Saturday, August 24, 2013

Mugdal Khichadi (मुगडाळ खिचडी)

आजारी असताना, विशेषकरून  ताप आला असेल किंव्हा पोट बिघडलं असेल. जेवण करायचा कंटाळा आला असेल किंव्हा खूप थकवा आला असेल अश्या वेळी पटकन होणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे हि खिचडी. लहान मुलांना सुद्धा भरवण्यासाठी एकदम उत्तम.


साहित्य: 
 तांदुळ- १/२  कप
 मूग डाळ- १/४ कप
जीरे- १ टीस्पून
काळी मिरी- २ ते ४ (ऐच्छिक )
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
पाणी- ३ ते ४ कप (मी इथे ३ कप वापरले आहे, ज्याप्रमाणात खिचडी पातळ व मऊ हवी आहे तसे वापरावे )
साजूक तूप - १ टीस्पून + वरून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार 
कृती:
डाळ-तांदूळ स्वच्छ धुउन, आवश्यक पाण्यात भिजत ठेवावेत. पाणी मोजून घेतल्यास तेच पाणी खिचडी बनवताना वापरता येते.

कुकरमध्ये तूप गरम करून मिरी व जीरे जरासे परतावे.  मग हिंग, डाळ-तांदुळ, पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून गॅसवर ठेवावा.
३-४ शिट्टया  झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा. कुकर उघडल्यावर रवीने थोडेसे खिचडीला घाटावे. आजारी माणसाना व लहान मुलांना खायला सोपे जाते.  गुजराती पद्धतीत खिचडीला अस थोडं घाटल जाते. आवडत नसेल तर नाही घाटले तरी चालेल.

खिचडी फार पातळ व मऊ नको असेल तर फक्त १ १/२ कप पाणी वापरावे.


ही गरमागरम खिचडी भरपूर तूप घालून लोणचे किंवा लिंबाच्या फोडीसोबत सोबत खावी. जोडीला कढी आणि पापड असेल तर सोने पे सुहागा ! काय ?

Tuesday, August 20, 2013

Gulbahar Rasgulla (गुलबहार रसगुल्ला)

माझ्या कल्पकतेतून साकारलेले हे गुलबहार रसगुल्ले उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट डेसर्ट आहे. आपल्या आयुर्वेदानुसार गुलकंद हे शरीरातील उष्णतेला कमी करत. मोठयांपासून छोट्यांपर्यंत आवडणारे रसगुल्ले गुलाबाच्या मोहक रंगात, एकदा करून पहाच.



Read this recipe in English...........click here.

साहित्य:
गाईचे दूध- १ लिटर
सफेद विनेगर- २ टेबलस्पून 
 साखर- १ १/२ कप 
पाणी- ३ कप 
रोझ इसेंस- १/२ टीस्पून 
रासबेरी रेड फूड कलर- १ चिमुटभर 
गुलकंद- २ ते ३ टीस्पून 
गुलाबाच्या पाकळ्या-  सजावटीसाठी 


कृतीः
दुध मंद आचेवर उकळवावे, उकळी आली की विनेगर टाकुन त्यास हलवत रहावे. त्यामुळे ते फाटेल. एका चाळणीवर स्वच्छ सुती कपडा पसरून ठेवा आणि गॅस वरून भांडे उतरउन लगेच त्या कपड्यावर ओतावे आणि त्याची घट्ट गठली बांधून, पिळून अतिरिक्त पाणी काढुन टाकावे. चाळणीतच किमान १५ मिनिटे तसेच ठेऊन द्यावे. 
नंतर त्यात रंग मिसळावा व चांगल्या तर्‍हेने हाताच्या तळव्याचा वापर करून मळावे. छेना (पनीर) जोपर्यंत मऊ, मलाईदार आणि सर्व गुठळ्या मोडेपर्यंत मळावे. 
नंतर त्याचे सारखे भाग करून गोळे करवे. साधारण १५ होतील. गुलकंदचे पण छोटे गोळे बनवावे. पनीरची परी करून गुलकंदची गोळी मध्ये भरून पुन्हा गोळे वळून घ्यावेत
पाण्यातरोझ इसेंस व साखर मिळवावी. उकळवे, उकळ आला कि लगेच त्यात गोळे हळुच त्यात टाकुन ५ मिनीटे मोठ्या आचेवर उकळवावे. आता रसगुल्ले तरंगायला लागतील. त्यानंतर झाकण ठेऊन अजून ५ मिनीटे मोठ्या आचेवर उकळवावे. रसगुल्ले तयार ……. 
रसगुल्ले काढुन गुलाब पाकळ्यांनी सजउन थंड करावे, नंतर वाढावे.

