Showing posts with label सुकी मासळी. Show all posts
Showing posts with label सुकी मासळी. Show all posts

Wednesday, May 18, 2016

Sukatichi Chutney (सुकट /सुका जवळा चटणी)

आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या खाल्या असतील. पण हि चटणी सुक्या जवळ्याची. मत्स्यप्रेमींची जीव्हा तृप्त करेल यात शंका नाही.



Read this recipe in English, click here.

साहित्य:
  • सुकट /सुका जवळा /सुका कोलीम /सुंगठा - १/२  कप 
  • खवलेले ओले खोबरे- ३ ते ४ टेबलस्पून 
  • चिंचेचा घट्ट कोळ- २ टीस्पून 
  • लसुण- ४ ते ५ पाकळ्या 
  • सुक्या लाल मिरच्या, तोडुन - ३ ते ५  (किंवा लाल मिरची पूड- २ टीस्पून)
  • मीठ- चवीनुसार 
  • तेल- १ टीस्पून (ऐच्छिक)
  • पाणी- अगदी जरास /चमचाभर    

कृती:
  • सुकट निवडून, पाखडून घ्या. (सुकट ताजी, स्वच्छ, पांढरी असावी.)
  • सुकट खोलगट तव्यावर किंवा कढईत लालसर रंगावर आणि घमघमाट येईपर्यंत भाजावी चांगली चुरचुरीत भाजली गेली पाहिजे. 
  • वरील सर्व साहित्य आणि सुकट एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यावे. 
  • कुठल्याही भाकरी सोबत मस्त लागते. 


टीप- ओल्या खोबऱ्याएवजी सुके खोबरे पण वापरता येईल. चव वेगळी लागेल थोडी.            

Wednesday, July 8, 2015

Fodashichi Bhaji (फोडशी/कुलुची भाजी)

फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी रायगड जिल्ह्यात ओळखली जाते. इतर भागात या भाजीची नावे वेगळी असू शकतात. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. इतर पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी ह्या दोन्ही प्रकारात करता येते. ओळखीच्या भाजीवाली कडूनच किंवा जाणकार व्यक्तीकडूनच रानभाज्या विकत घ्याव्यात, चुकीच्या भाज्या विषारी असू शकतात. 

Read this recipe in English.......click here.

# पध्दत १ (सुकट घालून)



साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
सुकट /सुका जवळा- १/२ कप
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेल्या लसूण पाकळ्या - ६ ते ८
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- २ टीस्पून
कोकम/आमसूल- ३
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून

कृती:
  • सुकट  निवडून पाण्यात किमान १५ मिनिटे भिजत घाला. नंतर पाण्यातून काढून घट्ट पिळुन घ्या.  
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात काळजीपुर्वक स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ आणि पानांच्या चुणेत माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून त्यात लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजवून पिळुन घेतलेली सुकट टाका व जराशी परतून घ्या. 
  •  नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • गरमागरम भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
.................................................................................................... ……………

# पध्दत २ (डाळ घालून)
साहित्य:
फोडशी/कुलु - १ जुडी
चणा डाळ - २ टेबलस्पून
चिरलेला कांदा- १ कप
ठेचलेला लसूण पाकळ्या - ६
राई/ मोहरी- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - २ टीस्पून (किंव्हा मिरची पूड- १ टीस्पून+ गरम मसाला- १ टीस्पून)
मीठ चवीनुसार
तेल- ३ टेबलस्पून
खवलेले ओलं खोबरं- २ टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती:
  • चणा डाळ धुवून २ तास भिजत ठेवा. 
  • भाजीच्या छोट्या जुडित आत एक कडक असा काठी सारखा भाग असतो तो काढून टाका. कधी कधी त्याला फुले/तुरे आलेले असतात, तेही काढून टाका.    
  • भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मुळाजवळ माती असते. 
  • नंतर चिरून व धुऊन घ्या. मुळे आधीच कापलेली असतात. पांढरा भाग असती तोही चिरून घ्यावा. साधारणपणे २ कप एवढी भाजी मिळेल. 
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली कि लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात हळद, हिंग आणि मसाला टाका. जरासे परता. 
  • त्यात भिजलेली डाळ व थोडे पाणी टाका. झाकण ठेऊन मंद आचेवर ५-७ मिनिटे शिजू द्या. 
  • नंतर त्यात चिरलेली भाजी व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १५ ते २० मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. 
  • भाजी शिजत असताना थोड्या थोड्या वेळाने हलवून जरुरी प्रमाणे पाणी घाला. नाहीतर भाजी खलीन करपेल. 
  • वरून ओलं खोबरं पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.

टिपा:
  • हि भाजी पातीच्या कांद्याप्रमाणे दिसते. पतीचा कांदा फार लवकर शिजतो पण ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागतो.
  • तुम्ही वरील पद्धतीने सुकट घालुन पातीच्या कांद्याची भाजी करू शकता.
  • हि भाजी किंचित कडू असते पण अगदी मेथी इतकी कडू नसते.
  • या भाजीच्या पानांची भजी पण करता येते. पालक किंवा मेथीची गोळा भजी करतो तशी.  

