Showing posts with label भाताचे प्रकार. Show all posts
Showing posts with label भाताचे प्रकार. Show all posts

Thursday, April 21, 2016

Chitrann (चित्रान्न ~ कैरी भात)

चैत्र महिन्यातील खासीयत असलेल्या चित्रान्न या पदार्थाचे मुळ कर्नाटकात असले तरी हा भात महाराष्ट्राच्या सीमावर्तीय भागातही बनवला जातो. दाक्षिणात्य 'लेमन राइस' च्या चवीशी साधर्म्य असणारा हा भाताचा एक प्रकार आहे. यासाठी शिळा भातही चालेल.

   


Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • शिजलेला मोकळा भात- ३ कप (बासमती वापरण्याची गरज नाही, मी रोजच्या वापरातील 'कोलम' तांदुळ वापरला आहे. )  
  • कैरीचा कीस- १/२  ते १ कप 
  • खवलेले ओले खोबरे- १/४  कप 
  • हिरव्या मिरच्या, चिरून- २ ते ३
  • कढीपत्ता- १ डहाळी 
  • शेंगदाणे- मुठभर 
  • काजू तुकडे- १ टेबलस्पून (ऐच्छिक) 
  • चणाडाळ- १ टेबलस्पून 
  • उडीद डाळ- १ टीस्पून 
  • लाल सुक्या मिरच्या, तोडून- २
  • मोहरी- १ टीस्पून 
  • हिंग- १/४  टीस्पून 
  • हळद- १/२  टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • साखर- चिमुटभर (ऐच्छिक) 
  • तेल- २  टेबलस्पून 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४  कप 

कृती:
  • सडसडीत भात शिजवून घ्यावा. थंड झाल्यावर हलक्या हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात भाताच्या प्रमाणात मीठ घालून मिसळून घ्यावा.  
  • कढईत तेल गरम करावे. तेलात शेंगदाणे आणि काजू खरपुस तळून घ्यावेत. झाऱ्याने बाहेर काढून भातावर टाकावेत. 
  • त्याच तेलात मोहरी टाकावी, ती तडतडली की चणाडाळ व उडीदडाळ टाकून सोनेरी तपकिरी रंगावर तळून घ्यावी. 
  • त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे व कडीपत्ता टाकून जरासे परतावेत. 
  • त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि हिंग घालून जरासे परतावे. 
  • आता त्यात हळद, कैरीचा किस, साखर व जरास मीठ घालुन ३-४ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. 
  • त्यात खवलेले खोबरे घालून पुन्हा जरावेळ परतावे. 
  • आता त्यात शेंगदाणे व काजू घातलेला भात टाकून चांगला मिसळून घ्यावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी. 
  • नंतर त्यात कोथिंबीर टाकुन पुन्हा एकदा जरासा परतून घ्यावा. 
  • चित्रान्न तयार आहे. भात पापडासोबत वाढावा.        

टीपा:
  • मला स्व:ताला फारसे आंबट आवडत नाही त्यामुळे मी १/४  कप एवढाच कैरीचा किस वापरते. तुम्ही सुद्धा तुमच्या आंबटपणाच्या आवडीवर किसाचे प्रमाण ठरवा. 
  • कैरी आधीच चाखून बघा म्हणजे ती किती आंबट आहे हे कळेल, त्यावरून किसाचे प्रमाण ठरवा. 
  • भात फोडणीला घालताना तो पुरेसा थंड झाला असावा. 
  • शिळा भात संपवण्याचा एक रुचकर उपाय.
  • साखर जास्त घालू नका. हा साखरभात नाही.       
  • बदल म्हणून भाताऐवजी पोहे वापरावे. कांदे पोह्याला जसे पोहे भिजवतो तसे भिजवून वर सांगितलेली फोडणी करावी.       