टीप:
  • रसगुल्ले साखरेच्या पाकात उकळल्यावर आकाराने दुप्पट होतात. म्हणून रसगुल्ले बनवताना आकाराचे भान ठेवा. शिवाय त्यानुसार उकळण्यासाठी मोठे भांडे घ्या.
  • छेना तुम्ही जेवढं जास्त वेळ मळाल तेवढे रसगुल्ले हलके आणि स्पॉन्जी बनतील. 
  • साखरेचा पाक गुलाबजाम प्रमाणे घट्ट बनवू नये. 

Saturday, August 17, 2013

नारळाची हिरवी चटणी

ही महाराष्ट्रीयन पद्धतीची मस्त रुचकर चटणी कशाबरोबरही छान लागते.


Read this recipe in English..........

साहित्य :
खवलेलं ओल खोबर - १ ते १ १/४ कप (मध्यम आकाराचा नारळ )
लसूण- ६ पाकळ्या
कोथिंबीर - १ छोटी जुडी
हिरव्या मिरच्या- ३ ते ५ (तुमच्या आवडीप्रमाणे )
कडीपत्ता - ५-६ पाने
साखर- १/२ टीस्पून
मीठ- चवीनुसार
पाणी- १/२ कप

फोडणीसाठी -
जिरे किंव्हा मोहरी - १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
तेल- १ टेबलस्पून
कडीपत्ता - ५-६ पाने

सगळे साहित्य ताजे  वापरा.

कृती :
वरील सर्व साहित्य वाटून घ्या. त्यावर जिरे , हिंग व कडीपत्त्याची फोडणी ओता.
मोहरीची फोडणी  करायची असेल तर मग जिरे वाटणात घ्या.
हि चटणी डोसा, इडली मेदुवडा किंव्हा घावन सोबत छान  लागते.

हि चटणी जर जेवताना किंव्हा  बटाटा-वड्यासोबत द्यायची असेल तर कमीत कमी पाणी घालून वाटा. फोडणी घालू नका.

आवडत असेल तर  चटणीत छोटा अर्धा लिंबू पिळा.
किंव्हा १/४ कप दही चटणीत घाला.  पण मग २-३ मिरच्या जास्त घालाव्या लागतील. दह्याचा स्वाद  छान लागतो.
चटणी वाटताना पाण्याएवजीनारळाचे पाणी वापरले तर एक वेगळी चव मिळेल. 

Tuesday, August 13, 2013

Shralyachya / Dodakyachya Salanchi Chuteny/Bhaji (शिराळ्याच्या /दोडक्याच्या सालांची चटणी/भाजी)

शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. याची साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची चटणी/भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल.


Read this recipe in English............


साहित्य:
  • शिराळी - २५० ग्रॅम (आपल्याला फक्त त्यांच्या सालांचाच उपयोग करायचा आहे )
  • कांदा, चिरून - १ कप / १ मोठा
  • मिरची, कापून - ३ ते ४
  • लसुण , ठेचून - ६ पाकळ्या
  • मोहरी - १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार
  • तेल- ३ टेबलस्पून
  • खवलेला ओला नारळ- १/४ कप


कृती:
  • शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. खल-बत्ताच्या साह्याने साले कुटा. कुटताना थोडे मीठ टाका म्हणजे पाणी सुटून लवकर कुटले जाईल. 
  • हि कुटलेली चटणी एका बाउल मध्ये काढा. त्यात पाणी टाका आणि नंतर ती चटणी किव्हा ठेचा हाताने घट्ट पिळून घ्या. म्हणजे जास्तीचे मीठ निघून जाईल.
  • एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद, हिंग टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • नंतर त्यात पिळलेला ठेचा व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. मध्ये मध्ये भाजी हलवत रहा. 
  • वरून ओलं खोबर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.




