Showing posts with label चटण्या. Show all posts
Showing posts with label चटण्या. Show all posts

Wednesday, May 18, 2016

Sukatichi Chutney (सुकट /सुका जवळा चटणी)

आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या खाल्या असतील. पण हि चटणी सुक्या जवळ्याची. मत्स्यप्रेमींची जीव्हा तृप्त करेल यात शंका नाही.



Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • सुकट /सुका जवळा /सुका कोलीम /सुंगठा - १/२  कप 
  • खवलेले ओले खोबरे- ३ ते ४ टेबलस्पून 
  • चिंचेचा घट्ट कोळ- २ टीस्पून 
  • लसुण- ४ ते ५ पाकळ्या 
  • सुक्या लाल मिरच्या, तोडुन - ३ ते ५  (किंवा लाल मिरची पूड- २ टीस्पून)
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- १ टीस्पून (ऐच्छिक)
  • पाणी- अगदी जरास /चमचाभर    

कृती:
  • सुकट निवडून, पाखडून घ्या. (सुकट ताजी, स्वच्छ, पांढरी असावी.)
  • सुकट खोलगट तव्यावर किंवा कढईत लालसर रंगावर आणि घमघमाट येईपर्यंत भाजावी चांगली चुरचुरीत भाजली गेली पाहिजे. 
  • वरील सर्व साहित्य आणि सुकट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यावे. 
  • कुठल्याही भाकरी सोबत मस्त लागते. 


टीप- ओल्या खोबऱ्याएवजी सुके खोबरे पण वापरता येईल. चव वेगळी लागेल थोडी.            

Tuesday, December 1, 2015

Alashichi Chutney (अळशीची किंवा जवसाची चटणी)

अळशी किंवा जवस हे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करते. हृदय रोग आणि कर्करोग यापासून संरक्षण करण्यासाठी मदत करते.


Read this recipe in English.....plz click here.

साहित्य:
  • अळशी किंवा जवस- १/२  कप 
  • तीळ- १/४ कप
  • मिरची पूड - २ ते ३ टिस्पून 
  • मीठ- चवीनुसार 

कृती:

  • कढईत अळशी साधारण ३-४ मिनिटे मध्यम आचेवर खमंग भाजा. थोडा रंग बदलतो. ताटलीत काढून घ्या.
  • मग तीळ सुद्धा छान खमंग भाजून घ्या.
  • सर्व थंड झाल्यावर मिरची पूड व मीठ घालून एकत्र मिक्सरला वाटून घ्या.
  • भाकरी किंवा पोळीबरोबर चटणी सर्व्ह करावी. (खाताना चटणीत थोडासा बारीक चिरलेला कांदा व थोडस तेल टाकून मिक्स करा, मस्त लागते. भाजलेल्या पापडाचा चुरा पण यात छान लागतो. )  


टीपा :
  • तीळ किंवा शेंगदाणे न वापरता फक्त अळशीची चटणी सुद्धा करू शकतो पण अळशी चवीला उग्र असते. तिचा उग्रपणा कमी करण्यासाठी  तीळ किंवा शेंगदाणे वापरतात  
  • या चटणी लसणाच्या साधारण ६ ते ८ पाकळ्या वाटून घाला. खूप मस्त लागते चटणी.   
  • तीळांसोबत किंवा तीळांऐवजी शेंगदाणे किंवा सुके खोबरे वापरू शकता. 
  • या चटणी मध्ये कढीपत्ता सुद्धा चांगला लागतो. कढीपत्ता धुवा आणि सुती कपड्यावर पसरून पूर्णपणे कोरडा होवू द्या. नंतर थोड्या तेलावर कुरकुरीत तळा. अळशी सोबत वाटून घ्या.   
  • अळशी हि अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे रोजच्या आहारात तिला समाविष्ट करावे. मी अळशी थोडी भाजून त्याची पूड करून फ्रीजमध्ये ठेवली आहे. भाजी शिजत आली कि मी अर्धा-एक चमचा मी भाजीत घालते. दाण्याच्या कुटाप्रमाणे अळशीच्या कुटाचा वापर करता येईल.         