Friday, August 28, 2015

Narali Bhat (नारळी भात)

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे नेहमी एकाच दिवशी असतं. नारळी पौर्णिमा आली की प्रथम आठवतो तो नारळी भात. कोळी लोकं हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. कोकणात या दिवशी समुदात नारळ अर्पण करून पावसामुळे खवळलेल्या समुदास शांत करतात. कारण नारळ म्हणजे की शीत, सर्वांना शांत करणारा. नारळाचं दूध शरीरास खूप थंड असतं. काही वेळेला नारळीभात एक गोड पदार्थ जेवणात असावा म्हणून पण बनवला जातो.


Read this recipe in English......click here. 

साहित्य:
  • जुना तांदूळ (बासमती तुकडा किंवा आंबेमोहर) - १ कप 
  • पाणी- २+ १/४  कप (तांदूळ नवा असेल तर पाणी कमी वापरा.)   
  • साजूक तूप- ३ ते ४ टेबलस्पून 
  • लवंगा- ४
  • वेलची पूड- १/२  टीस्पून 
  • जायफळ पूड- १/२  टीस्पून 
  • गूळ, किसलेला- ३/४ कप ते १ कप 
  • ओले खोबरे, खोवलेले- २  कप  (१ मोठा नारळ) 
  • काजू, तुकडे करून- १/४ कप  
  • मनुका/बेदाणे (पिवळे किंवा काळे) - २ टेबलस्पून
  • केशर- चिमुटभर (ऐच्छिक) 
  • मीठ- चिमुटभर 

कृती:
  • तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत अर्धा ते एक तास निथळत ठेवावेत.
  • पातेल्यात २ टेबलस्पून तूप गरम करून लवंगा घालून काही सेकंद परता. 
  • निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परता.
  • तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर पाणी गरम करत ठेवा.  
  • गरम पाणी परतलेल्या तांदूळावर घाला. मीठ घालून ढवळून घ्या.  
  • पातेल्यावर झाकण ठेवून भात शिजवावा. भात शिजला की हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
  • भात शिजत असताना खोबरे, वेलची-जायफळ पूड आणि गूळ एकत्र  करावे. हलक्या हाताने चुरून घ्यावे.  
  • परतीतील भात कोमट असतानाच खोबऱ्याचे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
  • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या कढईत/भांड्यात तूप गरम करून काजू सोनेरी रंगावर तळून घ्यावे. मनुका टाकून जराश्या परताव्यात. 
  • लगेच आच मंद करून त्यात भात घाला. झाकण ठेवून साधारण १० ते १५ मिनीटे शिजवा. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. भांड्याखाली तवा ठेवल्यास करपण्याची भीती राहत नाही. आणि हळूहळू शिजल्यामुळे गुळ भातात चांगला मुरतो. 
  • सुरूवातीला भात पातळ होईल आणि काही वेळाने आळू लागेल.  
  • भात आळला की गॅस बंद करावा. झाकण ठेवून १५ मिनिटे तसाच ठेवावा. भात खुप कोरडा करू नये. थोडा आसट/ मऊ भात चांगला लागतो. फडफडीत/मोकळा भात चांगला लागत नाही.      

टीपा:
  •  मी भात करताना केमिकल विरहित नॅचरल गुळ वापरला आहे. हा गुळ गडद तपकिरी असतो. म्हणून भाताला तपकिरी रंग आला आहे. तुम्ही नेहमीचा पिवळा गुळ वापरू शकता.    
  • तुम्हाला जसे गोड आवडते त्या प्रमाणात गूळाचे प्रमाण पाऊण कप ते १ कप ठेवा.
  • तांदूळ पूर्णपणे शिजला पाहिजे. अन्यथा भात जर कमी शिजला असेल तर गुळ टाकल्यावर परतला तरी नंतर शिजत नाही. 
  • भात आळला की  नंतर शिजवू नये . भातातल्या गुळाचा पाक नंतर घट्ट होवू लागतो. त्यामुळे भात कडकडीत होतो. 
  • गुळाऐवजी तेवढीच साखर वापरू शकता. किंवा मग अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरा. 
  • विशेष करून साखर वापरल्यास भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो. चिमुटभर केशरी रंग टाकला तरी चालेल.  

