Monday, August 23, 2021

मुगाचे बिरडे

वालाचे बिरडे असते तसेच मुगाचे बिरडेही कोकणात फार प्रिय आहे. विशेतः श्रावणी सोमवारी केले जाते. आम्ही श्रावणी सोमवारी कांदा-लसूण न वापरता हे बनवतो पण इतर दिवशी कांदा-लसूण बिरड्याला वापरले तरी चालेल. चवीला उत्कृष्ट असले तरी सोलण्याचे काम थोडे वेळखाऊ आहे पण पहिल्या घासातच कष्टाचे चीज होते.  
कांदा-लसणाशिवाय सुद्धा फार चांगले लागते.   



साहित्य :

  • अख्खे मुग- १ कप 
  • तेल - २ ते ३ टेबलस्पून 
  • मोहरी- १ १/२ टीस्पून 
  • हिंग- १/२ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • घरगुती मिक्स मसाला किंवा मालवणी मसाला - ३ टीस्पून  किंवा (२ टीस्पून मिरची पूड +१ १/२  टीस्पून गोडा  मसाला 
  • गोडा मसाला- १ १/२  टीस्पून  (मी यात कांदा-लसूण वापरला नसल्याने मिक्स मसाल्यासोबत गोड मसाला वापरते.) 
  • मीठ- चवीनुसार 
  • ताजे ओले खोबरे- १/२  कप 
  • जीरे- १ टीस्पून  
  • कोकमं/आमसुलं- ४ (जर उपलब्ध नसतील तर १ टीस्पून  चिंचेचा कोळ वापरा. कैरी वापरली तरी चालेल.) 
  • गुळ- चिमूटभर (ऐच्छिक) 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून 
जर तुम्हाला कांदा-लसूण घालून हे बिरडे करायचे असेल तर :- कांदा, चिरून- १/२ कप आणि लसूण- ४ पाकळ्या


मुगाला मोड कसे आणावे?
  • दोन दिवस आधीपासूनच त्याची तयारी करावी लागते. समजा बिरडे सोम दुपारच्या जेवणासाठी करायचे असेल तर शनीवारी रात्रीच वाल भिजत घालावे लागतात.
  • मूग धुवून रात्रभर किंवा किमान ८ तास तरी पाण्यात भिजत घालावेत. 
  • सकाळी त्यातले पाणी काढून पुन्हा ते मूग १-२ वेळा धुवून घ्यावे, त्यामुळे नंतर चिकट होत नाहीत. संपूर्ण पाणी निथळून घ्यावे. 
  • सुती पातळ फडक्यात बांधून ठेवावेत. भांड्यात झाकून ठेवावेत.
  • उबदार जागी ठेवावे म्हणजे छान मोड येतात. व्यवस्थित मोड यायला साधारण 16 तास लागतात. अर्थात हे हवामानावर अवलंबून असते.
  • नंतर एका मोठ्या पातेल्यात भरपूर कोमट पाणी घ्यावे. त्यात ते मूग तासभर तरी राहू द्यावे.
  • नंतर  हलक्या हाताने मोड तुटणार नाहीत ही काळजी दोन्ही हातांनी चोळावे. मग त्यातले पाणी दुसर्‍या भांड्यात ओतावे. पाण्याबरोबर सालंही सुटत जातात. असे २-३ दा करत बहुतांशी साले सुटून जातात. तरीही काही मुगांची साले शिल्लक राहतात ते मूग हाताने सोलावे. 
  • अश्याप्रकारे सर्व साले निघाली की मूग बिरडे करण्यासाठी तयार होतात. 
कृती:
  • ओले खोबरे, जीरे आणि थोड पाणी टाकून सर्व एकत्र वाटून घ्या. (फ्रीझरमधले खोबरे वापरणार असाल तर वाटणासाठी गरम पाणी वापरा.)  लसूण वापरायचा असेल तर या वाटाणासोबत वाटावा.
  • एका भांड्यात तेल गरम करा. मोहोरी घालून तडतडू द्यावी. (कांदा वापरणार असाल तर तो घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.) नंतर हिंग, हळद आणि मसाला किंव्हा लाल तिखट घालून जरासं परतून लगेचच त्यात सोललेले मूग घालावे. हलक्या हाताने परतावे. थोड पाणी घालावे. झाकण ठेऊन एक उकळी आणावी.  
  • नंतर त्यात खोबऱ्याचे वाटण, मीठ आणि ज्या प्रमाणात तुम्हाला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात पाणी घालावे. झाकणावर पाणी ठेऊन २०-२५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. 
  • बिरडे शिजत आले की गूळ, कोकम (आणि गोडा मसाला वापरणार असाल तर) आणि जरूर असल्यास अजून पाणी घालून एक उकळी आणावी.  
  • वरून कोथिंबीर घालून चपाती, भाकरी किंव्हा भातासोबत वाढावे.

सूचना:
  • सोललेले मूग खुप नाजुक असतात पटकन मोडले जातात म्हणून हलक्या हाताने ढवळावे. ते अख्खे राहतील याची काळजी घ्यावी. 
  • बिरडे अति शिजले तर त्याचा डाळी सारखा लगदा होईल. आणि मग तो चवीला अतिशय वाईट लागेल. 
  • बिरड्यात पाणी घालताना गरम पाणी वापरावे त्यामुळे बिरडे चांगले शिजते. झाकणाच्या ताटावरचे गरम पाणी वापरले तरी चालेल.   
  • काही लोक यात बटाटा घालतात, पण माझ्या मते त्यामुळे बिरड्याची चव बिघडते.
  • कोकमा ऐवजी चिंचेचा कोळ किंवा कैरी घातली तरी चालेल.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.