Showing posts with label शाळेचा डब्बा. Show all posts
Showing posts with label शाळेचा डब्बा. Show all posts

Monday, November 14, 2016

शाळेचा डबा

शाळेचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. पौष्टिकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. ही भाजी नको - ती भाजी नको अशा एक ना अनेक तक्रारींनी नुसता वैताग आणतात ही मुलं. नावडीची भाजी असली की बरीचशी मुलं डबा संपवतच नाहीत. साधारण आठ तास मुलं घराबाहेर असतात. अश्यावेळी योग्य आहार पोटात न गेल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात.
Recipe source: Amezon.in

मुलांच्या अभ्यासाइतकंच मुलांच्या खाण्यापिण्याकडेही गांभीर्यानं बघायला हवं. शाळेत खाल्लं नाही तर घरी आल्यावर खातील अशी समजुत करून घेणे अत्यंत घातक आहे. ठराविक कालावधीनंतर पोटात आहार गेला नाही तर मुलांची एनर्जी कायम कशी राहणार आणि न काही खाता पिता त्यांचं शाळेत लक्ष कसं लागाणार ? शिवाय घरी आल्यावर मुलं इतकी भुकेलेली असतात कि त्यांचा गोड किंवा तेलकट असे अनहेल्दी पदार्थ खाण्याकडे कल राहतो आणि आईही बरेचदा ते प्रेमापोटी किंवा अपराधी भावनेने सहन करते. आई नोकरी करत असेल तर हि मुलं बेबीसिटरकडे अश्या अनहेल्दी खाण्यासाठी फार हट्ट करतात. परिणाम मुलांच्या वजनावर होतो.

लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे, त्यांच्या आवडीचे ३-४ डबे आणून ठेवावेत. पदार्थाच्या प्रकार व रंगानुसार डब्याची निवड करावी. मुलांच्या डब्याला कधी लसणाचा किंवा इतर उग्र वास येत असेल तर लिंबाची फोड डब्यावर घासावी.

माझ्या मुलींच्या शाळेत फॅन्सी पदार्थ चालतच नाहीत. त्यांना एक दीर्घ आणि एक लघू अशी मधली सुट्टी असते. त्यापैकी दीर्घ सुट्टीत पोळी/भाकरी/घावन + भाजी, पराठा किंवा थालीपीठ असेच पूर्णान्न पदार्थ चालतात. फक्त शनिवारी इडली, डोसा, अप्पे, पुलाव इत्यादी पोटभरीचे पदार्थ चालतात.

मी दीर्घ मधल्या सुट्टीसाठी (Long Reces) पुढील प्रमाणे डबा देते :
१. मी आठवड्यातून एक-दोनदा मोड आलेल्या कडधान्याची उसळ देते.
२. एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे करते.
३. ज्या भाज्या आवडत नाहीत त्यांचे पराठे करते. उदा. पालक, मेथी, दुधीभोपळा इत्यादी. आठवड्यातून एकदा पराठे देते. सोबत घरचं लोणचं किंवा चुंदा देते.
४. आठवड्यातून एकदा थालीपीठ देते. मी थालीपीठ भाजणी मध्ये तांदुळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, चणाडाळ, मुगडाळ, उडीदडाळ, मसूरदाळ, कुळीथ, सोयाबीन, गहू, धणे, जीरे समावेश करते. थालीपीठासोबत ताज घट्ट दही देते. कधी कधी थालीपीठात कांद्याऐवजी काकडी, पालक, मेथी, कोबी, कांद्याची पात इत्यादी भाज्या पण बारीक चिरून घालते. तसेच थालीपीठात आळशी पूड व तीळ घालते तर कधी कधी मेथी पूड पण घालते.
५. काकडी, मुळा, गाजर, बीट असं थोडस सलाड देते. सोबत छोट्या झिपलॉक पिशवीत चाटमसाला देते.
६. फळ शक्यतो देत नाही. सफरचंद वै. फळ कापून दिली तर काळी पडतात आणि पूर्ण फळ हे लोक खात नाहीत. शिवाय कलिंगड, पपई सारख्या काही फळांना पाणी सुटत. केळ लिबलिबीत आणि काळ होत बॅगमधील उष्णेतेमुळे शिवाय बॅगेत केळ्याचा घमघमाट सुटतो त्यामळे मुली अजिबात तयार होत नाहीत केळ न्यायला. मात्र सीझनप्रमाणे छोट्या डब्यात स्ट्रॉबेरी, द्राक्ष, जांभळं, संत्र-मोसंबीच्या फोडी देते. छोटी संत्री आणि छोटी सफरचंद बाजारात मिळाली तर अख्खीच देते.