दुसरी पद्दत:-
  • एका मोठ्या नारळाचे दुध काढावे.  (२ कप दुध हवे, तेवढे नसल्यास थोडे पाणी वाढवावे.) 
  • तांदूळ धुऊन निथळत ठेवून द्यावेत. 
  • नॉन-स्टिक किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा, काजू परतून घ्यावेत. 
  • त्यातच तांदूळ टाकून थोडेसे परतवून घ्यावेत. 
  • त्यावर नारळाचं दूध व मीठ टाकून हलवावं.  
  • मंद गॅसवर भात शिजू द्यावा. 
  • भात पूर्ण शिजल्यावर त्यात किसलेला गूळ, केशर, मनुका, वेलची-जायफळ पूड टाकून मंद गॅसवर ठेवून मिश्रण हलवत राहावं. 
  • गूळ विरघळल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. 
  • भात आळला कि  गॅस बंद करावा.  


Thursday, May 21, 2015

Palak Khichadi (पालक खिचडी)

पालक खिचडी रात्रीच्या जेवणासाठी अगदी योग्य पर्याय आहे. बनवायला सोप्पी, पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम…



Read this recipe in English.......click here. 


साहित्य:
  • तांदूळ - १ कप (बासमती घेण्याची गरज नाही, रोजच्या वापरातला किंव्हा कोलम तांदूळ वापरावा) 
  • मुगडाळ- १/२ कप 
  • शेंगदाणे- १/४ कप (आवडत असल्यास अजून जास्त वापरा) 
  • पालक, चिरून- ३ कप (१ छोटी गड्डी/जुडी)
  • कांदा, चिरून- ३/४ कप (१ मोठा)
  • टोमॅटो, चिरून- १/२ कप (१ मध्यम)
  • लसूण, ठेचुन किंवा बारीक चिरून- ६ पाकळ्या
  • राई/ मोहरी- १/२ टीस्पून 
  • जीरे- १/२ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • हळद- १/२ टीस्पून 
  • घरगुती मसाला / मिरची पूड- २ टीस्पून 
  • गोडा मसाला- २ टीस्पून 
  • तेल- ३ टेबलस्पून
  • गरम पाणी- अंदाजे २  १/२ ते ३ कप (तांदूळ नवा आहे कि जुना यावर अवलंबुन आहे.) 
  • मीठ- चवीनुसार 
  • खवलेले ओले खोबरे- १/२ कप
  • साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक) 

कृती:
  • किमान १ तास शेंगदाणे पाण्यात भिजत घाला. 
  • पालक निवडुन धुवून आणि चिरून घ्या. कोवळी देठे घ्या.
  • तांदूळ व मूगडाळ धुवून आणि बाजूला ठेवा.
  • कुकरमध्ये तेल गरम करा. राई टाका.
  • राई तडतडली की जिरे, लसूण आणि कांदा घालून परता.
  • कांदा गुलाबी झाल्यावर  हळद, हिंग, तिखट घाला आणि थोडावेळ परता.
  • आता टोमॅटो, पालक, शेंगदाणे आणि गोड मसाला घालून एक मिनीट परतून घ्या.
  • तांदूळ आणि डाळ घालून जरास परता. 
  • नंतर पाणी आणि मीठ घाला. झाकण लावून ३ शिट्ट्या काढा.
  • वाफ गेल्यावर कुकर उघडा आणि व्यवस्थित मिक्स करा. 
  • वाढताना भातावर साजूक तूप आणि ओले खोबरे टाकून कोशिंबीर व पापडाबरोबर सर्व्ह करा.

टीप: पालका ऐवजी मेथी वापरू शकता.


Wednesday, February 25, 2015

Sodyachi Khichadi (सोड्याची खिचडी /सोडे भात)

सोड्याची खिचडी किंव्हा सोडे भात कोकणात अतिशय लोकप्रिय आहे. सी. के. पी. लोकांची तर यात खासियत आहे. 



Read this recipe in English.... click here. 