Saturday, August 22, 2015

South Indian Tomato Chutney (दक्षिण भारतीय पद्धतीची टोमॅटो चटणी)

टोमॅटो चटणी आंबट -तिखट, मस्त चटकदार लागते. हि चटणी इडली, डोसा किंवा अगदी पराठ्याबरोबर पण मस्त लागते.



Read this recipe in English........click here. 


साहित्य:
  • टोमॅटो, चिरून- ३ मध्यम 
  • कांदा, चिरून- १/४ कप किंवा १ लहान 
  • तेल- १ टेबलस्पून
  • चणाडाळ- १ टिस्पून
  • उडीद डाळ- १ टिस्पून
  • सुक्या लाल मिरच्या (ब्याडगी), तोडून- २ ते ३
  • हिरवी मिरची, चिरून- १
  • आले, चिरून-, १/४  इंच
  • ओला नारळ, खवुन- २ टेबलस्पून किंवा भाजलेले शेंगदाणे- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
  • साखर- चिमूटभर (ऐच्छिक)
  • हिंग- १/४  टिस्पून
  • मीठ- चवीनुसार 
फोडणीसाठी:
  • तेल- १ टेबलस्पून
  • मोहरी- १  १/२  टीस्पून
  • सुकी लाल मिरची (ब्याडगी), तोडून- १
  • कढीपत्ता- ७-८ पाने 
  • हिंग- चिमूटभर

कृती:
  • एका नॉन-स्टिक पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दोन्ही डाळी मंद आचेवर लालसर रंगावर परता.  
  • त्यात हिंग, लाल मिरच्या आणि जरासं परता.
  • त्यात आले, हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून १मिनिटभर परता.  
  • त्यात टोमॅटो आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. झाकण लावून टोमॅटो मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजू द्यावे. करपू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहावे.  
  • आता त्यात साखर आणि खोबरं घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
  • मिश्रण पूर्णपणे थंड होवू द्या आणि छान एकजीव होईपर्यंत मिक्सरला वाटून घ्या. वाटण्यासाठी पाणी वापरायची गरज नाही. एका वाडग्यात चटणी काढा.
  • कढल्यात/ फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात मोहोरी टाका.
  • मोहरी तडतडल्यावर गॅस कमी करून त्यात लाल मिरची, कढीपत्ता घाला आणि काही सेकंद परता.
  • त्यात हिंग घाला आणि लगेच गॅस बंद करा. लगेचच चटणीवर फोडणी ओता, जरा वेळ झाकून ठेवा. 
  • वाढताना छान मिक्स करा आणि इडली, डोसा किंवा मेदूवडा, डाळवड्यासोबत सर्व्ह करा.
  • २-३ दिवस फ्रिजमध्ये हवाबंद डब्यात घालुन ठेवू शकता.

टिपा:
  • ओले खोबरे आणि साखर हे चटणीच्या मुळ कृती मध्ये नाही.  पण मी ते माझ्या मनाने वापरले आहेत. त्यामुळे चटणीला जरासा गोडवा येतो व तिची चव वाढते. खोबरे किंवा शेंगदाणे वापरल्यामुळे चटणी एकजीव होते. आवडत नसल्यास किंवा उपलब्ध नसल्यास नाही वापरले तरी चालेल.
  • ब्याडगी मिरची फारशी तिखट नसते पण रंगला छान असते. ब्याडगी मिरची ऐवजी काश्मिरी मिरची वापरू शकता.
  • चटणी जास्त तिखट हवी असेल तर, टोमॅटो परतताना त्यात थोडेसे लाल तिखट घालावे. सुक्या मिरच्या उपलब्ध नसतील तर ३ सुक्या मिरची ऐवजी १ टीस्पून लाल तिखट/मिरची पूड वापरली तरी चालेल.  