Saturday, August 10, 2013

Kanak-Rajgeera Vade (कणक राजगिरा वडे)

उपवासासाठी एकदम उत्तम ……




ह्या कंदमुळाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. कोकणात याला "कणकं" किंव्हा "कणग्या" म्हणतात. अश्या अनेक प्रकारची कंदमुळ थंडी सुरु झाली कि बाजारात दिसू लागतात. आदिवासी लोक विविध प्रकारची कंदमुळे विकायला आणतात. उपवासाला चालणारी हि कंदमुळ उकडून किंव्हा निखाऱ्यावर भाजून चांगली लागतात. बटाटा आणि रताळ्याचे जसे पदार्थ बनवतो तसे याचे पदार्थ बनवायला हवेत. माझी हि प्रायोगिक रेसिपी…


उकडलेले कणक (सोलुन, किसून किंव्हा कुस्करून), त्यात मावेल एवढे राजागीरा पीठ, चवीप्रमाणे मिरची व जिऱ्याचा ठेचा,शेंगदाणा कूट, मीठ एकत्र करून मळून घ्या. साबुदाणा पिठात घोळून तळा.
उपवासाच्या चटणी सोबत किंव्हा दह्यासोबत गरम गरम खा.

वरील पाककृतीसाठी ह्या कंदमुळाऐवजी बटाटा, रताळ, अळकुडी इत्यादी कुठल्याही प्रकारची कंदमुळे वापरता येतील.






Thursday, August 8, 2013

Healthy Heart Dumplings (हेल्दी हार्ट ओटस डम्पलिंगस )





Read this recipe in English...........

साहित्य:
  • रोल ओटस- १ कप
  • पाणी - ३/४ कप
  • कांदा, बारीक चिरलेला - २ टेबलस्पून
  • आलं, बारीक चिरलेलं - १ टेबलस्पून
  • गाजर, बारीक चिरलेलं - २ टेबलस्पून
  • शिमला मिरची, बारीक चिरलेली  - १ टेबलस्पून
  • मटार - २ टेबलस्पून
  • हिरवी मिरची,बारीक चिरलेली  - ४
  • कोथिम्बिर, बारीक चिरलेली  - २ टेबलस्पून
  • खवलेल ओल खोबर - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
  • मोहरी- १ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • ऑलिव ओईल किंव्हा कुठलही तेल- ३ टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे


कृती :
  • एका प्यान मध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर  त्यात मिरची, कांदा आणि आल टाका. हळद आणि हिंग टाकून जरासं परता.  त्यात राहिलेल्या भाज्या आणि मीठ टाकून १-२ मिनिट परता. पाणी टाका आणि उकळी येऊ द्या.
  • त्यात ओटस टाका आणि व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. झाकण ठेऊन १ मिनिट वाफ काढा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडा.
  • पण एक लक्ष्यात ठेवा कि पाण्याचे प्रमाण हे ओटस पेक्षा कमीच असले पाहिजे अन्यथा मिश्रण चिकट बनेल.
  • नंतर त्यात कोथिंबीर आणि खोबर टाकून व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या .
  • त्या मिश्रणाचे सारखे गोळे करून इडली पात्रात  किंव्हा मोदक पात्रात ४ ते ५ मिनिट वाफवा. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये पण करू शकता.
  • टोमाटो केचप किंव्हा कुठल्याही चटणीसोबत गरमागरम वाढा. 


Sunday, August 4, 2013

कोकणी मटन रस्सा

सर्व मांसाहारी लोकांना आवडेल असा रस्सेदार, झणझणीत, रुचकर  मटन रस्सा. भात, भाकरी, वडे , आंबोळी किंव्हा पाव कश्याही सोबत उत्तम. बस ओरपा ……. 



साहित्य:
मटण - १ किलो
बटाटे- २ मध्यम आकाराचे 
आल-लसुण पेस्ट - ४ टीस्पून 
कांदा, चिरुन- १ मोठा 
हळद- १ टीस्पून 
हिंग- १/२ टीस्पून 
घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - ५ ते ८ टीस्पून  (आवडीनूसार कमी जास्त वापरा, मी ६ टीस्पून वापरला आहे ) 
तेल- ६ टे.स्पून 
दालचिनी- २ इंचाचा तुकडा 
काळी मिरी - ६
तमालपत्र- ६
मीठ - चवीनुसार 

वाटण-
तेल- २ टीस्पून 
खवलेल ओल  खोबर - ३/४ कप ते १ कप 
कांदा, चिरुन- १/४ कप 
लवंगा- ३
जिरे- १/२ टीस्पून 
मसाला वेलची- १

धणे- १/२ टीस्पून 
बडीशेप- १/२ टीस्पून 
खसखस- १/२ टीस्पून 
काळी मिरी- २
बाद्यान - १
जायपत्री- १ छोटी 
कोथिंबिर- १/४ कप किंव्हा मुठभर 
हिरवी मिरची- १ किंव्हा २

तेलावर सर्व खडे मसाले आणि कांदा टाकून १ मिनिट परतवा. त्यात खोबर टाकून खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर मिरची, कोथिंबीर आणि थोड पाणी टाकून बारीक वाटून घ्या.