वाढणी: ४
साहित्य:
  • सोडे - १/२  कप
  • तेल-  ४ ते ६  टेबलस्पून 
  • तांदूळ - २ कप (बासमती तांदूळ वापरण्याची गरज नाही, मी कोलम तांदूळ वापरते. )
  • कांदा, उभा चिरून- २ कप 
  • टोमॅटो, बारीक चिरून- १ कप
  • बटाटा- १ मोठा 
  • दालचिनी- १ इंचाचा तुकडा
  • तमालपत्र- ३
  • आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
  • हळद - १/२ टिस्पून
  • हिंग- १/२ टिस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ४ ते ५ टिस्पून 
  • ओल्या नारळाचे वाटण- २ टेबल स्पून (नाही वापरले तरी चालेल)
  • मीठ- चवीनुसार 
  • पाणी - ४ कप (तांदूळ जुना आहे की नवा यावर अवलंबून असते)
  • अंडी, उकडलेली - २
  • कोथिंबीर, बारीक चिरून - मुठभर 

कृती:
  • सोड्याचे हातानेच तोडून लहान तुकडे करा.  
  • व्यवस्थित धुवून आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवा आणि नंतर घट्ट पिळून घ्या.
  • तांदूळ धुवून बाजूला निथळत ठेवा. 
  • बटाटा सोलुन त्याचे  साधारण १ इंच लांबीचे तुकडे करा.
  • एका छोट्या कुकर मध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी आणि कांदा घालावा.
  • कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जरास परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परता आणि भिजवून पिळुन घेतलेले सोडे घालून १ मिनिट परता.
  • नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. 
  • आता टोमॅटो, बटाटा घाला आणि २ मिनिटे चांगले परता.
  • नंतर तांदूळ घालून एक मिनिटभर परता.
  • पाणी आणि मीठ घाला. (नुसतेच पाणी वापरण्याऐवजी अर्धे पाणी आणि अर्धे नारळाचे दुध वापरले तर अजून मस्त चव येते.) चांगले मिक्स करावे आणि झाकण लावून कुकर बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या घ्या. (कुकरच्या बाहेरही करता येईल, गरम पाणी वापरलेत तर भात चांगला मोकळा व लवकर शिजेल. साधारण भात शिजायला १५ ते ते २० मिनिटे लागतील.) 
  • वाढताना वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. कोशिंबीर आणि उकडलेल्या अंड्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. सोबत सोलकढी उत्तम लागते.  

टीप:
सोडे म्हणजे उन्हात सुकवलेली कोलंबी. कोकणात अनेक पदार्थात सोडे वापरले जातात. अधिक माहितीसाठी "सुकी मासळी" इथे क्लिक करा. 

Wednesday, October 29, 2014

Kolambi Bhat (कोलंबी भात / कोलंबीची खिचडी / कोलंबी पुलाव)

कोकणातील पारंपारिक, लोकप्रिय आणि अत्यंत रुचकर असा हा भात……… 


Read this recipe in English..........click here. 

साहित्य:
सोललेल्या कोलंब्या- १ कप
बासमती तांदूळ (कोलम पण चालेल)- २ कप
कांदा, उभा चिरून- २ मध्यम
टोमॅटो, चिरून- २ मोठे
आलं-लसूण पेस्ट- १ टेबलस्पून
घरगुती मसाला / मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून किंव्हा (२ टीस्पून लाल तिखट + १ टीस्पून गरम मसाला)
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
लिंबू रस- १ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
साजुक तूप- १ टेबलस्पून
शहाजिरे - १ टीस्पून
तमालपत्र- ३
बाद्यान/चाक्रीफुल- २
मसाला वेलची- २
काळीमिरी- ८
लवंग- ५
दालचिनी- २ इंचाचा तुकडा
नारळाचे दुध- १ कप
गरम पाणी- ३ कप
कोथिंबीर- १/४ कप
तळलेला कांदा-१ कप (ऐच्छिक)