Tuesday, March 17, 2015

Karvand Chutney (करवंद चटणी)

बाजारात काजू, कैरी, करवंद यायला लागली कि समजावे उन्हाळा आला. आधी कच्ची करवंदे विकायला येतात आणि नंतर काळी गोड अशी पिकलेली करवंदे.  कच्ची करवंदे चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी वापरली जातात.
चला तर आज करू या चटणी .........



Read this recipe in English....click here.

साहित्य:
  • खोवलेला ताजा नारळ - १/४  कप
  • कच्ची करवंदे - १/४  कप
  • हिरव्या मिरच्या- २
  • लसूण पाकळ्या- २
  • आले- १/४  इंच तुकडा
  • चिरलेली ताजी कोथिंबीर - २ टेबलस्पून
  • साखर- एक चिमूटभर
  • मीठ- चवीनुसार
  • पाणी- आवश्यकतेनुसार 


कृती:
  • गॅसवर मिरच्या थोड्याश्या भाजून घ्याव्यात. (नाही भाजल्या तरी चालतील पण भाजल्यामुळे चटणीला खमंगपणा येतो. )  
  • वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि वाटून घ्या. (पाट्यावर वाटलेली चटणी फारच मस्त लागते.)  
  • चटणी तयार, काश्याबारोबारही खा……… 


टीप:
  • चटणीला चांगली चव हवी असेल तर फ्रोझन खोबरे वापरू नका, ताजे साहित्य वापरा.
  • करवंदा ऐवजी कैरी वापरून पण अशीच चटणी करता येते. 
  • दोन्ही फळे उन्हाळ्यात उपलब्ध असतात. पण दोन्ही चटणीची चव वेगळी लागते.  

Friday, February 27, 2015

Metkut (मेतकुट)

मेतकुट हे आपल्या स्वयंपाकघर सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून बनवता येते. मऊ भात किंव्हा खिमट/गुरगुऱ्या भात त्यावर साजूक तुप आणि मेतकुट खूप छान लागते. पूर्वीच्या काळी न्याहारीला हमखास असे खाल्ले जायचे. आजारी असताना किंव्हा परिक्षेच्या दिवसात हलका आहार म्हणून अतिशय चांगले. बाळाला भाताची पेज किंव्हा खिमट भरवताना त्यावर मेतकुट घालावे. "मेतकुट" करायलाही फार सोपे आहे. कसे ते पहा ....



Read this recipe in English...... click here.

साहित्य:
  • चणा डाळ- १ कप
  • उडीद डाळ- १/४  कप
  • तांदुळ- १/२  कप
  • गहू - १ टिस्पून
  • लाल तिखट/मिरची पूड  - २ टीस्पून
  • धणे- १ टिस्पून
  • जिरे - १ टिस्पून
  • हिंग - १ टिस्पून
  • हळद - १ टिस्पून
  • मोहोरी - १ टिस्पून
  • दालचिनी-  १ इंचाचा तुकडा 
  • काळे मिरी- २
  • लवंग- ४
  • जायफळ - अर्धे 

कृती:
  • मंद आचेवर  मिरची पूड, हिंग, जायफळ, हळद वगळता सर्व साहित्य वेगवेगळे खमंग न करपवता भाजा. 
  • ते सर्व साहित्य एकत्र करा व थंड होऊ द्या. त्यावर जायफळ किसून घाला. 
  • नंतर उर्वरित साहित्य पण त्यात घालून सर्व साहित्य मिक्सर मध्ये दळून  बारीक पूड  करा. 
  • बारीक चाळणीने चाळुन  आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा. आपण २-३ महिने हे वापरू शकता.

मेतकुट कसे खाल ……?
  • गरम भात किंव्हा मऊ भात , मेतकुट, साजूक तूप चांगले मिक्स करावे आणि गरम गरम खा. हव असल्यास भातावर लिंबाचा रस किंवा दही घाला.
  • मेतकुट, दही, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेला कांदा घालावा.  कोशिंबीर तयार. हव तर वरून फोडणी पण देऊ शकता.
  • ब्रेड बटर लावून भजा त्यावर जरास मीठ आणि मेतकुट लावा. 
  • मेतकुट पोहे बनवा.  