Wednesday, February 25, 2015

Sodyachi Khichadi (सोड्याची खिचडी /सोडे भात)

सोड्याची खिचडी किंव्हा सोडे भात कोकणात अतिशय लोकप्रिय आहे. सी. के. पी. लोकांची तर यात खासियत आहे. 



Read this recipe in English.... click here. 

वाढणी: ४
साहित्य:
  • सोडे - १/२  कप
  • तेल-  ४ ते ६  टेबलस्पून 
  • तांदूळ - २ कप (बासमती तांदूळ वापरण्याची गरज नाही, मी कोलम तांदूळ वापरते. )
  • कांदा, उभा चिरून- २ कप 
  • टोमॅटो, बारीक चिरून- १ कप
  • बटाटा- १ मोठा 
  • दालचिनी- १ इंचाचा तुकडा
  • तमालपत्र- ३
  • आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
  • हळद - १/२ टिस्पून
  • हिंग- १/२ टिस्पून
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ४ ते ५ टिस्पून 
  • ओल्या नारळाचे वाटण- २ टेबल स्पून (नाही वापरले तरी चालेल)
  • मीठ- चवीनुसार 
  • पाणी - ४ कप (तांदूळ जुना आहे की नवा यावर अवलंबून असते)
  • अंडी, उकडलेली - २
  • कोथिंबीर, बारीक चिरून - मुठभर 

कृती:
  • सोड्याचे हातानेच तोडून लहान तुकडे करा.  
  • व्यवस्थित धुवून आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवा आणि नंतर घट्ट पिळून घ्या.
  • तांदूळ धुवून बाजूला निथळत ठेवा. 
  • बटाटा सोलुन त्याचे  साधारण १ इंच लांबीचे तुकडे करा.
  • एका छोट्या कुकर मध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, दालचिनी आणि कांदा घालावा.
  • कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जरास परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परता आणि भिजवून पिळुन घेतलेले सोडे घालून १ मिनिट परता.
  • नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता. 
  • आता टोमॅटो, बटाटा घाला आणि २ मिनिटे चांगले परता.
  • नंतर तांदूळ घालून एक मिनिटभर परता.
  • पाणी आणि मीठ घाला. (नुसतेच पाणी वापरण्याऐवजी अर्धे पाणी आणि अर्धे नारळाचे दुध वापरले तर अजून मस्त चव येते.) चांगले मिक्स करावे आणि झाकण लावून कुकर बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या घ्या. (कुकरच्या बाहेरही करता येईल, गरम पाणी वापरलेत तर भात चांगला मोकळा व लवकर शिजेल. साधारण भात शिजायला १५ ते ते २० मिनिटे लागतील.) 
  • वाढताना वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. कोशिंबीर आणि उकडलेल्या अंड्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. सोबत सोलकढी उत्तम लागते.  

टीप:
सोडे म्हणजे उन्हात सुकवलेली कोलंबी. कोकणात अनेक पदार्थात सोडे वापरले जातात. अधिक माहितीसाठी "सुकी मासळी" इथे क्लिक करा. 

Friday, October 31, 2014

Sukat-Vang-Batata (सुकट वांग-बटाटा रस्सा )

लहानपनापासून सुकट मला आवडते. हि नुसतीच किंव्ह विविध भाज्यांसह व  विविध प्रकारे बनवता येते. एक प्रकार आज पाहू या.



Read this recipe in English......click here.

साहित्य:
  • सुकट / सुका जवळा- १/२  कप
  • कांदा, बारीक चिरून- १ कप
  • लसूण, ठेचून - ८ पाकळ्या
  • वांगे- १ मध्यम
  • बटाटा - १ मध्यम
  • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ टिस्पून
  • हळद - १/२ टिस्पून
  • हिंग- १/४ टिस्पून
  • कोकम/आमसुलं - ३ ते ४ (कैरी किंव्हा आंबोशीचे तुकडे पण कोकमाऐवजी वापरी शकता)
  • कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
  • तेल- ३  टेबलस्पून
  • मीठ- चवीनुसार 
कृती:
  • सुकट निवडून व्यवस्थित धुवा आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवून ठेवा आणि वापरण्यापूर्वी घट्ट दाबून पिळुन पाणी काढुन टाका.  
  • बटाटा सोलुन साधारण १ इंचाचे व वांग्याचे १. ५ इंचाचे तुकडे करा.
  • पॅनमध्ये किंव्हा छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण व कांदा घालून गुलाबी रंगावर परतावे.
  • त्यात हिंग, हळद घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मसाला व घट्ट दाबून पिळुन घेतलेली सुकट टाका आणि जर वेळ परता. 
  • त्यात वांगी, बटाटा, मीठ आणि कोकम टाका. 
  • ज्या प्रमाणात रस्सा हवा त्यानुसार थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करावे आणि कुकरच्या १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. बाहेर शिजवणार असाल तर बटाटा शिजल्यावरच कोकम टाकावे.  
  • हि भाजी वरून कोथंबीर घालून तांदूळ किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
  • जर हि सुकट कुकरमध्ये करणार नसाल तर वांग-बटाटा शिजत आल्यावरच कोकम किंव्हा इतर आंबट घाला. नाहीतर बटाटा शिजणार नाही.    
  • याच भाजीत शेवगाच्या/शेकाटाच्या शेंगा घाला, मस्त लागतात. कच्चे/हिरवे टोमॅटो पण यात छान लागतात.  
  • येथे मी सुकट वापरली आहे परंतु आम्ही अश्या प्रकारचा रस्सा सुकट, अंबाडीची सुकट, सोडे किंव्हा ताजी कोलंबी वापरून सुद्धा करतो.
  • सुकट वांगी, घेवडा, वाल पापडी, कांद्याची पात, बारीक मेथी इत्यादी भाज्या घालून केली जाते.