कृती:
  • कोळंबी सोलून तिचा मधला धागा काढावा. व्यवस्थित धुवून घ्यावी. तिला थोडेसे मीठ, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिंग, मसाला व लिंबू रस चोळून अर्धा तास मुरत ठेवावी. 
  • तांदूळ धुवून ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून निथळत ठेवा.  
  • पातेल्यात तेल गरम करा. अख्खे/खडे  मसाले फोडणीला घाला. 
  • त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
  • कांदा परतुन झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परता आणि मऊ होईपर्यंत शिजवा. 
  • मुरत ठेवलेली कोलंबी घालून परता. 
  • तांदूळ घालून २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाला की गरम पाणी घाला. 
  • एका उकळी आली की नारळाचे दुध, तूप व गरजेनुसार मीठ घाला. 
  • हलक्या हाताने ढवळून घट्ट झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवा. भातातले पाणी कमी झाल्यावर मंद आचेवर मुरु द्या.
  • तळलेला कांदा व कोथिंबीर पेरून गरम गरम सर्व्ह करा.

टीप : 
  • मोठ्या कोलंबी पेक्षा लहान कोलंबी या भातात चांगली लागते. 
  • नारळाचे दुध नसेल तर पूर्ण पाणी वापरले तरी चालेल. (म्हणजे २ कप तांदूळ = ४ कप पाणी)   


Saturday, April 5, 2014

Dahi Butti/ Dahi Bhat (दही बुत्ती/दही भात)

दही बुत्ती/दही भात उन्हाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाला गारवा मिळतो. झटपट होणारा हा भाताचा प्रकार रुचकर आणि पोटभरीचा आहे.


Read this recipe in English......... click here. 


साहित्य:
  • तांदूळ- १ कप 
  • दही- १ १/२ कप (दही शीळे व फार आंबट नको) 
  • काकडी- १ (ऐच्छिक) 
  • शेंगदाणे- २ टेबलस्पून (ऐच्छिक) 
  • तेल- १ टेबलस्पून 
  • मोहरी- १ टीस्पून 
  • कढीपत्ता पाने- १ डहाळी 
  • सुक्या लाल मिरच्या- २ ते ३ 
  • उडीद डाळ- १ टीस्पून 
  • हिंग- १/४ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार 

कृती:
  • भात शिजवून घ्यावा. एका ताटात काढून पसरावा म्हणजे लवकर थंड होईल. 
  • भात थंड झाला की त्यात दही आणि मीठ घाला. ढवळून एकत्र करून घ्या. 
  • काकडीचे छोटे तुकडे करून घ्या. 
  • कढल्यात तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावेत. हे शेंगदाणे व काकडीचे तुकडे दही घातलेल्या भातावर पसरावेत. 
  • त्याच गरम तेलात उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली की त्यात कढीपत्ता, सुक्या मिरच्या तोडून घालाव्यात. सगळ्यात शेवटी हिंग घालून गॅस बंद करावा आणि हि फोडणी दही-भातावर घालावी. 
  • छान एकत्र करून वाढावे. 

सुचना आणि वैविधता :
  • भात गरम असताना भातात दही मिसळू नये. 
  • तुम्हाला भात जर मऊ व गुरगुट्या आवडत असेल तर त्यात १/४ कप थंड दुध घालावे. 
  • भात अजून चटपटीत बनवायचा असेल तर भातात बारीक किसलेले आले मिसळावे. 
  • कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जीरे असे एकत्र वाटून दह्यात फेटावे आणि भातात घालावे, छान चव येते. 
  • सुक्या मिरच्यांऐवजी सांडगी मिरच्या (भरून सुकवलेल्या) फोडणीत टाकाव्यात. भात खाताना वरून कुस्करून टाकाव्यात, भाताला छान खमंगपणा येतो. 
  • काकडी ऐवजी किंव्हा सोबत काळी/हिरवी द्राक्षे किंव्हा डाळिंबाचे दाणे भातात टाकावेत. पांढरा कांदा पण चिरून घालता येईल. पण मग अशी फळे किंव्हा भाज्या घातलेला भात लगेचच संपवावा. अन्यथा भाताला पाणी सुटेल व कडवटपणा येईल. 