Tuesday, December 2, 2014

Avala Chutney (आवळा चटणी)

आयुर्वेदाप्रमाणे आवळे अत्यंत गुणकारी असतात.  ते हिवाळ्यात मिळू लागतात. चला तर मग आज साधी पण चविष्ट अशी चटणी करू या ……

Read this recipe in English.......click here.

साहित्य:
आवळ्याचे तुकडे - १/२ कप
हिरवी मिरची - १
आल, चिरून  - १ टीस्पून
कोथिंबीर, चिरून- १/४  कप
मिरे - २
साखर - चवीप्रमाणे
मीठ- चवीप्रमाणे


कृती:
सर्व साहित्य एकत्र करा आणि थोडे पाणी घालुन वाटुन घ्या.
मिरची नाही घातली तरी चालेल.

Monday, October 6, 2014

Pudina Chutney (पुदिना चटणी)

आकर्षक रंगाची आणि एकदम चटकदार अशी हि पुदिना चटणी.


Read this recipe in English.........click here.

साहित्य:
पुदीना पाने- अर्धा कप
कोथिंबीर- पाव कप
कांदा, चिरून- पाव कप
हिरव्या मिरच्या - २ ते ३
जिरे- पाव टिस्पून
लिंबू रस- १ ते २ टीस्पून
मीठ किंवा सैंधव मीठ-  चवीनुसार
साखर- एक चिमूटभर
पाणी - आवश्यकतेप्रमाणे


कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र  करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. 
हि चटणी पराठा किंवा सँडविच किंवा तंदुरी पदार्थ किंव्हा कोणत्याही तळलेल्या पदार्थासोबत वाढावी. 

टीप:
आपण सँडविच करिता हि चटणी करत असाल तर चिमूटभर मिरपूड घालावी.
हि  चटणी घट्ट हवी असेल तर त्यात वाटतानाच ब्रेडची स्लाइस घालू शकता. जास्त प्रमाणात चटणी करित असताना, ही टीप तेथे उपयुक्त आहे.  (लिंकिंग रोड,मुंबई  येथील एका सँडविच वाल्याने मला हे गुपित सांगितले आहे.)
आपण या चटणी मध्ये अर्धा टोमॅटो टाकू शकता, अधिक चवदार होईल. 
आंबट करण्यासाठी त्यात अनारदाना पावडर किंवा आमचूर पावडर टाकू  शकता.
या चटणीत एक लसूण पाकळी टाकू शकता.


आपण या चटणी पासून पुदिनावाले आलू किंवा अरबी, पुदीना पुलाव, पुदीना पराठा करू शकता.

Saturday, January 11, 2014

Thecha (ठेचा)

ठेचा ……… भाकरी, पिठलं, भरीत असाल की जोडीला ठेचा हवाच. आणि तो होतोही पटकन. भाकऱ्या करून झाल्या की तवा  गरम असतानाच  तेल घालायचं सगळे जिन्नस त्यात परतायचे. माझी आई तर तो तव्यातच ठेचून करायची, खल-बत्त्याची  पण जरूर नाही. आणि बर का हा असा ठेचून करतात म्हणूनच तर याच नाव ठेचा आहे.



 
Read this recipe in English ..........click here.

साहित्य:


  • हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (किंव्हा तुम्हाला झेपतील तेवढ्या )
  • लसुण पाकळ्या- १०
  • शेंगदाणे - १/४ कप 
  • कोथिंबीर- थोडीशी 
  • मीठ- चवीप्रमाणे 
  • तेल- १ चमचा 




कृती:
तव्यात तेल गरम करून त्यात एक एक करून सर्व जिन्नस परतउन घ्या आणि नंतर मीठ घालून ठेचा. झाल की….
भाकरीबरोबर झक्कास.
करून ठेऊ नका,  ताजा बनवा आणि ताजाच खा. फ्रीज मध्ये ठेवला तर टिकतो पण चव जाते.    