कृती:
मटण स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. मटणाला 
हळद, हिंग, आल-लसूण पेस्ट आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा तास मुरत ठेवा. 

कढई मध्ये तेल गरम करुन त्यात कांदा आणि वर दिलेले खडे गरम मसाले गुलाबी होइस तो पर्यंत परता. 

आता मटन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता. 

त्यात पाणी व एका बटाट्याचे दोन तुकडे या प्रमाणे तुकडे करून टाका. झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या. 

मग मसाला आणि वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. ४५ ते ६० मिनिट मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
मधेमधे हलवत रहा.  हा रस्सा पातळ असतो तेव्हा जरुरीनुसार गरम पाणी टाका. झाकानावरचे टाकले तरी चालेल. ४-५ मिनिटे अजुन शिजवा. चव घेऊन मिठाचे प्रमाण पहा. 

गरमागरम भात, भाकरी, आंबोळी किंव्हा वड्यासोबत वाढा. 


हे मटन कुकरमध्ये पण शिजवता येईल. पण बाहेर केलेल्या मटणाची चव काही न्यारीच असते. 
ह्या पद्धतीने कोंबडी पण शिजवता येईल. पण लक्ष्यात ठेवा, कोंबडी शिजायला कमी वेळ लागतो. 











Friday, August 2, 2013

कोकणी वडे (कोंबडी वडे / मालवणी वडे )

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे आमच्या कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे हि कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिध्द आहे.

हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात. तुम्हाला एक गम्मत सांगू का ………चहसोबत पण मस्त लागतात. आणि करता करतानाच किती संपतात.


Read this recipe in English..........click here.


पूर्वतयारी-(वड्यासाठी पीठ बनवणे ):
साहित्य:

  • जाडा तांदूळ-१ किलो
  • चणा डाळ - १०० ग्रॅम
  • उडीद डाळ - ५० ग्रॅम
  • धणे - १ टेबलस्पून
  • जीरे -  १ टेबलस्पून
  • बडीशेप-  १ टेबलस्पून
  • मेथी दाणे - १/२ टीस्पून


कृती:
तांदूळ स्वच्छ  धुवा. निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही. तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ व हलके होतात.
पण पावसामुळे किंव्हा घाई असेल तर तांदूळ नाही धुतले तरी चालतील.
वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे  करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे. ताज्या पिठाचेच वाडे चांगले लागतात.

जर तुम्ही परदेशात राहत असाल किंव्हा तुमच्या आसपास गिरणी नसेल तर सुद्धा काही पर्याय आहेत. त्यांचा जरूर वापर करा.
१. सर्व पीठ आणि धने पूड वै. सर्व बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येइल.
२. २ कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि ६ उडदाचे पापड भिजऊन वाटून पीठ भिजवता  येईल.
३. उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान २ तास भिजवायचे आणि आलं-लसूण-कांदा-मिरची  सोबत वाटून तांदळाचे पीठ, बेसन यात एकत्र करून पीठ मळता येईल.

आता पाहू या पाककृतीचा मुख्य भाग…… 
साहित्य:

  • वड्याच पीठ - ३ कप
  • कांदा- १ मोठा
  • हिरवी मिरची- २ ते ३
  • कोथिंबीर - मुठभर
  • आलं - १/२ इंच
  • लसूण - ५ ते ६ पाकळ्या
  • हळद- १/२ टीस्पून
  • मीठ- चवीनुसार (मीठ जपून घाला, लक्षात ठेवा की हे वडे रश्यासोबत खायचे आहेत.)  
  • तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार 


कृती:

  • कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे  सगळ वाटून घ्या. (काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. कांद्यामुळे चांगली चव येतेच शिवाय पीठ आंबून येण्यास मदत होते.)
  • एका परातीत वड्याचे पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या. (पीठ घट्टच मळायला हवे, आंबवल्यावर ते सैल होते.) 
  • रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा.
  • सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ  झालेलं असेल.
  • एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे  व्यवस्थित तळून घ्या. वडे  छान  फुगतात. (पीठ खूपच मऊ होऊन वडे थापता येत नसतील तर थोडे सुके पीठ घालुन मळून घ्या.)  
  • काही लोक वडे पिवळे दिसायला हवेत म्हणून व्यवस्थित तळत नाहीत, पण असे वडे कच्चट लागतात .
  • मग वाट कसली पाहताय ……… हे गरमागरम वडे गरम झणझणीत कोंबडीच्या किंवा मटणाच्या रश्यासोबत वाढा. शाकाहारी लोकांनी अजिबात निराश व्हायला नको, काळ्या वाटाण्याच्या किंवा हरभऱ्याच्या रश्यासोबत वडे खा.  