Thursday, October 24, 2013

Masalebhat (मसालेभात)

लग्नासारखे शुभ समारंभ असले कि  मसालेभात हा हवाच. कोशिंबीर, चटणी, पापड, पुरी-भाजी, भजी, जिलेबी आणि मठ्ठा … या शिवाय बेत अपुरा आहे नाही !



Read this recipe in English.......click here.

साहित्य:
बासमती किंव्हा आंबेमोहर तांदूळ - १ १/२ कप  (उत्तम प्रतीचा जुना तांदूळ वापरावा, कोलम पण चालेल.)
मटार - १/२ कप
फ्लॉवरचे तुरे- १/२ कप
तोंडली,  चिरून - १/४ कप
वांग, उभ चिरून- १/४ कप
गाजर, सोलून आणि तुकडे करून- १/४ कप
फरसबी- तुकडे करून- १/४ कप
भिजवलेले शेंगदाणे- १/४ कप
काजू तुकडा- १/४ कप
मनुका- १ टेबलस्पून
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
कडीपत्ता- १ डहाळी
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
गरम पाणी- ३ ते ३ १/४ कप
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
खवलेले ओले खोबरे- १/२ कप
साजूक तूप- जरुरीनुसार

काळा मसाला-
खिसलेले  सुके खोबरे - १ टेबलस्पून
तीळ - १ टेबलस्पून
लवंग- ४
जीरे - २ टीस्पून
मसाला वेलची- २
दालचीनी- २ इंचाचे तुकडे
सुक्या लाल  मिरच्या - ३ ते  ४

(वरील सर्व जिन्नस थोड्याश्या तेलावर खमंग भाजून घ्यावेत. आणि मिक्सरमध्ये दळून घ्यावेत. मिरची ब्याडगी वापरली आहे. जर काळा मसाला करायला वेळ नसेल तर १ ते १ १/२ टीस्पून मिरची पूड + २ टीस्पून गोडा मसाला  वापरावा, चवीत फारसा फरक पडत नाही. मी सुद्धा बहुधा असाच वापरते. )

कृती:
तांदूळ आणि सर्व भाज्या धुउन  बाजूला ठेवाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. ती तडतडली की काजू, कडीपत्ता, हळद, हिंग टाकावा. सर्व भाज्या, शेंगदाणे, मनुका टाकून मिनिटभर परतून घ्याव्यात. नंतर त्यात तांदूळ, काळा मसाला आणि मीठ टाकून छान एकत्र करून जरा वेळ परतून घ्यावे. नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन मंद आचेवर भात शिजवावा.  मधेमधे हलक्या हाताने भात हलवावा.
हा भात प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येतो.
वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. गरमागरम भात मठ्ठ्या बरोबर वाढावा .


Saturday, August 24, 2013

Mugdal Khichadi (मुगडाळ खिचडी)

आजारी असताना, विशेषकरून  ताप आला असेल किंव्हा पोट बिघडलं असेल. जेवण करायचा कंटाळा आला असेल किंव्हा खूप थकवा आला असेल अश्या वेळी पटकन होणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे हि खिचडी. लहान मुलांना सुद्धा भरवण्यासाठी एकदम उत्तम.


साहित्य: 
 तांदुळ- १/२  कप
 मूग डाळ- १/४ कप
जीरे- १ टीस्पून
काळी मिरी- २ ते ४ (ऐच्छिक )
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
पाणी- ३ ते ४ कप (मी इथे ३ कप वापरले आहे, ज्याप्रमाणात खिचडी पातळ व मऊ हवी आहे तसे वापरावे )
साजूक तूप - १ टीस्पून + वरून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार 
कृती:
डाळ-तांदूळ स्वच्छ धुउन, आवश्यक पाण्यात भिजत ठेवावेत. पाणी मोजून घेतल्यास तेच पाणी खिचडी बनवताना वापरता येते.