Monday, December 2, 2013

पुदिना- कोथिंबीर चटणी (टिक्का आणि कबाब स्पेशल)

ह्या प्रकारची पुदिना चटणी स्पेशली तंदुरी पदार्थ जसे टिक्का आणि कबाब बरोबर दिली जाते, मग ते शाकाहारी असोत किंव्हा मांसाहारी.  पण तुम्ही ही चटणी कश्याबरोबरही खाऊ शकता.



Read this recipe in English.......... click here.

साहित्य:
ताजी पुदिना पाने- ३/४ ते १ कप 
ताजी कोथिंबीर- १/२ कप 
कांदा,चिरून - १/४ कप 
हिरव्या मिरच्या - २
दही- १ टेबलस्पून 
साखर- चिमुटभर  
सैंधव किंव्हा साधे मीठ- चवीप्रमाणे 

कृती:
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये छान  बारीक वाटून घ्यावं.  चटणी तयार ….
गरमागरम पनीर किंव्हा चिकन टिक्का किंव्हा तंदुरी चिकनचा आस्वाद  ह्या चटकदार चटणीसोबत. 

Monday, November 11, 2013

Padavalachya Biyanchi Chutney (पडवळाच्या बियांची चटणी)

आपण नेहमी पडवळाची भाजी करताना त्याच्या बीया फेकून देतो. पण  दक्षिण भारतात  त्यापासून चटणी बनवतात. मी त्यात थोडे बदल करून हि चटणी बनवली आहे. इडली-डोश्या बरोबर नेहमीच्या चटणीला बदल म्हणून ही चटणी चांगली वाटते.



साहित्य:
पडवळाच्या बीया आतील लगद्यसह - १/२ कप 
हिरव्या मिरच्या - २ ते ३
राई - १/२ टीस्पून 
जीरे - १/४ टीस्पून 
मेथीदाणे - २ ते ३
हळद- १/४ टीस्पून 
हिंग- चिमुटभर 
तेल- १ टेबलस्पून 
चिंच- एका गोटी एवढी (किंव्हा २ टीस्पून  कोळ )
गूळ, चिरलेला- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे 
चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून 
मीठ- चवीप्रमाणे 

कृती:
एका प्यानमध्ये तेल  करून राई घालावी, तडतडली की मिरच्या, जीरे, हळद, हिंग  करावी.  त्यात बीया व लगदा आणि मीठ टाकून मंद आचेवर ३-४  परतून घ्यावा घ्यावा. थंड होऊ द्यावा. 

वरील मिश्रण, चिंचेचा कोळ, गुळ आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यावा ……… चटणी तयार.  


Saturday, August 17, 2013

नारळाची हिरवी चटणी

ही महाराष्ट्रीयन पद्धतीची मस्त रुचकर चटणी कशाबरोबरही छान लागते.


Read this recipe in English..........

साहित्य :
खवलेलं ओल खोबर - १ ते १ १/४ कप (मध्यम आकाराचा नारळ )
लसूण- ६ पाकळ्या
कोथिंबीर - १ छोटी जुडी
हिरव्या मिरच्या- ३ ते ५ (तुमच्या आवडीप्रमाणे )
कडीपत्ता - ५-६ पाने
साखर- १/२ टीस्पून
मीठ- चवीनुसार
पाणी- १/२ कप

फोडणीसाठी -
जिरे किंव्हा मोहरी - १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तेल- १ टेबलस्पून
कडीपत्ता - ५-६ पाने

सगळे साहित्य ताजे  वापरा.

कृती :
वरील सर्व साहित्य वाटून घ्या. त्यावर जिरे , हिंग व कडीपत्त्याची फोडणी ओता.
मोहरीची फोडणी  करायची असेल तर मग जिरे वाटणात घ्या.
हि चटणी डोसा, इडली मेदुवडा किंव्हा घावन सोबत छान  लागते.

हि चटणी जर जेवताना किंव्हा  बटाटा-वड्यासोबत द्यायची असेल तर कमीत कमी पाणी घालून वाटा. फोडणी घालू नका.

