. हलक्या हाताने दाबलीत तरी चालतील.)
 - आता त्यात लोणचे मसाला, हळद आणि १ टिस्पून मिठ घालावे. चांगले मिक्स करावे.
 - तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावर त्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी वाडग्यात घालून निट मिक्स करावे.
 - स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे ८ ते १० दिवसात लोणचे मुरते.
 - लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल. नको असल्यास वरचे तेल काढून टाका. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या/पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता.)
 

करवंद लोणचे किती दिवस टिकते.
ReplyDelete