अजून काही छोट्या टिप्स :
१. काही मुलांना पोळीला भाजी लावून खायचा कंटाळा असतो आणि म्हणूनच पोळी-भाजी ऐवजी पोळी-भाजीचा रोल द्यावा.
२. अगदी लहान मुलांना चपातीचे तुकडे करता येत नाहीत किंवा तुकडे करून चपाती खाण्यात फार वेळ लागतो आणि मग सुट्टी संपली तरी डबा तसाच राहतो. म्हणून मुलांना पोळीचे छोटे छोटे तुकडे करून द्यावेत.
३. कधीतरी भाजी बिघडली किंवा करपली किंवा घरात दुसरं काहीच नाहीये, आणि घाई पण आहे, दुसरं काही नवीन बनवायला वेळ नाही अश्या वेळी जाडसर चपाती लाटून त्यावर थोडस तेल, मसाला/मिरची पूड, मीठ, तीळ, ओवा किंवा कसुरी मेथी पसरवुन त्याची पुन्हा घडी घालून पोळी लाटावी. अशी हि झटपट मसाला चपाती दही, केचप किंवा लोणच्यासोबत छान लागते. अश्याच प्रकारे मुलांना आवडत असेल तर चटणी किंव्हा मेतकुट घालून झटपट पराठाही बनावता येतो. शिवाय फ्रिजमध्ये उकडलेला बटाटा असेल तर तो किसून घेऊन काही जिरे-धने पूड, मिरची पूड घालून झटपट आलू पराठा तसेच बटाटा+चीज+चिलीफ्लेक्स झटपट चीज पराठा करता येतो.
४. रस्सेदार, तेलकट आणि खूप तिखट भाज्या मुलांना डब्यात अजिबात देऊ नये. लहान मुलांना मिरची काढून घेऊन भाजी द्यावी, सगळं लक्ष खेळण्यात असल्यामुळे मिरची तोंडात जाऊ शकते.
५. दप्तरात डब्याच्या कप्प्यात एक छोटा नॅपकिन ठेवावा.
६. एकदम घट्ट झाकणाचे किंवा उघडायला जड असे डबे देऊ नये.
 ७. रोज घरी आल्यावर डबा सगळा संपवलास का? भाजी आवडली का? मित्र/मैत्रिणीने काय आणलं होत? आज काय मजा केलीस डबा खाताना? असे प्रश्न हसत हसत विचारावे. मग मुलंही त्यावर आपल्याशी बोलतात. यामुळे आपल्याला पण अंदाज येतो मुलं डब्यामुळे खुश आहेत कि नाही. किंवा डबा खाताना काही अडचणी तर येत नाहीत ना. काय खाल्ल्यामुळे किंवा कशाच्या वासामुळे त्रास होतो, कारण घरी खाल्लेली भाजीचा वास आणि चव तीच असू शकते असं नाही. काय पदार्थ दिला तर वेगळा लागतो. अश्या बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो. त्यावरून डब्यात काय द्यावं आणि काय देऊ नये हे ठरवता येत. मोठी मुलं ह्या गोष्टी स्वतःहून सांगू शकतात पण लहान मुलं विचारल्याशिवाय सांगत नाहीत.
८. मुलांचं दप्तर पण रोज तपासावं. काही मुलं न आवडणारे पदार्थ दप्तरात टाकतात शिवाय इतर कचराही असतोच.