पाककृती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

कोंबडी रस्सा: http://marathifoodfunda.blogspot.in/2014/07/malwani-kombadi-rassa.html

मटण रस्सा: http://marathifoodfunda.blogspot.in/2013/08/blog-post_3.html

Thursday, August 1, 2013

निवडीच "आंबट तिखट"




निवड म्हणजे छोटी मांदेली, छोटे बोंबील, छोटी कोलंबी किंव्हा करंदी अस सगळ मिक्स मिळत. पावसाळ्यात अश्या प्रकारची मासळी बाजारात येते.
हे सगळे छोटे मासे साफ करून घ्यायचे.
नंतर एका कढइत हे सर्व मासे, तेल, घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला, हळद, हिंग, मीठ, ठेचलेला लसूण, कोकम, मिरच्या, कोथिम्बिर टाकून मिक्स करायचं.
१५-२० मिनिटानी मसाला मुरल्यावर झाकण ठेऊन , पाणी न टाकता मंद आचेवर १० मिनिट शिजवायच. पाणी आपोआप सुटत त्याला.
आणि अंगाबरोबर रस्सा हवा असल्यास जरास पाणी शिंपडा किंवा शिजताना झाकणावर पाणी ठेवा. 
झाल आंबट तिखट तयार .......गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खा.

Pizza Sauce (पिझ्झा सॉस)

मी वेगवेगळ्या प्रकारच्या पिझ्झा सॉसच्या पाककृती वाचल्या. त्यातून मी करायला सोप्पी अशी हि पाककृती तयार केली आहे. याला लागणारे सर्व साहित्य पण बाजारात सहज उपलब्द्ध आहेत.


Read this recipe in English ............click here.

साहित्य:
  • टोमॅटो- २५० ग्रॅम
  • कापलेला कांदा - १ कप
  • लसुण पाकळ्या- ८ ते १०
  • दालचिनी तुकडा- अर्धा इंच
  • काळी मिरी - ५ ते ६
  • ओरेगानो - १ टीस्पून
  • मिरची पूड- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे
  • टोमॅटो केचप - २ टेबलस्पून
  • ऑलिव ऑइल किंव्हा बटर- ४ टेबलस्पून
  • साखर- १/४ टीस्पून (ऐच्छिक )
  • मीठ- चवीप्रमाणे

कृती:
  • एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात काळी मिरी, दालचिनी, कांदा आणि लसुण टाका. छान घ्या. कांदा गुलाबी झाल्यावर टोमाटो , मिरची पूड आणि मीठ टाका. टोमॅटो पूर्ण गळेपर्यंत शिजवा. त्यात ओरेगनो आणि साखर टाकून परतवा. पूर्ण सुक करू नका. ओलसरच राहू दे.
  • थंड झाल्यावर थोडस ऑलिव ऑइल, टोमॅटो केचप टाकून मिक्सर मध्ये त्याची पेस्ट करून घ्या.
  • हा सॉस डीप फ्रीझरला ६ महिने टिकतो.

पिझ्झा सॉस वापरून तुम्ही घरच्या घरी मस्त पिझ्झा बनवु शकता. बाजारात पिझ्झा बेस मिळतात. त्यावर हा सॉस लावून त्यावर आवडीच्या भाज्या पसरवा (उकडलेले चिकन किंवा सोसेजेस, पनीर पण वापरू शकता.) आणि मोझ्झेरेला चीज किसून घाला. वरून मिरी पूड आणि जरास ओरेगा नो टाका व प्रीहीटेड ओवन मध्ये २००°से. वर २० मी. बेक करा किंव्हा नॉन-स्टिक पॅनला जरास बटर लाऊन त्यावर सॉस, भाज्या, चीज घालून तयार केलेला पिझ्झा ठेवा. झाकण ठेवून मंद आचेवर १० मिनिटे किंव्हा चीज वितळेपर्यंत ठेवा. किंवा ब्रेड वापरून ब्रेड पिझ्झा तयार करा.