आवडत असेल तर  चटणीत छोटा अर्धा लिंबू पिळा.
किंव्हा १/४ कप दही चटणीत घाला.  पण मग २-३ मिरच्या जास्त घालाव्या लागतील. दह्याचा स्वाद  छान लागतो.
चटणी वाटताना पाण्याएवजीनारळाचे पाणी वापरले तर एक वेगळी चव मिळेल. 

Thursday, July 4, 2013

Chinch-Khajur Chutney (चिंच - खजुराची चटणी)

हि आंबट- गोड चटणी सगळ्या चाट पदार्थांसाठी आवश्यक आहे. ती पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी पदार्थात रंगत आणते. शिवाय भजी , सामोसा या सारख्या तळलेल्या पदार्थांची लज्जत वाढवते.




Read this recipe in English.........click here.

साहित्य:
खजूर, बिया काढून- १० ते १२
चिंच, बिया आणि दोरे काढून - १/४ कप
गुळ - १ कप
मिरची पूड- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
मीठ - चवीप्रमाणे
पाणी -४ कप

कृती:
एका स्टीलच्या, जाड  बुडाच्या भांड्यात वरील सर्व साहित्य मंद आचेवर २० मिनिटे उकळावं . थंड झाल्यावर मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्यावं. गरज असल्यास चाळणीने गळून फ्रीज मध्ये ठेवा. फ्रिझरमध्ये अशी  चटणी ६ महिने टिकू शकते.
चटणी पातळ हवी असल्यास थोडी घट्ट चटणी बाउलमध्ये काढून त्यात जरुरीप्रमाणे थोडे पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पातळ करावी. (पाणी घातलेली फार टिकणार नाही.)

ही चटणी उपवासाला पण चालेल, फक्त त्यात हिंग टाकू नका. 

Saturday, April 27, 2013

कैरीची चटणी



Read this recipe in English... 

साहित्य :

  • खवलेल ओल खोबर- १/४ कप
  • कैरीचे तुकडे, सालासकट- १/४ कप
  • हिरव्या मिरच्या - २ ते ३
  • साखर- १ टीस्पून 
  • मीठ- चवीनुसार
  • पाणी- जरुरीनुसार 


कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र वाटून चटणी तयार करावी.
मिरची आणि साखरेच प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल.

थोड्या वेगळ्या चवीसाठी ३ पाकळ्या लसूण किंव्हा अर्धा इंच आल वाटणात घालू शकता. पण एकावेळी एकतर आल तरी वापरा नाहीतर लसूण तरी वापरा. दोन्ही एकदम वापरू नका. चांगले लागत नाही.

कैरी एवजी कच्ची करवंद वापरू शकता.  ती चटणी पण फार छान लागते. 

Thursday, April 4, 2013

कच्च्या टोमाटोची चटणी



Read this recipe in English

साहित्य:

कच्चे टोमाटो - २५० ग्रॅम
हिरव्या मिरच्या - ३ ते ४ किंव्हा आवडीनुसार
राई - १ टीस्पून
जीरे- १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/२ टीस्पून
साखर- २ टेबलस्पून (टोमाटोच्या आंबट पणावर अवलंबून आहे, कमी-जास्त आवडीप्रमाणे)
दाण्याचा कुट - १/४ कप
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून किंवा आवडीनुसार
तेल- ४ ते ५ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे




कृती :

टोमाटो उकडून घ्या. उकडताना वापरलेले पाणी वापरू नका. साल काढून टोमाटोचा लगदा करून घ्या.मिरचीचे छोटे तुकडे करा. कढईत तेल गरम करून राई टाका. तडतडली की जीरे, मिरच्या, हळद हिंग टाकून थोडे परतून घ्या. त्यात टोमाटोचा लगदा टाकून परतून घ्या, साखर आणि मीठ टाकून २-३ मिनिटे वाफ द्या. दाण्याचा कुट व कोथिंबीर टाकून आचेवरून खाली उतरा. आंबट, गोड, तिखट चटणी तयार.
पराठ्या बरोबर किंव्हा ताटाच्या डाव्या बाजू साठी खमंग चटणी तयार....