लघू मधल्या सुट्टीसाठी (Short Reces) किंवा पूर्वप्राथमिक शाळा कमी वेळच्या असतात त्यासाठी काही पर्याय सुचवत आहे : 
१. खजूर, सुका मेवा ओट्स, बीट, मटार, गाजर वैगरे पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून ठेवल्यास त्याही डब्यात पूरक अन्न म्हणून देता येतील. त्यात साखरेऐवजी गूळ घातल्यास मुलांना अजून ऊर्जा मिळेल. वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या पण मुलांसाठी उत्तम.
२. उकडलेले शेंगदाणे/हरभरे/मोडाचे मूग, टोमॅटो, कांदा, लिम्बुरस, जीरेपूड किंवा मिरीपूड एकत्र करा, हव तर त्यात कॉर्न फ्लेक्स टाका. सैंधव/मीठ वेगळे द्या किंवा देऊच नका. कडधान्ये उकडताना मीठ टाकले तर ती नंतर मीठाशिवायही खाता येतात. कॉर्न फ्लेक्स पण वेगळ्या डबीत द्या. टोमॅटोच्या बिया काढून टाका, सँडविचमध्येही बीयाविरहित टोमॅटो द्या. काकडी पण खूप पाणीदार असेल तर त्याच्याही बिया काढून टाका.
३. सँडविच आणि मोमो हे डब्याला दिले कि मुलांना मजा आणतात. सँडविच मध्ये अक्षरशः वाटेल ते घालता येते. तसेच मोमोच्या आत आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचं फिलिंग करता येतं. पालक पनीर, छोले, उसळी याचे मोमोज तयार करता येतात. फक्त मोमो मैद्याचे न बनवता गहू, तांदूळ+नाचणी चे बनवावे आणि शक्यतो उकडलेलेच द्यावे. करंजीच्या साच्यानं आपण मोमो करू शकतो. तांदूळ+नाचणी पीठाचे बनवायचे असतील तर मोदकासारखी उकड काढावी आणि फूडप्रोसेसरमध्ये छान मऊसर मळून घ्यावे.
४. पोळीचे चतकोर तुकडे करून त्यावर भाजी पसरून, वरून चीज किसून घालावं. ही पोळी ओव्हनमध्ये बेक करावी किंवा तव्यावर झाकून चीज वितळेपर्यंत ठेवावी. असा पोळी पिझ्झा मुलांना नक्की आवडेल.
५. हेल्दी स्टफ चिला- चिला बनवण्यासाठी बेसन+कणिक+बारीक रवा, मिरची-आले-लसुन-जिरे याचे वाटण, हळद, मीठ सर्व एकत्र करून ताकात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर त्याचे पोळे करून घ्या. स्टफिंग बनवण्यासाठी- मोड आलेले मुग, काकडी,टोमाटो, कांदा, चाट मसाला, मीठ टाकून एकत्र करा. तयार पोळ्यावर मेयोनीज पसरवा. त्यावर स्टफिंग पसरवा. टोमाटो केचप सोबत देऊ शकता.
६. छोटे उत्तपे मुलांना आकर्षित करतात. न्याहारी आणि मुलांच्या डब्याला उत्तम. वरून नुसता कांदा घालण्या ऐवजी गाजर, बीट, कोबी किंव्हा पालक या सारख्या भाज्या किसून किंव्हा बारीक चिरून घालू शकता.
७. इडली तर आपण नेहमीच खातो, पण त्यात गाजर, पालक, बीट, मटार या सारख्या भाज्या टाकल्या तर ती अजून पौष्टिक होईलच शिवाय चवीत बदल पण होईल. चटण्याही वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतील. डोसे/उत्तपे करताना सुद्धा वेगवेगळी पीठे आणि भाज्या वापरून वैविधता आणता येईल.
८. उकडलेली कंदमुळं जसे रताळं, अळकुडी, कणकं सुद्धा सोलुन देता येतील.
९. एका लहानशा डबीत चार पाच मनुके, एखादा बदाम, एक काजू, एक लहानसा अक्रोड, खारकांचे तुकडे किंवा सीडलेस खजुर किंवा एखाद अंजीर द्यावे. अगदी भाजलेले शेंगदाणे किंवा चणे पण उत्तम सोबत नैसर्गिक गुळ म्हणजे मूल्यवृध्दीच.
१०. कुरमुऱ्याचा चिवडा किंवा शेव-पोहे पण मुलांना आवडतात.
११. उन्हाळ्यात मुलांना पाण्याच्या दोन बाटल्या द्याव्या लागतात. त्याऐवजी कधीतरी एकात लिंबाचं/कोकमाचं /आवळ्याचं सरबत किंवा ग्लुकॉन-डी टाकून पाणी द्यावं. पन्ह सुद्धा द्यायला हरकत नाही.
१२. वेगवेगळ्या भाज्यांचे कटलेट सुद्धा मुलांना फार आवडतात. सोबत ब्राऊन ब्रेडची स्लाइस दिली तर पूर्ण आहार होईल. सोबत कधीतरी एखादी चीज स्लाइस देखील चालेल.
१३. वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक कुकीज देता येतील.
१४. शाळेत पास्ता/नुडल्स द्यायची परवानगी असेल तर गव्हाचा पास्ता मिळतो तो आणावा. वेगवेगळ्या भाज्या घालून पास्ता/नुडल्स करता येतील.
१५. शाळेत चालत असेल तर उकडलेले अंड देता येईल.

असे असंख्य पर्याय आहेत. जेवढे आठवले तेवढे लिहिले. सुचेल तशी भर घालत राहीन.
तुम्हीही सुचवा. तुमच्या सूचना, टिप्स कमेंट मध्ये लिहून पाठवा.
(हा लेख misalpav.com वरील अनाहिताच्या बालदिन विशेषांकात प्रसिद्ध झाला आहे.) 

Thursday, September 3, 2015

Adai Dosa (अडाई डोसा)

अडाई डोसा पौष्टिक, प्रथिनयुक्त आणि लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. अडाई डोसा हा 'मिक्स डाळ डोसा' यापेक्षा वेगळा असतो कारण यात डाळीसह तांदूळ सुद्धा वापरतात.


Read this recipe in English.......click here.

साहित्य:
  • जाडा किंवा इडलीचा तांदूळ - 1½ कप
  • चणा डाळ- ½ कप
  • तूर डाळ - ¼ कप
  • उडीद डाळ- ¼ कप
  • मुग डाळ- ¼ कप
  • मसूर डाळ * - ¼ कप (ऐच्छिक)
  • मेथी दाणे * -  ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • कांदा किंवा मद्रासी छोटे कांदे, चिरून- 1 कप 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
  • कढीपत्ता, बारीक चिरून- 2 टेबलस्पून 
  • हिरवी मिरची, बारीक चिरून * - 2 टेबलस्पून (पर्यायी)
  • आले, किसून- 2 टेबलस्पून 
  • ओले खोबरे, खवलेले- 2 टीस्पून 
  • हिंग- ¼ टिस्पून
  • हळद * - ¼ चमचा (ऐच्छिक)
  • लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी)- 10 (किंवा मिरची पूड- 2 ते 3 टिस्पून)
  • खायचा सोडा- चिमूटभर (ऐच्छिक)
  • मीठ - चवीनुसार
  • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:
  • तांदूळ आणि सर्व डाळी धुवा. किमान 5 तास किंवा पूर्ण रात्रभर तांदूळ आणि डाळी  वेगवेगळ्या भिजत घाला. मेथी दाणे डाळीतच भिजायला टाका.
  • तांदूळ आणि लाल मिरच्या वाटून एक मोठ्या वाडग्यात काढा.
  • सर्व डाळी एकत्र जराश्या भरडसर वाटाव्या.  
  • वाटलेले तंदुलांनी डाळी एकत्र करा. 2 ते 5 तास पीठ आंबवण्यासाठी ठेवा किंवा वाटल्यावर लगेच डोसे केले तरी चालतात. पण थोड्यावेळ पीठ आंबवले तर डोसे हलके आणि रुचकर होतात.   
  • डोसे करायला घेण्यापूर्वी पीठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, खोबरं, हळद, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घालावा. ढवळुन मिक्स करावे. पीठ इडली सारखेच असावे. गरज असल्यास पाणी टाका.
  • तवा गरम करून आणि थोडे तेल पसरवा आणि पळीभर पीठ डोसा घाला. डोश्यापेक्षा जाड आणि उत्तप्यापेक्षा पातळ असा डोसा घालावा. 
  • डोश्याच्या बाजूने आणि वरून थोडे तेल सोडवे. मध्यम गॅस वर झाकण ठेवून १-२ मिनिट शिजवावे. मग डोसा पलटून आणि पुन्हा एक मिनिट शिजवावे.
  • टोमॅटो चटणी किंवा नारळाची हिरवी चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर हे डोसे गरमागरम सर्व्ह करा.