कुकरमध्ये तूप गरम करून मिरी व जीरे जरासे परतावे.  मग हिंग, डाळ-तांदुळ, पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून गॅसवर ठेवावा.
३-४ शिट्टया  झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा. कुकर उघडल्यावर रवीने थोडेसे खिचडीला घाटावे. आजारी माणसाना व लहान मुलांना खायला सोपे जाते.  गुजराती पद्धतीत खिचडीला अस थोडं घाटल जाते. आवडत नसेल तर नाही घाटले तरी चालेल.

खिचडी फार पातळ व मऊ नको असेल तर फक्त १ १/२ कप पाणी वापरावे.


ही गरमागरम खिचडी भरपूर तूप घालून लोणचे किंवा लिंबाच्या फोडीसोबत सोबत खावी. जोडीला कढी आणि पापड असेल तर सोने पे सुहागा ! काय ?

Monday, April 29, 2013

मोडाच्या मुगाचा भात

मोड आलेल्या मुगाची उसळ किंव्हा आमटीच आपण करतो. पण हा भात सुद्धा छान लागतो.




Read this recipe in English....... click here.


साहित्य:
  • शिजवलेला (किंव्हा शिळा) भात - १ कप
  • उकडलेले मोडाचे मुग- १/२ कप
  • चिरलेला कांदा- १/२ कप
  • चिरलेली सिमला मिरची - १/४ कप
  • जिरे- १/२ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • लाल मिरची पूड- १ टीस्पून
  • गरम मसाला- १/२ टीस्पून
  • तेल- २ टेबलस्पून
  • मीठ चवीप्रमाणे
  • कोथिंबीर आणि टोमाटो चकत्या सजावटीसाठी


कृती:
  • भाताची शीते हलक्या हाताने मोकळी करून घ्यावी. 
  • एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, शिमला मिरची, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, मिरची पूड, मुग टाकून १-२ मिनिट परतून घ्यावा. त्यात भात आणि मीठ टाकून छान एकत्र करून झाकण लाऊन एक वाफ द्यावी. 
  • कोथिम्बिर आणि टोमाटोने सजून गरमागरम वाढा.

Monday, April 22, 2013

Valachi Khichadi (वालाची खिचडी / डाळींब्यांचा भात )

ही खिचडी आमच्या कोकणात फार लोकप्रीय आहे.  खरतरं ही फक्त नावानेच  खिचडी आहे, आहे हा बिरड्याचा (वालाचा) मसालेभात … एकदा नक्की बनवा, नक्कीच पुन्हा पुन्हा बनवत राहाल.



Read this recipe in English.......

साहित्य:
  • उत्तम प्रतीचा जुना तांदूळ - २ कप (बासमती घेण्याची गरज नाही, आंबेमोहर किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
  • मोड आणून सोललेले वाल- १ १/२  ते २ कप
  • चिरलेला कांदा- २ कप
  • चिरलेला टोमाटो- १ कप
  • ठेचलेला लसूण- १ टेबलस्पून (या भातासाठी आले अजिबात वापरू नका. आल्याची चव बिरड्याची चव घालवतो)
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • जीरे- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला / मिरची पूड- ४ ते ५ टीस्पून
  • गोडा मसाला- २ टीस्पून
  • खिसलेला गूळ- १/४ टीस्पून किंव्हा चिमुटभर (एच्छिक)
  • तेल- ५ ते ६ टेबलस्पून
  • गरम पाणी- ४ ते ४  १/४ कप (खास कोकणी चवीसाठी नारळाच दुध २ कप + पाणी २  १/४ कप वापरा)
  • मीठ चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
  • खवलेले ओले खोबरे- १/४  कप (नारळाचे दुध वापरणार असाल तर खोबरे वापरण्याची गरज नाही. ) 
  • साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक)