सुकट / सुका जवळा:

Friday, July 11, 2014

Sode, Vang, Batata aani Fanasachya Biyanchi Bhaji (सोडे घालून वांग, बटाटा आणि फणसाच्या बियांची भाजी)

ज्यांना सोडे आवडतात त्यांना सोडे घालून केलेला कुठलाही पदार्थ चांगला लागतो ……… आणि मलाही सोडे फार आवडतात. तुम्ही पण करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल.


Read this recipe in English....... click here.

साहित्य:

  • सोडे किंव्हा सुकट/सुका जवळा - १/२ कप
  • कांदा, बारीक चिरून - १ मध्यम
  • वांगे, तुकडे करून - १ मध्यम
  • बटाटा, तुकडे करून- १ मध्यम
  • फणसाच्या बिया-  १० ते १२ (उपलब्ध असतील तर)
  • भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून
  • आले-लसूण वाटण- २ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून
  • कोकम- ३ ते ४
  • तेल- ३ टेबलस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • कोथिंबीर, बारीक चिरून  - २ टेबलस्पून


कृती:

  • सोड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. पाण्यात किमान १५ मिनिटे भिजू द्या. नंतर घट्ट पिळून घ्या.
  • फणसाच्या बिया ठेचा किंव्हा मध्ये २ भागात कापून घ्या आणि सोलून घ्या.
  • छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करा.  त्यात कांदा लालसर परतून घ्या.
  • त्यात हळद, हिंग, मसाला, आले-लसुन वाटण, भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
  • त्यात सोडे टाकून जरासे परता.
  • त्यात सर्व भाज्या, कोकम व मीठ घाला. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घाला. जास्त पाणी घालू नका कारण याचा अंगासरशीच (घट्ट) रस्साच  चांगला लागतो.
  • कुकरला २-३ शिट्ट्या घ्या.  वाढताना कोथिम्बिर टाका.
  • भाकरी किंव्हा चपाती बरोबर मस्त लागतं.


टीप: सोड्या ऐवजी सुकट/सुका जवळा घालून सुद्धा हि भाजी खूप मस्त लागते. करायची अगदी हीच पद्धत आहे. पण सुकट घालत असाल तर रस्सा न ठेवता सुकीच करावी, खोबऱ्याचे वाटण घालू नये.

(भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- सुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत गडद तपकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे. हे वाटण फ्रिझरला ठेवले तर २-३ महिने व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही खमंग भाजलेले खोबरे वाटले जाते, पटकन भरड वाटणे अन्यथा तेल सुटते. जास्त दिवस टिकते. फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.)
   

Friday, April 4, 2014

Sukatichi Koshimbir/Chirmur (सुकटीची कोशिंबीर/किसमुर)

काही म्हणतात भाजलेली मसाला सुकट, तर काही सुकटीची कोशिंबीर. गोवा-कारवार भागात 'किसमुर' किंवा 'किसमुरी' म्हणतात, पण त्यात ओले खोबरे वापरतात. जाऊदे नावात काय आहे? ज्यांना सुकी मासळी आवडते, त्यांना हा पदार्थ आवडतोच.

 

 Read this recipe in English ..... click here. 

साहित्य :
सुकट - २ कप
कांदा, चिरलेला- १/२ कप
कोथिंबीर, चिरलेली- २ टेबलस्पून
कैरी, छोटे तुकडे करून- २ टेबलस्पून (उपलब्ध असेल तर ) किंवा आवडत असेल तर जरासा चिंचेचा कोळ
घरचा मसाला किंव्हा मिरची पूड-  १ १/२  टीस्पून
मीठ- चवीनुसार
तेल - १ १/२ ते २ टेबलस्पून

कृती: 
सुकट चाळून व निवडून घ्या.  धुऊ नका. सुकट चांगली स्वच्छ व ताजी असली पाहिजे.
लोखंडी तव्यात किंव्हा कढईत सुकीच लालसर रंगावर भाजून घ्या. करपऊ  नका.
 सुकट सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करा.
खायच्या वेळेलाच त्यात सुकट मिक्स करा नाहीतर ती मऊ पडेल. (हव असल्यास सुकट थोडी हाताने चुरली तरी चालेल. )
गरमागरम भाकरीसोबत वाढा.
नाचणीच्या भाकरी सोबत फक्कड लागते. हि आहे आमच्या कोकणातील लोकप्रिय न्याहरी.