टिपा:
  • * असे चिन्हांकित केलेले साहित्य मुळ पाककृतीत नाहीत, मी चव वाढवण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते वगळले तरी चालेल.
  • डाळ-तांदूळ  वाटल्यावर लगेचच  डोसा करणार असाल तर बेकिंग सोडा वापरा,अन्यथा गरज नाही.  
  • जर चुकून पिठ पातळ झाले, तर बारीक रवा घाला. रवा घातल्यावर किमान अर्धा तास पिठात भिजला पाहिजे.
  • जाड डोसे आवडत नसतील तर पीठात थोडे पाणी घालून पातळ डोसे पण करता येतात.  
  • या डोश्याला 'पूर्णान्न' बनवण्यासाठी पीठात गाजर, कोबी, पातीचा कांदा, सिमला मिरची, पालक, शेवग्याची पाने किंवा शेपू सारख्या भाज्या घाला. चव तर वाढेलच सोबत पौष्टीकताही.  

Friday, December 5, 2014

Dudhi Muthiya (दुधी मुठीया)

दुधी मुठिया हा गुजराती पदार्थ अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.


Read this recipe in English, plz click here. 

साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा
गहू पीठ (कणिक)- १ कप
बारीक रवा - १ कप
बेसन- १ कप
आले- २ इंच
हिरव्या मिरच्या - 2
लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून
तीळ- १/२  टिस्पून
जिरे- १ टिस्पून
धणे पूड - १/२  टिस्पून
हळद - १/२  टिस्पून
हिंग - १/२  टिस्पून
बडीशेप- १/२  टिस्पून
लिंबू रस - २ टिस्पून
साखर- एक चिमूटभर
कोथिंबीर, चिरून- १/२  कप
खायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२  टिस्पून
मीठ-चवीप्रमाणे
तेल- २ टीस्पून

फोडणीसाठी:
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
कढीपत्ता- २ डहाळ्या
मोहोरी- १ टिस्पून
तिळ - २ टीस्पून
हिंग- १/४  टिस्पून

सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
दुधी किसून  आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.
दुधी, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ  परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. कणिक फार मऊ  नको आणि फार घट्टही  नको .
हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
स्टीलच्या चाळणीला  तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या. मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे.
वरून कोथिंबीर टाकुन सजवावे.  कैरीच्या किंव्हा नारळाच्या चटणी बरोबर गरम सर्व्ह करा.

Saturday, November 1, 2014

Tandul Ghavane (झटपट घावणे)

"घावणे" आमच्या कोकणात अतिशय लोकप्रिय आहेत. मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे हे घावणे न्याहारीला किव्हा जेवताना सुद्धा खाल्ले जातात. घावणे दोन प्रकारे केली जातात. रात्री तांदुळ भिजवुन सकाळी वाटुन त्याचे घावणे बनवायचे किंव्हा पुढे देत असलेल्या कृतीप्रमाणे तांदुळ पिठापासून झटपट घावणे बनवायचे.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • तांदुळाचे पीठ- १ कप (पीठ मध्यम रवाळ, सरसरीत असावे, फार बारीक दळू नये ) 
  • पाणी- १+ १/४ कप (थोडेफार कमी-जास्त पाणी लागेल, सरसरीत असावे) 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंव्हा साजूक तूप - आवश्यकतेनुसार 

सूचना :
  • जाडा तांदूळ धुवून सावलीत वाळत घाला आणि दळून आणा. त्यामुळे घावणे मऊ, हलके आणि पांढरे शुभ्र होतील शिवाय बिघडण्याची शक्यता कमी होईल.
  • घावण्यासाठी पीठ ताजेच हव, जुन्या, रया गेलेल्या पीठाचे घावणे करताना तुटतात. 