कृती:
  • तांदूळ आणि वाल धुउन  बाजूला ठेवावेत.
  • एका जड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. 
  • ती तडतडली कि जीरे, लसूण, कांदा टाकावा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
  • नंतर त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जर परतावा. 
  • त्यात वाल, टोमाटो आणि १/४ कप खोबरे आणि गोडा मसाला टाकून मिनिटभर परतून घ्यावा. 
  • नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जर वेळ परतून घ्यावे. 
  • नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन भात शिजवावा. 
  • नंतर त्यात गूळ टाकून हलक्या हाताने हलउन छान एकत्र करून २ वाफा काढाव्यात. खिचडी तयार.
  • ही खिचडी प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येते.
  • वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. 
  • गरमागरम खिचडी कैरीची कढी किंव्हा टोमाटो सार बरोबर वाढावी


Thursday, March 28, 2013

Rice Vegetable Ring (राइस व्हेजीटेबल रिंग)

जरा हटके अशी ही बिर्यानी आहे ...नक्की करून बघा.




Read this recipe in English.........click here.

साहित्य:
राइस बनवण्यासाठी:
  • उकडलेले चणे- १/४ कप
  • शिजवलेला भात- २ कप
  • लिंबाचा रस- २ टीस्पून
  • बारीक चिरलेला लसूण- १/२ टीस्पून
  • मिक्स हर्ब्स- १ टीस्पून
  • मीर पूड- १ टीस्पून
  • ऑलिव तेल- २ टीस्पून
  • मीठ चवीनुसार
व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी:
  • कांद्याच्या रिंगा- ४
  • १/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेला कांदा - १/४ कप
  • टोमाटो स्लाइस- ४
  • १/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - १/४ कप
  • २ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - ४ चौकोन
  • बेबी कॉर्न- ४ (१ इंचाच्या तुकड्यात कापावी)
  • गाजर- १ (१/४ इंचाच्या तुकड्यात कापावे)
ग्रेव्ही बनवण्यासाठी :
  • बारीक कापलेला कांदा- १/२ कप
  • बारीक कापलेला टोमाटो- १/२ कप
  • लसूण पाकळ्या- ८
  • दालचिनी- १/२ इंचाचा तुकडा
  • लाल मिरची पूड - १ टीस्पून
  • साखर- १/४ टीस्पून
  • मिरी पूड- १/२ टीस्पून
  • ऑलिव तेल- २ टेबलस्पून
  • किसलेले प्रोसेस्ड चीज- १/२ कप
  • ऑलिव स्लाइस - ५ 
  • मीठ चवीप्रमाणे 

कृती:
  • एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, कापलेला कांदा व लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात टोमाटो आणि मीठ टाकावे. टोमाटो मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यात मिरची पूड, मीर पूड, मिक्स हर्ब्स आणि साखर टाकून अजून थोडे परतून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे. ग्रेव्ही तयार....
  • एका बाउल मध्ये वर दिल्याप्रमाणे राइस बनवण्यासाठी जे साहित्य दिले आहे ते सर्व एकत्र करावे. 
  • बेबी कॉर्न ब्लांच करावे. वरील सर्व भाज्या (व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी नमूद केल्या आहेत त्या ) थोड्याश्या तेलात परतून घ्याव्यात. परतताना चवीप्रमाणे थोडे मीठ आणि मिरपूड भूभूरावी. 
  • एका ओवन प्रूफ चौकोनी डिश मध्ये वरील राइस पसरून घ्यावा. मध्यभागी एक खड्डा बनवावा. त्याच्या कडेला फोटोत दाखवल्याप्रमाणे सिमला मिरचीचा मोठा चौकोनी तुकडा, टोमाटो स्लाइस आणि बेबी कॉर्न चे तुकडे एकाआड एक लावावेत. 
  • त्या खड्ड्यात परतलेल्या उर्वरित भाज्या टाकून त्यावर ग्रेव्ही ओतावी व वर किसलेले चीज पसरावे. चार बाजूला चार कांद्याच्या रिंगा व ऑलिव चे स्लाइस ठेवावे. 
  • ५ ते ८ मिनिटे ओवन मध्ये बेक करावे. खायला तयार ....