Friday, February 26, 2016

मटारचे फलाफेल वापरून मराठमोळे पॉकेट सँडविच

नाव जरी विदेशी असलं तरी साहित्य आणि कृती एकदम देशी. या विदेशी पदार्थाला भारतीय मसाल्यांची जोड देवून जास्त रुचकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त दिसायला विदेशी. तर झाल असं की मला पिटा पॉकेट सँडविच खूप आवडतं. पण तो पिटा ब्रेड आमच्याकडे मिळत नाही. मग विचार केला टम्म फुगणारी, पापुत्रा सोडणारी आपली भाकरी आणि पिटात काय फरक आहे. हिवाळ्यात पौष्टिक म्हणून ज्वारी-बाजरी खायची पद्धत आमच्याकडे आहे. कोवळा ताजा पालक आणि ग्रीन लेट्युस मध्ये चवीत फारसा फरक मला जाणवत नाही.
आणि हे आहे भाकरी पॉकेट सँडविच………चला हव तर भरलेली भाकरी म्हणा. आपली शेतकरी मंडळी भाकरीवर झुणका, कांदा घेऊन हातावरच खातात की. हे थोडस वेगळ आपण भाकरीच्या आत भरुया. खायला आणखी सोप्पं.

Read this recipe in English, click here.


(पिटा पॉकेट सँडविच हा मध्य-पूर्व आशिया मधील पदार्थ आहे. भाकरीप्रमाणे दिसणारा गोल फुगलेला आणि आतून पोकळ असणारा ब्रेड म्हणजे पिटा ब्रेड. त्याचे दोन भाग करून त्यात हर्ब्स घातलेले दही, ताहिनी पेस्ट म्हणजे तिळाची पेस्ट लावतात. त्यात लेट्युस सारखी सलाडाची पाने, कांदा इत्यादी पसरवतात. सुक्या काबुली चण्यापासून भजी सदृश्य 'फलाफेल' त्यावर ठेवले कि झाले पिटा पॉकेट सँडविच)

वाढणी- ४
साहित्य:
मटारचे फलाफेल /वडे -
  • मटार - १ कप (मटारऐवजी हिरवा ओला हरभरा, ओले तूर वापरले तरी चालतील. मी सगळ्याचे वडे करून पाहिलेत. चवीत अगदी थोडासा फरक जाणवतो. पण सगळेच रुचकर लागतात.)
  • कांदा, बारीक चिरून- २ टेबलस्पून
  • कोथिंबीर- १/४ कप
  • आले- १/२ इंचाचा तुकडा
  • लसुण- ३ ते ४ पाकळ्या
  • जीरे- १/२ टीस्पून
  • बडीशेप- १/४  टीस्पून 
  • मिरची- १
  • मिरची पूड/लाल तिखट- १/४ टीस्पून
  • हिंग- चिमुटभर
  • मीठ- चवीनुसार
  • बेसन- २ ते ३ टेबलस्पून
  • तांदूळ पीठ- १ टीस्पून 
  • तेल- जरुरीनुसार
चटणी-
  • दही- १/४ कप
  • शेंगदाणे, भाजून सोललेले - २ टेबलस्पून
  • तीळ, भाजलेले- १/२ टीस्पून
  • लसुण- २ पाकळ्या
  • मिरची पूड- १/२ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार
इतर-
  • ज्वारी~बाजरी जाडसर भाकरी - २
  • पालकाची कोवळी ताजी पाने- १६
  • काकडी- १
  • कांदा- १
  • टोमॅटो- १

कृती:
मटारचे फलाफेल -

  • मटार, जीरे, बडीशेप, कोथिंबीर, आले, लसुण, मिरची एकत्र पाणी न वापरता मिक्सर मध्ये भरडसर वाटून घ्यावे. (कोथिंबीर, आले, लसुण, मिरची हे बारीक चिरून घ्यावे म्हणजे व्यवस्थीत वाटले जाते.)
  • एका वाडग्यात वरील वाटण, मीठ, हिंग, मिरची पूड, कांदा व बेसन एकत्र करावे.
  • सर्व एकत्र मळून त्याचे आवळ्याएवढे गोळे करावे. मध्यम ते मंद आचेवर तळावेत. किंवा थोडे चपटे करून दोन्ही बाजुंनी तेलावर खरपूस भाजून /शालो फ्राय करून घ्यावेत. (तळले तर जास्त रुचकर लागतात.)



चटणी-
शेंगदाणे आणि तीळ आधी मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावेत. त्यातच दही, मीठ, मिरची पूड टाकून वाटून चटणी करावी.

वाढण्यासाठी रचना-
  • पालक धुवुन पुसून घ्या. काकडी, कांदा, टोमॅटोच्या चकत्या करून घ्या.
  • भाकरी भाजून झाली कि लगेच तिचे दोन तुकडे करून पापुत्रा सोडवून ठेवा.
  • त्या अर्ध्या भाकरीला आतुन चटणी लावा, त्यावर पालकाची ३-४ पाने पसरा. त्यावर काकडी-टोमॅटोच्या चकत्या पसरा. त्यावर हरभऱ्याचे ३ वडे ठेवून त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवा आणि थोडीशी चटणी शिंपडा. 
  • पटकन खाऊन टाका. नाहीतर नंतर मऊ पडेल.

टीप:
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर मटार/हरभरा/तूर  ब्लांच करून घ्या.  
  • वडे शालो फ्राय करायचे असतील तर बेसन थोडेसे भाजून घ्यावे म्हणजे बेसन कच्चट लागत नाही. 
  • वडे करताना बेसन ऐवजी भाजणी वापरली तरी चालेल.   


No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.