कृती:
  • पीठ, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे. सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. 
  • नॉन-स्टीक डोसा तवा किंव्हा बीडाची कावील/तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. वाटीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. 
  • कडेने थोडेसे तेल सोडावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा १-२ मिनिटे भाजावे. घावण डोश्यासारखे कुरकूरीत बनवू नका. 
  • गरम गरम घावणे नारळाची चटणी किंवा पिवळी सुकी बटाटा भाजीबरोबर मस्त लागतात. थंड झाले तरी चांगले लागतात. आम्ही नाश्ता मध्ये गूळ आणि तूपासोबत पण हे घावणे खातो. 
  • जेवणामध्ये मटण किंवा चिकन रश्यासोबत वाढतात. तसेच काळा वाटाणा किंव्हा चण्याच्या रश्यासोबत पण वाढतात. खरतरं हे कुठल्याही भाजीसोबत चांगले लागतात. 

टीपा:
  • चिमुटभर मेथी पूड टाकली तरी चालते, चांगली चव येते. 
  • ताक आणि मिरची घालून याचेच रुपांतर धिरड्यात होते. 

गोड पदार्थासाठी वापर: 
  • आमच्याकडे गणपतीत गौरी-शंकराला "घावण- घाटले" म्हणजेच  "घावणे- गुळवणी" याचा नैवेद्य दाखवला जातो. 
  • घाटले/ गुळवणी हे गूळ आणि नारळाचे दूध पासून बनवले जाते. बासुंदी सारखे दिसते. याची पाककृती मी नंतर देईन. 
  • उकडीच्या मोदकासाठी जसा आपण चव/सारण बनवतो, तो चव गरम घावण्यावर पसरून त्याची घडी घातली जाते. असे घावणे सुद्धा नैवेद्यात गोड पदार्थ म्हणून ठेवले जातात. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावणे बनवतात तेव्हा वरील जे प्रमाण दिले आहे त्यात १ टेबलस्पून गुळ टाकू शकता. त्यामुळे घावणे गोडसर लागतील. 
  • असे गोड पदार्थांसाठी जेंव्हा घावाने बनवतात तेव्हा तेलाऐवजी तूप आणि पाण्याऐवजी दुध किंव्हा नारळाचे दुध वापरले तर घावाने अजून रुचकर लागतील. 

Thursday, October 30, 2014

Jambhalya Kobicha Paratha (जांभळ्या कोबीचा पराठा)

मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी करावा लागणारा हा प्रकार …… 


Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • गहू पीठ- साधारण ३ कप  
  • जांभळा कोबी, बारीक चिरून किंवा किसून- २ कप (१ लहान आकाराचा कोबी) 
  • कांदा, बारीक चिरून- १ मध्यम 
  • हळद- १/४  टिस्पून 
  • हिंग- १/४  टिस्पून 
  • धणे पूड- १ टिस्पून 
  • तिळ- १ टिस्पून 
  • ओवा, खरडून- दिड टिस्पून 
  • जीरे - १ टिस्पून 
  • आले- 2 "तुकडा 
  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (आपल्या चवीनुसार) 
  • कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर 
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल किंवा बटर- २ टिस्पून + भाजण्यासाठी आवश्यकतेनुसार 

कृती: 
  • पाणी न घालता आले, हिरव्या मिरची आणि जिरे भरड वाटावे. 
  • परातीमध्ये कोबी, कांदा, आलं-मिरच्याचा ठेचा, कोथिंबीर, धणेपूड, हळद, हिंग आणि मीठ एकत्र. हाताने चुरून चांगले मिक्स करावे आणि ५ मिनीटे तसेच राहू द्यावे. मुरून पाणी सुटते.   
  • त्यात गव्हाचे पीठ, तिळ, ओवा घालावे आणि मिक्स करावे.  
  • त्यात २ टिस्पून गरम तेल (मोहन) टाका. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालुन मळून घ्यावे. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा. 
  • कणकेचे लहान गोळे करा.    
  • प्लास्टिकच्या कागदावर लाटा. लाटण्यासाठी प्लास्टिक कागद वापरल्याने जास्तीचे पीठ न वापरता पराठा लाटता येतो त्यामुळे भाजताना कमी तेल लागते. 
  • नॉन-स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. भाजताना कडेने थोडे थोडे तेल किंव्हा बटर सोडा. 
  • गरम गरम पराठा टोमॅटो केचप किंवा दही किंवा कोणत्याही लोणचे/चटणी बरोबर सर्व्ह करा. 

Tuesday, October 28, 2014

Tomato Omelette (टोमॅटो ऑम्लेट)

चटकदार आणि झटपट होणारा पदार्थ.……. 


साहित्य:
  • टोमॅटो, चिरून- ४ मोठे 
  • बेसन- १ कप 
  • तांदूळ पिठ- २ टेबलस्पून 
  • हिरव्या मिरच्या, चिरून- ३
  • लसूण पाकळ्या- ६
  • जिरे पूड- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • लाल मिरची पूड- १/२ टीस्पून 
  • मिरपूड - १/४ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप 
  • तेल- आवश्यकतेनुसार तळण्यासाठी 
  • बटर, टोमॅटो केचप, पुदीना चटणी - आवश्यकतेनुसार
  • ब्रेड स्लाइस- ६

कृती:
  • टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र मिक्सरमध्ये वाटा. पाणी वापरण्याची गरज नाही. पण गरज असल्यास, अगदी थोडेसे पाणी वापरा. 
  • या टोमॅटो रसात दोन्ही पीठे, हिंग, हळद, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड आणि मीठ घालून चांगले ढवळून मिक्स करावे. गुठळ्या राहू देवू नयेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
  • नॉनस्टीक तव्याला तेल लावून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस कमी करून एक डावभर मिश्रण तव्यावर घालून डावेनेच गोलाकार पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू भाजून खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू भाजावी. 
  • टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. (मुंबईला टोमॅटो ऑम्लेटबरोबर बटर लावलेला स्लाईस ब्रेड देतात, छान लागतो.)

Friday, September 26, 2014

Corn Dosa (मक्याचा डोसा)

डोश्याचा  एक आगळा-वेगळा प्रकार ……… मका नेहमी आपण भाजून किंवा उकडून खातो. फारफार तर काय भजी करतो. आता हे डोसे पण नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील.


Read this recipe in English........click here.

साहित्य:
  • मक्याचे दाणे- २ कप (४ कणसापासून)
  • बेसन- पाव कप
  • बारीक रवा-२ टेबलस्पून
  • हिरवी मिरची, बारीक कुटून- ३ ते ४
  • आले, बारीक किसून- अर्धा इंच
  • कोथिंबीर, बारीक चिरून- पाव कप
  • जिरेपूड - १ टिस्पून
  • हळद - १/४ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
  • खायचा सोडा- चिमूटभर
  • तेल-  तळण्यासाठी, आवश्यकतेनुसार 

कृती:
  • थोडे पाणी घालून मक्याचे दाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत.  
  • मक्याच्या पेस्टमध्ये सर्व उर्वरित साहित्य एकत्र करा व चांगले ढवळा. जरुरीनुसार पाणी घालावे. मिश्रण डोसा पिठासारखे हवे. (थोडी आंबट चव हवी असल्यास पाण्याऐवजी ताक वापरावे.)  
  • १५ ते २० मिनिटे मिश्रण तसेच राहू द्या. 
  • नॉन-स्टिक डोसा पॅन गरम करा आणि थोडे तेल तव्याला लावा.  
  • पॅनवर एक पळीभर मिश्रण घालावे आणि गोलाकर चमचा फिरवून त्याचा डोसा बनवावा. 
  • डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडावे आणि डोसा दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावा.  अश्याप्रकारे सर्व उर्वरित डोसे करून घ्यावेत. 
  • पुदिना चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर गरम डोसा सर्व्ह करा. 

Sunday, January 19, 2014

Upavasache Thalipeeth (उपवासाचे थालीपीठ)

झटपट होणारं खुसखुशीत चविष्ट उपासाच थालीपीठ, माझी मुलगी तर या थालीपीठासाठीच उपवास करायला तयार असते......  


Read this recipe in English..... click here. 

उपवासाची भाजणी :
साबुदाणा - १ किलो
वरी तांदूळ  - १ किलो
राजगिरा - ५०० ग्रॅम
जीरे - १०० ग्रॅम

साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.
जीरे न भाजताच घालावे.
सर्व जिन्नस एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक करावे किंवा गिरणीतून सरसरीत दळून आणावे.

उपवासाची भाजणी बाजारात पण मिळते.  त्यापासून तुम्ही उपवासाचा उपमा, वडे  बनऊ शकता. 
आता आपण यापासून थालीपीठ कसे बनवायचे ते पाहू ……….    

साहित्य:
  • उपवासाची भाजणी - १ १/२ कप 
  • उकडलेले बटाटे- २ मध्यम 
  • शेंगदाण्यांचा कूट- २ ते ४ टेबलस्पून 
  • मिरची पूड- १ टीस्पून 
  • साखर- १/२ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार 
  • पाणी किंव्हा ताक - १/२ कप 
  • तेल किंव्हा तूप तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार 

कृती:
उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
भाजणी, बटाटे, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
पाणी किंव्हा ताक घालून मळून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
नॉनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर  थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. 
दही किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते. 


Tuesday, November 12, 2013

Dudhi Parathe (दुधीचे पराठे)

दुधीची भाजी म्हटलं की अनेक जणांची नाके मुरडतात. पण दुधी सारखी पौष्टिक भाजी नाही. माझ्या मुलांना आणि त्यांच्या बाबांना सुध्दा ही भाजी  आवडत नाही. मग काय अशी हार  मानायची का? म्हणूनच त्यासाठी पराठ्यांचा पर्याय एकदम योग्य आहे. पौष्टिक आणि रुचकर असे हे पराठे ………….



साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा (साधारण किसल्यावर २ १/२ कप)
कणिक (गव्हाचे पीठ)- ३ कप 
बेसन- ४ टीस्पून 
हळद- १/२ टीस्पून 
हिंग- १/४ टीस्पून 
तीळ - २ टीस्पून 
हिरव्या  मिरचीचा ठेचा किंव्हा लाल मिरची पूड- २ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
जिरे पूड किव्हा खरडलेलं जिरे - १ टीस्पून 
आले-लसूण वाटण (पेस्ट)- २ टीस्पून 
चिरलेली कोथिंबीर- १/४ कप 
मीठ- चवीप्रमाणे 
मळण्यासाठी तेल-  २ टेबलस्पून 
भाजण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार  



कृती:

दुधी भोपळा बियांसकट किसून घ्यावा. त्याला सुटलेले पाणी फेकून देऊ नये, त्यामुळे जीवनसत्वे नष्ट होतात. 
एका  काचेच्या बाउलमध्ये  कीस , आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग घेऊन ते ३ मिनिटे मायक्रो-व्हेव करावे. 
किंव्हा प्यांमध्ये २ टीस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण वाटण, बेसन, हळद, हिंग  परतून दुधी चा कीस ३-४ मिनिटे  शिजवावा. नंतर बेसन घालून ढवळून ग्यास बंद करावा.

मिश्रण थंड झाल्यावर त्यात तीळ, मिरची पूड किव्हा ठेचा, कोथिंबीर व मीठ टाकावे.  छान एकत्र करून त्यात कणिक घालावे. जरूर वाटल्यास आणखी कणिक घालावयास हरकत नाही. पाणी अजिबात वापरू नये. तेल टाकून कणिक माळून घ्यावे. त्याचे सारख्या  बनवावे. 

लाटताना प्लास्टीक पेपर घेतल्यास पीठ  लागते, त्यामुळे भाजताना सुद्धा कमी तेल लागते. शिवाय पराठा लाटणे  जाते. 

तव्यावर दोन्ही बाजूंनी थोडे तेल लाऊन पराठे भाजून घ्यावेत. 
हे पराठे कच्च्या टोमाटोची चटणी, छुंदा, दही, चटणी, केचप किंव्हा  लोणचे ….  कश्याबारोबरही  छान लागतात.   






Sunday, July 28, 2013

Palak Mug Dosa (पालक मुग दलिया डोसा )

न्याहारी, मुलांच्या डब्यासाठी  छानसा आरोग्यदायी पदार्थ………  


Read this recipe in English........click here.

साहित्य:
सालवाली मुगडाळ- १/४ कप
दलिया (लापशी रवा)- १/४ कपबारीक रवा- १ टेबलस्पून
पालक, चिरून- १/४ कप
हिरवी मिरची- २ ते ३
लसुण पाकळ्या- २
जीरे- १/२ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १ टेबलस्पून
हिंग- चिमुटभर
तीळ- १ टीस्पून
खायचा सोडा - चिमुटभर
मीठ- चवीनुसार
तेल- आवश्यकतेनुसार


कृती:
मुगडाळ व दलिया धुऊन, रात्रभर किंव्हा किमान ४ तास पाण्यात वेगवेगळे भिजत घाला.
हि भिजलेली डाळ, पालकाची पाने, मिरची, लसुण, जीरे, साखर, दही आणि जरुरीनुसार पाणी एकत्र करून  मिक्सरवर वाटा. दलिया सुद्धा वाटून डाळीच्या मिश्रणात मिसळा.
त्या वाटलेल्या मिश्रणात रवा, हिंग, तीळ, सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. ते मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी तसच ठेवा म्हणजे रवा भिजेल.
डोसा तवा गरम करून थोडेसे तेल पसरवा. त्यावर डोसे करून घ्या.
नेहमीच्या डोश्याप्रमाणे  पातळ नको. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
टोमाटो केचप सोबत किंव्हा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत गरमागरम वाढा.

डाळीऐवजी अख्खे मुग वापरले तरी चालतील पण रात्रभर भिजवावे लागतील. 

Thursday, July 18, 2013

Sabudana-Variche Ghavan (साबुदाणा आणि वरीचे घावन)

उपवासासाठी उत्तम आणि पोटभरीचा पदार्थ.......... 


Read this recipe in English.......

साहित्य:
वरी तांदूळ- १ कप
साबुदाणे - १/२ कप
उकडलेला बटाटा- १ मोठा
मिरच्या - ३ ते ४
जीरे - १ टीस्पून
खवलेल ओल खोबर-२ टेबलस्पून  (ऐच्छिक )
मीठ- चवीनुसार
तेल किंव्हा साजूक तूप- जरुरीनुसार
पाणी- जरुरीनुसार

कृती:
साबुदाणे आणि वरी धूऊन  वेगवेगळे भिजत घाला. पूर्ण बुडतील एवढ पाणी त्यात ठेवा. रात्रभर किंव्हा ४-५ तास तरी भिजू द्या.
वरी, मिरच्या, जीरे आणि ओल खोबर मिक्सरवर बारीक वाटून घ्या. साबुदाणे पण बारीक वाटून घ्या. उकडलेला बटाटा सोलून, किसणीवर किसून घ्या.
वरील वरी , साबुदाणा चे वाटलेले मिश्रण आणि किसलेला बटाटा, चवीनुसार मीठ टाका. मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. डोश्याच्या पिठापेक्षा थोड घट्ट हव.
नॉन-स्टिक तवा तापऊन थोडे तेल किंव्हा तूप घालून घावन करून घ्या.
काकडीच्या किंव्हा उपवासाच्या कोणत्याही चटणीसोबत गरमागरम वाढा.

वरील मिश्रणात बटाटा घातला नाही तरी चालतो. पण मग ते घावन लगेचच खावे लागतात.  कारण नंतर ते चिवट किंव्हा कडक होतात. बटाट्यामुळे मऊ  राहतात. त्यामुळे डब्यात किंव्हा प्रवासाला सोबत नेऊ शकतो.





Monday, July 15, 2013

Thalipeeth (थालीपीठ)

थालीपीठ हा पदार्थ परिपूर्ण आहार आहे. मराठी माणसास त्याविषयी अधिक सांगणे न लगे. मी हा आपला पारंपारिक पदार्थ अधिक पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.




Read this recipe in English..........

साहित्य:
भाजणी - १ कप
कापलेला कांदा- १ कप (१ मोठा)
मिरची पूड किंव्हा घरगुती मसाला - १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तीळ - १ टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप (किंव्हा आवडीप्रमाणे)
मीठ चवीप्रमाणे
तेल- आवश्यकतेनुसार
पाणी- १/४ कप

कृती:
एका परातीत कांदा, कोथिम्बिर, मिरची पूड, हळद, हिंग, तीळ व मीठ एकत्र करावे व हाताने हलकेसे चुरून घ्यावे.
त्यात भाजणी आणि पाणी टाकून मळून  घ्यावे. त्याचे ४ समान भाग करावेत.
एक स्वच्छ कपडा ओला करून घ्यावा. तो पोळपाटावर पसरून त्यावर गोल ठेऊन थापून घ्यावा. तेल सोडण्यासाठी भोक पडवीत. कपड्यासकट उचलून तेल लावलेल्या गरम तव्यावर टाकावा. शक्यतो नॉन-स्टीक तव वापरावा, तेल कमी लागत.
किंव्हा थंड तव्यावर थापून, तेल सोडून तवा ग्यासवर ठेवावा. भोकामध्ये व बाजूनी तेल सोडून थालीपीठ खमंग भाजून घ्यावे.
घराच्या लोण्यासोबत गरमागरम थालीपीठाची मजा काही न्यारीच असते.
मस्त घट्ट दही किंव्हा टोमाटो केचप सोबत वाढा.



Thursday, June 13, 2013

Egg Dosa (अंड्याचे घावन )

हा मसालेदार डोसा/घावन  खूपच रुचकर आणि किस्पी होतो. ह्यात अंड असल्यामुळे यशाची खात्री १०० % अजिबात मोडणार नाही.  


Read this recipe in English.....

साहित्य:

  • अंडी-२
  • तांदुळाचे पीठ- १ कप
  • बारीक चिरलेला कांदा- १/२ कप
  • बारीक चिरलेला टोमाटो - १/४ कप
  • बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
  • आल-लसुन पेस्ट- १ टीस्पून
  • हिरवी मिरची ठेचा- १ टीस्पून किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे
  • हळद- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • पाणी- अंदाजे १ कप
  • मीठ आणि मिरपूड -चवीप्रमाणे
  • तेल- आवश्यतेनुसार


कृती:

  • कांदा आणि टोमाटो फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेतलत तर छान बारीक होईल आणि मिळून येईल.
  • एका बाउल मध्ये पाणी व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा. पाणी लागेल तसे हळूहळू घाला.
  • व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण डोश्यासारख सरसरीत झाल पाहिजे. मिश्रण डोश्यापेक्षा थोडं पातळ चालेल. 
  • डोसा तवा गरम करून थोड तेल पसरवा. वाटीत मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओता. जास्त जाडसर करू नका. झाकण ठेऊन १-२ मिनिटे शिजू द्या.
  • उलटून घ्या. छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या .
  • गरमागरम घावणे केचप बरोबर वाढा.
  • चिकन किंव्हा कोलंबीच्या करी सोबत पण छान लागतात .


Saturday, May 25, 2013

Palak Oats Uttapa (पालक ओटस उत्तपा)

आम्हा आयांना ही नेहमीच चिंता असते कि मुलांना ओटस आणि पालक सारख्या पालेभाज्या कश्या खाऊ घालाव्या. मला वाटते कि हा त्यावरील एक उपाय आहे. शिवाय हा एक हेल्दी नाश्ता आहे.


Read this recipe in English.... click here.

साहित्य:
चिरलेला पालक - १ कप
चिरलेला कांदा- १/२ कप
ओटस- १ कप
बारीक रवा- १ कप
लसूण आणि मिरची ठेचा - ३ ते ४ टीस्पून
जिरे पावडर- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
साखर- १/२ टीस्पून
दही- १/४ कप
खाण्याचा सोडा- चिमुटभर
पाणी- अंदाजे २ कप
मीठ चवीप्रमाणे
तळ्ण्यासाठी तेल

कृती:
एका बाउल मध्ये ओटस  आणि रवा गयाव. त्यात दही व पाणी घालून चांगले फेटावे. या एवजी २ कप आंबट ताक सुद्धा चालेल.
ते मिश्रण एक तासासाठी तसेच ठेवावे. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे. चांगले फेटून घ्यावे.
तव गरम करून त्यावर थोडे तेल घालावे. वरील मिश्रणाचे उत्तपे घालावे. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
टोमतो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.

ह्या मिश्रणाचे तुम्ही अप्पे सुद्धा करू शकता.
ह्यामध्ये पालक एवजी दुसऱ्या तुमच्या आवडीच्या भाज्या वापरता येतील.
लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक छान आणि झटपट प्रकार आहे.